प्रीती पर्व दुसरे! भाग -१

आजपासून सुरू होतेय आपली आवडती कथामालिका प्रीती.. पर्व दुसरे!
प्रीती.. पर्व दुसरे!
भाग एक.


हॉटेल ट्युलीप. एक पंचतारंकित हॉटेल. तिथे सुरू असलेला बिझनेस अवॉर्ड फंक्शन. समोर खुर्च्यावर बसलेल्या मंडळीत कमालीची उत्सुकता.


"अँड द बेस्ट बिझनेसवूमन अवॉर्ड गोज टू.." आयोजकांच्या वाक्यासरशी बसलेल्या सगळ्यांनी श्वास रोखून धरला.


"मिस सोनिया फ्रॉम एसपी ग्रुप! गिव्ह अ बिग चिअर फॉर हर!" आयोजकांनी सोनियाचे नाव पुकारले तशा टाळयांच्या गजरात तिथे बसलेल्या सर्वांनी तिचे स्वागत केले.


सोनिया.. गहिरे निळे डोळे. चेहऱ्यावर हलकासा मेकअप अन तरीही त्यात उठून दिसणारे तिचे सौंदर्य. आधीच गुलाबी असलेल्या ओठावर लाल रंगाची लिपस्टिक फिरवलेली. अंगावरची गुलाबी साडी. नुकताच फुललेला गुलाब स्टेजवर येतोय असे वाटत होते. सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.


कोपऱ्यातील टेबलवरची एक घारी नजर अशीच तिच्यावर खिळलेली होती. डोळ्यांची पापणी न हलवता अनिमिष नेत्रानी ती नजर तिचा पाठलाग करत होती.


"मेनी मेनी काँग्रॅच्यूलेशन्स टू यू सोनिया मॅडम!" तिच्या हातात मेडल देत आयोजकांनी तिचे अभिनंदन केले.

"थँक यू! थँक यू सो सो मच! आजचा हा पुरस्कार फक्त माझा नाहीये. यासाठी माझ्या कंपनीतील माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला मोलाची साथ दिलीय त्यांच्यामुळेच मी आज इथवर पोहचलेय. तेव्हा आजचा मला मिळालेला हा पुरस्कार आमच्या एसपी ग्रुपची प्रतिनिधी म्हणून मी स्वीकारतेय. धन्यवाद!" हातात माईक घेऊन सोनिया बोलत होती.


"स्वतःचे यश स्वतःपुरते कधीच ठेवणार नाहीस तू. जुनी सवय आहे ही तुझी." कोपऱ्यातील ती नजर स्वतःशीच हसली.


"या यशात आम्हा सर्वांबरोबरच आणखी तीन व्यक्ती आहेत ज्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे एसपी ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत त्या म्हणजे आमच्या कपंनीचे पार्टनर मिस्टर मिहीर. थँक यू मिहीर!" हातातील पदक कोपऱ्यातील त्या नजरेकडे उंचावून सोनिया म्हणाली.

ओठावर स्मित आणून तो तिथे हात उंचावून उभा राहिला.

"यू डिझर्व्ह धिस. या पेक्षा आणखी मोठे यश तुझ्या पदरात पडेल." मनातच तो बोलत होता.

"आणखी दोन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे आईसमान असलेली राधामावशी आणि जिच्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती माझी लेक.. प्रीती! थँक यू बोथ ऑफ यू!"


स्टेजवरून खाली उतरून ती आपल्या टेबलजवळ गेली. तिथे बसलेल्या त्या दोन्ही स्त्रिया तिच्याकडे अभिमानाने बघत होत्या. एक पासष्ठी उलटलेली कॉटनची साडी ल्यालेली, डोळ्यात सोनियाच्या यशाचा अभिमान असलेली राधामावशी.


दुसरी पंचेवीस वर्षांची तरुणी. लॉन्ग वनपीस मध्ये खुलून आलेले तिचे सौंदर्य. केस मोकळे सोडलेले. कानात छोटेसे नाजूक हिऱ्यांचे आणि गळ्यातही त्यांना मॅच होणारी नाजूक चैन. गौरवर्णी चेहऱ्यावरचे गहिरे निळे डोळे आणि गुलाबी ओठावरचे गोड हसू. नजरेत सोनियाबद्दल असलेला नितांत आदर.

ही तरुणी होती सोनियाची लाडकी लेक प्रीती!

"अभिनंदन बाळा. हे यश तुझेच आहे." तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून कानामागे बोटे मोडत राधामावशी म्हणाली.

"हो माई. या पुरस्काराची खरी मानकरी तर तूच आहेस." तिला घट्ट मिठी मारत प्रीती म्हणाली.
तुला मिठी मारायला केव्हाचे हात शिवशीवत होते.फायनली माझे हात धन्य झाले. आता पाच मिनिटं तरी तुला सोडायचे नाहीत."

सोनिया हसत तिच्यापासून दूर झाली.

"आपण घरी नाही,बाहेर आहोत बरं का." तिच्या नाकावर टिचकी मारून ती मिहीरजवळ गेली.


"काँग्रॅच्यूलेशन्स!" तिचा हात हातात घेत तो म्हणाला.


"थँक यू." तिने मस्तपैकी स्माईल दिली.


"असा एकटा का बसलाहेस? राधामावशी आणि प्रीतीसोबत जॉईन व्हायचे होते ना? चल." म्हणून ती त्याला त्या दोघींकडे घेऊन आली.


"मिहीर, पुढच्या आठवड्यात एक छोटेखानी पार्टीचे आयोजन केले आहे."

"सक्सेस पार्टी?" मिहीर.

"हो ती तर आहेच. त्याबरोबर प्रीतीची बर्थडे पार्टीपण आहे. सोबत मला एक अनाउंसमेंट सुद्धा करायची आहे."


"कसली अनाउंसमेंट माई?" स्टार्टर वर ताव मारत प्रीतीने विचारले.


"सर्व सांगून झाले आता एवढे तरी सरप्राईज असू दे." सोनिया.

"मिहीर अंकल, तुम्हाला माहिती आहे का माई कशाबद्दल बोलतेय ते?"


"तुझ्या माईची गोष्टच न्यारी आहे. या कानाची खबर त्या कानाला कळत नाही तर मला कुठून कळणार?" मिहीर हसून म्हणाला.


"कळेल गं. एक आठवड्याचा तर प्रश्न आहे." राधामावशी.


"म्हणजे तुला ठाऊक आहे तर. ए राधाई सांग ना गं. नाहीतर उष्ट्या हातांनी तुला गुदगुल्या करेन हां." प्रीती.


"स्टॉप इट प्रीती. मोठी झालीहेस आता. पुरे हा बालिशपणा." सोनिया.


"नो वे माई. मला इतक्यात मोठं नाही व्हायचेय यार. ए सांग ना गं राधाई माईला."


"कधी कधी माईचेही ऐकायचे असते ना?" तिला आईस्क्रिम चा चमचा भरवत राधामावशी.


"काय मावशी हे? तिला का भरवत आहेस?" सोनिया.


"असू दे गं, लहान आहे अजून." राधामावशी.

सोनियाने डोक्यावर हात मारून घेतला.

"यू कॅरी ऑन सोनिया. यांचे हे नेहमीचेच आहे." मिहीर बोलला त्यावर हसून तिनेही खायला सुरुवात केली.


रीतसर कार्यक्रम पार पडल्यानंतर सोनिया, प्रीती आणि राधामावशी घरी परतले. मिहीरदेखील त्याच्या घरी गेला.

******

"काय झालं बाळा, झोप येत नाहीये का?"
राधामावशी पाणी प्यायला म्हणून स्वयंपाकघरात जायला निघाली तेव्हा तिला सोनिया सोफ्यावर बसून टीव्ही बघताना दिसली.

"हम्म! मावशी,एवढ्या वर्षात खोऱ्यानं यश तर कमावलं पण झोप मात्र पळाली ती कायमचीच." खिन्न हसून सोनियाने उत्तर दिले.


"असे काही नाहीये. थांब तुझ्या केसांना तेल लावून मस्त चंपी करून देते. छान झोप येईल तुला." असे म्हणून राधामावशीने तेलाची बाटली आणून तिचे केस मोकळे केले.


"मावशी, तू नसतीस तर कसं झालं असतं गं माझं? कुठे गेले असते मी?" तिच्या मांडीवर डोके टेकवत सोनिया म्हणाली.


"सोना, खरं सांगू? मी केवळ निमित्तमात्र आहे गं. आज तू जे आहेस ते केवळ तुझ्यामुळे आहेस. न खचता, न डगमगता तू संकटाचा सामना करत पुढे आलीस. खंबीरपणा, जिद्द, काही करून दाखवण्याची धमक तुझ्या रक्तातच आहे." तिच्या डोक्याला हळूवार मसाज करत मावशी म्हणाली.


"तुझ्या बोटात किती जादू आहे गं मावशी. असं वाटतं तू मालिश करत राहावीस आणि मी इथेच झोपी जावे." ती डोळे मिटून म्हणाली.


"मग झोप ना. मी करते की मालीश." मावशी हसून म्हणाली.


"मावशी एक विचारू?" सोनिया.

"हं."

" माझी रक्ताची माणसं मला परत भेटतील का गं?बोलताना तिचा स्वर दाटून आला.


"भेटतील की. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते पोरी. आपल्या कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात. तुझ्या घरच्यांच्या मताप्रमाणे तू चुकीचे वागले असशील तरी तुझी पुण्याई त्यांच्या वरचढ आहे. तुझे भोग लवकरच संपतील बघ." तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत राधामावशी म्हणाली.


"सोनियाऽ"

"हूं." तिने डोळे मिटूनच हुंकार भरला.

"एक सांगू?" मावशी.

"हम्म." ती.

"मिहीरच्या डोळ्यात अजूनही तूच आहेस गं."

"मावशी, नको ना तो विषय."

"तसं नाही सोना. इतकी वर्ष एकटीने आयुष्य काढलीच की. आता पुढे पाऊल टाकायला काय हरकत आहे? मोहन परत येईल अशी वेडी आशा अजूनही तुझ्या मनात आहे का?" मावशीने डोक्यावर हात फिरवत म्हटले.

"मुळात मी एकटी नाही आहे. तू आहेस की सोबत. आपली प्रीती आहे. आणखी काय हवं?"

"आम्ही आहोतच पण एक जीवभावाचा सखा लागतोच की."

"हे तू बोलतेस मावशी? तू एकटीने आयुष्य जगत होतीस. तुला कोण्या पुरुषाची गरज नाही पडली आणि मला म्हणतेस की जीवभावाचा सखा हवा."
डोळे मिटूनच ती हसली.

"तसे नाही गं. मिहीर प्रेम करतो तुझ्यावर म्हणून म्हणाले. मोहनच्या नावाचे मंगळसूत्र तूच तोडले होतेस हे तुला आठवते ना?"

"मावशी, मंगळसूत्र तोडले होते, प्रेम नाही. तू मोहनला बघितले होतेस ना? जवळून बघितले आहेस. त्याच्या डोळ्यात कधीतरी तुला माझ्याबद्दलची प्रतारणा दिसली होती का गं? त्या डोळ्यात प्रेम होते, निखळ प्रेम." ती राधामावशीकडे वळून म्हणाली.

"मावशी, मिहीरला मी आवडत असेल. कदाचित मलाही तो आवडत असेल पण माझे आवडणे वेगळे आहे गं. हे प्रेम नव्हे. किमान माझ्या बाजूने तरी नाहीच नाही. खरे प्रेम एकदाच होते अगं. जे प्रेम मोहनसाठी होते, दुसऱ्या कोणासाठी कधीच वाटणार नाही." सोनिया हळवेपणे म्हणाली.

"बरं बाई, चुकले माझे. झोप तू." राधामावशीने तिच्या केसातून पुन्हा हात फिरवायला सुरुवात केली.


क्रमश:

पुढील भाग लवकरच!
©® Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*******

प्रीती..पर्व दुसरे! ची ही सुरुवात. काळ जरा पुढे सरकलाय. या पंचवीस वर्षांच्या काळात सोनियाच्या आयुष्यात कायकाय घडले हे हळूहळू उलगडेलच. तोवर पहिला भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

*साहित्यचोरी गुन्हा आहे *
*******

🎭 Series Post

View all