प्रीती माईस पत्र

प्रीती माई


प्रीती माईस पत्र


माय माझी ही प्रेमळ,
नावातच तिच्या प्रीती
कसं सांगू माय तुला,
आठवण येते किती...

रुजे बीज हे मातीत,
धरी तग त्याचा जीव
तुची दिलास आधार,
येई आठव अतीव...

दिशा दाखवून आम्हा,
डोळी दाविला प्रकाश
पंख दिधले आम्हास,
उंच गाठण्या आकाश...

चंद्रप्रीती माई तुला,
आम्हा चांदण्याची आस
आम्हा पोरकं करून,
संपवला हा प्रवास...

खरतर पत्र लिहिण्यास कारण असावाच लागत असे काही नाही , पण नेहमीप्रमाणे आज ही तुमच्यासोबत हितगुज करावं वाटतंय.तुम्ही नेहमीच विद्यार्थी म्हणून नाही तर स्वतःच्या मुलांप्रमाणे आम्हा सगळ्यांना कधी मायेने तर कधी कठोर शिकवलं. त्यामुळे मी इथे एक विद्यार्थीनी म्हणून नाही तर तुमची मुलगी म्हणून छोटासा संवाद साधतेय.


कितीही आठवण आली तरी आम्ही रडणार नाही...
आम्ही स्ट्रॉंग बाळ आहोत तुमची...
सतत आम्हाला ही जाणीव करून दिलीत तुम्ही...
प्रत्येक संकटात लढायचं शिकवलं, रडायचं नाही आणि मुलींनी तर नाहीच नाही...

पाचवीत फ्री तासाला तुम्ही आमच्या वर्गाला आलेलात...तेव्हा वाटलंच नव्हतं की मी तुमची लाडकी होईन.. किंबहुना आज ही प्रश्न पडतो की तुम्ही माझ्या लाडक्या आहात की मी तुमची... पण जे काही आपलं नात होत... ते अतिशय सुंदर आणि अमूल्य आहे. घरचे आणि तुमच्या व्यतिरिक्त इतकं जवळच त्यानंतर आयुष्यात कुणी आलंच नाही.

पाचवीत सर आम्हाला गणित शिकवायचे पण त्यांच्या बोलण्यातून त्यांनी आम्हाला आधीच तुमची ओळख करून दिली होती. जितक्या तुम्ही स्ट्रिक्ट पण त्याहून अधिक प्रेमळ होतात. तुमच्यासोबत जेवण करणं म्हणजे आमची पर्वणीच असायची आणि तुमच्या बाजूला बसून जेवायचं म्हणजे जणू मोठाच मान होता माझ्यासाठी...

इंग्लिश इंग्लिश इंग्लिश
इंग्लिश ची काय मिषाद
इंग्लिश माझ्या खिशात

इतकं सोप्या पद्धतीने इंग्लिश तुम्ही आम्हा इंग्लिश ची भीती असणाऱ्या सगळ्या मुलांना शिकवलं. आमच्या अतरंगी मुलांसाठी नेहमी तुम्ही आमच्या बॅच चा फ्री तास घेऊन नवनवीन गोष्टी शिकवल्यात. स्वामी विवेकानंदचे विचार आम्हा प्रत्येकाच्या मनात रुजवले. आमची वाचनाची आवड निर्माण केली. इतकंच नाही तर शक्तीदायी विचार आचरणात कसे आणायचे ह्याची शिकवण दिली. आज ही ते दिवस आठवतात जे तुम्ही आमच्यासोबत शिबिरात वेगवेगळ्या विषयांवर माहिती दिलीत. नेहमी आम्हाला मोटिवेट केलंत. स्वबळावर भरारी मारण्यास शिकवलं.

पाचवी ते सातवी तुम्ही शिकवत नसताना ही सातवीत आमच्या वर्गाला इतिहास शिकवायला स्वतःहून मागवून तुम्ही घेतलं होतं. तेव्हा स्वतःला खूप स्पेशल समजू लागलो होतो आम्ही... की आमच्या शाळेची मुख्याध्यापिका असून ही तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळात वेळ आम्हाला शिकवायला येत. तुम्ही शिकवणार म्हणून नेहमी मनीचा उल्हास अगदी ओतप्रोत भरलेला असायचा.

मुळातच माझा वटवट सावित्री स्वभाव (बडबड्या) असल्याने पाठ शिकवण्याआधी मुलांनी अभ्यास करून यायचं आणि संवाद रुपात शिकवण ही पद्धत मला खूप आवडायची त्यामुळे इतर कुठला नाही पण इतिहासचा अभ्यास मी आवर्जून शिकवण्याआधीच करून येत होते आणि त्याबद्दल तुम्ही माझं नेहमीच कौतुक केलं. कधी बडबडी वरून ओरडा पण खाल्ला पण त्याशिवाय पण करमायचं नाही ना... तुमच्या सोबत चा प्रत्येक क्षण आयुष्याची आकडेमोड शिकवून गेला. प्रत्येकवेळी शाळेत तुमचं आणि सरांचं असणं हे खूप महत्त्वाचं वाटायचं. जणू तुम्हा दोघांशिवाय शाळा ही शाळा नाहीच.

प्रत्येक वर्गाचा वाटून दिलेला परिपाठ तुम्ही आवर्जून अटेंड केला. जिथे योग्य वाटेल तिथे भरभरून कौतुक केलं नि जिथे कमी जाणवली ती देखील स्पष्टपणे सांगितली. त्यामुळे आयुष्याच्या परिपाठात ह्याचा मला खूप फायदा झाला.

आम्हा मुलींना फक्त बहाणा हवा असायचा तुमच्या घरी येण्याचा... मग ते गणपती, दिवाळी, ख्रिसमसच डेकोरेशन असू देत वा तुमचा किंवा सरांचं वाढदिवस , अगदी मदर्स डेला केलेलं तुमच्या सोबतच सेलिब्रेशन आज ही आठवत... सगळे घाबरायचे तुम्हाला पण मी मात्र सगळ्यात पुढे... आज ही तुमच मायेने गालावरून हात फिरवणं, माथ्यावर पा घेणं मी मिस करते. घरी बोलवून घरात बनवलेल्या मिठाई, चटपटीत अस मायेने कधी ही कुठल्या शिक्षकांनी खचितच विद्यार्थ्यांना खाऊ घातल्या असतील ज्या आम्ही तुमच्या कडे खाल्ल्या आहेत. बिनधास्त येऊन कुठल्याही डब्यात जे काही फराळ असेल सगळ्यांना वाटून निवांत तुमच्यासोबत गप्पा मारत खाणं, हे मी माझ्या आयुष्यात फक्त तुमच्या सोबत एन्जॉय केलंय. घरी वा मामाच्या घरी व्यतिरिक्त इतकी मोकळीक आणि इतकं प्रेम कुठे असतं जे मला नेहमी तुमच्या घरी तुमच्याकडून मिळालं. जेव्हा हे सगळं आठवत ना, तेव्हा मी स्वतःला खूप स्पेशल समजते.

तुम्ही कित्येक नवनवीन योजना शाळेत आणल्यात आणि यशस्वीरित्या राबवल्या देखील. मी स्वतःला नशिबवान समजते की मी त्या योजनांचा भाग होते. आणि सगळ्यांना सहभाग घ्यायला लावणं त्यासाठी तुम्ही किती मेहनत केलीत. जेव्हा वोटिंग पद्धतीने मला शाळेचं उप पंतप्रधान बनवलं होत तेव्हा स्नेह संमेलन वेळी तुमच्यासोबत स्टेजवर बसण्याचा सन्मान तुम्ही मला दिलात तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात उच्च सन्मान होता. मी त्यासाठी नेहमी तुमची मनस्वी आभारी राहीन.

सहावीत असताना पालक मिटिंग च्या वेळी माझ्या आईकडे तुम्ही मला दत्तक मागितलं होत, अर्थात हे कळण्याचं माझं वय ही नव्हतं आणि तितकीशी समज ही नव्हती पण आई आज ही गर्वाने सांगते की माझी पोरगी शाळेत तुमची किती लाडकी होती. माझ्यातल्या कला गुणांना ओळखून तुम्ही आणि सरांनी नेहमीच मला साथ दिलीत. कुठे वक्तृत्व स्पर्धा असो वा विज्ञान मेळावा... चित्रकला स्पर्धा वा इंटर स्कुल खेळण्याच्या स्पर्धा असू देत वा गणित प्रज्ञा परीक्षा... अगदी घरच्यांनी सहलीला नकार दिला तर त्यांना मानवण्यापासून आमची सहलीची फी सुद्धा तुम्ही भरली आहे. आणि आम्ही मात्र तुम्हाला शेवटच्या क्षणी वेळ ही देऊ शकलो नाही किंबहुना तशी परिस्थिती ही नव्हती पण आज ही खंत वाटते की का आला हा कोरोना... ?का गेलात तुम्ही, इतकी काय घाई होती. अजून खूप काही बोलायचं होत, सांगायचं होत.

तुम्ही रिटायर झाल्यापासून शाळेत जायला मन होत नाही. नाहीतर त्यापूर्वी कॉलेज ला गेलो तरी काही ना काही कारण काढून शनिवारी कॉलेज ला सुट्टी असली की पाउल आपोआप शाळेकडे वळायची. कित्येक मुलांची शाळेची फी, इतर स्पर्धा परीक्षा तुम्ही स्वतः भरली होती. हुशार मुलांची कदर प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांत असतेच असे नाही पण तुम्ही सगळ्यांना स्वतःची मुलं समजून सगळं केलंत.

आज प्रकर्षाने वाटत की तुम्हीच खरतर माझ्या बॅच च्या फ्रेंड्स चा दुवा होतात. आज सगळ्या पाखरांची भरारी घेतली आणि सगळे विखुरले गेले पण आमच्यात एकच गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे तुमचं आणि सरांचं प्रेम आणि शिकवण... आणि तुमचे विचारांची शिकवण ही नेहमी आम्हाला भारताचे सुजाण, सुसंस्कृत नागरिक म्हणून वागावयास पुरेशी शिदोरी आहे. आणि ती शिदोरी आम्ही नेहमी जपून ठेवू आणि पुढल्या पिढ्याना ही देत राहू.

ज्ञान दानाचे हे कार्य तुम्ही अगदी शेवटच्या श्वासपर्यंत केले त्याबद्दल तुमचे आम्ही मूल सदैव ऋणी राहू...


तुमची प्रेमाची शिदोरी नेहमी सोबत असेन
शक्तीदायी विचारांना नेहमी शिरी धरेन
तुम्हाला हात जोडून आदराचा प्रणाम करेन
कारण आम्ही तुम्हाला आमच्या मनात जपलंय...

कधी नाही आसवं डोळ्यांत येऊ देणार
संकटात ना कधी आम्ही घाबरणार
नेहमीच झाशीची राणी बनून राहणार
कारण आम्ही तुम्हाला आमच्या मनात जपलंय...

सतत प्रयत्न करू आम्ही उंच उडण्याचा
झुकुन चरणी अर्पण करू प्रणाम मानाचा
भरारी घेऊन उंच झेंडा मिरवू विजयाचा
कारण आम्ही तुम्हाला आमच्या मनात जपलंय...

प्रयत्न करू मनी नेहमी तुमची छबी जपण्याचा
तुमच्यासारखच गरजुना हात देऊ मदतीचा
विचारांची घडी पुढच्या पिढीस देण्याचा
कारण आम्ही तुम्हाला आमच्या मनात जपलंय...


तुमचीच लाडकी,
संध्या.