Mar 03, 2024
प्रेम

प्रीतबंध. भाग -६

Read Later
प्रीतबंध. भाग -६
प्रीतबंध.
भाग -सहा.

मागील भागात :-
हॉस्पिटलमध्ये आलेल्या विजयाला अभीच्या कंडिशनबद्दल कळते आणि ती त्याला भेटायला जाते. इकडे सत्याची सर्जरी जाळू असली तरी डॉक्टर सिन्हा अजूनही त्याच्या प्रकृतीबद्दल सांशक असतात.

आता पुढे.


"नो अंकल, डॉक्टर अभिजीत इज वन ऑफ द फेमस ॲज वेल फेवरेट डॉक्टर इन धिज हॉस्पिटल. त्यांच्याकडून उपचार करून घ्यायला दूरदूरचे पेशंट येतात. त्यांच्या नुसत्या बोलण्यानेच इथे आलेल्या पेशंटचा अर्धा त्रास नाहीसा होऊन जातो."

राऊंडला म्हणून आलेली डॉक्टर सीमा वरदला म्हणाली. आत येताना त्याचे बोलणे तिने ऐकले होते.


तिच्या बोलण्यामुळे वरदच्या चेहऱ्यावर आपल्या मुलाबद्दलचा अभिमान दाटून आला. विजया मात्र या चर्चेपासून दूर आपल्या भूतकाळात हरवली होती.

भूतकाळ.. मागच्या चाळीस वर्षांपूर्वीचा ते आत्तापर्यंतचा.


वरद आणि विजयच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती. घरात समृद्धी, पैसा,नोकरचाकर..सर्व सुखं पायाशी लोळण घालत होती. वरदच्या वडिलांचा छोटेखानी असलेल्या व्यवसायाने हळूहळू भक्कम पाय रोवायला सुरुवात केली होती आणि आता वरद देखील त्यांच्या व्यवसायात उतरून मदत करू लागला होता.

त्याची मेहनत, अपार कष्ट, अचूक निर्णयक्षमता या सर्वांचे फळ म्हणून व्यवसाय जगतात चांगला जम बसला होता.


सगळी सुखं पदरात असली तरी कुठेतरी काही कमी असल्याशिवाय त्या सुखाला कुठे किंमत असते? वरद आणि विजयाच्या आयुष्यचेही असेच होते. अंगणात सुखाचे झाड लडबडलेले असताना देवाने मात्र मुद्दामच त्या सुखावर काटेरी कुंपण घातले होते.

आज ऑफिसमधून वरद घरी परत आला तेव्हा नेहमी स्मितवदनाने स्वागत करणारी त्याची अर्धांगिनी विजया त्याला दारात दिसली नाही तसे काहीतरी चूकचुकल्या सारखे त्याला झाले.


"आई, विजया कुठे आहे?" आल्या आल्या त्याने सारिकाताईंना विचारले त्यावेळी त्यांच्या डोळ्यातील विखारीपणा त्याला स्पष्ट जाणवला.


"आजवर आई, आई म्हणून आमच्या मागे गोंडा घालत असणारे आता फक्त बायकोच्या नावाचा जप करताय. चांगलं आहे." एक छद्मी हसू घेऊन सारिकाताई म्हणाल्या.


"आई, मला असे नव्हते म्हणायचे, ती दिसली नाही म्हणून विचारले." तो आपल्या खोलीत हिरमुसून निघून गेला.

खरे तर आज एक मोठी डिल फायनल झाल्याच्या आनंदात तो घरी परतला होता पण आल्याआल्या आईने घेतलेल्या तोंडसुखाने त्याचा हिरमोड झाला.

त्याच्या खोलीत तो प्रवेशला तेव्हा विजया खिडकीजवळ उभे राहून बाहेर कुठेतरी बघत होती. नवरा येऊन, आपले आवरून आपल्या पाठीमागे उभा आहे याचे तिला भान नव्हते.


"विजू.." हळूच साद घालून त्याने तिला मागून मिठी मारली.


"अहो, आलात तुम्ही? माझ्या लक्षातच आले नाही." ती त्याच्याकडे वळत खाली मान घालून म्हणाली.

मान खाली असली तरी आवाजातील ओलसरपणा त्याला जाणवत होता. काहीतरी चुकीचे घडलेय आणि त्यामुळे ती दुखावली गेलीय याचा अंदाज त्याला आला होता.


"विजू, काय झालेय? आणि खिडकीतून बाहेर काय बघत होतीस?" तिच्या हनुवटीला वर उचलून धरत त्याने विचारले.


"काय बघणार? जे नशिबात नाही तेच बघत होते." केविलवाणे हसत ती परत खिडकीकडे वळली.

"तिकडे बघा, त्या आंब्याच्या झाडाकडे." खिडकीतून दिसणाऱ्या त्यांच्या बागेतील एका आंब्याच्या झाडाकडे बोट दाखवत ती म्हणाली.


"या वर्षी पहिल्यांदा त्याला मोहर आलाय. त्याचा सुगंध तुम्हाला जाणवतोय? आणि त्याच्या फांदीवर असलेले नवे घरटे तुम्हाला दिसते आहे का?"


"अगं एखाद्या पक्षाने घरटे बांधले असणार, त्यात काय एवढं?" तिच्या प्रश्नाने त्याला कसलाच अंदाज येत नव्हता.

"चिमणीचे घरटे आहे ते." ती तिकडेच पाहत बोलत होती.

"बहूतेक नवी आई असावी. तिची इवली इवली पिल्लं घरट्यात आहेत." बोलताना अश्रूचा एक थेंब तिच्या गालावर निखळला आणि तिला काय म्हणायचे आहे हे वरदच्या लक्षात आले.


"विजू.."


"त्या चिमणीचे घिरट्या मारून चोचीत दाणा घेऊन येणे आणि मग आपल्या इवल्याशा पिल्लांच्या चोचीत अलगद ते भरवणे मी मघापासून न्याहाळते आहे." ती तिच्याच तंद्रित बोलत होती.


"कुठूनतरी दाणा शोधून ती चिमणी थकून घरट्यात परतत असेल तेव्हा तिच्या पिल्लांच्या चिवचिवाटाने तिचा सर्व थकवा निघून जात असेल नाही?" ती त्याच्याकडे वळली.


"वरद, आपल्या घरात आपल्या चिमण्यांचा चिवचिवाट कधीच ऐकू येणार नाही का हो?" भरल्या डोळ्यांनी ती त्याला विचारत होती.


"आपल्याकडे तर कशाचीही कमी नाहीये. त्या चिमणीसारखं पिल्लांना सोडून दाण्याच्या शोधात मला कुठे भटकायचेदेखील नाहीये. तरी देवाने या सुखापासून माझी ओंजळ का रिती ठेवली?"


"विजू, अगं होईल सगळं नीट. तू का त्रास करून घेते आहेस?" तिच्या गालावरचे अश्रू पुसत वरद म्हणाला.


"कधी वरद? लग्नाला पाच वर्ष उलटलीत तरी आपल्या घरात अजून पाळणा हलला नाहीये. कुणास ठाऊक का, पण या महिन्यात दिवस उलटून गेले म्हणून मनात एक आस होती. तर आजच माझी पाळी आलीय." ती त्याच्या छातीवर डोके ठेवून पुन्हा रडू लागली.


"अगं, लग्नाला पाचच तर वर्ष झालीत, पंधरा नाहीत. हेही सुख येईल की आपल्या घरी." तिला मिठीत घट्ट पकडत तो म्हणाला.

तिला तो समजावत होता. तिलाच की स्वतःलाही? आई न होण्याचे दुःख तिच्या डोळ्यात दिसत होते पण बाप न होण्याचा सल त्याच्याही काळजात रुतत होताच की. बायकोची होणारी तगमग आणि बाहेर आईच्या वागण्यातील तळमळ त्याला कळत होती. त्याचे दुःख त्याने कोणाला सांगावे?


"विजू, ये बैस. दरवेळी असे रडण्याने काय होणार आहे बरं?" तिला हाताने धरून बेडवर बसवत तो म्हणाला.


"मग काय करू? मला आता नाही हो हे सगळं सहन होत. तुम्हाला मी कधीच अपत्यसुख देऊ शकत नाही आणि तेच अंतिम सत्य आहे." ती रडत म्हणाली.


"झालं तुझं बोलून?" तो थोडा चिडला.


"नाही. एक सांगायचंय मला." ती डोळे पुसत म्हणाली.


"वरद, तुम्ही ना दुसरे लग्न करा. सुंदर आहात, श्रीमंत आहात. एखादी चांगली मुलगी सहज तुमच्याशी लग्नाला तयार होईल." डोळ्यात पाणी येऊ न देता ती पुढे म्हणाली.


"विजू " त्याच्या आवाजात धार होती.

"आज बोललीस ते शेवटचं. यापुढे असे काही बोलू नकोस. माझ्या प्रेमाची हीच पारख केली आहेस का गं? भलेही कांद्यापोह्याच्या कार्यक्रमांपासून ते लग्नापर्यंत रीतसर प्रवास पार पडल्यानंतर आपल्यातील नाते सुरु झाले असेल पण तुला बघायला आलो त्याच क्षणी तुझ्या प्रेमात पडलो होतो गं मी.

देवाब्राम्हणाच्या साक्षीने गळ्यात मंगळसूत्र बांधताना तुझी साथ कधीच सोडणार नाही असे वचन तुला दिले होते. ते याचसाठी का?" तो दुखावला गेला होता.


"पण मी अशी वांझोटी.." तिचे वाक्य पूर्ण होण्याआधी त्याने तिच्या ओठावर बोट ठेवले.

"हा शब्दही उच्चारू नकोस. मला सांग विजू, जर माझ्यात काही दोष असेल नि त्यामुळे आपल्याला मूल होत नाही असे कळल्यावर तू मला सोडून देशील का?"


"असे का अभद्र बोलताय? पुरुष कसा दोषी असेल? दोष तर बायकांत असतो ना?" ती तोंडावर हात ठेवून म्हणाली.


"का? मूल फक्त एकट्या स्त्रीचेच असत नाही ना? पुरुषदेखील तेवढाच जबाबदार असतो. मग त्याच्यात देखील दोष असू शकतो ना?" तो त्याचा मुद्दा तिला पटवून देत होता.


"मी काय म्हणतेय नि तुमचं आपलं काहीतरी वेगळंच सुरु झालेय." तिने डोक्याला हात मारला.


"आपल्याला मूल नसले तरी चालेल पण यापुढे असे काही बोलायचे नाही." तिला मिठीत घेत तो म्हणाला.

"आपण पुढच्या आठवड्यात मुंबईला जाऊयात. माझा एक मित्र मोठा स्त्रीरोगतज्ञ आहे. त्याच्याकडे जाऊन आपण तपासणी करून घेऊयात आणि या वेळी दोघांचीही तपासणी करून घेऊ. ठीक आहे ना?" तिच्या केसातून हात फिरवत तो तिला शांत करत होता.

****

"विमल, तू तुझी बाकीची कामं आवरून तुझ्या खोलीत जा. आम्ही जेवण वाढून घेऊ."

रात्री जेवणाच्या टेबलवर भांडी आणून ठेवत असलेल्या त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या विमलला सारिकाताईंनी अडवले. एरवी ती सगळ्यांची जेवणं आटोपल्यावर आवरून जात असे.

"जी मोठया बाईसाहेब." त्यांची आज्ञा पाळत विमल स्वयंपाकघर आवरून बाहेर पडली.


"वरद, आम्हाला तुमच्याशी काही बोलायचे आहे." ताटात जेवण वाढत असलेल्या विजयाकडे एक कटाक्ष टाकत त्या वरदला म्हणाल्या.


"ऐकतोय." त्याने थंडपणे म्हटले.


"आम्ही एक निर्णय घेतलाय. अनायसे सगळेच एकत्र आहोत, तेव्हा सर्वांसमोर सांगावे अशी माझी इच्छा आहे." सारिकाताई.


कसला निर्णय? कळू द्या तरी." बाजूलाच बसलेले त्यांचे यजमान म्हणाले.

सारिकाताईंनी कसला निर्णय घेतला असेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//