प्रीतबंध. भाग -४

तुझ्या माझ्या हृदयाचा थेट संबंध.. प्रीतबंध.


प्रीतबंध.
भाग -चार.

मागील भागात :-
सत्याबद्दल ऐकून अभीला पॅनिक अटॅक येतो. राशी सत्याला हॉस्पिटलला घेऊन येते. तिथे तिला डॉक्टर सिन्हाकडून अभीबद्दल कळते.
आता पुढे.


"नो, त्याचे निमित्त असेल. अभीला तसा थोडा त्रास होताच." शब्द जुळवत डॉक्टर सिन्हा बोलत होते.


"डॉक्टर राशी, सर तुम्हाला बोलवत आहेत." ती त्यांना पुढे काही विचारण्यापूर्वी डॉक्टर सैनानीच्या असिस्टंटने तिला आवाज दिला.


"हॅलो डॉक्टर सिन्हा, राशी. प्लीज, दोघेही बसा आणि मी काय सांगतोय ते ऐका."


"सर, सत्या बरा आहे ना?" सैनानींचे बोलणे पुरे होण्यापूर्वी राशीने अधीरतेने विचारले.


"राशी, लिसन. मला तुझ्यापासून काही एक लपवता येणार नाही. उलट तू डॉक्टर आहेस तर मला आणखी स्पष्ट बोलावे लागेल."


"म्हणजे?" तिचा श्वास वाढला होता.


"सत्या इज इन कोमॅटिक स्टेज. वरून फारसं काही दिसत नसलं तरी मेंदूला बऱ्यापैकी इंज्युरी झालीये. त्वरित सर्जरी करावी लागेल. त्यानंतर चोवीस तासात जर का शुद्ध आली तर ठीक नाहीतर..


"नाहीतर काय सर?"

"ब्रेन डेड होण्याचे चान्सेस आहेत. असं नको व्हायला."


"नाही सर, असं काहीही होणार नाही. मी लगेच घरच्यांना बोलावून घेते."


डॉक्टर राशी, आपल्याकडे इतका वेळ नाहीये. तू त्याला वेळेत घेऊन आलीस म्हणून काही ट्रीटमेंट आपण सुरु तरी करू शकलोय. आता पुढचा वेळ मी दवडू शकत नाही.


"मग काय करू सर?" भावनाविवश होत ती.


"राशी,तुम दिल के डॉक्टर दिलसे सोचते हो और हम दिमाग के डॉक्टर दिमाग से काम लेते है. तुम सत्या की वाईफ हो तो तुम कॉन्सेन्ट लेटर पर साईन कर लो.

अभी देखील हॉस्पिटल मध्ये असेलच. त्याची सही घे. जर तो सर्जरी मध्ये बिझी असेल तर डॉक्टर सिन्हा, तुमची सही चालेल.

तुम लेटर भर दो. मै ऑपरेशन शुरु कर देता हूं. तबतक तुम अपने घरवालोंको बुला लेना."

तिच्या मनाची अवस्था हेरत डॉक्टर सैनानींनी स्वतःच तिला उत्तर दिले आणि ते परस्पर ओटी मध्ये निघूनही गेले.


"मी दुसरी सही करतोय. तू काळजी करू नकोस. सत्या यातून नक्की बाहेर येईल." तिला धीर देत डॉक्टर सिन्हानी सही केली.


"सर, मला अभीला भेटायचे आहे."


"अभीला मी हॅन्डल करतोय. त्यामुळे माझ्यावर तू तेवढा ट्रस्ट ठेवू शकतेस. इथे सध्या सत्यासाठी प्रार्थना कर आणि घरच्यांना बोलावून घे." तिला पुन्हा धीर देऊन ते कार्डीयाक डिपार्टमेंटला निघून गेले.


अभी आणि ती दोघेही नसल्यामुळे त्यांच्या डिपार्टमेंटचा पूर्ण भार डॉक्टर सिन्हावर पडला होता.

सत्यासाठी तिचा जीव तुटत होता आणि अभीसाठी काळीज. त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी भेटावे असे हजारदा मनात येऊन गेले पण सत्याजवळ थांबणे देखील गरजेचे होते.

तिने वरदला म्हणजे सत्याच्या वडिलांना कळवले होते. घरी विजयाला कळवायची मात्र हिंमत झाली नाही. विजयाला कळले तर ती हे सहन करू शकेल का याची भीती जास्त होती.

हतबल झालेली ती आपले जड आलेले डोळे मिटत तिथल्या खुर्चीवर बसली.

सत्याने तिच्या घरी लग्नासाठी घातलेली मागणी, त्यांचे लग्न, त्याच्याबद्दलचा राग राग सगळं नजरेसमोरून तरळत होते. हे सगळं असताना ती त्याच्या प्रेमात पडू शकेल असेतरी तिला कुठे कधी वाटले होते? आणि आज तिने परिधान केलेली लाल साडी त्याच्या प्रेमात पडल्याचीच साक्ष होती.


"राशी." तिच्या डोळ्यातील थेंब गालावर यायला आणि खांद्यावर एक स्पर्श व्हायला एकच गाठ पडली.


"पप्पा.." ती उठून उभी व्हायला लागली.


"अगं बस." तिला खाली बसवत तेही तिच्याजवळ बसले.


"मॉम?" तिने वरदकडे प्रश्नार्थक पाहिले.


"मी घरी गाडी पाठवली आहे. ती येईलच. डॉक्टर काय म्हणाले?"


"सर्जरी सुरु केली आहे. त्यानंतर ते सांगतील." मघाचे बोलणे त्याला पूर्ण न सांगता तिने वेळ मरून नेली.


"आणि अभी? तो त्याच्याच कामात आहे का? सत्याला भेटला की नाही?" वरदच्या प्रश्नाने तिला पुन्हा हुंदका फुटला.

"रडू नकोस अगं. माझी काहीच तक्रार नाहीये. त्यालाही त्याचे पेशंट इम्पॉर्टन्ट असतील ना? आत्ता आपण सत्यासाठी जसे इथे बसलोय, तसाच एखादा अभागी बाप त्याच्याही ओटीपुढे बसून आपल्या अस्वस्थ मनाला समजावत असेल. त्याच्या कामाचा आवाका कळतो गं मला."
तो तिला समजावत म्हणाला पण कुठेतरी सत्याजवळ अभीने असायला हवे होते असं सारखे मनात होते.


"पप्पा, अभीला त्याच्या प्रॉयारिटी कळतात पण सध्या तो स्वतःच पेशंट आहे. सत्याबद्दल ऐकून त्याला माइल्ड अटॅक आलाय." वरदच्या हातावर हात ठेवून ती म्हणाली.


"काय? तू मला फोनवर काहीच बोलली नाहीस. कसा आहे तो?"


"काय बोलणार होते? मीच अजूनपर्यंत त्याला भेटले नाहीये. डॉक्टर सिन्हा त्याच्यावर उपचार करत आहेत." ती डोळे पुसत म्हणाली.


"पप्पा, तुम्ही इथे आहात तर मी अभीकडे जाऊन येऊ?" भरल्या डोळ्यांनी तिने परवानगी मागितली. त्याने मान डोलावून होकार दिला.


"तुम्ही काळजी करू नका. मी लगेच येते. काही वाटलं तर मला लगेच कॉल करा." त्याच्याजवळून उठत ती म्हणाली.

इकडे ऑपरेशन थिएटर मध्ये सत्या, तिकडे आयसीयू मध्ये अभी.. विजया आल्यावर तिला काय उत्तर द्यायचे तेच त्याला कळत नव्हते.

*****

"अभी.." राशी अभीचा हात हातात घेऊन त्याच्याजवळ बसली होती.

तिच्या स्पर्शाने त्याने हळूवार डोळे उघडले.

रडून लाल झालेले डोळे, कोमेजलेला चेहरा.. तिच्या लग्नात ती जेवढी म्लान दिसत होती तशीच या क्षणी ती त्याला भासली. चेहऱ्यावरच्या दुःखाची तिव्रता मात्र आणखी जास्त जाणवत होती.

"सत्या.." त्याने ओठांची हालचाल करत विचारले. बोलताना किती त्रास होतोय हे तिला कळत होते. या त्रासात देखील त्याला सत्याबद्दल जाणून घ्यायचे होते.

"तो होतोय ना बरा. डॉक्टर सैनानी त्याला ट्रीट करत आहेत. तू उगाच स्वतःला त्रास करून घेतला आहेस. त्याला कळेल की त्याच्याबद्दल ऐकून तुझी ही अवस्था झाली तर आवडेल का त्याला?" त्याला दम भरत ती म्हणाली.

उत्तरादाखल त्याच्या डोळ्यातून दोन थेंब गालावर आले.

"अभी, नको ना इतका इमोशनल होऊ. सगळं ठीक होणार आहे. बरं तुझे रिपोर्ट्स बघायचेत मला. कुठे आहेत?" ती इकडेतिकडे पाहत म्हणाली.

त्याने तिच्या हातात त्याची बोटे गुंफली आणि मानेनेच नकार दिला. जणू सांगायचं होतं की, 'नको बघू, मी ओके आहे.'


"राशी? तू इथे काय करते आहेस? तुला सत्याजवळ असायला हवे ना?" डॉक्टर सिन्हा आत येत म्हणाले.


त्यांची चाहूल लागली तसे तिने अभीच्या हातातून तिचा हात हलकेच सोडवून घेतला.

"यू डोन्ट वरी. डॉक्टर अभय आणि सीमाला मी बोलावून घेतलंय. त्यामुळे अभीकडे लक्ष द्यायला मी आहे. जा तू. तुझी जास्त गरज तिथे आहे." तिच्याकडे आश्वासक नजरेने बघत ते.

तिने त्यांच्याकडे पाहिले आणि मग अभीकडे. त्यानेही नजरेने तिला जायला सांगितले. द्विधा मनस्थितीत तिची पावले सत्याच्या दिशेने निघाली.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******

🎭 Series Post

View all