प्रीतबंध. भाग -३

सत्याला काय झाले असेल?
प्रीतबंध.
भाग -तीन

मागील भागात:-

सत्याच्या ओढीने राशी तयार होऊन लवकर हॉस्पिटलला निघते. वाटेत तिला सत्याचा मेसेज येतो.
आता पुढे.


ॲप्रॉन, स्टेथो आणि बॅग घेऊन तिची कार हॉस्पिटलच्या दिशेने निघाली.

अर्ध्यात पोहचत नाही तोच तिला सत्याचा व्हॉइस मेसेज आला. आनंदाच्या भरात तिने मेसेस उघडला आणि तिच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली..

"सत्याऽऽ "


"राशी.. माय हार्टबीट! आय एम सॉरी यार, रिअली सॉरी. या क्षणी मला खूप त्रास होतोय. पण आजवर तुला दिलेला त्रास त्या पेक्षा कैक पटीने जास्त होता. तू माझ्यात गुंतते आहेस ते चांगले की वाईट मला ठरवता येत नाहीये गं.

एवढं मात्र खरं, तू माझे स्पंदन आहेस तर अभी त्या स्पंदनाचे घर. माझे हृदय आहे तो. त्याला परत तुझ्या हातात मी सोपवत आहे. माझे हृदय डायरेक्ट तुझ्याशी जुळलेय, त्याला समजून घे. त्याला कधीच अंतर देऊ नकोस."

तिने परत एकदा तो मेसेज ऐकला आणि कार बाजूला घेत थरथरत्या हाताने सत्याचा नंबर डायल केला. दोनदा पूर्ण रिंग जाऊनही तो कॉल उचलत नव्हता. तिसऱ्यांदा रिंग देताना तिच्या हृदयाची धडधड दसपटीने वाढली होती, डोळ्यात अश्रू जमा झाले होते. ते गालावर बरसणार तेवढ्यात तिचा कॉल कनेक्ट झाला.


"सत्या, वेड्यासारखा काय मेसेज पाठवला आहेस? असं काही बोलताना तुला माझा जरासुद्धा विचार आला नाही का? तू स्वतःला काय समजतोस? वाटलं तेव्हा लग्न करशील आणि वाटेल तेव्हा असे मेसेज करशील?" तिचा बांध फुटला होता.


"हॅलो मॅडम, तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय, कदाचित त्यांचा ॲक्सिडेंट झालाय. त्यांच्या शेजारी हा फोन वाजत होता म्हणून मी तो उचलला." एक अनोळखी आवाज कानावर पडताच राशीच्या पायाखालची जमीन सरकली.


"काही काय बोलताय? सत्याचा ॲक्सिडेंट कसा होईल? तो तर हॉस्पिटलला आहे ना?"


"माहिती नाही मॅडम. इथे एक कार झाडाला आदळलीय नि आत एक माणूस दिसतो आहे. मी फोन करून ॲम्ब्युलन्स बोलावली आहे आणि पोलिसांना देखील कळवले आहे. घरच्यांना कुणाला कळवावे म्हणून त्यांचा मोबाईल शोधत होतो तर तुमचा कॉल आला.


"तू..तुम्ही आता कुठे आहात?" अवसान गळालेल्या अवस्थेत तिने प्रश्न केला. त्या गृहस्थाने सांगितलेला पत्ता तिला दहा मिनिटाच्या अंतरावर होता. स्वतःवर नियंत्रण ठेवून ती त्या दिशेने निघाली.


आजूबाजूला जमलेल्या बघ्यांच्या गर्दीतून वाट काढत राशी तिथे पोहचली. झाडाला टक्कर दिल्यामुळे कारचा समोरचा भाग चेंदामेंदा झाला होता तर स्टीअरिंग वर आपटलेल्या सत्याच्या डोक्यातून रक्त आले होते.

"सत्या" तिने एक आर्त किंकाळी फोडली.


ॲम्ब्युलन्सच्या सायरनने गर्दी बाजूला झाली सत्याला घेऊन राशी आत बसली आणि ड्रायवरला ऍम्ब्युलन्स त्यांच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडे वळवायला सांगितले.


"सत्या, गेट अप मॅड. मी आले आहे, हे बघ ना, माझ्या आवडीचा लाल रंग ल्यालेय मी, फक्त तुझ्यासाठी. डोळे उघड ना रे."


तिचा विलाप सुरु होता. त्याला तिळमात्र कल्पना नव्हती. त्याच्या हृदयाची कंपने सुरु होती, पण प्रतिसाद बंद होता. तो बेशुद्ध झाला होता.


तिने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्या रक्ताने तिचे हात माखले होते.

"सत्या, हा लाल रंग माझ्या रंगात मिसळलाय, आतातरी ऊठ ना." डोळ्यातील संततधार बरसत होती.


काही न सुचून तिने मोबाईलवर एक नंबर डायल केला, जो तिनेच कधीतरी डिलिट केला होता. मोबाईल मधून नंबर गेला असला तरी मनाच्या साठवणीत अजूनही दडवून ठेवला होता.


"येस डॉक्टर राशी?" पलीकडून अभीचा आवाज आला तशी ती पुन्हा हमसून रडायला लागली.

"राशी? काय झालंय?" त्याचा रुक्ष आवाज क्षणात काळजीत बदलला.

"अभी, सत्या.."


"काय झालंय सत्याला?" अभीच्या सर्वांगाला कंप फुटला.


"ॲक्सि.. ॲक्सिडेंट." ती स्वतःला सावरत कसेबसे बोलली.

"म्हणजे फार काही सिव्हिअर नाहीये पण काही सुचत नव्हतं म्हणून तुला कॉल केला. मी हॉस्पिटलला पोहचतेच आहे, तू तेवढा.." तिला काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि ती बोलता बोलता थांबली.

"अभीऽऽ, अभी आर यू देअर? अभी तू ऐकतो आहेस ना?" तिचा स्वर कातर झाला होता. पलीकडून मात्र काहीच प्रतिसाद नव्हता.

******

"डॉक्टर अभिजीतऽऽ" बाजूने जाणाऱ्या नर्सचे लक्ष त्याच्याकडे गेले तशी ती धावत आली.

तिच्या आवाजाने वेटिंग एरियात असणारे पेशंटचे एकदोन नातेवाईक देखील धावत आले.

"प्लीज, गर्दी करू नका फक्त मला यांना केबिनमध्ये घेऊन जायला मदत करा." मदतीला आलेल्यांकडे बघत नर्स डॉक्टर सिन्हाना कॉल लावत म्हणाली.

"सर, डॉक्टर अभिजीतना बहुधा पॅनिक अटॅक आलाय.."

तिचे पुढचे काहीच न ऐकता डॉक्टर सिन्हा तातडीने अभीच्या केबिनमध्ये आले. तिथले जुनिअर डॉक्टर त्याची इसीजी करत होते. तो रिपोर्ट बघून त्यांनी लगेच टूडी इकोकार्डीओग्राफी काढला आणि तातडीने त्याला आयसीयू मध्ये शिफ्ट करण्याचे आदेश दिले.

"हॅलो सरऽऽ.."


"हॅलो डॉक्टर राशी, मी जस्ट तुला कॉल करणारच होतो. हॉस्पिटलला लवकर येऊ शकशील तर फार बरं होईल. डॉक्टर अभिजीत.." अभीला शिफ्ट करत असताना त्यांना राशीचा कॉल आला.


"सर, तो कुठे आहे? माझा फोन देखील घेत नाहीये." त्यांचे बोलणे थांबवत ती म्हणाली.


"डोन्ट बी सो पॅनिक. खरं तर मला जे सांगायचेय ते खूप इम्पॉर्टन्ट आहे पण ते असं फोनवर नाही बोलू शकणार. तू त्वरित ये मग बोलूया आपण. सत्या देखील अजून आलेला नाहीये, तो सोबत येईल तर बरंच आहे."


"सर मी आणि सत्या हॉस्पिटलला आहोत. त्याचा खूप मोठा अपघात झालाय. हार्ट इज इन गुड कंडिशन बट ही इज इन अनकॉन्शीअस स्टेट. डॉक्टर सैनानी त्याचा ब्रेन एमआरआय करत आहेत." तिचा हुंदका दाटून आला.


"ओ माय गॉड! सी राशी, डोन्ट वरी. एव्हरीथिंग विल बी फाईन, ओके. डॉक्टर सैनानी इज अ ग्रेट डॉक्टर, वी कॅन ट्रस्ट हिम. तू टेंशन घेऊ नकोस आणि शक्य होईल तर घरच्यांना बोलवून घे."

"येस सर. सर अभी.."

"मी पाच दहा मिनिटात येतोच तिकडे, मग बोलूया. ओके?" तिचा प्रश्न टाळत ते उत्तरले.

अभीची कंडिशन तशी स्थिर नव्हती. तिथल्या डॉक्टरांना काही सूचना देऊन डॉ. सिन्हा सत्या ज्या विभागात होता तिथे गेले.


"सर, अभीला काय झाले? तो का नाही आला?" डॉ. सिन्हा दिसताच राशी त्यांच्याकडे जात म्हणाली.


"आपण इथे सत्यासाठी आहोत ना? त्याच्याबद्दल डॉ. सैनानी काय सांगताहेत ते ऐकूया." त्यांनी तिच्या पाठीवर हात ठेवला.


"सर, माझ्यापासून काय लपवत आहात? मला अभीला भेटायचे आहे. काय झालंय त्याला? सांगा ना." त्यांचा हात डोक्यावर ठेवत ती म्हणाली.


"सत्याबद्दल ऐकून बहुतेक पॅनिक अटॅक आलाय त्याला." तिच्या डोक्यावरचा हात खाली घेत ते म्हणाले.


"बहुतेक?"


"म्हणजे आलाय." नजर चोरत ते म्हणाले.


"नो, त्याचे निमित्त असेल. अभीला तसा थोडा त्रास होताच." शब्द जुळवत डॉक्टर सिन्हा बोलत होते.


"डॉक्टर राशी, सर तुम्हाला बोलवत आहेत." ती त्यांना पुढे काही विचारण्यापूर्वी डॉक्टर सैनानीच्या असिस्टंटने तिला आवाज दिला.


डॉ. सैनानी काय सांगतील? वाचा पुढील भागात.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all