Feb 22, 2024
प्रेम

प्रीतबंध. भाग -२

Read Later
प्रीतबंध. भाग -२


प्रीतबंध.
भाग -२

बेडवर पहुडल्या पहुडल्या अंगाला आळोखेपिळोखे देत राशी म्हणाली आणि मग स्वतःच खुदकन हसली. आजवर त्याने तिला स्वतःहून कधी उठवले नव्हतेच मग आज तरी कसे उठवेल?

तिने स्वतःच्या डोक्यावर हात मारला अन डोळे मिटून परत कुस बदलली. अचानक पहाटेची गोड आठवण आठवून तिच्या अंगावर हलकेच मोरपीस फिरू लागले.


पहाटे सुद्धा असेच अचानक तिचे डोळे उघडले होते आणि तिला जे दिसले, तिचा श्वास क्षणभरासाठी जागेवरच थांबला होता.

सत्या.. सत्यजीत, तिचा नवरा तिच्या अगदी जवळ होता. नाईट लॅम्पच्या मंद प्रकाशात त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळली होती. जणू काही तिचे सौंदर्य तो त्याच्या डोळ्यात साठवू बघत होता.

"सत्या.." भारावून तिने साद घातली.

"राशी, मे आय हग यू?" अगदी शांत स्वरात त्याने तिला विचारले होते.

अचानक त्याने विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे तीला उमगलेच नाही, दुसऱ्या क्षणी मात्र ती अलवारपणे त्याच्या मिठीत विसावली.

"सत्या आय लव्ह यू." त्याच्या कानाशी ती हलकेच कुजबुजली.

"आय एम सॉरी डिअर." तिच्या केसातून अलगद हात फिरवत तो म्हणाला.

"फॉर व्हॉट?" त्याच्या डोळ्यात बघण्याचा प्रयत्न करत ती.

"फॉर एव्हरीथिंग, द्याट आय डन विथ यू." त्याचा स्वर भिजला होता पण त्याने तिला ते जाणवू दिले नाही.


"सत्या, मी विसरेलय सगळं. तू नको ना परत भूतकाळ मध्ये आणू. मला माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायची आहे आणि ती तुझ्यासोबत करायची आहे." त्याच्या मिठीत स्वतःला पुन्हा तिने कैद केले.

काही न बोलता तो केवळ तिच्या केसातून हात फेरत होता अन सोबतीने ते मोरपीस देखील. त्याच्या हृदयाची स्पंदने ऐकत ती तशीच मिठीत केव्हा झोपी गेली तिलाही कळले नाही.


टिक टिक..
साडेआठचा गजर कानावर पडला आणि सत्याच्या हृदयाच्या स्पंदनातून ती वास्तवात आली.

'हम्म, उठा राशी मॅडम. मनाला आवरता येत नसले तरी इतर गोष्टी आवरून तुम्हालाही हॉस्पिटल गाठायचे आहे.' स्वतःशी शब्दांची कोटी करत ती उठून बसली.


पेंगुळलेल्या डोळ्यांनी आरशासमोर उभी राहून ती स्वतःला न्याहाळत होती. नुकतीच उठल्यामुळे सुस्तावलेला चेहरा, जरासे विस्कटलेले केस.. त्यात देखील किती गोड दिसत होती ती.


आरशात बघून तिने एक भलेमोठे स्मित केले. स्वतःचा असा आनंदी, हसरा चेहरा बघून तिचे तिलाच छान वाटत होते. खरे तर कितीतरी दिवसानंतर ती स्वतःला अशी न्याहाळत होती, नव्हे असे स्वतःला बघायला गेल्या वर्षभरापासून ती विसरूनच गेली होती.

'आय लव्ह यू सत्या.' काल त्याच्या मिठीत असताना ती बोललेले शब्द परत कानात रुंजी घालू लागले आणि तिला परत हसू आले.


'खरंच का मी प्रेमात पडलेय? पुन्हा? आणि तेही सत्याच्या? असं एकदा एकावर प्रेम केल्यानंतर आणखी दुसऱ्यावर जीव जडू शकतो?' मनातील प्रश्नाने ती काहीशी गोंधळली.

या प्रश्नाचे उत्तर शोधावे याची फारशी गरज नव्हती. सत्याबद्दल काहीतरी असे खास तिला जाणवायला लागले होते. ते खास म्हणजे प्रेमच असावे असे वाटू लागले होते.

हळूवार गुणगुणत ती आवरायला गेली. आंघोळीला आज नेहमीपेक्षा जास्तच वेळ लागला. वॉर्डरोबमधून ड्रेस घेताना तिथेही रेंगाळली. हातात घेतलेला ड्रेस जागेवर ठेवत तिने कपड्यांच्या आत लपलेली एक साडी ओढून बाहेर काढली.


"माझ्या लाडक्या बायकोसाठी हे खास गिफ्ट.." लग्नाच्या पहिल्या महिन्यात सत्या तिच्यासमोर ही साडी ठेवत म्हणाला.

"आय हेट रेड कलर." एकदम रागाने ती उद्गारली होती.

"अरे? एका डॉक्टरने असं लाल रंगाला हेट केलेले कसे चालेल? इनफॅक्ट त्या रंगाच्या आणखी प्रेमात पडायला हवं. ॲटलीस्ट तुझ्यासारख्या कार्डीयॉलॉजिस्टने तरी. तुमचं कामच ते असते ना, याच्या हृदयाचे ब्लॉकेज काढा, त्याच्या हृदयाची बायपास करा. चोवीस तास रक्ताचे माहेरघर असलेल्या अवयवाशी तुम्ही खेळता, मग लाल रंगाचा एवढा राग का?"

त्याची ती अविरत सुरु असलेली बडबड आणखी पुढे ऐकण्यापेक्षा राशीने ती लाल साडी तशीच कपाटात कोंबली.


लाल रंग! न आवडण्यासारखे काय होते त्यात? उलट तिला तर हा रंग इतर रंगाहून कणभर अधिक आवडायचा. लाल रंग म्हणजे प्रेमाचा रंग, मग तिलाही तो आवडणारच ना? पण सत्याशी लग्न झाले आणि या रंगाचा नुसता रागराग यायला लागला. लग्नात नेसलेली लाल साडी, मेहंदीचा खुललेला लाल रंग, भांगेत भरलेले लाल कुंकू.. सारेच नकोसे होते.


जो रंग थेट हृदयात जपला होता, त्याच रंगाशी हृदयाने वर्षाभरापूर्वी फारकत घेतली होती आणि आज हातात परत त्याच रंगाची साडी होती.


डोळ्यात डोकावू पाहणाऱ्या अश्रुंना धुडकावून लावत राशी छानशी तयार झाली. लाल साडी, हातात छोटूसे ब्रेसलेट, ओठावर हलकेच फिरलेली लिपस्टिक. तिला आज खूप नटल्यासारखे वाटत होते आणि तरीही काहीसे अधुरेपण देखील जाणवत होते.

स्वतःला आरशात परत एकवार बघून जाणवत असलेली कमी तिने हेरली आणि मेकअप बॉक्स मधून सौभाग्याची खूण म्हणून मिरवणाऱ्या सिंदूर कांडीने माथ्यावर एक छोटीशी रेघ ओढली. आता कुठे तिला तिचा साज परिपूर्ण वाटत होता, एका विवाहितेसारखा.


"राशीऽऽ" बाहेरून आवाज आला तशी लगबगीने ती जायला वळली.

"मॉमऽऽ आले." घाईत खोलीबाहेर पडताना ती जराशी धडपडली. आणि मग पुन्हा सावरत हॉलमध्ये पोहचली.

"वाह! क्या बात है राशी? आज चक्क साडी?" तिथे असलेल्या विजयाने तिच्याकडे बघून आश्चर्याने विचारले.

"सहजच, जस्ट ॲज अ चेंज आणि खरं म्हणजे आज मनापासून नेसावीशी वाटली." राशी हसून उत्तरली.

"कधी कधी असे बदल चांगले असतात. सुदंर दिसते आहेस. लाल रंग तुझ्या अंगावर खुलतो बरं का." तिनेही हसून दिलखुलास दाद दिली.

"बरं, नाश्ता तयार आहे. ये लवकर."

"देवाला नमस्कार करून आलेच." राशी देवघराकडे वळत म्हणाली.

'किती गोड दिसतेय ही! माझ्या सत्याची चॉईस चुकीची नव्हतीच.' पाठमोऱ्या राशीकडे बघून विजया मनात म्हणाली. राशीचे खुललेले रूप बघून नकळत तिच्या ओठावर स्मित फुलले.


"मॉम, आज एकट्याच? पप्पा?" उपम्याची प्लेट हातात घेत राशीने विचारले.


"अगं, त्यांना आज लवकर जायचे होते म्हणून सत्यासोबत ते गेलेसुद्धा. तू सांग, जेवणात काय बनवू?"


"मॉम, आज काही नको. मी हॉस्पिटलच्या कँटीनमधून खाऊन घेईन. तसेही सध्या पोट अगदी टुंब भरलेय."


"अशी गं कशी तुम्ही मुलं? सत्यासुद्धा फारसं काही खाऊन गेला नाही. अभी तर काय? नुसता झोपण्यापुरता इथे राहतोय असं वाटतं आणि त्यात तूही कँटीनचे खाणार म्हणतेस. मलाही मग थोडासा स्वयंपाक करायला जीवावर येतो गं. खाणारी चार तोंड असली म्हणजे बरे वाटते."


"मॉम, आपल्या सुनेचे इतके लाड करणारी सासू मला भेटलीये हे माझे भाग्यच. पण आज थोडे लवकर निघतेय ना, म्हणून टिफिन नकोय. उद्यापासून फक्त घरचं आणि घरचंच जेवेन बघा. आता निघते मी. बाय."

ऍप्रॉन, स्टेथो आणि बॅग घेऊन तिची कार हॉस्पिटलच्या दिशेने निघाली.

अर्ध्यात पोहचत नाही तोच तिला सत्याचा व्हॉइस मेसेज आला. आनंदाच्या भरात तिने मेसेस उघडला आणि तिच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली..

"सत्याऽऽ "

काय झाले असेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//