Mar 03, 2024
प्रेम

प्रीतबंध. भाग -१

Read Later
प्रीतबंध. भाग -१
प्रीतबंध.
भाग -एक.

"डॉक्टर अभिजीत, प्लीज कम इन आयसीयू. देअर इज ॲन इमर्जन्सी."

सकाळी आठच्या राऊंडवर असताना अभिजीतला कॉल आला तसे सोबत असलेल्या ज्युनिअर डॉक्टरांवर पुढचे पेशंट सोपवून त्याने आयसीयू कडे धाव घेतली.

"सर, पेशंट नंबर फोर इज नॉट रिस्पॉंडिंग."

"आत्ताच पंधरा मिनिटांपूर्वी ठीक होता ना? असा कसा रिस्पॉन्ड करत नाही आहे?" मॉनिटर रिडींग चेक करत अभिजीत म्हणाला.

हे चॅम्प, काय झालंय?"

आयसीयूच्या बेडवर असलेल्या एका पंचवीस वर्षांच्या तरुणाशी एकतर्फी संवाद साधत अभिजीतने नर्सला पटापट औषध बदलण्याचे आदेश दिले. दोन इंजेक्शन्स, सलाईन मधून बदललेले अँटीबायोटिक्स काम करायला लागली आणि काही क्षणापूर्वी प्रतिसाद न देणाऱ्या त्या तरुणाच्या मॉनिटरवरचा बीप बीप आवाज परत सुरु झाला.

"थँक गॉड! सर मी तर घाबरलेच होते. आता कुठे माझा श्वास नॉर्मल झालाय. यू आर ग्रेट." नर्सने एक सुस्कारा टाकला तसे त्याने मंद स्मित केले.

"सिस्टर, आपण असे पॅनिक होऊन कसे चालणार ना? आपल्यावर विश्वास ठेवून दूरदूरवरची लोकं या हॉस्पिटलमध्ये येतात, तेव्हा इथल्या प्रत्येक पेशंटसाठी आपल्याला शंभर नाही तर दोनशे टक्के देताच यायला हवे. आता दर पंधरा मिनिटांनी मला अपडेट्स देत रहा, ओके?" आयसीयू मधून बाहेर पडताना तो म्हणाला.


"डॉक्टर, तुम्ही आमच्या लेकरासाठी अगदी देवासारखे धावून आलात. तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही." आयसीयूच्या बाहेर उभे असलेले पेशंटचे वडिल अभिजीतपुढे हात जोडून उभे होते.


"अहो काका, हे माझे कामच आहे, माझे हो कसले उपकार मानता? उपकार मानायचेच असतील तर त्या परमेश्वराचे माना. शेवटी करता करविता तोच आहे." त्यांचे हात हातात घेत अभिजीत म्हणाला.


"होय हो, परमेश्वर आहेच आणि सध्या तुमच्याच रूपात तो आम्हाला भेटलाय. तुमच्यामुळेच आमच्या एकुलत्या एक मुलाला जीवनदान लाभलेय." त्यांचे अश्रू वाहत होते.

त्यांच्या खांद्यावर विश्वासाचा हात ठेवून ओठावर एक गोड हास्य लेवून तो पुढे निघाला.


डॉक्टर अभिजित पाटील, वय वर्ष बत्तीस. तीन वर्षांपूर्वी सिन्हाज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रुजू झालेला
आणि आता एक यशस्वी हृदयरोगतज्ञ म्हणून नावारूपाने उदयास येत असलेला हा तरुण डॉक्टर.

पेशंटवर जीव टाकणारा, योग्य उपचार झाले पाहिजेत म्हणून नडून बसणारा हा डॉक्टर सगळ्या पेशंट्सचा लाडका नसेल तरच नवल.

मागील तीनचार वर्षात द सिन्हाज मध्ये नव्या डॉक्टरांची एक फळी रुजू झाली त्यापैकी बऱ्यापैकी हात बसल्यावर कित्येकजण आपल्या वैयक्तिक प्रॅक्टिससाठी हॉस्पिटल सोडून गेले, मात्र एक त्रिकुट अजूनही इथेच काम करत होते. इथले पेशंट त्यांच्यासाठी सर्वकाही होते आणि पेशंटसाठी हे डॉक्टर्स म्हणजे त्यांचे दैवत!

त्या त्रिकुटापैकीच एक म्हणजे अभिजीत. गोरा वर्ण, धारदार नाक, मृदुभाषी. त्याच्या नुसत्या बोलण्यानेच पेशंट अर्धा बरा होऊन जात असे. आताही त्याच्याशी बोलून आयसीयूमध्ये असणाऱ्या पेशंटच्या वडिलांना किती धीर आला होता.

त्यांच्याशी बोलून समोर जात असताना अचानक त्याचा श्वास दाटून आल्यासारखे वाटायला लागले. छातीवर हात ठेवून तोंडाने एक दीर्घ श्वास घेत स्वतःला सावरत असताना त्याच्या कानावर एक आदेशवजा आवाज आला.

"डॉक्टर अभिजीत, कम इनसाईड."

चेहऱ्यावर अचानक जमा झालेला घाम टिपत त्याने बाजूला पाहिले. 'डॉ. राम सिन्हा.' केबिनवरच्या नेमप्लेटकडे लक्ष जाताच त्याने डोक्याला हात लावला. खुद्द सिन्हा सर त्याला आत बोलवत होते.

"सॉरी सर, ते.."

"काहीही बोलू नकोस. इथे रिलॅक्सपणे बस. हे घे पाणी पी." त्याचे बोलणे मध्येच थांबवत त्यांनी त्याला आत ओढले.

"थँक यू सर." शर्टची कॉलर बटण ढिली करत तो म्हणाला.

"अभी, काय चाललंय तुझं? माझं अजिबात ऐकणार नसशील तर नाईलाजाने मला तुझ्या घरी सगळं कळवावे लागेल."

"सर.." त्याच्या आवाजात कंप होता.

"डिअर डॉक्टर, डोन्ट वरी. अजुनपर्यंत मी नाही सांगितलेय, पण तू ती वेळ येऊ देऊ नकोस. कालच मी तुला काही दिवस ब्रेक घे असे सांगितले होते आणि तरीही तू आज ऑन ड्युटी आहेस.

आणि हे काय? स्वतःचा चेहरा आरशात बघतोस की नाही? ही दाढीची वाढलेली खुंटे, डोळ्याखाली काळी वर्तुळे.. हे तुझ्या व्यक्तिमत्वाला सूट होत नाही अभी.
मी तुला स्ट्रिक्टली वॉर्न करतोय की तू लक्ष दिले नाहीस तर मी सक्तीची रजा देऊन तुला घरी बसवेन." बोलताना त्यांचा आवाज भारावला होता.

"सर, प्लीज असं काही करू नका. इथे येतो म्हणून तेवढाच जीव रमतो तरी. नाहीतर या आयुष्याचं मी काय केलं असतं?" त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले.

"अभी.."

"सर, प्लीज?"

"तू नेहमी असाच मोडता घालतोस. अभी, विसरू नकोस की तू माझा एक आवडता विद्यार्थी आणि आता आवडता डॉक्टर आहेस. आय डोन्ट वॉन्ट टू लूझ यू यंग मॅन." त्याच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवत ते म्हणाले.

"बरं ते जाऊ दे, व्हेअर इज डॉक्टर राशी?" कंठापर्यंत आलेला उमाळा बाजूला सारत त्यांनी लगेच दुसऱ्या विषयात हात घातला.

"तिची बाराची शिफ्ट आहे, सो यायचीय ती अजून." ओठावर हसू आणत तो उत्तरला.

"हम्म. अँड व्हॉट अबाऊट सत्या?" खुर्चीवर बसत डॉक्टर सिन्हा.

"त्याची दहाची शिफ्ट, तेव्हा तो काही वेळाने येईलच."

"बरं. तू थोडा वेळ आराम कर आणि नंतर तुझे पेशंट बघ." सरांनी आदेश सोडला.

"नो सर, आता मी एकदम बरा आहे. जनरल वॉर्डमध्ये एक राऊंड मारून येतो. माझ्या पेशंट्सना नजरेआड करून मला चालणार नाही." तो उठून उभा राहिला.

"सर, थँक यू व्हेरी मच." केबिनबाहेर जाता जाता अचानक मागे वळून त्याने डॉक्टर सिन्हांना एक मिठी मारली.

"आय एम ऑल्वेज विथ यू डिअर. तू मात्र हे विसरू नकोस की या हॉस्पिटलला तुझी गरज आहे, तेव्हा काळजी घे." त्याच्या पाठीवर थाप देत ते म्हणाले.

******

"सत्याऽ" झोपेत बरळत राशीने हात बाजूला टाकला आणि तिचे डोळे उघडले. बाजूला सत्या नाहीये हे बघून तिचा चेहरा उतरला.

'खडूस डॉक्टर, मला न उठवता तू गेलास देखील?'

बेडवर पहुडल्या पहुडल्या अंगाला आळोखेपिळोखे देत ती म्हणाली आणि मग स्वतःच खुदकन हसली. आजवर त्याने तिला स्वतःहून कधी उठवले नव्हतेच मग आज तरी कसे उठवेल?

तिने स्वतःच्या डोक्यावर हात मारला अन डोळे मिटून परत कुस बदलली. अचानक पहाटेची गोड आठवण आठवून तिच्या अंगावर हलकेच मोरपीस फिरू लागले.

******

कोण आहे हा सत्या? काय होती ती आठवण? आणि अभीला काय झालेय? या दोघांचे काही नाते आहे काय?
पहिल्या भागात किती प्रश्न! उत्तरांची शृंखला प्रत्येक भागात मी घेऊन येईलच की, तुम्ही तेवढे वाचत रहा.

आणि हो, नव्या कथेची नवी सुरुवात कशी वाटली नक्की सांगा.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//