प्रित तुझी माझी... ❤️भाग 40

हॉल मध्ये आल्यावर समरला धक्काच बसला, माझा आणि वीणा च नाव का लिहिलं आहे स्टेजवर? तो विणा कडे बघत होता तोपर्यंत वीणाचा स्टेज कडे लक्षच नव्हतं समर मम्मीकडे आला,..... "मम्मी माझा नाव का लिहिलं आहे स्टेजवर", मम्मी छान हसत होती,.... "कळेलच थोड्या वेळात",.

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......


वीणा कडे पण सगळ्यांचं जेवण झालं, जेवण बाहेरून मागवलं होतं, खूप मजा आली आज, सगळं व्यवस्थित झाल, जेवणाची तयारी दादा प्रकाशने केली, बाबा आई वहिनी वीणा मस्त गप्पा मारत बसले, जेवल्यानंतर सुद्धा प्रकाशने सगळ आवरल, मुल खूप खुश होती, गम्मत वाटत होती त्यांना, उद्या बाहेर जायच म्हणजे अजून मजा, वहिनी दादा मुलं बाजूच्या रूम मध्ये जायला निघाले


"उद्या लवकर जायचं आहे ह परांजपे कडे वहिनी",..... वीणा


"किती वाजेपर्यंत जायचं आहे तिकडे",..... वहिनी


" दहा वाजेपर्यंत बोलले आहेत ते",........ वीणा


"ठीक आहे आवरू लवकर आपण",......... वहिनी


बाबांनी झोपण्यासाठी गाद्या टाकल्या...


"प्रकाश इकडे ये ना तुझ्याशी थोडं काम आहे, समरचा नंबर डायल करून दे याच्यावरून",..... वीणा


प्रकाश ने फोन लावून दिला...


" हॅलो वीणा, मला वाटल आज मेहेंदी लावली आहेस, आपलं काही बोलण होत की नाही",..... समर


" सुकली बरीशी मेहंदी, तुझं झालं का जेवण",.... वीणा


"हो आमच्याकडे पण सगळी मेहंदी ची गडबड सुरू आहे, ",...... समर


" झाली का उद्याच्या कार्यक्रमाची तयारी",..... वीणा


"हो तू किती वाजता येणार आहे सकाळी",.... समर


" आम्ही दहा वाजेपर्यंत पोहोचतो तिकडे",.... वीणा


" चालेल तयार झाली की सांगा मी गाडी पाठवतो",.....समर


" आम्ही बरेच लोक आहोत, आम्ही येतो टॅक्सीने" ,.... वीणा


" नाही मी दोन गाड्या पाठवतो",..... समर


"ठीक आहे चालेल मी तयार झाली की कळवते",... वीणा


"सोहाच्या हातावर कशी काढली आहे मेहंदी काय करते आहे सोहा",..... वीणा


" नेहमीचाच कार्यक्रम आशिष शी बोलते आहे ती पण फोनवर, वीणा आपला कधी होणार आहेस असा साखरपुडा आणि लग्नाच काय प्लॅनिंग आहे",..... समर


" आज सकाळपासून तू हाच विषय का घेऊन बसला आहेस ",..... वीणा हसत होती


" अरे मग एवढी छान वातावरण तयार झाला आहे, तू मेहंदी लावली आहे आणि मी विचार पण करू नको का",.... समर


" झोप आता उद्या भेटू आपण मला तर फोन जास्त धरता येत नाही गुड नाईट ",.... वीणा


गुड नाईट.... समर


वीणा घरात आली तिच्या जागेवर येऊन झोपली, उद्याचा कार्यक्रम कसा असेल हा विचार करत होती ती, खरच समर म्हणतो तसा कधी होईल आमचा साखरपुडा,


"आपण बॅग भरायला हवी होती का आज आई ",.... वीणा


" उद्या सकाळी भरू बॅग आता चिंता करू नको डोक्याला तेल लावून देऊ का उद्या छान केस धु",..... आई


" हो चांगलं आवरणार आहे मी उद्या , नको तेल, मी झोपते",.... वीणा


सकाळी वीणा लवकर उठली, वहिनी पण लवकर आवरून आली,

" वहिनी चल आपण बॅग भरू ",..... वीणा


"ते सोहाच गिफ्ट घ्या ताई ",..... वहिनी


" हो आणि घरच्या मंडळींच गिफ्ट घेते त्याची वेगळी बॅग करू",..... वीणा


"चला आटपा सगळे पटापट, सविता फक्त चहा कर",..... आई


" अरे म्हणजे काय आता पण दहा ला पोहोचलो आणि तिकडे नाष्टा नसला म्हणजे काय करायचं",...... दादा


" अरे रमेश मग जाऊन ब्रेड घेऊन ये",... आई


" चहा ब्रेड का",.... दादा


"जरा तयारी करू दे रे सविताला, ती सारखीच किचनमध्ये बिझी असते, नाहीतर तू बनव नाश्ता ",.... आई


दादा ब्रेड घ्यायला बाहेर गेला... आई मुलांच आवरुन देत होती


सगळ्यांचे छान आवरून झालं...


परांजपेन कडे सकाळपासून कामाची गडबड सुरू होती, आजीला तर काय करून काय नाही असं झालं होतं, सगळ व्यवस्थित आहे ना ती जातीने लक्ष देत होती, मम्मी पण आज आवरून लवकर खाली आली, गेटवर सामानाच्या गाड्या येत होत्या, जास्तीचे मदतनीस आधीच आलेले होते, ते सगळं सामान पाठीमागच्या हॉल मध्ये उतरवून घेत होते, हॉलला लागूनच एक डायनिंग हॉल होता, तिथे नाश्ता ची आणि जेवणाची व्यवस्था होती, पूर्ण बंगला खूप सुंदर रित्या फुलांनी सजवलेला होता, आशिष च्या घरचे नाश्त्याला येणार नव्हते, दुपारून येणार होते लंच ला


प्रीति आवरून आलीच नऊ वाजेपर्यंत, वीणा बॅग परत एकदा चेक करत होती सगळ्यांचे संध्याकाळचे कपडे बॅगेत होते, वीणा आणि घरचे रेडी झाले तिने समर ला फोन केला, समरने दोन गाड्या पाठवल्या, सगळे गाडीत बसून परांजपेंच्या घराकडे आले, एका गाडीत आई बाबा दादा रमेश होते, अतिशय सुंदर गेटमधून गाड्या आत गेल्या, सुरेख लाॅन बंगल्याची सजावट सगळे बघतच राहिले


" खूप छान बंगला आहे हो ताई समरचा",..... वहिनी


" हो ना विणा किती छान घर आहे ग",..... प्रिति


आई बाबांना घर बघुन खूप आनंद झाला....


समर चे आई बाबा बाहेर उभे होते सगळे भेटले, आत गेले


समरने ओळख करून दिली सगळ्यांची, वीणा च्या आईबाबांनी आजी-आजोबांच्या पाया पडल्या, वीणा ने सगळ्यांच्या पाया पडल्या सगळे खूप छान भेटत होते एकमेकांना


विणा आज खूपच सुंदर दिसत होती निळ्या रंगाचा अनारकली कुर्ता तिने घातला होता सुंदर मोकळे सोडलेले केस कानात झुमके ती गाडीतून उतरली तेव्हा पासून समर तिच्याकडे बघतच होता वीणा च्या ते लक्षात आलं तिच्या चेहऱ्यावर हसू होतं


समर ने छान कुर्ता घातला होता सगळे ट्रॅडिशनल ड्रेस मध्ये होते


अभी आणि आरुला तर खूप उत्साह वाटत होता समरने अभी आरू साठी खूप चॉकलेट आणि खाऊ आणला होता


"चला इकडे या दोघांनी पटापट आपले नाव सांगा",.... आजी आजोबा खूप खुश होते मुलांना बघून


सविता वहिनी दादा प्रकाश आजी आजोबांना भेटले,


"ही कोण ग",..... आजी प्रीती कडे बघत होती


"आजी ही माझी मैत्रिण प्रीती ",..... वीणा


"प्रीती ये इकडे, ऑफिस मध्ये सोबत आहात का तुम्ही दोघी "?,....... आजी


" हो ",..... समर ने सांगितल


सगळे हसायला लागले....


"समर ला सगळी माहिती आहे वीणा तिच्या मैत्रिणी त्यांच्या ऑफिस बद्दल",.... आजी


वीणा वहिनी प्रीती जाऊन सोहाला भेटल्या ती आवरत होती


आज सोहा खूप छान दिसत होती हातावरची मेहंदी खूप छान रंगली होती तिच्या, लाल ड्रेस खूप खुलून दिसत होता,


बर झालं वीणा वहिनी तू लवकर आलीस मला सोबत झाली, वीणा ने प्रीती आणि वहिनीची सोहाशी ओळख करून दिली, आई बाबा आजी आजोबा मम्मी पप्पा सगळे छान गप्पा मारत बसले होते,


"समर सगळ्यांना आपलं घर दाखव नंतर",..... पप्पा


हो.......


दादा प्रकाश समर बोलत बसले होते


चहापाणी नाष्टा करायला सगळे मागे हॉलमध्ये गेले पप्पांच्या फोनवर फोन आला की आशिष च्या घरचे निघाले आहेत आता एकच उत्साह संचारला होता सगळीकडे


गाड्या आल्या आशिष त्याचे आई बाबा आजी आजोबा गाडीतून उतरले, सगळे आत गेले...


सोहा येवून सगळ्यांना भेटली...


आता छान तीन ग्रुप पडले होते एक आजी आजोबा दोघी बाजूचे दुसरा ग्रुप मम्मी पप्पा तिसरा ग्रुप यंग मंडळी


सगळे गप्पा मारत बसले होते


समरने आशिषला वीणाची ओळख करून दिली दादा प्रकाश वहिनी प्रीती सोहा सगळे छान बोलत होते


"आता पुढे काय करायचं लग्नाची तारीख कधी काढायची गुरुजी आले की ठरवून घेवू",...... परांजपे सर


"मुलं किती पटापट मोठे झाले नाही, मला तर खरंच वाटत नाही आहे की आम्ही आज येथे साखरपुड्याला आलो आहोत आणि लगेच लग्नाची तारीख ठरवत आहोत ",...... वीणा चे बाबा


समर केव्हापासून वीणा शी बोलायचं चान्स शोधत होता सगळ्यांमध्ये ते काही त्याला जमत नव्हतं, वीणा ला समरची धडपड समजत होती


" चला आपण सगळे घर बघु",......समर


दादा वहिनी प्रकाश प्रीती आशिष सोहा उठले सगळं घर बघून झालं सगळे वरच्या रूम मध्ये आले


"वीणा ऐक ना आज तू माझ्या शी बोलत का नाहीस",.... समर


"सगळे आहेत समर काय अस",...... वीणा


"ऐक तर, आपलं काय ठरलं होतं काल",...... समर


"काय ठरलं होतं" ,...... वीणा


"असं काय करतेस विणा तू विसरली का आपलं ठरलं होतं ना की आज आपण ठरवू कधी लग्न करायचं ते",...... समर


" समर तू उगाच माझ्या मागेमागे करून नकोस",.... वीणा


" अगं पण जरा वेळ बोल तरी माझ्याशी वीणा, मेहंदी बघू तुझी",.... समर


समर प्लीज ...... वीणा ने हात पुढे केले, खूप छान मेहंदी रंगली होती विणाची,....... मी जाते


वीणा.... अरे यार.....


प्रीती आणि वहिनी शी बोलायला वीणा पुढे निघून गेली घर बघून झालं...


दुपार झाली, लंच ला मोठा बेत होता, परांजपे कुटुंब सगळ्यांना आग्रह करत होते,


"सविता मुलांना काय हव ते बघ ह",..... परांजपे मॅडम


वीणा.. सविता वहिनी अभी आरू ला जेवायला देत होत्या,


जेवण झाल सगळे आरामशीर बसले होते,
पार्लर वाली आली तेवढ्यात,


"तयारीला लागा चला",....... आज आजी ने सगळी सूत्र हाती घेतली होती


वीणा वहिनी प्रीती सामान घेऊन वरच्या रूम मध्ये गेल्या, आई ने गेस्ट रूम मध्ये तयारी केली, आशिष च्या आई त्यांच्या सोबत होत्या


मागे बाजूच्या हॉलमध्ये साखरपुड्याची तयारी सुरू होती,


मम्मी आली आजीच्या रूममध्ये,.... "सगळ्या दागिन्यांची पर्स तुमच्याकडे ठेवा आई",...


"हो चालेल तुला जेव्हा लागेल तेव्हा सगळ माझ्याकडुन घे",...... आजी


"केव्हा द्यायचे दागिने ",....मॅडम


"वीणा आणि सोहाचे दागिने वेगवेगळे आहेत ना",.... आजी


" हो वेगवेगळे आहेत मी ठेवलेत नीट,",.....मॅडम


"सोहाचे दागिने आधीच तयारी करतांना घालून देवु आणि वीणा चे दागिने साखरपुड्याच्या साडीसोबत द्यायचे",..... आजी


सोहाचा मेक पूर्ण झाला, परांजपे मॅडम आत आल्या त्या सोहा कडे बघतच राहिल्या, आजी आली आज मुलींची दृष्ट काढावी लागेल, सुरेख अशी जांभळ्या गुलाबी साडीत सोहा खूप छान दिसत होती, परांजपे मॅडम यांनी पुढे होवुन सोहाला दागिने घातले, खूप छान झाली होती तयारी


"वीणा चल मेकअप साठी",.... मॅडम


"मम्मी मी करते माझा मेकअप ",.... वीणा


" चल ग वीणा ",..... मॅडम


वीणा चा मेकअप झाला, मुळातच सुंदर वीणा अतिशय सुंदर दिसत होती पांढरी गुलाबी साडी तिच्या वर खूपच छान दिसत होती वीणा ला समजतच नव्हतं की तिची का एवढी तयारी सुरू आहे वीणा च्या आईने वीणाला नेकलेस सेट घातला,


" आई अग हे काय कोणाचा आहे हा नेकलेस आणि कानातले",..... वीणा गडबडली होती


"आवडला ना, तुझे आहेत हे दागिने",...... आई


"काय चाललय काय",...... वीणा


परांजपे मॅडम आता आल्या त्यांनी सोन्याच्या बांगड्या वीणाच्या हातात घातल्या, हातातल्या मॅचिंग बांगड्या बरोबर मिस मॅच करून खूप छान कॉम्बिनेशन तयार झाल


परांजपे मॅडमने दोन दोन बांगड्या वहिनी आणि प्रिती ला पण दिल्या


" नाही मॅडम आम्ही नाही घेऊ शकत या सोन्याच्या बांगड्या",..... वहिनी


"चुप ग सविता घाल ग बांगड्या तू मला मुली सारखीच आहेस, मावशी म्हण मला तू, प्रीती आटोप तयार हो, तुम्हा दोघींना वीणा आणि सोहा सोबत उभं राहायचं आहे" ,...... परांजपे मॅडम


आशिष ही तयार झाला, तिकडे पप्पांनी समरला तयार व्हायला सांगितले,


सगळे मागच्या हॉल वर आले


अतिशय सुंदर वीणा कडे समर बघत राहीला, व्हाइट गुलाबी रंगाची साडी, मॅचिंग बांगड्या, ज्वेलरी, झुमके खूप छान दिसत होती, खरच हा रंग खूप छान दिसतो वीणा ला,


समर ही खूप handsome दिसत होता व्हाइट कुर्ता शोभत होता, वीणा त्याच्या कडे बघून छान हसत होती, समर लाजला होता आता


स्टेज अतिशय सुंदर सजवला होता, सगळ्यांना बसायला खुर्च्या मांडल्या होत्या, गुरुजी पूजेची तयारी करत होते, स्टेजवर चार नाव होते, आशिष सोहा..... वीणा समर


हॉल मध्ये आल्यावर समरला धक्काच बसला, माझा आणि वीणा च नाव का लिहिलं आहे स्टेजवर? तो विणा कडे बघत होता तोपर्यंत वीणाचा स्टेज कडे लक्षच नव्हतं


समर मम्मीकडे आला,..... "मम्मी माझा नाव का लिहिलं आहे स्टेजवर",


मम्मी छान हसत होती,.... "कळेलच थोड्या वेळात",.


"अरे काय असं सांग ना? आजी कुठे आहे",.... समर


आजी दिसलीस तेवढ्यात आजीची गडबड सुरू होती सामान ठेवण्याची


"आजी इकडे ये माझ आणि वीणा च नाव पण स्टेजवर आहे याचा काय अर्थ",....... समर खूप खुश होता


" काय अर्थ असणार आहे बेटा तुझा आणि वीणा चा ही आज साखरपुडा आहे ",...... आजी


वीणा आई कडे बघत होती हे कधी ठरल....


" दोन दिवसापूर्वी परांजपे यांचा फोन आला होता की सोहा बरोबर तुझा आणि समरचाही साखरपुडा करून टाकू, आम्ही होकार दिला, लगेच थोडीशी खरेदी करून टाकली, कस आहे सरप्राईज",...... आई


सगळीकडे आनंदी आनंद झाला प्रीती आणि वहिनी खूपच आनंदात होत्या, दादा आणि प्रकाश ला ही बातमी समजली, ते दोघे येऊन वीणा ला भेटले, समर ला समजतच नव्हतं काय करावं


आता वीणा ला समजलं मेहंदी आणि मेकअप का करून घेत आहेत, एवढे नवीन छान दागिने आणले


कार्यक्रमाला सुरुवात झाली सगळे खुर्च्यांवर बसले


आशिष आणि सोहा.... समर वीणा चौघ स्टेजवर आले सोहाला आणि खूप आनंद झाला होता ती जाऊन समर वीणा ला भेटली,...... "खुप काँग्रॅच्युलेशन्स दादा वहिनी",


खूप छान कार्यक्रम सुरू होता आधी आशिष आणि सोहा स्टेज वर आले परांजपे सरांनी आशिषला कपडे दिले चैन घातली आशिष च्या आईने सोहाला साडी दागिने दिले सोहा साडी बदलायला गेली


समर वीणा स्टेज वर आले वीणा च्या बाबांनी समरला ड्रेस दिला चैन घातली, परांजपे मॅडमने वीणाला नवीन साडी दागिने दिले वीणा तयारी ला गेली


वीणा सोहा तयार होवुन आल्या......


सोहा आशिषने एकमेकांना अंगठी घातली सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आता समर आणि वीणा चा नंबर होता, आईने पुढे होऊन वीणाच्या हातात अंगठी दिली, दोघांनी एकमेकांना अंगठी घातली, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, खूप खुश होते दोघं, विश्वासच वाटत नव्हता की खरच आपला साखरपुडा होतो आहे, स्टेजवर दोन सोफे अरेंज केले होते, दोन्ही जोड्या सोफ्यावर बसल्या छोटा रिसेप्शन सारखा कार्यक्रम सुरू झाला


"थांबा गुरुजी जाऊ नका पुढचे मुहूर्त काढायचे आहेत",....... परांजपे सरांनी वीणा चे आई बाबा, आशिष चे आई बाबा, परांजपे मॅडम यांना सगळ्यांना गुरुजीं जवळ बोलवली


"काय करूया", ..... सर


"मला असं वाटतं की मुलांच चांगला मुहूर्त बघून लवकरात लवकर लग्न करून टाकाव",.... मॅडम


"आमची काहीच हरकत नाही",... आशिष चे आई बाबा


"आम्हालाही काही प्रॉब्लेम नाही",.... वीणा चे आई बाबा


"माझ्याकडे एक आयडिया आहे जवळचा एक चांगला मुहूर्त बघून आपण सगळ्यांनी मिळून एक रिसॉर्ट बुक करू आणि त्यात दोन-तीन दिवस मिळून छान लग्नाचे कार्यक्रम करून टाकू आता लग्न ठरलं आहे साखरपुडा झाला आहे मग लग्नाला उशीर कशाला",..... परांजपे सर


"चालेल काही हरकत नाही",..... बाबा


" गुरुजी तुम्ही उद्या मला जवळचे मुहूर्त सांगा मी या सगळ्यांशी बोलतो आणि नंतर आपण सगळं ठरवून टाकू ",... सर


"चालेल, मी काढतो मुहूर्त ",.... गुरुजी गेले


तिकडे स्टेजवर खूप धमाल सुरू होती, प्रीती वहिनी सोहा आणि वीणा च्या आसपास होत्या, सोहा आशिष मस्त गप्पा मारत बसले होते, अभी आरु खेळून दमले, आज खूप खाऊ मिळाला होता त्यांना खायला आणि जेवण ही आवडीच, आजी सगळ्यांशी बोलत बसली होती,


समरला चा अजुन विश्वास वाटत नव्हता की त्याच्या साखरपुडा झाला आहे, तो सारखा वीणा कडे बघत होता


"समर तू सारखं काय माझ्याकडे बघतो आहेस, समोर बघ ना",.... वीणा


"मग तू का एवढी तयारी केली आहेस आणि तू खूप सुंदर दिसते आहेस आणि आज आपण ऑफिशियली एंगेज झालो ना",..... समर


वीणा गोड हसत होती....


"आता तरी सांग कधी करु या लग्न",...... समर


प्लीज....... समर


चला सगळ्यांनी जेवून घ्या, दोघी जोड्या स्टेजवरून उतरल्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडल्या, आजीने दोघा जोड्यांची दृष्ट काढली, जेवणाची पंगत बसली, चला एकमेकाना घास भरवा, हास्य विनोद करत जेवण झाल,


वहिनी वीणा प्रीती सोहा रूम मध्ये आल्या, वहिनीने बॅग भरली वीणाच्या आईने घेतलेला नेकलेस सेट नीट पर्स मध्ये ठेवला सगळ्यांच्या पर्स बॅग घेवून त्या खाली आल्या,


परांजपे मॅडमने एका मदतनीसला घेवून द्यायचे गिफ्ट हॉल मध्ये आणले, आधी आशिष च्या घरच्यांना गिफ्ट दिले मग वीणा च्या घरच्यांना गिफ्ट दिले, मुल खूप खुश होते, बर्थडे नाही तरी गिफ्ट मिळाल , वीणा च्या आई बाबांनी परांजपे सर मॅडम आजी आजोबांना गिफ्ट दिल, सोहाला गिफ्ट दिल


चला आता आम्हाला निघावं लागेल, वीणा जावून परांजपे मॅडम सर आजी आजोबांना भेटली,


"लवकर ये बेटा आता घरी" ,...... आजोबांनी आशीर्वाद दिला........


🎭 Series Post

View all