Login

प्रीत नव्याने बहरली...भाग 9

Love story
प्रीत नव्याने बहरली...भाग 9

ती सौरभच्या समोर येऊन उभी राहिली.

"सौरभ."

"सानिका अगं काय हे? किती थकली दिसतेस."

सानिकाने त्याच्या प्रश्नावर उत्तर न देता ती त्याला बिलगली आणि रडायला लागली.

"कुठे गेला होतास? कुठे गेला होतास असा न सांगता. किती शोधलं मी तुला, तुझा नंबर नव्हता माझ्याकडे. कॉलेजला आला नाहीस म्हणून अस्वस्थ झाले होते मी."

सौरभने त्याचा हात हळूच तिच्या डोक्यावर ठेवला.

"रिलॅक्स सानिका, अगं मी गावाला गेलो होतो. आईला बरं नव्हतं आणि म्हणून तुला इकडे हॉस्पिटलमध्ये आणावं लागलं. ती आता बरी आहे, तू शांत हो."

त्याने तिला चेअरवर बसवलं, त्याच्याजवळ असलेल्या बॉटल मधलं पाणी दिलं.

सानिका शांत झाली.

"काय झालं सानिका? का पॅनिक झालीस तू?"

"तू असा न सांगता इकडे आलास ना म्हणून मला अस्वस्थ झालं होतं. कॉलेजमध्ये दिसला नाहीस. नजर भिरभिर व्हायला लागली, माझी नजर तुला शोधत होती. कुठे कुठे नाही शोधलं मी तुला, शेवटी शोधत शोधत तुझ्या गावाला पोहोचले आणि तिथे कळलं की तू इथे आहेस म्हणून. तिथल्या काकांनी मला नंबर दिला, तुझ्या बाबांचा."

"तू काही खाणार आहेस का सानिका? खूप थकलेली दिसतेस."

"नाही नको."

"असं नाही काहीतरी खाऊन घे, हॉस्पिटलचं खाली कँटीन आहे तिथे जाऊन काहीतरी खाऊन घे, चल चहा तरी घे."

दोघे कॅन्टीन मध्ये गेले, दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या आणि त्या गप्पागप्पांच्या ओघांमध्ये सानिकाने सौरभला सगळं सांगितलं की ती न सांगता घरून निघाली. तिच्या घरचे तिला शोधत असतील.

सौरभ दचकला,

"काय? काय बोलतेस तू? तुझ्या घरचे तुझ्या शोधात असतील. तू स्वतःसाठी त्यांना त्रास का देतेस? हे बघ सानिका हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तू मला शोधायला निघालीस ते ठीक होतं पण घरून सांगून निघायला हव होतंस. असं न सांगता निघालीस म्हणजे तुझ्या घरच्यांच्या जीवाला घोर नाही का लावला."


"अरे सांगून निघाले असते तर त्यांनी घराबाहेर पाऊल ठेऊ दिलं नसतं."

"अगं पण." तो बोलता बोलता थांबला.

सानिका शांत बसली होती.

"काय झालं? सानिका आय एम सॉरी. मला तुझ्यावर ओरडायचं नव्हतं, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी."


"तुझ्यावर रागावली नाहीये मी."

"मग अशी शांत का झालीस?"

"बरेच प्रश्न पडले आहेत मला ज्याची उत्तर मला मिळत नाही आहेत."

"एक सांगू का तुला."

"हम्म बोल.

"थोडा वेळ दे."

"कुणाला?"

"स्वतःला."

"स्वतःला वेळ देऊ?"

"हो, तुला जे काही प्रश्न पडलेत ना त्याचे उत्तर तुला नक्की मिळतील, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. प्रत्येक गोष्ट ही त्या त्या वेळेलाच घडत असते, थोडा वेळ जाऊ दे तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला नक्की मिळतील. तुझ्या मनात हा प्रश्नांचा काहूर माजला आहे ना त्याला जरा वेळ शांत कर आणि विचार कर बघ तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळतील आणि हो आता तू घरी जा तुझे घरचे तुझी काळजी करत असतील. खरं तर तुला एकटीला पाठवणं योग्य नाही पण यावेळी जर मी तुझ्या घरी आलो तर प्रॉब्लेम होईल. आधीचं ते टेन्शनमध्ये असतील आणि आपल्या दोघांना एकत्र बघून ते नको ते नको ते विचार करतील. म्हणून तू आता एकटीच जा."


दोघांनी चहा घेतला आणि सौरभने सानिकाला ऑटोपर्यंत नेऊन सोडलं, तिला ऑटो मध्ये बसवून दिलं आणि तो पुन्हा आत आला.

ती ऑटोमध्ये बसली, तिच्या मनात घरच्यांचा विचार आला.

"आई, बाबा, आजी, आर्यन सगळे माझी काळजी करत असतील. आर्यन तर मला शोधायला निघाला असेल आणि माझ्या मैत्रिणी त्या पण मला शोधायला निघाल्या असतील. नक्की काय झालं असेल घरी. बाबांना कळलं असेल तर काय करतील ते." तिच्या मनात अनेक विचार आले. बाबांच्या विचाराने ती घाबरली.

सानिकाच्या घरी आर्यन, राज आणि राघव तिघेही गेली घरी आले.

ते घरात पाऊल ठेवताचं गायत्रीने प्रश्नांचा भडीमार केला,

"सापडली का माझी सानिका? कुठे आहे ती? कुठे दिसली तुम्हाला? आली का ती तुमच्या सोबत? तिला सोबत का नाही आणलं?"


आर्यनने तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिला डोळ्याने आधार दिला.

"शांत हो, बस इकडे. सानू दी अजूनही सापडलेली नाहीये. आम्ही तिला सगळीकडे शोधलं पण ती कुठेच दिसली नाही."


"काय रे भाऊ आहेस तू तिचा? आपल्या बहिणीला शोधू शकला नाहीस, काय कामाचा आहेस तू आणि तुम्ही तुम्ही मित्र आहात ना तिचे मग स्वतःच्या मैत्रिणीला तुम्हाला शोधता आलं नाही."

गायत्री रडायला लागली आणि रडता रडता तिची नजर दरवाजाकडे गेली.