❤️प्रीत मनी जपली❤️... भाग 3

Katha mirachya sangharshachi

❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 3


आधीच्या भागात आपण पाहिले की, 


मीरा आणि राधेचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघांचेही अल्लड वय होतं. दोघेही भेटायचे, बोलायचे, सोबत वेळ घालवायचे. मीराला राधेसोबत लग्न करायचं होतं पण राधे अजून सेटल नव्हता. मीराचं शिक्षण थांबलं,पण शामाचं शिक्षण तरी पूर्ण व्हावं अस तिला वाटत होतं. 

आता पुढे,


संध्याकाळ झाली, बाहेर काळोख व्ह्यायला आला होता. गाई गुरे परतीच्या पावलांनी त्यांच्या गोठ्यात परतत होत्या.  मीराने सगळीकडे कंदील लावले.


शामा अभ्यास करत बसलेली होती. मीराने भाकऱ्या बनवायला घेतल्या. मीराची आई कमला अजून घरी आलेली नव्हती. रोज या वेळेवर येऊन जायची पण आज आलेली नव्हती.


काही वेळाने राजाराम ( मीराचे  बाबा ) दारू पिऊन घरी आला, आणि डायरेक्ट कंदीलवर जाऊन पडला.


“बापू..काय हे बापू, तिच्या अभ्यासाला एकच कंदील होता तो बी तुम्ही तोडला. आता ती अभ्यास कशी करायची?”


“ये तू मला अक्कल शिकवू नको, तुमचं तुम्ही पाहत बसा.” असं म्हणून तो गलंडत जमिनीवर कोसळला, तो उठलाच नव्हता.

कमला अजून आली नाही म्हणून मीराला काळजी वाटत होती.

“ये शामा तू अभ्यास कर, मी आईला बघून येते.” असं म्हणून मीरा घराच्या बाहेर पडली.

बाहेर ककाळोख होता, त्यामुळे तिला भीती खूप वाटत होती. ती राधेच्या घरी गेली, तिने बाहेरूनच राधेला आवाज दिला.

“राधे.. राधे.. आई आली नाही अजून चलतो का माझ्यासोबत बघायला?”

“कुठे गेली?”
“कामावर गेली, ती परतलीच नाही रे. मला खूप भीती वाटत आहे, का नसेल आली ती? इतकी रात्र झाली आता कुठे शोधायचं तिला?”

“चल, चल मी येतो तुझ्यासोबत काळजी करू नको.”  असं म्हणून दोघेही निघाले. पूर्ण गाव हुडकून झाला पण कमला कुठेच दिसली नव्हती.

“मीरा आता काय करायचं?”

“राधे मला भीती वाटते, कुठे गेली असेल रे आई? पूर्ण गाव हुडकून झाला तरी दिसली नाही. आता कुठे शोधू?  बापू घरी असाच पडलाय त्याला तर काही पडलीच नाही कुणाची. स्वतःच्या धुंदीतचं जमिनीवर लोळला. शामा अभ्यास करतीये. काय करू मी काहीच कळत नाहीये.”

“हे बघ तू आता काळजी करू नकोस, तू जा घरी. आपण पुन्हा उद्या सकाळी शोधायला निघूया.”

“आता सापडली नाही तर उद्या काय दिसेल रे. काय करावे मला काहीच कळत नाहीये.”
दोघेजण बोलत असताना राधेची आई बाहेर आली.

“काय रे कोण आहे? कोणाशी बोलतोय?”

“काही नाही आई, मीरा आहे. कमला काकी घरी आली नाहीये म्हणून तिला काळजी वाटत होती. इतक्या अंधारात एकटी कशी जाऊ म्हणून मला बोलवायला आली होती.”

“काय ग मीरे कुठे गेली तुझी आई?”

“अजून आली नाहीये घरी आणि पूर्ण गाव हुडकला पण आई नाही दिसली.”

“अग मग गेली कुठे तुझी आई?”

“माहित नाही आणि तुझा बापू तो कुठे गेला? त्याला सांगायचं ना.”

“तो जमिनीवर लोळतोय. मी शोधून आले पण नाही दिसली कुठेच, मी जाते घरी.”
“बरोबर जा.” असं म्हणत राधेची आई आणि राधे दोघे आत गेले.

मीराला खूप भीती वाटत होती. सगळीकडे काळोख दाटला होता. ती तिच्याच विचारात घरी चाललेली होती. वाटेत तिच्या पायाला ठेच लागली म्हणून तिने खाली बघितलं तर ती पाहून अगदी जोरात किंचाळली कारण खाली तिची आई कमला पडून होती.

“आई..” 
‘आता इथून गेले तेव्हा इथे कोणीच नव्हतं आणि आता इथे आई कशी आली.’ ती तिच्याच विचारात एकटी बोलत होती.
“आई.. आई उठ ना ग. ये आई काय झालं आई उठ ना. ये आई..”
तिने आईला उठवण्याचा प्रयत्न केला पण आई काही उठली नाही.
मीरा पुन्हा धाव धावत राधेच्या घरी गेली.

“राधे राधे.” मीराने बाहेरून आवाज दिला.
“काय ग पुन्हा का आलीस? अशी  का ओरडते आहेस?” राधेची आई बाहेर आली.

“आई दिसली, रस्त्यात पडून आहे. मला काही कळत नव्हतं म्हणून मी राधेला बोलवायला आली. काकी त्याला पाठव ना माझ्यासोबत.”

“मीरा तू समोर हो मी येतोय.” आतून राधेचा आवाज आला. 
दोघेही धावत धावत कमलाकडे गेले.
“आई आई उठना ग, राधे बघ ना हे अशी कशी पडून आहे.”

“तू पाणी आण.”

“पाणी कुठून आणायचं?”
“आपण काकीला घरी घेऊन जाऊया, इथून जास्त अंतर नाहीये.”

“हो तसं करूया.”

दोघांनी कमलाला पकडलं आणि घरी घेऊन गेले. घरी गेल्यावर तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं पण कमला शुद्धीवर आली नव्हती.

“राधे आई तर शुद्धीवर येत नाही आहे, काय करायचं? कसं करायचं?”

“आई उठ ना ग.. ये आई.” मीरा आणि शामा दोघेही रडायला लागल्या.

काही तासाने कमलाला शुद्ध आली तोवर राधे तिथेच बसून होता. मीराने लगेच तिला पाणी दिलं, तिला उठून बसवलं.

“आई काय झालं? कुठे गेली होतीस? आणि अशी बेशुद्ध कशी पडली, त्या रस्त्याने गेली तेव्हा तू तिथे नव्हतीस नंतर कशी काय आलीस? कुठे गेली होतीस?”

कमला काही सांगणार तिचं लक्ष राधेकडे गेले, तिने राधेकडे बघितलं. तिला राधेसमोर काही बोलायचं नसेल. राधेला ते कळलं त्याने मीराकडे बघितलं.

“मीरा काळजी घे, मी येतो.” असं म्हणून राढे तिथून निघून गेला.

“काय झालं आता तरी सांग ना, काय झालं तू अशी बेशुद्ध कशी काय पडलीस?”

“बाजूच्या गावाला शेतात गेले होते काम करायला, बाजूची पुष्पी गेली होती ना पुष्पी मी सोबत मी पण गेले होते. तिच्या पोराची तब्येत बरी नव्हती म्हणून ती दुपारीच परत गेली आणि मी पूर्ण पैसे मिळतील म्हणून कामावर राहिले. संध्याकाळ झाली आणि मग मी कामावरून निघाले तर वाटेत मला..” कमला बोलता बोलता थांबली.

“वाटेत काय? आई वाटेत काय झालं?”

“वाटेत त्या गावच्या कोणत्यातरी माणसाने मला अडवलं. मी नाही ओळखत त्याला कोण आहे. मला  माहित नाही. त्याने माझी वाट अडवली.

“चल बाजूला हो, जाऊ दे मला.”

“अशी कशी जाऊ देऊ तुला? आत्ताशी तर एकटी गावली आहेस. नाहीतर असा कोणी मला एकटा गावत नाही. आता एकटी गावली आहेस तर तुला अशी कशी सोडू.”

“माझा रस्ता सोड नाहीतर.”

“काय? नाहीतर काय? मारणार आहेस मला. घे मार मला तेवढाच तुझा स्पर्श होईल ग माझ्या गालाला.”

“निर्लज्ज माणसा इकटी बाई बघून असा बोलतोय लाज नाही वाटत तुला. घरी तुझी बायको बहीण आहे की नाहीये.”

“आहेत ना पण ती सगळी माझी माणसं आहेत. पण तू तर माझी नाही आहेस ना.”

“हे बघ माझी वाट सोड.”
“नाही सोडणार.” त्याने तिचा हात पकडला आणि तिला निर्जन ठिकाणी घेऊन गेला.

बोलता बोलता कमला रडायला लागली.
“त्यानंतर काय झालं मला नाही माहित गं, मी तिथे रस्त्यावर कशी आली हे पण मला माहित नाही.”

“आई तू रडू नकोस, हे बघ आई तू रडू नकोस आपण करू काहीतरी. त्या माणसाला आपण धडा शिकवू.”

“कसा शिकवणार आहेस तू कोणीतरी पैसेवाला असेल म्हणून त्याने आपल्या गरीबावर हात टाकला.”

“आई असं काही नाहीये, आपण गरीब असलो तरी स्वाभिमानी आहोत, आज तुझ्यासोबत असे केले उद्या मी आहे, शामा आहे मग कस होईल.” असं म्हणताच कमलाने मीराच्या तोंडावर हात ठेवला.
“ये मीरे असं बोलायचं नाही, माझा जीव गेला तरी चालेल पण तुमच्यावर मी वाईट नजर पडू देणार नाही एवढं ध्यानात ठेव.” असं म्हणून ती मीराला बिलगली आणि ढसाढसा रडायला लागली.

क्रमश:

🎭 Series Post

View all