"श्रावणी, अभि जेवला का ग?"
" त्यांना भूक नाही आई.. पण मी विचारते ,परत."
"बर.. एकच दिवस सुटी असते त्याला.. काहीतरी छान,चटपटीत करून दे त्याला खायला!"
" हो,आई.मी त्यांच्यासाठी मखाना चिवडा बनवून ठेवलाय.आणखी काही लागत असेल तर विचारते अन् मग बनवते."
" बर..शिवन्या काय करतेय?"
" ती जेवली अन् झोपली आताच.मी तिलाच झोपी लावत होते आता. "
" बर बर..मी देवळात चालले. "
" हो .पण तुम्ही जेवल्या ना?"
" हो जेवले मी!"
श्रावणी ,घरातली मोठी सून. त्यामुळे कार्यतत्पर असणे,कुटुंबाला २४ तास हवे नको ते बघणे या तिच्या ठरलेल्या प्रायोरीटिज! अन् मग या सगळ्यातून काही वेळ मिळालाच तर स्वतःचा छंद जोपासून जरासा आनंद मिळवीत ताजेतवाने होऊन पुन्हा कामाला लागायचे असे तिचे ठरलेले रूटीन!
यात कधीही आजवर खंड पडला नव्हता,नव्हे घराचा उजवा हात म्हणजे श्रावणी होती.
पण एक दिवस अचानक,
" हॅलो अभिराज देशमाने बोलताय?"
" हो..आपण कोण?"
" मी ओम साई क्लिनिक मधून बोलतोय. श्रावणी तुमच्या कोण?"
" माझी बायको आहे. काय झालं डॉक्टर,?"
" त्यांचा अपघात झालाय.त्यांना खूप मार लागलाय,त्यामुळे त्वरित सर्जरी करावी लागेल."
" बापरे! ठीक आहे आलो मी लगेच!"
" हॅलो आई..,"
" काय रे अभि?"
" श्रावणीचा अपघात झालाय."
" काय? अरे ती शिवन्याला सोडवायला शाळेत गेली होती. तेव्हापासून घरी आलीच नाही."
" शिवन्या कुठे आहे?"
" ती आली पण शाळेतून घरी!"
" तू लवकर ओम साई क्लिनिक मध्ये ये."
अभि सारी प्रोसीजर पूर्ण करतो.
श्रावणीची सर्जरी होते.
थोड्या वेळात डॉक्टर बाहेर येतात.
" डॉक्टर,मी श्रावणीचा नवरा. नक्की काय झाले आहे?"
" हे बघा ,त्यांचा अपघात झाल्याने
उजव्या हाताचे शोल्डर होल्डिंग लिगामेंट्स टियर म्हणजे ब्रेक झालेले होते.त्याचीच आम्ही यशस्वी सर्जरी केली आहे. पण त्यांना हाताला ८-९ महिने पुर्णतः आराम देणे गरजेचे आहे."
" हो चालेल ना डॉक्टर. "
" आई बघ काय झाले! मी तर पूर्ण खचून गेलोय आता. घराचं काय होईल? शिवन्या कशी राहील? आता श्रावणीचा हात काय बरा होईलच पण मला इतर समस्यांचे जास्त टेन्शन आले आहे ."
" अभि,श्रावणी गप्प बसणारी मुलगी नाही.कितीही दूखो - खूपो ती आपल्या कुटुंबासाठी आपले दूखणे बाजूला ठेवेल अन् आपल्या प्रायोरीटिज नीट हाताळेल."
थोड्या दिवसांत प्रचंड त्रास सहन करून श्रावणी घरी परतते..डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे ती स्वतःची पूर्ण काळजी घेण्यासाठी आईकडे जाते.
सासूबाई एकदिवस तिला फोन लावतात,
" श्रावणी कशी आहेस?"
" थोडे दुखते आहे.आरामच करत होते!"
" अग लवकरच ये बाई! तुझा हात काय आज ना उद्या बरा होईलच! फक्त तू तुझ्या जबाबदाऱ्या, प्रायोरिटिज विसरू नकोस."
थोड्या दिवसांत अभि आणि सासूबाई श्रावणीला भेटण्यासाठी तिच्या आईकडे येतात.
"अभि, कशी आहे रे शिवन्या?"
" ती छान राहते ग्.तिला काय टीव्ही अन् मोबाईल असला की झाले काम! तू मात्र लवकर घरी चल.तू आमचा उजवा हात आहेस माहित आहे ना तुला? शिवाय एक कर्तव्यदक्ष सून देखील आहेस. त्यामुळे तू तुझ्या प्रायोरिटीज विसरू नये असे मलाही वाटते."
श्रावणी ताडकन उठली,
" बस ,अभि बस! आई आणि तू मला प्लीज माझ्या प्रायोरीटीज, जबाबदाऱ्यांबद्दल सांगू नका.अरे मी माझ्या प्रायोरीटीज, कधीही विसरले नव्हते.माझा एक अपघात काय झाला अन् तुम्ही मला इथे हे सूनवायला आलात? अरे माझा देखील उजवा हातच आहे जो मला हे कर्तव्य दक्षतेचे सामर्थ्य प्राप्त करून देतो;लवकरात लवकर हात बरा व्हावा म्हणून तर मी आले आहे ना आईकडे.. मजा करायला नाही आलेले!"
श्रावणीचे हे सणसणीत उत्त्तर ऐकून अभि अन् तिच्या सासूबाई शरमल्या अन् त्यांनी तिची माफी मागितली.
आपल्या प्रायोरीटीज चे मालक आपण आहोत अन् एक सजग स्त्री,आई म्हणून आपण त्या कधीही विसरू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे.पण स्त्रीचे शरीर हे त्यासाठी निरोगी हवेच हवे; मग त्यासाठी जराशा प्रायोरीटीज बदलल्या तर निश्चितच वावगे नाही,होय ना?
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा