प्रेयसी दान भाग-४

आपल्या सच्चा प्रेमाचं दान करून प्रेयसीच्या सुखाखातर समर्पण वृत्ती जपणाऱ्या प्रियकराची एक अजरामर, रोमांचक आणि रहस्यमयी प्रेमकथा!
राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

प्रेयसी दान-भाग ४

निनाद सोबतची ती भेट आणि भेटीतील एकेक संवाद मिलींदला आठवत होता. निनाद... बालपणी आईच्या मायेला मुकलेला... वाढत्या वयात एक मित्र म्हणून वडिलांचं मानसिक पाठबळ न लाभलेला आणि तारुण्यात आपलं प्रेम देखील आपण मिळवू न शकल्यानं फारच हतबल भासला होता मिलींदला.

"निनाद... एक इच्छा होती माझी... आमच्या लग्नाच्या आदल्या रात्री संगीताचा इव्हेंट आहे. मला मनापासून वाटतं की तू यावंस!" मिलींद.

"माझी देखील खूप इच्छा आहे... तुम्हाला लग्नात माझ्याकडून एक अविस्मणीय भेट देण्याची!" निनाद.

"झालं तर मग... तुझे स्वर हाच मोठा आहेर असेल माझ्यासाठी!" मिलींद.

"ते तर असतीलच सोबत... मला असं काही दान करायचंय जे तुमच्या नात्याला नवीन रूप देईल... पूर्णत्व देईल...!" निनाद.

"तू आनंदी रहा. तुझ्या स्वरांनी दुनिया जिंकून घे. याखेरीज खरंच काहीही नकोय निनाद आम्हाला." निनादला उत्तर देत दिव्याने रेस्टॉरंट मधे बसलेल्या दोघांना जॉईन केलं.

"मी वचन देत नाही मिलींद... कारण वचन पूर्ण झालं नाही तर त्याचा मलाच त्रास होतो... पण हो माझे स्वर तुमचा संगीताचा इव्हेंट नक्कीच साजरा करतील!" निनादने शब्द दिला.

"मग नेमकी माशी शिंकली कुठे? का आला नसेल निनाद संगीताच्या इव्हेंटला? अर्थात त्याने मित्रांच्या ग्रुपवर पाठविलेल्या व्हिडिओ क्लिपने कार्यक्रमात बहार आणली होती. सोपं नव्हतंच त्याच्यासाठी असं आपल्याच प्रेयसीच्या लग्न समारंभात येऊन कार्यक्रमाला चार चांद लावणं." मिलींद स्वतःशीच पुटपुटत होता.

"काळ किती हावी ठरतो, येणाऱ्या... येऊ घातलेल्या प्रत्येक सुखावर तोच तर प्रभावी ठरतो." दिव्याचे सतत स्वतःशीच चाललेले संवाद आणि मिलींदचा विचार चक्रात अडकलेला भोवरा यामुळे दोघांमधील संवाद बराच खुंटलेला होता. परस्परांशी साधला जाणारा संवाद नात्यांमधली गुंफण पक्की करतात पण जिथे हा संवाद थांबतो तिथे मनावरचा ताण अधिकच वाढत जातो.

"हॅलो... स्वाती, एकदा भेटून बोललो असतो तर कदाचित काही मार्ग निघाला असता. अर्थात तुझी इच्छा असेल आणि तुला शक्य असेल तरच!" मिलींदने न रहावून स्वातीला फोन केलाच आणि ठरल्या प्रमाणे ते दोघे भेटले देखील.

"बोला भाऊजी... काय म्हणते दिव्या आता? मधे फोन करते म्हटलं अन राहूनच." स्वाती.

"दिव्या माझ्याशी काहीच बोलत नाही... ती स्वतःशीच बोलत असते. हसणं... रडणं... चिडणं यातलं ती काहीच करत नाही." मिलींद.

"काय...? म्हणजे अजूनही दिव्या त्याच अवस्थेत आहे तर! मला वाटलं तिला वेळ द्यावा आणि एवढ्यातच माहेरी जावून आली तर तिचा मूड फ्रेश झाला असेल." स्वाती.

"या सहा महिन्यात सगळं काही इतकं बदलत गेलय की आता काय करावं हेच कळत नाही. लग्नाच्या आदल्या दिवशी पर्यंतची दिव्या अचानक लग्नानंतर बदलते काय... सतत निराशेच्या खोल गर्तेत जाते काय... आणि त्यात भर म्हणून की काय तिला भास होतात हे तू सांगितलस. मला तर खरंच काहीही कळेनासं झालंय." मिलींदचा त्रागा होणे स्वाभाविकच होते.

"हो.. तिला भास होतात... गिटार वाजल्याचे... निनादचे स्वर गुंजत असल्याचे! आणि..." स्वाती बोलताना मधेच शांत झाली.

"आणि काय स्वाती? अशी मधेच गप्प का होतेस?" मिलींद स्वातीच्या अर्धवट वाक्याने अधीर झाला.

"आणि काय...! कुठे काय...! तुमचं नवीन नवीन लग्न झालेलं... तुमच्या अपेक्षा असतीलच ना भाऊजी. आनंदाचे चार क्षण आपल्या बायको सोबत घालवावेत." स्वातीने विषयांतर करण्याचा प्रयत्न केला.

"अगं स्वाती असा विषय वळवू नकोस. त्या दिवशी देखील तू असंच बोलताना अर्ध्यात फोन ठेवलास." मिलींद.

" अहो भाऊजी... किती कामं असतात ऑफिसला... नेमकं आपलं बोलणं सुरु असतानाच समोर काम आलं. नंतर बोलू म्हटलं आणि राहून गेलं!" स्वाती मिलींदला वेळ मारून नेणारी उत्तरं देत होती.

"अगं स्वाती तू त्यादिवशी सांगत होतीस की दिव्याला निनाद भेटला ते...!" मिलींदने विचारले.

"भेटले नाहीत भाऊजी ते... निनाद भेटला असं उगाच वाटलं दिव्याला आणि ती या भ्रमानेच अस्वस्थ झाली." स्वाती.

"स्वाती... ते दोघे भेटले असतील तरीही मला त्यांच्या भेटीवर कधीही आक्षेप नसेल. मी एवढ्या त्रोटक विचारसरणीचा नक्कीच नाही. ते दोघे परस्परांना भेटू शकतात... दोन मित्रांप्रमाणे त्यांची भेट होणं यात वावगं काहीच नाही. मला दिव्याच्या अस्वस्थ असण्यामागचं कारण जाणून घ्यायचं आहे " मिलींद अगदी पोटतिडकीने बोलत होता.

"त्यांची भेट होणं कसं शक्य आहे??" स्वाती पुटपुटली आणि आपल्याच विचारात गर्क झाली. "खरंच एवढी डिस्टर्ब का असेल दिव्या? तिला कळलं तर नसेल की निनाद...! किती काळ लपेल तिच्यापासून हे सत्य. कधी न कधी तरी तिला सामना करावाच लागेल. कदाचित कळलं असेल दिव्याला की निनाद..." स्वाती मनातल्या मनातच बोलत होती.

स्वाती पुटपुटली आणि नेमकं तेच मिलींदने पकडून धरलं. "का शक्य नाही भेट होणं त्या दोघांची? उलट ही भेट होणं दिव्याच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे... बोल स्वाती बोल. मला निनादचा नवीन मोबाईल नंबर तरी दे. किती ट्राय करतोय मी त्याच्याशी बोलायला पण फोन बंदच येतोय त्याच्या." मिलींद अधीर होऊन विचारत होता.

स्वातीचे डोळे पाणावलेले होते. "एवढी काळजी घेणारी व्यक्ती हळव्या दिव्याची जोडीदार आहे म्हणजे कोणत्याही त्रासातून दिव्या लवकरात लवकर तरून जाईल." स्वाती.

स्वातीने मोबाईल फोन काढला आणि त्यातली एक व्हिडिओ क्लिप मिलींदला दाखविली ती बघून मिलींद होता त्यापेक्षा अधिकच अस्वस्थ झाला.

"भाऊजी, दिव्याला कळलं तर नसेल ना? कदाचित यामुळे तर ती अस्वस्थ नसेल ना झालेली?" स्वातीने विचारलं.

"हे माझ्या पासून का लपवून ठेवलं तुम्ही मित्र मंडळीने?"

क्रमशः

©तृप्ती काळे
नागपूर टीम

🎭 Series Post

View all