प्रेयसी दान भाग २

आपल्या सच्चा प्रेमाचं दान करून प्रेयसीच्या सुखाखातर समर्पण वृत्ती जपणाऱ्या प्रियकराची एक अजरामर, रोमांचक आणि रहस्यमयी प्रेमकथा!

राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

प्रेयसी दान-भाग २


"स्वाती... ए स्वाती आवाज येतोय ना माझा? हॅलो.. स्वाती." मिलींदची अस्वस्थता शिगेला पोहोचली होती.

"भाऊजी करते मी नंतर फोन... महत्वाचा कॉल येतोय. बोलूत नंतर." वेळ मारून नेणारं उत्तर देत स्वातीने फोन ठेवला.

"काय झालं असेल नेमकं? स्वाती काही लपवत तर नसेल ना? दिव्याच्या मनस्वास्थ्याशी संबंधित तर नसेल ना काही? भेटला असेलही निनाद दिव्याला तर एवढा धसका घेण्यासारखं काय त्यात... दिव्याने लग्नापूर्वीच सगळं काही खरं सांगितलेलं... त्यामुळे एखादी सहज भेट झाली असेलही दोघांची तरी वावगं ते काय त्यात...? नाही... नाही... असं काही त्या दोघांचं भेटणं बोलणं झालं असतं तर दिव्या माझ्याशी बोलली असतीच...! कदाचित थोडी फ्रेश देखील झाली असती..." मिलींदच्या डोक्यात असे हजारो विचार दाट मेघांगत गर्दी करून बसले होते.

मिलींद ऑफीस मधून आला मात्र चित्त पूर्णपणे विचलीत झालेले होते. टू बी ऑर नॉट टू बी खोपाटी खोच्या खेळातल्या खो प्रमाणे जणू स्वातीकडून मिलींदकडे पासऑन झालेला होता. दिव्याला निनादबद्दल काही विचारावे का? आधीच ती आपल्या विचारात मग्न असते त्यात त्या दोघांच्या भेटीबद्दल एकदम काही विचारलं तर ती हा गैरसमज करून बसायची की मी तिच्या बाबतीत फारच पझेसिव्ह झालोय... नाहीतर तिला असंही वाटायचं की मी तिच्या हेतूंवर शंका घेतोय...! विचारू की नको या चक्रव्ह्यूवात अडकलेल्या मिलींदची तर झोपच उडली होती.

"दिव्या... प्रत्येकाचा काहीतरी भूतकाळ हा असतोच. आपण परस्परांना पसंती देण्यापूर्वी आणि आपलं हे नातं रेशीमगाठीत बांधलं जाण्यापूर्वी मला तुला काही सांगायचंय. अर्थात! तुला असं काही शेअर करण्याचं बंधन नाही... पण मला मन मोकळं करायचं तुझ्याकडे...!" मिलींदला आज अचानक दिव्या सोबतची पहिली भेट आठवत होती.

"बोल ना मिलींद... मलाही बरंच काही सांगायचंय. मला खरंतर घरच्यांनी बजावलेलं की फारसं काही बोलू नकोस... पण पूर्वार्ध जाणून घेतल्या खेरीज कादंबरीच्या उत्तरार्धाला सुरवात केली तर वाचक गोंधळून जाऊ शकतो...!" दिव्याचं असं साहित्यिक बोलणं ऐकून मिलींद फार प्रभावी झाला होता.

"काही वर्षांपूर्वी माझी एका मुलीशी मैत्री झाली... आमच्या घट्ट मैत्रीचं कधी प्रेमात रूपांतर झालं कळलंच नाही. आमच्या आवडी निवडी फार मिळत्या जुळत्या नव्हत्या तरीही आमचा आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन फारंच सारखा होता... अगदी समांतर रेषांसारखा...!" मिलींदच्या बोलण्यातून त्या मुलीबद्दलची आत्मीयता दिव्याला जाणवत होती.

"मग का सोडलंस तिला...? की तिने सोडलं तुला?" मिलींद बोलताना अचानक थांबला त्यामुळे दिव्याने त्याला बोलतं करण्यासाठी प्रश्न केला.

"नाही... म्हणजे कंफर्टेबल असशील तरचं सांग." दिव्या बुचकळ्यात पडल्याने सावरासावर करू लागली.

"कुठे सोडलं मी तिला... तिला वजा केल्यावर काय उरणार होतं या आयुष्यात! आणि मला खात्री आहे तिच्याही मी आज देखील तितकाच स्मरणात असेल... मनात असेल." मिलींद आजही आपल्या पहिल्या प्रेमाला विसरू शकलेला नव्हता.

"बरोबर आहे तुझं... पहिल्या प्रेमाला कुणीच विसरू शकत नाही. कारण ते वजा झालं तर आयुष्यात हरायला आणि सरायला देखील काही उरत नाही...!" दिव्या देखील काहिशी भावूक झालेली होती.

"ती त्यादिवशी फार आनंदी होती... तिचे बाबा... त्यांना मी पसंत आहे आणि आमच्या लग्नाला त्यांची मंजुरी आहे असं ती सांगत होती...! मात्र त्या आनंदाच्या क्षणातली ती आमची अखेरची भेट ठरली." मिलींद मनमोकळं करत होता.

"का पण? तिच्या घरून पसंती होती तर... तुझ्या घरून होता का विरोध?" दिव्याचा हा प्रश्न स्वाभाविक होता.

"माझ्या घरून देखील विरोध नव्हता तरीही आमचं निस्वार्थी प्रेम हरलं आणि त्या शेवटच्या भेटीनंतर कित्येक दिवसांनी कुमुद अचानक समोर आली ती कुणाची तरी पत्नी म्हणून... त्यावेळी तिचा आणि स्वतःचा देखील फार राग आला होता मला... पण कालांतराने राग ओसरला देखील!" मिलींद आपली आपबिती सांगत होता.

"का केलं पण तिने असं? की यामागे तिची काही असहाय्यता होती...?" दिव्याने विचारले.

"तिचे बाबा बडे राजकारणी... त्यांच्या राजकारणापुढे एका प्रेमकहाणीचा अर्ध्यातच अंत झाला...! मला कालांतराने हे कळलं की तिला तिच्या बाबांनी गावी नेलं आणि त्यांचे राजकारणातील संबंध वृद्धींगत करण्यासाठी तिच्या आईला वेठीस धरून तिच्या इच्छेविरुद्ध तिचं लग्न लावून दिलं. ती कुणाचीतरी पत्नी झाल्यापासून आमच्यात पूर्वीची ओळख असण्या इतपत देखील संबंध नाही...!" मिलींदचा पूर्वार्ध ऐकून दिव्या जरा हळवी झाली.

"काही प्रेमकहाण्या अपूर्ण राहून देखील अजरामर ठरतात...! प्रेम असलेल्या कित्येक जोडप्यांच लग्न होतं पण काळाच्या ओघात अन् अपेक्षांच्या दडपणात त्यांच्या नात्यातलं प्रेम मात्र हरवून जातं." दिव्या मिलींदची समजूत घालत होती.

"निनाद... गिटारीस्ट आहे... आम्ही एकाच शाळेत अन योगायोगाने एकाच कॉलेजला होतो?" दिव्या बोलत होती.

"निनाद...! तोच ना ज्याचे इव्हेंट व्हायचे पूर्वी... काय गिटार वाजवतो तो... तुझा मित्र आहे तो... क्या बात है!" इतर चाहत्यांप्रमाणे मिलींद देखील निनादचा एक चाहता होता.

"हो.. हो... तोच निनाद ज्याचे सोशल साईट्सवर हजारो फॉलोअर्स आहेत... ज्याचे गिटार वादण मनाची तार छेडून जातात... ज्याच्या स्वरात अनोखी जादू आहे... सोसलेल्या असंख्य वेदनेची आर्तता आहे...! तोच निनाद!" निनाद बद्दल बोलताना दिव्याच्या डोळ्यातली चमक लपून रहाणे केवळ अशक्य होते.

"ओ हो.. या निनादने तर इतर चाहत्यांसारखे तुला देखील वेडे केले असे दिसते आहे एकूण... हल्ली त्याच्या पोस्ट देखील नसतात सोशल साईट्सवर... निनाद... असतो कुठे हल्ली तो...?" मिलींदने विचारले.

मिलींद दिव्या सोबतच्या त्या भेटीतून बाहेर आला त्यावेळी सकाळचे चार वाजले होते. मिलींदला स्वतःचाच प्रश्न आठवला आणि त्याच प्रश्नात तो वेढला जाऊ लागला.

"निनाद... असतो कुठे हल्ली तो...?"


क्रमशः

©तृप्ती काळे
नागपूर टीम

🎭 Series Post

View all