Feb 28, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

प्रेयसी दान-भाग ७

Read Later
प्रेयसी दान-भाग ७
राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

विषय रहस्य कथा

प्रेयसी दान-भाग ७

"ओह... असू दे दिव्या. पहिले बस इथे आणि घे निवांत चहा." मिलींद दिव्याला समजावत होता.

"मी तुझ्या हातात कप दिलेला. मला वाटलं तू नीट पकडला असशील. तुला चटका तर नाही ना बसला?" दिव्या.

"अगं नाही... मला विशेष काही झालेलं नाही पण बघ ना हा आजचा न्यूज पेपर पूर्ण खराब झाला चहा सांडल्याने. तुला चहा घेताना पेपर वाचायला आवडतो ना... मी घेऊन येतो न्यूज पेपर थांब." मिलींद.

"असू दे मिलींद... एक दिवस नाही वाचलं तर काय फरक पडतो. तसंही हल्ली असतंच काय त्या न्यूज पेपरमधे! तेच ते अपघात... बलात्कार नाहीतर घाणेरडं राजकारण!" दिव्या.

दिव्याच्या उत्तराने मिलींदने सुटकेचा निःश्वास सोडला आणि तो घराबाहेर पडला.

"अच्छा, म्हणजे काल सायंकाळी त्या सभागृहातून जे स्वर गुंजत होते ते निनादचेच होते तर! क्षणभर तर मी देखील भांबावून गेलो होतो... असं वाटतं होतं प्रत्यक्ष येऊन बघावं सभागृहात." मिलींद युवामंचच्या एका सदस्याशी बोलत होता.

"हो सर, ते स्वर निनादचेच...! निनादला प्रसिध्दीचं फार वेड नव्हतं कधीच. त्यामुळे त्याचे रेकॉर्डिंगज् तसे दुर्मिळच. पण त्याच्या चाहत्यांनी ते जपून ठेवलेत. त्यातलं एक कालच्या कार्यक्रमात लावलेलं." युवामंच सदस्याच्या बोलण्यात निनाद बद्दल आत्मीयता होती.

एकीकडे दिव्याचा मानसोपचार सुरु होता आणि दुसरीकडे असं काहीतरी घडतं होतं ज्याने दिव्याची मनःस्थिती पुन्हा त्याच अवस्थेत जातं होती. औषधोपचारासोबतच मिलींद दिव्याचं मनःस्वास्थ्य जपण्याचा पुरेपुर प्रयत्न करत होता.

पावसाच्या सरींनी वातावरण मोहरलेलं होतं. मन मोहरून टाकणारा मातीचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. झाडवेलींना चकाकी आलेली होती. दिव्याला बरं वाटावं म्हणून मिलींद तिला लाँग ड्राइव्हला घेऊन गेला. दूरवर एका नितळ तलावाकाठी दोघे निवांत बसलेले असतानाच दिव्या अचानक बडबडायला लागली.

"निनाद... ए निनाद... मिलींद बघ ना निनाद तिकडे उभा आहे पण वळून बघत देखील नाहिय." बोलत असतानाच दिव्या वाऱ्याच्या वेगाने धावत धावत त्या अनोळखी व्यक्तीकडे गेली आणि तिने त्याच्या पाठीवर जोरात थाप मारली.

"अरे... हा काय वेडेपणा आहे! कोण हा निनाद? सावरा स्वतःला मॅडम... मी काही तुम्ही म्हणताय तो निनाद का काय... तो मी नाही." अनोळखी व्यक्तीने दिव्याला जवळ जवळ झटकलेच होते.

"सॉरी सर... माफ करा! चल दिव्या निघूत आपण." मिलींद त्याची माफी मागत होता.

"तुमच्या बायकोचा धक्का अजून थोडा जोरात बसला असता तर पडलो असतो मी तलावात. वेड्यांना आणू नये असं सार्वजनिक ठिकाणी!" त्या अनोळखी व्यक्तीच्या बोलण्याने मिलींद ओशाळला होता. परिस्थिती सावरत दिव्याला गाडीत बसवून मिलींद तिला घरी घेऊन गेला.

"तिथे निनाद होता... त्या माणसाने पाडले तर नसेल ना निनादला तलावात?" दिव्याची बडबड थांबत नव्हतीच.

दिव्याच्या वाढत चाललेल्या त्रासामुळे आणि बदलत्या वागणूकीमुळे आता मिलींद बरोबरच खरी कसोटी होती ती डॉ. बारी यांची! त्यामुळे तिच्या मानसोपचारात डॉ. बारींनी बरेच बदल केले होते.

"त्यांना असं वाटतं की मी... मीच जबाबदार आहे निनादचं आयुष्य उद्वस्त होण्यामागे. पण मी असं का करेल?" दिव्या हीपनोटाईजड् होती. डॉ. बारी तिच्या संवादातील बारकावे आपल्या डायरीत नोंदवून घेत होते.

"त्यांना? म्हणजे नेमकं कुणाला? दिव्या ऐकते आहेस न? कुणाला वाटतं असं की तू जबाबदार आहेस निनादचं जे वाईट झालंय त्याला?" डॉ. बारी.

"सगळ्यांना वाटतं... अगदी आमच्या गृपला देखील. बस काही जण तोंडावर बोलून दाखवतात तर काही जण छुपे प्लॅन करतात... माझ्यावर कसला रोष आहे कोण जाणे?" दिव्या बरंच मोकळं बोलत होती मात्र अजूनही नेमकं काय आणि कुणाचं वागण तिला सलत होतं त्याचा खुलासा झालेला नव्हता.

"गृप मधलं कुणी काही बोललं का? काय बोललं? काय झालं... बोल दिव्या!" डॉक्टर बारी.

"डॉक्टर... निनादला काय झालंय? त्याच्या इच्छेखातर मी लग्न केलं... पण म्हणून कुणी इतकं दूर जातं का?" दिव्या.

"येईल येईल... निनाद बरा होऊन येईल लवकरच!" डॉक्टर बारी दिव्याची समजूत काढत होते.

"येईल? कसा येईल? त्यांनी तर मला गुन्हेगार ठरवून सजा देखील सुनावली आहे... अन् तुम्ही म्हणताय की तो येईल!" दिव्या फार दुखऱ्या स्वरात बोलत होती.

"सजा... कसली सजा आणि कशासाठी? बोल दिव्या... बोल." डॉ. बारी.

"आजन्म दुःखात कुढत राहिल मी आणि फक्त रडत राहिल. मला हसण्याचा... आनंदी रहाण्याचा हक्कच नाही. हा आशीर्वाद मिळालाय मला." दिव्या.

"कोण आहे ज्यानी एवढी नकारात्मकता दिली? मनाला इतकं नसतात लावून घेत दिव्या एखाद्याचं बोलणं." डॉक्टर दिव्याला समजावत होते.

"आपल्या प्रियकराच्या मृत्यूला कुणी जर आपल्यालाच जबाबदार धरत असेल तर? निनाद गेलाय हे जग सोडून... दिव्या तुझ्यामुळे झालंय हे सगळं. तू अपशकुनी आहेस... स्वार्थी आहेस!" दिव्यावर झालेले आरोप ती जसेच्या तसे बोलून दाखवत होती.

"आजच्या एकूण संवादातून हे स्पष्ट आहे की दिव्याला निनादच्या मृत्यू बद्दल माहिती आहे पण हे एकतर तिला फार चुकीच्या पद्धतीने माहिती झालंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळा ब्लेम तिच्यावर टाकला गेलाय! त्यामुळे तिचं मन निनाद या जगात नाही हे सत्य स्विकारायला तयार नाही तर तिच्या मेंदूत विचारांची कालवा कालव चालली आहे." डॉक्टर मिलींदला सांगत होते.

"कोण असेल ज्याने तिला असं ब्लेम केलंय?" मिलींद.

"कोण असेल कुणास ठाऊक... पण ती व्यक्ती जी कुणी असेल तिचा दिव्यावर पूर्वीचाच प्रभाव असेल त्यामुळे तिला जास्त त्रास होतो आहे." डॉक्टर बारी.

डॉक्टरांसोबतच्या संवादानंतर मिलींदच्या डोक्यात आता ती व्यक्ती नेमकी कोण असावी याबद्दल अनेक शंका येऊ लागल्या. त्या व्यक्तीला शोधता यावं म्हणून मिलींद स्वातीला भेटला.

"स्वाती, काय वाटतं ग तुला? कोण असेल ज्याने एवढ्या चुकीच्या पद्धतीने निनाद गेल्याची बातमी दिव्याला दिली? आणि नुसती बातमीच नाही दिली तर त्यासाठी तिलाच आरोपी ठरविलं?" मिलींदची अस्वस्थता स्वातीला बघवत नव्हती. सांगावं का मिलींदला सगळं खरं असही स्वातीच्या मनात येतं होतं.

क्रमशः

©तृप्ती काळे
नागपूर टीमईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

तृप्ती काळे

सहायक कक्ष अधिकारी

हे तर एक दिवस तुम्ही लिहाल....

//