प्रेयसी दान- भाग ९

आपल्या सच्चा प्रेमाचं दान करून प्रेयसीच्या सुखाखातर समर्पण वृत्ती जपणाऱ्या प्रियकराची एक अजरामर, रोमांचक आणि रहस्यमयी प्रेमकथा!

राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा


विषय रहस्य कथा

प्रेयसी दान-भाग ९


"दिव्या कसे आहेत हे पोस्टर्स? एक सिलेक्ट कर आपल्या रूम मध्ये लावूत. आणि हो हे बघ तर टेडी... यातले तुझ्या आवडीप्रमाणे हवे तसे ठेवून घे. काही खेळणी अगदी हॉलमध्ये सजवली तरी चालतील. अख्ख्य घर कसं प्रसन्न वाटलं पाहिजे." मिलींदची उत्सुकता अगदी गगनाला भिडलेली होती. बाबा होण्याचा आनंद असतोच एवढा अनमोल!

"किती छान छान खेळणी आणि पोस्टर्स आणलेत तू. असं वाटतंय बाळ होऊन पुन्हा हे बालपण जगून घ्यावं. पण एकदा गेलेला क्षण पुन्हा कधीच पलटून येत नाहीत त्यामुळेच तर आयुष्यातला एकेक क्षण अनमोल ठरतो, नाही का मिलींद?" दिव्याचं मन देखील फार हर्षित झालेलं होतं.

"जावई बापू दिव्याला काही दिवस माहेरपणाला पाठवता का? काही दिवस राहील आमच्या सोबत. तसंही तुमची बदली इथेच झाली आहे तर अगदी केव्हाही येऊ शकता तुम्ही बायकोला भेटायला." दिव्याच्या आईने लग्नानंतर दिव्याच्या माहेरपणासाठी मिलींदला बरेचदा फोन केलेला परंतु यावेळी त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच आत्मीयता होती. दिव्याच्या उपचारात कुठलीही कसर रहायला नको म्हणून मिलींदने देखील दिव्याला कधी एकटं सोडलं नव्हतं पण आता मुलगी पहिलटकरीण आणि तिचे डोहाळे पुरविण्याचा आनंद तिच्या माहेरच्यांना मिळावा म्हणून मिलींदने दिव्याला माहेरी सोडलं.

"ही सगळी औषध वेळेवर घे आणि हो त्या बॅगेत फळं आहेत... फ्रिजमध्ये ठेवतोय. हवं तेव्हा ज्यूस बनवून घेत रहा. काहीही वाटलं तर फोन कर. येईल मी लगेच!" मिलींद दिव्याचा निरोप घेत होता. जावई आपल्या मुलीची एवढी काळजी घेतो हे बघून दिव्याची आई अगदी भरून पावली.

"मुलीचा सुखाचा संसार बघायला मिळणं याखेरीज हवं तरी काय असतं... नाही का हो दिव्याचे बाबा!" दिव्याची आई तिच्या वडीलांशी बोलत असतानाच तिथे नेहा आली.

"काकू दिव्या आल्याचं कळलं. म्हटलं भेटावं मैत्रिणीला!" नेहा.

"का नाही बेटा. जा तिच्या रुममध्येच आहे ती. विश्रांती करत असेल तर मात्र तुला थांबावं लागेल...!" दिव्याची आई बोलत असतानाच नेहा कोणताही विचार न करता दिव्याच्या रुममध्ये घुसली.

"तू इथे?" दिव्याला जरा आश्चर्यच वाटलं.

"हो... अगं मला काय हौस आहे होय तुला असं इथे येऊन भेटण्याची. तुझा नवरा... मिलींद! तोच म्हटला एकदा माझ्या लाडक्या बायकोला भेट. म्हणून आले बाई मी." नेहा ठसक्यात बोलली.

"मिलींद? तो का असं म्हणेल? तुला कधी भेटला तो?" दिव्याला पडलेले प्रश्न स्वाभाविक होते.

"मला भेटायला तर सगळेच अगदी आतूर असतात ग पण मला काय रिकामपण असतं होय! तुझ्या तब्येती बाबत होतं म्हणून मी आले." नेहा.

"तब्येत... त्याचा तुझ्याशी काय संबंध! एवढी कोणती दाट मैत्री आपली की मी प्रेग्नंट असताना तू भेटायला यावं?" दिव्या.

"ओह... किती लवकर गाडी पुढे गेली ग तुझ्या आयुष्याची! तुझा नवरा तर सांगत होता की तुझं मनःस्वास्थ ठीक नसतं हल्ली. पण तू तर अगदी ओक्के दिसते आहेस." नेहा टोमणे मारत होती.

"मनःस्वास्थ... मला काहीही झालेलं नाही. तू जाऊ शकतेस." दिव्यानं तिच्याच स्वरात तिला उत्तर दिलं.

"हो निनादचं आणि पर्यायानं माझं आयुष्य खराब करून तू तर आता ठिक असणारंच! कसं जमतं ग असं वागायला?" नेहा.


नेहाच्या घणाघाती बोलण्याने दिव्याचा चेहरा एकदम पडला.

"निनाद... कुठे असतो ग तो हल्ली? भेटत नाही... बोलत नाही! दिसतो फक्त कधीमधी आणि एकदम निघून जातो." दिव्या हळव्या स्वरात विचारत होती.


"तूच तुझं शोधत बस... नाहीतर तुझा नवरा पुन्हा मलाच... चल निघते मी!" नेहा अर्धवट काहीतरी बोलत तिथून निघून गेली.

"डायरी? बहुतेक नेहा विसरली असेल ही डायरी. तिला कळवायला हवं." दिव्या स्वतःशीच बोलत होती.

नेहाला फोन लावताना नकळत डायरीची काही पानं उघडली गेली आणि त्या डायरीतून काही फोटोज् देखील खाली पडले.

"निनादचं अक्षर! किती सुरेख... सुबक... आणि सुटसुटीत! काय लिहीलंय वाचते तरी."

"सोडून जायचे तर तोडून सर्व जा तू
का ठेवतेस जिंदा मुर्दाड जिंदगानी!"


"कोसळणारी सर एखादी ओसरते पण
आठवणींची सरणापर्यंत अविरत भळभळ!"


"श्वास हे देतील धोका
अन् हे आयुष्य सरेल;
त्याक्षणी ही तुझी आठवण
माझ्या सरणावर उरेल!"

प्रत्येक कवितेखाली... गझलेखाली आणि शेराखाली त्या त्या कवि-कवयित्रीचं नाव लिहीलेलं होतं. भावस्पर्शी कविता-गाणी हा खरंतर निनादचा विकपॉईंट होता पण त्याच्या डायरीतला त्याच्याच हस्ताक्षरातील हा संचय वाचून दिव्याच्या डोळातून अश्रु ओघळायला लागले होते. तेवढ्यात तिच्या फोनची रींग वाजली आणि तिने फोटोज् डायरीत घालून डायरी बंद करून ठेवली.

"काय झालं दिव्या? उदास का वाटतोय तुझा आवाज?" मिलींदला दिव्याच्या बोलण्यात उदासी जाणवली होती.

"नाही कुठे काय? काहीच नाही... बस असंच!" दिव्या.

आता मिलींदची कसरत अधिकच वाढली होती. प्रेग्नन्सीमुळे बरीच औषधं बंद करावी लागलेली होती त्यात दिव्या माहेरी असल्याने तिचं मन जपता येईल असं फारंस काही करता येणं शक्यच नव्हतं.

तिकडे नेहाच्या खुरापती मात्र वाढतच चालल्या होत्या.

"हॅलो, नेहा बोलतेय!" नेहा.

"बोल डियर बोल... काय म्हणते कशी आहेस तू? आणि हो केलंस का ग माझं काम फत्ते?" समोरची व्यक्ती नेहाची फार आपुलकीने चौकशी करत होती.

"तुमचं काम पूर्ण झालंच म्हणून समजा. आता त्या वेड्या दिव्याला कितीही वाटलं तरी ती बरी होणार नाही. ती कुणाला काही बोलूच शकणार नाही. डायरी वाचून वाचून विचारात गुरफटत जाईल आणि बाईसाहेब आता तर फारशी औषधं पण घेऊ शकणार नाहीत. प्रेग्नंट आहेत न! हा हा हा... माझ्याशी पंगा घेणाऱ्याला कसं बरं सोडेल मी!" नेहाच्या बोलण्यात एक निराळाच आसुरी आनंद होता.

क्रमशः

तृप्ती काळे
नागपूर टीम

🎭 Series Post

View all