प्रेयसी दान - भाग ५

आपल्या सच्चा प्रेमाचं दान करून प्रेयसीच्या सुखाखातर समर्पण वृत्ती जपणाऱ्या प्रियकराची एक अजरामर, रोमांचक आणि रहस्यमयी प्रेमकथा!

राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा


विषय रहस्य कथा

प्रेयसी दान-भाग ५

"भाऊजी तुमच्या पासून हे सगळं लपवलं यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं एक हे देखील होतं की दिव्या आपल्या वैवाहिक जीवनाला सुरवात करताना तिच्या मनात भतकाळातील घटनांचा कुठलाही क्लेष नसावा... जे झालं त्यात तिने स्वतःला दोषी ठरवून निराशेत कुढू नये." स्वाती.

"पण मग माझ्यापासून देखील तुम्ही हे सत्य लपवून ठेवलंत... का गं स्वाती... मी फक्त दिव्याचा नवरा एवढं एकच नातं होत का? लग्नाच्या पूर्वीपासून तुमच्या फ्रेंड सर्कलमधील एक सदस्य मी स्वतःला मानत आलोय ते फक्त दाखण्यापुरतं होतं का?" मिलींद जणू काही स्वातीला आरोपीच्या कटघरात उभं करून आपल्या मनातली हळहळ व्यक्त करत होता.

"निनादची आई...! त्यांनी अगदी कडक शब्दात बजावलेलं की याबद्दल कुठेही वाच्यता करायची नाही. दिव्या आणि तिचे कुटूंब काय पण इतरत्र देखील कुठेच बोलायचं नाही." स्वाती.

"का पण...! आमच्या वैवाहीक जीवनाची सुरवात सुखरूप व्हावी असं त्यांना वाटलं असेलही कदाचित पण तरीही!" मिलींद.

"आम्हाला पहिले वाटलं निनादला या व्हिडीओ नंतर चांगली ट्रीटमेंट मिळाली असेल पण..." बोलताना मधेच स्वातीचे डोळे पाणावले.

"पण काय स्वाती... बोल ना!" मिलींद.

"त्यानंतर एकीकडे तुमची सप्तपदी पार पडली अन् दुसरीकडे निनादने जगण्याची आसं सोडली. मिळणाऱ्या उपचाराला त्याचा प्रतिसाद अगदीच कमी कमी होतं गेला आणि तो..." स्वाती हे सगळं सांगताना फारच भावूक झाली आणि बोलताना अचानक निःशब्द झाली

"काय झालं निनादला... सिरीयस आहे का तो? कॅन्सर पेशंटच बरेचदा असं होतं. रिस्पॉन्ड करतं नाहीत मात्र वेळेत योग्य उपचार मिळाला की होतात बरे " मिलींद.

"तो आता कसा बरा होईल. व्हिडिओमधे दिसते तेवढी शक्ती... तेवढं मानसिक बळ देखील नव्हतं शिल्लक शरीरा पेक्षा मनानेच तो जास्त खचला होता. हे जग सोडून निघून गेला निनाद."स्वाती.

"काय...! मला व्हिडीओ पाहिल्यावर असं वाटलं की तो आय.सी.यू. त असेल. फारच खालावलेला असेल... कदाचित तो फार सिरीयस असल्याने ठीक होणं देखील आता अवघड असेल पण असं कुणी जातं का गं? एवढी भावूक कविता वाचून कायमचा एक्झीट घेतला त्याने तर!" मिलींद.

"स्वाती, मला अजूनही हे नाहीच कळलं की दिव्या का एवढी डिप्रेस्ड आहे ते...? म्हणजे तिला निनाद बद्दल माहिती तर झालेलं नसेल ना? किंवा कदाचित तो सिरीयस असल्याने हॉस्पीटलाइजड् आहे या भ्रमात तर ती नसेल ना?" एक तथ्य उमगल तरी बऱ्याच प्रश्नांनी मिलींदला भंडाळून सोडलं होतं.

"मला देखील हा तिढा सुटलेला नाही की जर निनाद हे जग सोडून गेलाय तर दिव्याला नेमकं भेटतं तरी कोण? की तिला त्याच्या स्वरांप्रमाणे भेटीचे देखील भास होतात. एक काम करुयात का आपण? दिव्याला एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ञाला नाहितर समुपदेशकाला दाखवूयात का?" स्वाती.

"मी उद्याच घेतो अपॉइंटमेंट. डॉ. बारी...! मित्रच आहे. बघू काय म्हणतोय तो. पण स्वाती तुझी मदत लागेल बरं का मला या कामी." मिलींद.

"मैत्रिणीला या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी शक्य ती सर्व मदत करणं हे माझं कामच आहे." स्वाती.

"मिलींद आज किती उशिरा आलास. आपण निनादला भेटायला जाणार होतो. तू कालच मला प्रॉमिस केलेलं की तो नेमका कुठे हॉस्पीटलाइजड् आहे ते माहीत करून घेशील. मला दुपारी निनादचा कॉल आलेला... पण कुठे आहे कसा आहे हे मात्र तो काहीच बोलला नाही." दिव्याची अवस्था वरचेवर अधिकच गंभीर होत चालली होती.

ठरल्या प्रमाणे मिलींद दिव्याला डॉ. बारींकडे घेऊन गेला. तिला असं घेऊन जाणं सोपं नव्हतंच. स्वातीचे मनःस्वास्थ्य ठीक नाही आणि दिव्याला तिच्या सोबत जावं लागेल असं काही तरी सांगून तिथवर येण्यास तयार केलं.

"डॉक्टर मी स्वाती. मला हल्ली भास होतात...! कुणीतरी माझ्याशी बोलतंय... मला आवाज देतयं असं वाटतं." मैत्रिणीला बोलतं करण्यासाठी स्वाती स्वतःच नसलेली व्यथा मांडत होती आणि त्यात यश आलं देखील.

"डॉक्टर... स्वातीला कदाचित भास होतच नसतील. म्हणजे बघा मला निनाद भेटतो... कैकदा फोनवर आम्ही बोलतो अन् ही स्वाती... माझा नवरा मिलींद मला समजावताय की निनाद सिरीयस आहे... हॉस्पीटलाइजड् आहे... तो भेटायला येणं शक्यच नाही." दिव्या बोलायला लागल्याने तिचे योग्य निदान करणे काहीसे सोयीस्कर झाले असे वाटतं होते. पण मनाच्या वेदनेचा उपचार एवढा का सोपा असतो!

"बरं दिव्या मला हे सांग की तुम्ही भेटता कुठे? नाही म्हणजे अगदीच सहज विचारतोय बरं..इच्छा असेल तरच बोल." डॉ. बारी

"लग्नात झालेली भेट आमची आणि त्यानंतर दोन तीन भेटी झाल्या असतील... त्याला नवीन अल्बम काढायचा आहे तर त्यासाठीच भेटलेलो आम्ही." दिव्या.

"लग्नात आला होता का निनाद? नाही म्हणजे खरंच भेटला का तुला तो लग्नात?" डॉ.बारी.

" हो तर... संगीताच्या मैफिलत तर त्यानेच रंगत आणलेली... आणि हो मंगलाष्टकं म्हणताना देखील त्याचेच स्वर दुमदुमत होते अख्या हॉलमधे. यालाच तर मैत्री म्हणतात ना डॉक्टर साहेब." दिव्या आज खूप मोठ्या कालावधीनंतर फारच उत्साही होती निनाद बद्दल बोलताना.

"आणखी कोण कोण आलं होतं तुमच्या लग्नाला? आठवण्याचा जरा प्रयत्न कर..." डॉक्टरांनी संवादाचा एक भाग म्हणून अगदी सहज विचारलं.

"राहुल, प्रिया, पल्लवी,. हेमंत, सीमा आणि..." दिव्या बोलताना अचानक स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यासमोर एक भयावह चित्र उभं झालेलं होतं ज्यामुळे ती बावचळून गेली होती.

"आणि कोण?? तुला काय होतंय दिव्या... आर यु ओके?" डॉक्टरांनी काळजी पोटी विचारले.

"बस... आता मला काहीच विचारू नका. मिलींद... मिलींद... " दिव्या आरडाओरड करायला लागली.

मिलींद रिसेप्शन मधून लगबगीने आत गेला. आपली कावरीबावरी झालेली बायको पाहून तो अचिकच उद्विग्न झालेला होता. तो दिव्याच्या डोक्यावून हात फिरवत होता"

"दिव्याचा हा त्रास क्रॉनिक होतो आहे... काही सिट्टींग्ज घ्याव्या लागतील. कदाचित संमोहन शास्त्र पद्धतीचा अवलंब करावा लागेल.. ती कितीपत आणि केव्हा ठीक होईल हे सांगणं अवघड आहे. सध्या एक इंजेक्शन दिलंय... बघू काय करता येतं ते!” मिलींद मात्र अजूनही दिव्याला थोपटत होता आणि त्याचवेळी लग्नातला एकेक प्रसंग आठविण्याचा प्रयत्न करत होता.

"डॉक्टरांसोबतच्या संवादातून दिव्याला एवढा त्रास होईल असं काही लग्नात झालं तर नसेल ना...?" अचानक या शंकेची पाल मिलींदच्या डोक्यात चुकचुकली.

क्रमशः

तृप्ती काळे
नागपूर टीम

🎭 Series Post

View all