प्रेयसी दान-भाग ११ (अंतिम भाग)

आपल्या सच्चा प्रेमाचं दान करून प्रेयसीच्या सुखाखातर समर्पण वृत्ती जपणाऱ्या प्रियकराची एक अजरामर, रोमांचक आणि रहस्यमयी अजरामर प्रेमकथा! संपूर्ण कथामालिका अवश्य वाचा... अभिप्रायाचा प्रतिक्षेत...! प्रेयसी दान आणि लेखिका!

राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा


विषय रहस्य कथा

प्रेयसी दान-भाग ११ (अंतिम भाग)

"बाबा सो सॉरी... एका कामात फसलो होतो आणि फोन सायलेंट मोडवर होता. काय म्हणाले डॉक्टर?" मिलींद हॉस्पिटलला पोहोचतच त्याने दिव्याच्या बाबांना तिच्या विषयी अगदी तळमळीने चौकशी केली.

"तिने कसला तरी धसका घेतलाय म्हणे. मनावर प्रचंड ताण आल्याने तिचं ब्लड प्रेशर शूट झालंय त्यामुळे कदाचित बाळ..." दिव्याचे बाबा बोलताना अचानक निःशब्द झाले.

सलाईन लागलेल्या दिव्याला न्याहाळताना मिलींद भूतकाळात गेला आणि निनादच्या एकेका वाक्याचा त्याला उलगडा होऊ लागला होता. परिस्थिती निखळ प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींना किती हतबल करू शकते याची अनुभूती आज मिलींदला आली होती.

"आपल्या होणाऱ्या बाळाला काही झालं तर? दिव्याची प्रकृती अधिक ढासळली तर? मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मी एवढं काय शोधत होतो की माझं सगळ भान हरवलेलं होतं!" मिलींद स्वतःलाच दोष देत होता.

"मी मला मिळालेल्या श्रीमंतीपुढे एवढी आंधळी झाले होते की हिरा आणि काच यात फरक करू शकले नाही? की सावत्र आई म्हणून मुलाचं मन ओळखू शकले नाही. शेवटी आई म्हणून मी कुठेतरी कमीच पडले... जग म्हणेल आता सावत्र आई मुलाच्या भावना ओळखू शकली नाही!" निनादची आई देखील विचारात गुरफटून गेली होती.

"नेहा... हो... ये तू हॉस्पिटलला. फोनवर नको... प्रत्यक्षच भेटून बोलूत आपण." निनादच्या आईने नेहाला हॉस्पिटलला बोलवून घेतले.

"हॅलो, डॉ. बारी... तुमची एक पेशंट आमच्या हॉस्पिटलला आहे. कंडीशन जरा क्रिटिकल आहे. एक व्हीजीट द्याल." डॉक्टरांनी मिलींदशी संवाद साधून डॉक्टर बारींना तिथे बोलावून घेतले.

दिव्याची जवळची मैत्रीण स्वाती देखील येऊन पोहोचली होती. सर्वजण दिव्याच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत होते. दिव्याने वाचलेली डायरी आणि फोटो मिलींदने डॉक्टर बारींकडे दिले.

डॉक्टर बारींनी सर्वांना केबिनमधे बोलावून घेतले आणि दिव्याला जाग आल्यानंतर तिच्याशी कशा पद्धतीने संवाद साधायचा याची दिशा ठरवून दिली.

बऱ्याच कालावधी नंतर औषधाचा प्रभाव काहीसा कमी झाल्याने दिव्याला जाग आली. डोळे उघडताच मिलींद दिसल्याने तिच्या भावना अनावर झाल्या होत्या. मिलींद तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत होता. अश्रू बिंदू त्याच्या नयनांमधून देखील ओघळत होते.

"मी खरंच काहीही केलेलं नाही... मला त्रास होतोय... निनाद कुठंय?" दिव्या निनादच्या आईला बघून भांबावली होती.

"दिव्या... मला माफ कर! माझं चुकलं." निनादची आई दिव्याची माफी मागत होती.

"तुझी अजिबात चूक नाही. माझंच चुकलं! माझे काही निर्णय मी तुमच्यावर लादले आणि हीच चूक मला भोवली." निनादची आई बोलत होती.

"ती डायरी... ते फोटो... काय झालं निनादला?" दिव्या कावरीबावरी होऊन विचारत होती.

"मी काही मनाने नाही ठेवली ती डायरी." नेहा अजूनही तोऱ्यात होती.

"हो मी घाबरले होते... मला वाटलं मिलींद मला जाब विचारेल. मग नेहाने सुचविलं की तू अजून डिप्रेस्ड झाली तर हे कुणालाच कळणार नाही की मी तुझा मानसिक छळ केला. लग्नाच्या दिवशी येऊन मी ज्या पद्धतीने तुझ्याशी बोलले ते ऐकल्यावर खरं प्रेम करणारी हळव्या मनाची व्यक्ती खचून जाणार हे स्वाभाविकच होतं!" निनादची आई.

"मग ते आवाज... ते भास?" मिलींदने नेहाकडे संशयाच्या नजरेनं पहात विचारलं.

"हो... सुरवातीला मी ते ऑडियो क्लिप्स तुमच्या घराजवळ वाजतील याची सोय केलेली होती... मात्र नंतर मी सगळं थांबवलं देखील होतं. पण ती डायरी मी पोहचती केली कारण मिलींद सारख्या कुणी येवून मला... या नेहाला जाब विचारावा याने माझा अपमान झाल्यासारखं वाटलं होतं मला! मला निनाद आवडायचा. पैसा, प्रतिष्ठा, सौंदर्य, ऐश्वर्य... काय नव्हतं माझ्यकडे? आणि निनादच्या आई बाबांना तर मी पसंत होतेच. मला तुझा हेवा वाटायचा दिव्या आणि त्यातूनच असा विकृत होतं गेला माझा स्वभाव." नेहाचा स्वर पहिल्यांदाच जरा नरमलेला होता.

"निनाद कुठे आहे मग सध्या की तो हे जग सोडून..." दिव्या पुन्हा हळवी होऊन मिलींदला बिलगली.

मिलींदने स्वातीच्या मोबाईल फोन मधली ती क्लिप ओपन केली ज्यात निनादने मिलींद आणि दिव्याला लग्नाच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या. सोबतच त्याने सुप्रसिद्ध कवी गझलकार अमित वाघ यांची \"प्रेयसी दान\" ही कविता सादर केलेली होती.

"लग्न लावले तिचे स्वत:हून केले प्रेयसीदान.....
अग्नि सोबत जाळून आलो.. माझा व्याकूळ प्राण....

फिरत राहिलो तीर... नदीवर दगडांचा वर्षाव...
रात्र अनावर तिला..मलाही मधुचंद्राचा घाव...

साज सजवलेल्या देहाचा जेव्हा उतरत होता....
नदीत तेव्हा पाण्यावरती देह तरंगत होता....

पाण्यामध्ये भिजूनी काया.. लपले माझे आसू..
मेल्यावरही ओठांवरती ठेवून गेलो हासू...

"प्रेम सनातन आहे माझे.." शप्पथ नव्हती खोटी...
तिच्या तनूचा बनून गोळा जन्म घेतला पोटी...

निर्मळ झाले नाते अमुचे नाही कुठे वासना....
तिच्या स्तनांचा माझ्यासाठी झाला आता पान्हा...

किती अलौकीक.. किती अपूर्व... या प्रेमाची गाथा..
प्रेयसीचा मी झालो तान्हा..प्रेयसी झाली माता..."

ऑडियो थांबला आणि सर्वत्र नीरव शांतता पसरली होती. दिव्या बर्फागत अगदी गार पडली होती. निनाद हे जग सोडून गेलाय हे सत्य स्वीकारून पुढे जाणं सोपं नव्हतं. निनाद बोलला त्याप्रमाणे वागला देखील होता. लग्नाची एक अविस्मरणीय भेट त्याने मिलींदला दिलेली होती.

आज तब्बल वीस वर्षांनंतर तिचं गिटार आणि अगदी तेच स्वर गुंजत होते. मात्र दिव्या आता भांबावलेल्या अवस्थेत मुळीच नव्हती. का... नेमकी कोण वाजवत असेल ही गिटार? हा प्रश्न तिला छेडला नाही कारण गिटारवर तार छेडणारी व्यक्ती निनादच होती आणि
मिलींद बोलला होता त्याप्रमाणे दिव्या आणि मिलींद यांच्यातील दुवा देखील निनादच ठरलेला होता. निनाद... अर्थातच युवा दिल की धडकन निनाद मिलींद देशमुख!


तृप्ती काळे
नागपूर टीम

🎭 Series Post

View all