प्रेयसी दान - भाग १०

आपल्या सच्चा प्रेमाचं दान करून प्रेयसीच्या सुखाखातर समर्पण वृत्ती जपणाऱ्या प्रियकराची एक अजरामर, रोमांचक आणि रहस्यमयी प्रेमकथा!
राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

विषय रहस्य कथा

प्रेयसी दान-भाग १०


दिव्या माहेरी असल्याने मिलींदला बरीच मोकळीक मिळाली होती. त्यामुळे डोक्यात घोळत असलेल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी मिलींदकडे भरपूर वेळ होता. निवांत बसून लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ बघण्यास देखील फुरसत मिळालेली नव्हती.

एकेक फोटो मिलींदच्या लग्नातील आठवणींना उजाळा देत होता. मिलींद फोटो अगदी बारकाईने बघत होता. जवळपास संपूर्ण अल्बम बघून झालेला होता पण खटकावं असं काही मिळालेलं नव्हतं त्यामुळे मिलींद जरा नाराज झाला होता.

न रहावून दिव्याने ती दडवून ठेवलेली डायरी पुन्हा बाहेर काढली. एकेक पान ती अगदी मन लावून वाचत होती. कविता... चारोळी... गझल तर मधेच कुठेतरी निनादच्या मनातलं कोलाहल त्या डायरीत व्यक्त झालेलं होतं.

दिव्या तू मला सोडून जाते आहेस की मी हे आयुष्य सोडून जातोय हेच मला कळत नाही. जसजसे क्षण सरताय तसतसा या श्वासाचा भार वाटू लागला आहे. कवयित्रीनं लिहीलंय अगदी तसंच काहीसं होतय. काय होता बरं त्या ओळी? मी तर आता त्या कवयित्रीचं नाव पण विसरलो.

"आज श्वासाचा जिवा का भार व्हावा
सोडुनी देहास आत्मा पार व्हावा!"

दिव्या डायरी वाचत होती आणि तिच्या पापण्यांमधून आसवं सतत ओघळत होती.

मिलींदने अल्बम बाजूला ठेवला आणि लग्नाची सिडी प्लेअर मधे टाकली. एखाद्या हिंदी चित्रपटाप्रमाणे लग्नाच्या व्हिडीओचं एडीटींग केलेलं होतं. संपूर्ण सिडी दोनदा बघून देखील मिलींदचं समाधान झालेलं नव्हतं. मग त्याला लगेच क्लिक झालं आणि लग्नाचं ओरीजिनल शूटींग मिळविण्यासाठी त्याने फोटोग्राफरला फोन लावला.

"ओरीजिनल क्लीप्सचं बॅकअप आम्ही सहसा ठेवतं नाही. एकदा सिडी आणि अल्बम हँडओव्हर केला की त्या क्लीप्स आमच्यासाठी वेस्ट मटेरीयल असतात." फोटोग्राफरने स्पष्ट भाषेत सांगितलं.

"मी त्या क्लीप्ससाठी डबल पे करायला तयार आहे. काहीही करा पण ते जमवा. मी येतोय तुमच्या स्टुडीओत अर्ध्या तासात." मिलींद खात्री नसलेल्या गोष्टींबाबत देखील आशाळभूत झालेला होता.


"सर या... बसा! फार मुश्कीलीने मिळाल्यात या ओरीजिनल व्हिडीओ क्लीप्स."

"व्यावसायिक ते व्यावसायिकच... आपली कमाई दुप्पट तिप्पट कुठे कशी काढून घ्यायची हे यांना चांगलच ठाऊक असतं!" हा विचार करत मिलींदने पेमेंट केलं आणि त्याच स्टुडीओत बसून तो व्हिडीओ क्लीप्स चेक करत होता.

"काय झालं असेल? मिलींद फोन का उचलत नाहीय? निनादचे असे अंत्यवस्थ फोटो आणि ही डायरी... मिलींदला सांगितलं असतं आणि जावून भेटलोच असतो निनादला!" दिव्या मिलींदला वारंवार फोन करत होती आणि मिलींद मात्र फोन सायलेंट करून क्लीप्स पहाण्यात गुंग झालेला होता.

"अखेरचा निरोप दे.. मिठीत गोड अंत दे
नसेनसेतुनी जहर अधीरले पाळायला!"

डायरी वाचताना मन भरून आल्यानं आणि विचारांची कालवाकालव झाल्यानं दिव्याचं डोकं पार बधीर झालेलं होतं.

"काय... यांनी... यांनी दिव्याला असं छळलं? पण का?" व्हिडीओ पॉज करून मिलींदने पुन्हा पाहिला आणि त्याच्या मनातली धूसरशी शंका दूर झाली.

मिलींद स्टुडीओतून बाहेर पडला मात्र मनातल्या अनंत विचारांना... प्रश्नांना अजूनही वाट गवसलेली नव्हती!

"का... काकू तुम्ही हे का केलंत? अहो, दिव्या तुम्हाला फार मानते आणि तुम्ही तिच्याच मनाशी खेळलात!" मिलींदने एकदम केलेल्या प्रश्नांमुळे निनादची आई भांबावून गेली होती.

"काय केलं मी? जरा तोंड सांभाळून बोला मिलींदजी!" निनादच्या आईने मिलींदचे दावे फेटाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण मिलींदच्या आवेशापुढे त्यांचं काही चालणं अशक्य होतं.

"हो... मीच दिव्याला अगदी तुमच्या लग्नात येवून मनस्ताप दिला. कारण मला होणारा त्रास काही कमी नव्हता. सावत्र असले तरीही निनादची आई होते मी. एकीकडे तुमचा लग्न सोहळा पार पडत होता आणि दुसरीकडे निनादने कोणत्याही उपचाराला प्रतिसाद देणं अगदी कमी केलेलं होतं. त्याची अवस्था बघवत नव्हती मला." निनादची आई आपल्या कृत्याचे स्पष्टीकरण देत होती.

"मुलाची एवढीच काळजी होती तर त्याचं प्रेम त्याला का नाही मिळू दिलं?" मिलींद मनातली भडास आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून व्यक्त करत होता.

"पत्रिका... गुरुजी म्हणाले होते!" निनादची आई उत्तर देतं असतानाच मिलींदने प्रतिप्रश्न केला.

"पत्रिका हे फक्त कारण होतं... दिव्यासारख्या साध्या मुलीला दूर करण्यासाठी! आज मी अख्खी कुंडली घेऊन आलोय त्यामुळे खोटं बोलणं थांबवा आता." मिलींद.

"हो... कारण दिव्यासारखी मिडल क्लास कुटुंबातली मुलगी मला सून म्हणून कधीच पसंत नव्हती! नेहा म्हणायची की दिव्याचा आमच्या संपत्तीवर डोळा आहे. प्रेम वगैरे हे सगळं नाटक आहे! आणि मलाही ते खरं वाटलं. कॅन्सर सारख्या आजाराने ग्रस्त मुलासाठी उगाच कोण आपलं आयुष्य उध्वस्त करेल ना?" निनादची आई एकेक स्पष्टीकरण देत होती.

"मग का नाही वाचवलं आपल्या मुलाला या संपत्तीच्या जोरावर? सगळं तर तुमच्या मनाप्रमाणे होत होतं." मिलींदचे प्रश्न निनादच्या आईसाठी वर्मी घाव बसल्या सारखे होते.

"कारण त्याच्या मनाने जगण्याची आस सोडली होती. जिथे आशा संपते तिथे सगळं काही संपल्यागत असतं." दिव्याची आई हतबल होऊन बोलत होती.

"अहो मग दिव्याला घेऊन जायचं असतं... लग्न पुढे ढकलल असतं तरी काय फरक पडला असता? कदाचित आज निनाद बरा झालेला असता!" मिलींद अगदी मनापासून बोलतं होता.

"हो मी तेच करणार होते... हळदीच्या रात्री निघाले देखील होते पण नेहाने अडविले! म्हणाली "निनादच्या आयुष्यातून जी पिडा आपसूक निघून जाते आहे तिला का आमंत्रण देताय? मी घेईल काळजी निनादची!" मग मलाही वाटलं की आपल्या बरोबरीची मुलगी निनादला जोडीदार म्हणून लाभली तर सगळ ठीक होईल." निनादची आई बोलत असतानाच मिलींदचं अचानक मोबाईल फोनकडे लक्ष गेलं.

"बापरे दिव्याचे आणि तिच्या आई बाबांचे एवढे मिस्ड कॉल्स? काकू जे झालं त्यात कोण चूक कोण बरोबर हा विचार करत बसलो तर अजून अघटीत बरंच काही घडून बसेल. दिव्याच्या बाबांचा मेसेज आहे की दिव्याची प्रकृती ठीक नाही. आता तुम्ही येणं... तिच्याशी बोलणं गरजेचं आहे!" मिलींद निनादच्या आईला घेऊन हॉस्पिटलकडे निघाला होता.

क्रमशः

तृप्ती काळे
नागपूर टीम

🎭 Series Post

View all