प्रेयसी दान - भाग ६

आपल्या सच्चा प्रेमाचं दान करून प्रेयसीच्या सुखाखातर समर्पण वृत्ती जपणाऱ्या प्रियकराची एक अजरामर, रोमांचक आणि रहस्यमयी प्रेमकथा!


राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

विषय रहस्य कथा

प्रेयसी दान-भाग ६

"नाही... मी काहीही केलेलं नाही. मी खरंच सांगते. अहो, विश्वास ठेवा माझ्यावर." दिव्या झोपेतच बरळत होती.

"आमचं फार प्रेम होतं परस्परांवर...! निर्व्याज... निखळ... आणि निस्वार्थी. निनाद ए निनाद... सांग ना रे यांना. बोल काही. " दिव्याची बडबड बंद तर होत नव्हतीच पण तिच्या बोलण्याचा काही अर्थ देखील लागत नव्हता.

सायंकाळ धूसर होत चाललेली होती आणि त्या दूग्ध केशरी सुवर्ण संधीकाली दिव्या अधिकच लोभस वाटू लागली. मिलींदने दोन कॉफीचे मग आणि सोबत दिव्याच्या आवडीचे सँडविच बनवून आणले आणि दिव्याला मायेने कुरवाळत उठविलं.

"उठ दिव्या... फ्रेश हो आणि थोडं खाऊन घे. बघ तरी तुला आवडतंय का ते...!" मिलींदने आवाज दिला आणि दिव्याला अर्धवट झोपेतून जागं आली.

"मिलींद... सो सॉरी! असं दिवेलागणीच्या वेळेला मी एवढी सुस्त झोपून राहिली आणि तुला हे सगळं करावं लागलं." दिव्या एका संस्कारी कुटुंबातली त्यामुळे तिला जरा वाईट वाटलं. "इथे आपण दोघेच आहोत म्हणून ठीक आहे. आई बाबा असते तर... काय वाटलं असतं त्यांना?" दिव्या.

"अगं माझे आई बाबा इतक्या कोत्या विचाराचे नक्कीच नाहीत. तब्येत महत्वाची सूनबाईंची! हेच म्हंटले असते ते." मिलींद.

"मला कुठे काय झालंय? अगदी ठणठणीत आहे मी. जरा डोकं जड पडलय पण तुझी कॉफी विथ सँडविचची ट्रीट सगळं ओक्के करेल." दिव्याला असं प्रसन्न पाहून मिलींदला देखील बरं वाटलं मात्र दुपारचे काही प्रसंग ती खरंच विसरली असेल का या विचारात तो तल्लीन झाला.

"वाह क्या बात है मिलींद! तुझ्या हाताला चव आहे. असं वाटतंय रोज असंच पडलं राहावं आणि तुझ्या हातचं छान छान खायला मिळावं. कॉफी तर अगदी कडक!" दिव्या.

"नको... असं का म्हणतेस की रोज असंच पडलं राहावं. तुला अगदी प्रसन्न बघायचंय मला. त्यासाठी वाटल्यास मी रोज बनवेल अशी कडक कॉफी!" मिलींद.

रात्रीचं जेवण आटोपून दोघेही शतपावली करण्यासाठी म्हणून बाहेर पडले. गार वाऱ्याची मंद झुळूक दिव्याच्या रेशमी केसांना तिच्या चेहऱ्यावरून अलगद स्पर्शून जात होती. रातराणीचा सुगंध मन धुंद करत होता आणि अशा रम्य वेळी आपल्या बायकोचा हात हातात घेऊन जाताना मिलींद मनोमन तृप्त होत होता. या सुखद क्षणांनी दिव्याच्या काळजीने आलेली त्रस्तता आणि मानसिक थकवा काहीसा कमी केलेला होता.

"ओ भाऊ, गजरा घ्या ना गजरा... घरला जायाचंय मला पण ही गजऱ्याची टोपली सरल्या बिगर न्हाय जाया जमत." एका गजरेवालीने मिलींद दिव्याची वाट अडवत गजरा घ्यायला जणू भागच पाडलं.

"काय म्हणतेस दिव्या...! घेऊ का गजरा तुझ्यासाठी...? नाही म्हणजे माळशील न तू गजरा?" मिलींदने विचारलं.

"मोगरा... वाह का नाही! किती सुरेख आहेत हे गजरे! तूच गुंफतेस का हे गाठीचे गजरे?" दिव्या आज बरेच दिवसांनी असं मोकळं वागत बोलत होती.

थोड अंतर दूर जातो न जातो तोच दिव्या अचानक अस्वस्थ झाली. "मिलींद... अरे बघ ना त्या हॉलला म्युझिकल कॉन्सर्ट सुरू आहे." असं म्हणतं दिव्या वाऱ्याच्या वेगाने त्या हॉलकडे जायला निघाली. त्या हॉलमधून निनादचा स्वर आणि सोबतीस गिटारीवर तेच संगीत ऐकू येत होतं. दिव्या तर त्या स्वरांनी ओढली गेलीच पण मिलींद देखील अगदी भांबावून गेला होता. आता खरी कसोटी हाती ती म्हणजे मिलींदची. एकीकडे दिव्याला सांभाळणं आणि दुसरीकडे कितीही इच्छा झाली तरी स्वतःला अशा ठिकाणी जाण्यापासून थांबविणं! मिलींदने दिव्याला एका बाकावर बसविलं.

"एवढ्या वेळेवर कुठे तिकीट मिळतंय दिव्या! आपण पुढल्या कॉन्सर्टला नक्की जावूत." मिलींद दिव्याची समजूत काढत होता मात्र तिची काही समजून घेण्याची इच्छाच नव्हती.

"ऐक... ऐक मिलींद... अरे निनादचा शो सुरू आहे आणि आपण बाहेर भटकतोय. चल ना जरा वेळ बसुत... ऐकुत दोघेही." दिव्या हट्टाला पेटलेली होती.

मिलींदला एकदम आठवलं आणि त्याने डॉ. बारींनी सुचविलेली गोळी दिव्याला पाण्यात घालून दिली. काही वेळाने दिव्या शांत झाली. मिलींद दिव्याला घेऊन घरी आला.

"मिलींद... थांब ना जवळ. आज इथेच थांब. फार भीती वाटते आहे मला." दिव्याने मिलींदचा हात अगदी गच्च पकडून ठेवला. दिव्याला औषधाची सुस्ती चढलेली होती. माळलेला मोहक गजरा... नेसलेली सुंदर साडी आणि वाऱ्याने चेहऱ्यावर ढळणाऱ्या बटा यामुळे दिव्या मिलींदला फारच मोहक वाटत होती. दिव्याच्या विचारात गुंतलेला असतानाच मिलींदला कधी डोळा लागला हे त्याला कळलंच नाही. दिव्या मिलींदला घट्ट बिलगून झोपली होती. प्रातःकाली मिलींदला जाग आली आणि त्याच्या लक्षात आलं की ते दोघे नकळत जवळ आले होते. दोन समंजस व्यक्ती ज्या पती-पत्नी म्हणून एकत्र रहात होत्या त्या आज खऱ्या अर्थाने एक झाल्या होत्या. निसर्ग आपली भूमिका बजावत असतो. आज ते दोघे त्याच नैसर्गिक भावनेतून एक झालेले होते.

"काय म्हणेल दिव्या? थोडाही धीर धरता आला नाही...! पण मी देखील कुठे कोणती जबरदस्ती केली. जे झालं ते एखाद फुल उमलावं एवढं सहज घडलं." मिलींद मनातल्या मनात विचार करत होता. दिव्याला काय उत्तर द्यावं... तिला कसं सामोरं जावं याच विचारात मिलींदची पहाटेची साखरझोप उडली होती.

"आय ॲम सो सॉरी... .मिलींद!" दिव्या.
"ही का सॉरी म्हणतेय. सॉरी तर मी म्हणायला हवं." मिलींदने मनातच विचार केला.

"तू माझा नेहमीच फार विचार केलास पण मी मात्र.... तुला वंचित ठेऊ पहात होते त्या प्रत्येक हक्कापासून जो तुला आधीच मिळायला हवा होता. काल नेमकं काय झालं होतं कोण जाणे? भिती... प्रेम...माया... एकटेपण...!" दिव्या बोलत होती पण मिलींदची नजर मात्र वर्तमान पत्रातल्या एका बोल्ड हेडलाईनकडे गेली.

"युवा मनाची धडकन गिटारीस्ट निनाद यांना युवामंच कडून संगीतमय श्रद्धांजली!"

"हे वर्तमान पत्र दिव्याच्या हाती पडलं तर? तिला या बातमीने धक्का बसून ती नैराश्यात गेली तर? एकीकडे नात्याला नकळत पण नव्याने झालेली सुरुवात जी दिव्याने देखील बर्‍याच अंशी स्विकारलेली होती तर दुसरीकडे या बातमीने येऊ घातलेला काळोख....!" आनंदाच्या श्रावणमासी मिलींदच्या मनात विचारांचा काळोख दाटलेला होता.

क्रमशः