सावज

Prey

#सावज

पुर्वी राग यायचा
बलात्काराची घटना ऐकून
खूप चीड यायची नि
लेखणीतून ती व्यक्त व्हायची
आताही राग येतो,अस्वस्थ वाटतं
असं काही ऐकल्यावर पण
लेखणीतून शब्द पाझरत नाहीत
पराकोटीचा संताप येतो नि
आतल्याआत गिळलाही जातो
आठवडाभर संवेदनशील मनं
यावर लिहितील,व्यक्त होतील
पण लांडग्यांना त्याने काहीच 
फरक पडणार नाही
त्यांना चट लागलेय नारीच्या कोवळ्या देहाची
संस्कार,संस्कृती हे शब्द त्यांच्या जगात नाहीत
ते आता दबा धरून बसणार
हे टीकाकारांच वादळ शांत झालं,
की पुन्हा हल्ला चढवणार 
एखाद्या अगतिक,असहाय्य कळीवर
साथीने तुटून पडणार 
पुन्हा तेच..थोडे धुळीचे लोट वहाणार
काही काळाने धुळ जमिनीवर स्थिरावणार
धुळीचंही बरोबरच
तिला असं सदा वाऱ्यासोबत वाहून चालत नाही
कळ्यांची झाडं मात्र शरमेने वाकणार
जिवंतपणी मरणयातना भोगणार
काय लिहायचं
लेखणीतून शब्द पाझरत नाहीत
निर्ढावलेला समाज कितीही प्रगत झाला तरी
लांडगे लाळ गाळणार,सावज दिसताच
तुटून पडणार
समाज मात्र महिला दिन दरवर्षी साजरा करणार
महिला स्वातंत्र्याचे पोवाडे गाणार

--सौ.गीता गजानन गरुड.