सावज : भाग ३५

A Horror Story Of An Excavator
" मी परत सांगतोय, आता तो महाल नकोच. मुलींसाठी तर अजिबात सेफ नाहीये. अभिलाषाच्या किंकाळ्या अजून माझ्या कानात घुमतायत. मी ह्या मुलींच्या बाबतीत कसलीच रिस्क घेऊ शकत नाही", अमित म्हणाला.

त्यावर सगळे घाबरून गप्प बसले. निघायचा दिवस उजाडला. सगळी आवराआवर झाली. सरकारी गाडी घ्यायला यायला थोडाच अवकाश होता. सगळं सामान बाहेर आणून ठेवलं. त्यात त्या दोन मूर्ती पण होत्या. त्या दोन मूर्ती नेऊन मुंबईच्या वस्तुसंग्रहालयाला भेट द्याव्या हा उद्देश भावे सरांचा होता.

म्होरक्याने जाताना तिथल्या आदीवासी लोकांनी भेट दिलेल्या अनेक वस्तू ह्यांना बरोबर दिल्या होत्या. सरकारी कारकून आले. नोंदी झाल्या. सगळे गाडीत बसले. थोडी गाडी पुढे गेली आणि भयानक पाऊस सुरू झाला. अंधार दाटून आला. गाडी तसाच रस्ता कापत होती. थोड्या वेळाने सगळ्यांच्या लक्षात आले की, गाडी फिरून फिरून तिथेच येतेय. चकवा लागला असा अंदाज सगळे बोलून दाखवू लागले.

शेवटी एके ठिकाणी गाडी थांबवायला भावे सरांनी सांगितलं. आता पाऊस तुफान वाढला होता. संध्याकाळ व्हायला आली होती.

भुका लागल्या होत्या सगळ्यांना. गाडीतच सगळ्यांनी खाल्लं. सगळ्यांनाच फ्रेश व्हायला जायचं होतं. पण खाली उतरून जंगलात जायचं सगळ्यांच्या जीवावर आलं होतं.

थोडा वेळ असाच गेला आणि एक वीज जवळच जोरात पडली. त्या चमकलेल्या प्रकाशात त्यांना तो महाल दिसला. त्या महालाच्या अगदी जवळच ती गाडी होती. पण अंधार आणि पाऊस ह्याने त्यांना तो महाल दिसला नव्हता. विजेच्या प्रकाशात त्यांना तो दिसल्यावर सगळे घाबरले. आता पावसाने तुफान रौद्ररूप धारण केले होते.

जंगलात असलेले ओढे, नाले भरभरून वाहू लागले होते. सगळीकडे ते पाणी, चिखल वाढू लागला होता. आता ह्यांच्या गाडीत देखील पाणी शिरू लागले होते. मुली तर फारच घाबरल्या होत्या.

" मला वाटतं, आपण आता त्या महालात जाण्यासाठी मनाची तयारी करावी. अन्यथा इथे पुरात बुडून मरायची वेळ येईल. आपण फक्त खाली दाराजवळ थांबू. बाकी कुठे जायला नको. फ्रेश पण होता येईल आपल्याला".

" नको सर, नको", अमित म्हणाला.

पुन्हा सगळे थांबले. पण शेवटी आता बसमध्ये पाऊल बुडेल इतकं पाणी साठलं. नाईलाजाने मंडळी मूर्ती गाडीतच ठेवून सगळे त्या पाण्यातून चिखलातून एकमेकांचा हात धरून कसेबसे त्या महालाच्या उत्तर दरवाज्यापाशी पोहोचले. तो दरवाजा ढकलून भिजलेले सगळे आत गेले. आत पूर्वीप्रमाणेच शांतता होती. अंधार होता. तातडीने सगळ्यांनी टॉर्च पेटवले. दोन दिवसांपूर्वी जे आणि जसं त्या दिवशी घडलं होतं, ते आठवून सगळ्यांनाच विशेषतः अमितला खूप कसंतरी झालं. सगळे तसेच भिजलेले कुडकुडत तिथे दाराच्या जरासं आत बसून राहिले.

आता मुली म्हणाल्या की, आम्हांला आता कंट्रोल नाही होणार. फ्रेश व्हायलाच पाहिजे.

अमित म्हणाला, " आत बाथरूम आहे, मी दाखवतो. आणि आम्ही मुलं बाहेर थांबतो. तुम्हांला एकटं सोडणार नाही".

भावे आणि करण तिथेच थांबले. रोहित आणि अमित मुलींबरोबर निघाले. टॉर्चच्या उजेडात ही मंडळी तिकडे गेली. मुली फ्रेश होऊन आल्या, त्यानंतर त्यांना घेऊन अमित आणि रोहित तिथून निघाले.

ते येताना वाटेत त्यांना सिंहासन ओलांडून यावे लागले. खरे तर ते बाथरूमच्या वाटेतच होते. पण आत्ता येताना क्षणभर त्या सिंहासनावर कोणीतरी बसल्याची
जाणीव रियाला झाली. ती दचकली. ते नेमकं लीनाने पाहिलं. काय झालं म्हणून ती विचारणार, इतक्यात तिलाही ती आकृती दिसली. तिच्या तोंडून एक किंचाळी निघाली.

रियाने रे अमितला दाखवलं. त्याने त्यावर टॉर्च मारला. काहीच नव्हतं. नुसते भास झाले वाटतं, असं म्हणून सगळे परत त्या दारापाशी आले. एव्हाना पाऊस अजून वाढला होता.

त्या महालात दुर्गंधी येत होती. आधी ती कोणाच्या लक्षात नव्हती आली. पण आता सगळे जरा बाथरूमला जाऊन आले, खाल्लं, पाणी प्याले, तेव्हा सगळ्यांचं लक्ष त्या दुर्गंधीकडे गेलं.

" कसली दुर्गंधी आहे ही? नको वाटतंय. बाहेर पाऊस म्हणून इथे आलो, तर इथे हा त्रास", करण वैतागून म्हणाला.

अमितने शांतपणे वरच्या महालात आपल्याच तीन माणसांचे मृतदेह असल्याची आठवण करून दिली. अमिषाच्या तोंडून दुःखाचा उद्गार बाहेर पडला.

" मी फक्त एकदाच, फक्त एकदाच वैभवला बघून येऊ"? तिचा प्रश्न ऐकून अमित एकदम चिडला.

" तुला कळत नाहीये का? वर धोका आहे. त्या राजाचा आत्मा वर आहे. अभिलाषाची काय अवस्था झाली तुला मी सांगितलं ना? का तुला स्वतःचा जीव आणि अब्रू धोक्यात घालायची आहे? शांत बस इथे. वर जायचा विचार सुद्धा मनात आणायचा नाही".

ती गप्प बसली खरी, पण तिला ते पटलं नसावं. बरीच रात्र झाली. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. बसल्या बसल्या सगळे झोपून गेले.

मध्यरात्र झाली. आमिषाला भास झाला की, तिला वैभव हाक मारतोय. ती खडबडून जागी झाली. बघतेय तर थोड्या अंतरावर तिला वैभव दिसला. तिला तो हाक मारत होता. हाताने खूण करून बोलावत होता. त्याचा कापलेला पाय दाखवून करुण रडत होता. ते बघून तिला भयानक दुःख झालं. ती झपाटल्यासारखी उठली आणि त्याच्या मागे निघाली. जाताना तिचा पाय अमितला लागला आणि तो जागा झाला. ती अशी निघालेली दिसल्यावर त्याने तिला हाक मारली. पण ती कोणत्या तरी ट्रान्स मध्ये होती. तिला ऐकूच गेलं नाही. पण त्याच्या आवाजाने बाकीचे जागे झाले. तिला धरेपर्यन्त ती पुढे गेली सुद्धा.

मागे सगळे धावले आणि तिला धरून आणलं. ती आता कोणाच्याही ताब्यात राहत नव्हती. ती धडपड करत होती. हातपाय झाडत होती. ओरडत होती. शेवटी तिला घेऊन करण महालाच्या बाहेर आला. महालाच्या बाहेर जशी ती आली, तशी ती नॉर्मल झाली.

पण बाहेर पावसात त्यांना जास्त थांबता येईना. इतक्यात रिया बाहेर आली आणि.....

काय घडलं पुढे? परत आत जाणार का अमिषा? सुखरूप राहणार का सगळे? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all