सावज : भाग ३४

A Horror Story Of An Excavator
त्याचा चेहरा बघून भावे सरांना अंदाज आला की काहीतरी गडबड आहे. ते म्हणाले, " आज आता काही नको बोलूस. आराम कर. आपण सगळेच जखमी आहोत. शॉकमध्ये आहोत. उद्या बोलू शांतपणे. आधी खाऊन घेऊ सगळे".

सगळे खायला खोपटात बसले. फार कोणाला भूक नव्हती, कारण मंडळी जखमी होती. अमित पुन्हा म्हणाला, " सर, आता बोलू का? फार महत्त्वाचं बोलायचं आहे".

" आज फक्त आराम. खूप जखमी आहेस. माझीही पाठ खूप दुखतेय. उद्या बोलू", सरांनी विषय संपवला.

रिया आणि अमितला त्या खोपटात सोडून सगळे थोडा वेळ बाहेर आले. आधी अमितला कळेना की, रियाची माफी कशी मागावी? कारण तिला समजून घेण्यात तो कमी पडला होता. तिनं तिचं प्रेम सिद्ध केलं होतं, पण अमित मात्र प्रेमाच्या परीक्षेत पूर्णपणे नापास झाला होता.

" मला माफ कर रिया, मी तुझ्यावर अविश्वास दाखवला. मला खरंच तुझं प्रेम कळलं नाही गं. मला वाटलं की तू मला सोडून गेलीस. मी खूप रडलो. खरंच मला माफ कर", अमितचे डोळे पुन्हा भरून आले.

" मी तुझ्या जागी असते, तर हेच केलं असतं. सोड ना सगळं. आता आपल्याला एकत्र येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. जन्मोनजन्म आपली गाठ आहे रे! अशी कशी सुटेल? आता हा विषय बंद. छान बरा हो. मग आपण घरी जाऊ", रिया त्याच्या जवळ जात म्हणाली. अमितने तिचा हात हातात घेतला आणि काहीच न बोलता तो फक्त तिच्याकडे बघत बसला.

थोड्या वेळाने सगळे झोपायला गेले. अमितला झोप येईना. इतक्या दिवसांचा मानसिक त्रास आणि त्या तिघांची आठवण, त्यांचा भयानक मृत्यू तो विसरू शकत नव्हता. मेघमाला राणीचा किळसवाणा स्पर्श, तिचा आवाज, तिचा तो सुगंध अजूनही त्याच्या डोक्यातून जात नव्हता. अंगदुखी आणि दुखणाऱ्या जखमा त्याला ते सगळं पुन्हा पुन्हा आठवून देत होत्या.

सकाळ झाली. मंडळी जरा उशिराच उठली. अमितला अगदी पहाटे झोप लागली. सावकाश उठून, शांतपणे आवरून सगळ्यांनी तगडा नाष्टा केला. मग सगळे मुलांच्या खोपटात जमले. आता पुढचा प्लॅन काय करायचा हे सगळ्यांच्या डोक्यात होतं.

" सर, आता ह्या मूर्ती इथेच आहेत. त्या महालातला आत्मा आता नाहीसा झालाय. मला वाटतं आता आपण त्या राजाच्या भुताला नाहीसं करायचं काहीच कारण नाही. आपण सरळ आता आपलं राहिलेलं प्रोजेक्ट पूर्ण करू आणि मुंबईला परत निघून जाऊ. आता त्या महालात असलेलं राजाचं भूत आपल्याला काय त्रास देणार? उगीच पुन्हा आता जीव धोक्यात नको घालायला. आणि तो खजिना पण नको. आपण आता आधी शर्मा सर, वैभव आणि अभिलाषा ह्यांना शोधू", अमिषा म्हणाली.

रोहित, लीना, करण ह्या सगळ्यांनीच तिला दुजोरा दिला. फक्त अमित आणि रिया काहीच बोलले नाहीत. भावे सर म्हणाले, " मलाही तसंच वाटतंय. पण शर्मा सर सापडल्याशिवाय गुहांचा अभ्यास करता येणार नाही".

" सर, आता ते तिघं कधीच परत येणार नाहीत", अमित एका झटक्यात बोलून गेला आणि आपण काय बोलून गेलो हे लक्षात आल्यावर त्याने जीभ चावली.

" काय बोलतोयस तू? अजून तुझं डोकं ठिकाणावर नाही आलंय. आराम कर जरा" ,अमिषा चिडून म्हणाली.

" हिला काय झालं चिडायला? आत्ता तर नीट होती", अमित म्हणाला.

" अरे, तिला वैभवची काळजी वाटतेय", रिया त्याला डोळ्याने खुणावत म्हणाली.

अमितच्या लक्षात आलं, पण आता बाण सुटला होता. भावे म्हणाले, " बोल, का म्हणतोयस असं? तुला कसं ठाऊक"?

मग अमितने सगळं सांगितलं. ते तिघं महालात कसे आले, खजिन्याचा मोह त्यांना कसा सुटला होता, ते तिघं कसे सगळीकडे फिरत होते, मग ते वरच्या मेघमाला राणीच्या महालात कसे गेले, तिथे गेल्यावर आलेला तो दुर्गंध, तो भयानक आवाज, त्या आवाजाने तिघांची केलेली दुर्दशा, वैभवचा कापलेला पाय, शर्मा सरांना काचेवर फेकलेलं, अभिलाषाची केलेली विटंबना, दोघांना कसं उलटं लटकवलं आणि शेवटी तिघांचा घेतलेला जीव हे सगळं त्याने संगतवार सांगितलं.

त्या वेळी त्याला काय दिसलं तेही त्याने सांगितलं. त्या राजाच्या अर्धवट देहातून डोकावणारा अर्धवट सांगाडा, राजाचा दुष्ट खुनशी आत्मा किती भयानक आहे हेही त्याने सांगितलं.

सगळे स्तब्ध झाले. त्या तिघांच्या मृत्यूची वार्ता ऐकायला मिळेल असा विचारच त्यांनी केला नव्हता. त्यांना सगळ्यांना प्रचंड धक्का बसला. अमिषा बघता बघता खाली कोसळली आणि रडू लागली. तिला समजवायची पण हिम्मत कोणातही नव्हती.

बराच वेळ सगळे काहीच बोलू शकले नाहीत. ह्या अमनावीय अस्तित्वाने आतापर्यंत चार बळी घेतले होते. या सगळ्यात ऑलमोस्ट बाकीच्यांचा जीव जाता जाता राहिला होता.

शेवटी भावे सर भानावर आले. त्यांनी अमिषाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिचं सांत्वन करू लागले.

" त्या तिघांचे मृतदेह अजून तिथेच असतील ना? त्यांचे अंत्यसंस्कार करायला हवेत ना! असं सोडून नाही जाता येणार. निदान मी तरी असा नाही जाऊ शकणार. काय करता येईल"? हा शेवटचा प्रश्न अमितला उद्देशून होता.

" सर, मला वाटतं आता आपण ह्या भानगडीत नको पडायला. आपला जीव फार महत्वाचा आहे. मी माझ्या डोळ्याने त्या आत्म्याचा भयंकर राग पाहिलाय. त्यांना आणायला जाऊ आणि आपला जीव गमावून बसू. प्लीज सर, हा हट्ट, हा विचार सोडा सर", अमित म्हणाला.

सगळे तेच म्हणायला लागले. शेवटी सरांना हो नाही करता करता ते पटलं आणि ते म्हणाले, " ठीक आहे, तुम्ही सगळे म्हणताय तेही बरोबर आहे. आपण गुहांचा अभ्यास शर्मा सरांशिवाय करू शकणार नाही. तो आत्मा तिथे सावज हेरायला बसला आहे, हे ही मान्य. त्यामुळे मी आता उद्याच इथल्या ऑफिसमध्ये कळवतो आणि थोडं बरं वाटलं की आपण मुंबईला परत जाऊ".

" सर, आता आपल्या तब्बेती मुंबईला गेल्यावर देखील बऱ्या होऊच शकतात. आपण आता मिळेल त्या वाहनाने मुंबई गाठू. मला तर आता इथे एकही क्षण राहण्याची इच्छा नाही", लीना म्हणाली.

अशी बरीच चर्चा होऊन शेवटी अजून एक दिवस आराम करून परवा निघायचं ठरलं. म्हणजे उद्या तिथल्या पुरातत्त्व खात्यालाही कळवायला एक दिवस हातात होता.

दुपारी जेवून सगळे परत एकत्र शांत बसले होते. ना कोणाला काही बोलायची इच्छा नव्हती, ना काही करायची.

" सर, माझी द्विधा मन:स्थिती आहे. एकदा वाटतंय की, तिथे जावं आणि त्यांचे मृतदेह आणावेत. एकदा वाटतंय की नको" करण म्हणाला.

" मी परत सांगतोय, आता तो महाल नकोच. मुलींसाठी तर अजिबात सेफ नाहीये. अभिलाषाच्या किंकाळ्या अजून माझ्या कानात घुमतायत. मी ह्या मुलींच्या बाबतीत कसलीच रिस्क घेऊ शकत नाही", अमित म्हणाला.

त्यावर सगळे घाबरून गप्प बसले.

काय होणार पुढे? मंडळी जाणार का परत त्या महालात? की संपवणार ते तिथला मुक्काम? की ते होणार त्या राजाचं सावज? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all