सावज : भाग ३३

A Horror Story Of An Excavator
तिथे पोहोचल्यावर तिथे असेच अजून काही विधी करण्यात आले. त्या विहिरीचं तोंड तात्पुरतं मंत्राने बंद करून टाकलं. म्हणजे अमितला त्या विहिरीत तो आत्मा ढकलू शकला नसता. आता ते तिथून निघाले आणि तिथून दोन दालनं ओलांडून सिंहासनाच्या पाठीमागच्या बाजूला आले. तिथे आल्यावर त्या तांडाप्रमुखाने सगळ्यांच्या हातात एक धागा बांधला. आणि तो काहीही झालं तरी काढून टाकायचा नाही हेही बजावलं. तो धागा अभिमंत्रित होता. त्याने कोणताही आत्मा त्यांना मारू शकला नसता.

तिथून ते अजून पुढे आले. तसे त्यांना मेघमालेचा आवाज आला. ती त्यांना इकडून येताना बघून संतापली होती. तिने फक्त रियाला दोन मूर्ती घेऊन महालात ये असे म्हटले होते. इतके सगळे बघून ती चिडली. शिवाय त्या मूर्ती देखील दिसत नव्हत्या.

ती जोरात ओरडली, आणि तिने रियाला उचललं. ती तिला फेकणार, इतक्यात रियाने तिच्याकडे असलेलं लाल रत्न काढलं आणि त्याचा प्रकाश सगळीकडे पसरला. तो प्रकाश बघून तिच्या हातातून रिया सुटली. आणि जोरात जमिनीवर पडली. तिच्या हाताला लागलं. आणि मेघमालेचा संतापलेला आवाज आला.

" का आलीस तू इथे? कधी आलीस? कशी आलीस? त्या मूर्ती कुठे आहेत? ही माणसं का आली? तुला आता मी जिवंत सोडत नाही", असं म्हणून तिने पुन्हा रियाला धरायचा प्रयत्न केला. पण ते लाल रत्न तिला रियापासून दूर ठेवत होतं.

मेघमाला आता चवताळली होती. तिने काही विशिष्ट मंत्र म्हणताच तो दगडी सिंह आत आला. कोणालाच ह्याची कल्पना नव्हती. त्याने थेट भावे सरांवर झेप घेतली. त्यांनी चपळाईने बाजूला सरकायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या पाठीवर तो पंजा बसलाच. पाठ सोलून निघाली. तसा तो चवताळून आता लिनाकडे वळला. पण तितक्यात त्या तांडाप्रमुखाने त्याच्यावर कसलेसे पाणी शिंपडले. त्यामुळे तो सिंह शांत झाला.

त्या तांडाप्रमुखाने त्वरेने झोळीतून कसलीशी पूड बाहेर काढली आणि त्याचं एक वर्तुळ त्याने त्या सिंहभोवती काढलं. आता त्या सिंहाला वर्तुळाच्या बाहेर पडता येईना. इकडे मेघमालेची तोपर्यंत काहीच चाहूल लागेना.

सगळे इकडे तिकडे बघू लागले. अचानक तिचा मोठ्याने खिदळण्याचा आवाज आला. बघतायत तर अमितला ती फरफटत आणत होती. ती दिसत नसली, तरी अमित फरफटलेला दिसत होता. ती किंचाळून हसू लागली. अत्यंत बीभत्स अशा आवाजात अमितला सुकुमार म्हणून हाक मारू लागली. त्याला बहुतेक शुद्ध नव्हती. कारण तो काहीच प्रतिकार करत नव्हता. ती त्याचे हाल हाल करत होती. त्याला आपटत होती. त्याचे केस उपटत होती. त्याच्या अंगावर ठायी ठायी जखमा दिसत होत्या. रियाने ते बघून मोठ्याने अमितला हाक मारली. ती रडत रडत मेघमालेला विनवू लागली. त्या तांडाप्रमुखाने झोळीतून हळद काढली आणि तिच्या दिशेने फेकली. पण तिच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

तिने आता अमितला एका पुतळ्याला बांधले. तांडाप्रमुख झोळीतून बऱ्याच गोष्टी काढून तिच्या अंगावर फेकत होता. पण त्याचा काहीही फायदा होत नव्हता.

रोहितला तेवढ्यात सुचलं की आता तर अमित सापडलाय. आता आपण विहिरीत तिचा सांगाडा टाकू शकतो. त्याने हळूच त्या तांडाप्रमुखाला तसे सांगितले.

तांडाप्रमुखाने बाकीच्यांना तिचं लक्ष इथे गुंतवायला सांगितलं आणि तो हळूच तिथून निघाला. इकडे तिचा थयथयाट सुरूच होता. पुतळ्यांचे दगड ती ह्यांच्या अंगावर फेकत होती. ह्या सगळ्यांना ते लागत होते. प्रत्येकजण रक्तबंबाळ झालं होतं. तो मारा चुकवत सगळे इकडे तिकडे पळत होते.

आता तिने त्या महालाची पूर्ण नासधूस चालवली होती. तिचं भयंकर आवाजात ओरडणं, मधेच किंचाळत हसणं, दगड फेक सगळं चालू होतं. मधेच ती अमितला मारत होती.

तिकडे हळूच मागे गेलेल्या तांडाप्रमुखाने त्या विहिरीचं तोंड मोकळं केलं. आणि त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या रियाला त्याने खूण केली. ती त्या दगडांपासून स्वतःला वाचवायला काहीच करत नव्हती, कारण ते लाल रत्न तिच्याकडे असल्याने तिला इजा होत नव्हती. तिने तो सांगाडा पटकन मागे आणला. त्याच्यावर लाख टाकली आणि तो पेटवून दिला.

इकडे जसा सांगाडा पेटला, तशी ती भयानक किंचाळली. जणू काही तिला कोणी जिवंत जाळतंय. जुना असलेला तो सांगाडा पटकन जळून गेला. तसा पूर्ण महाल शांत झाला. इतका शांत की जणू कित्येक वर्षात तिथे काही घडलेच नाही कोणी आलेच नाही. त्या सांगाड्याची राख रियाने विहीरीत टाकली. एक पर्व संपलं होतं.

तिकडे तो दगडी सिंह पूर्ण शांत झाला होता. आता तो एक साधा दगडी पुतळा होता, ज्याला मुंडकं नव्हतं..

एक क्षण लागला सगळ्यांना शांत व्हायला. एका क्षणाने अत्यंत आवेगाने अमितला हाक मारून रिया त्याच्याकडे तिरासारखी धावली. रक्तबंबाळ असलेल्या त्याला मिठीत घेऊन त्याच्या रक्ताने भरलेल्या कपाळावरून हात फिरवू लागली. तिच्या डोळ्यांतून अविरत धावणाऱ्या अश्रूंच्या धारा कोणालाच बघवत नव्हत्या.

तिचा करुण विलाप सगळा महाल भरून टाकत होता. शेवटी भावे सर तिच्या जवळ आले. त्यांनी तिच्या बॅगमधून हिरवं रत्न काढलं आणि अमितच्या सर्वांगावरुन फिरवलं. थोड्या वेळाने त्याचा रक्तस्राव थांबला. त्याची नाडी मंद चालत होती. त्याला पटकन सगळ्यांनी उचललं आणि तांड्यावर घेऊन आले. तिथे बॅगेत असलेली काही औषधं, जंगली वनस्पतींचा रस, कसलासा पाला म्होरक्याने त्याच्या जखमांवर लावला. रिया पुन्हा पुन्हा ते हिरवं रत्न त्याच्या अंगावरून फिरवत होती. जवळजवळ सहा तासांनी तो शुद्धीवर आला. प्रथम त्याला काहीच कळेना. ती कुठे आहे, कोण आहे, काहीच कळेना. तेवढ्यात त्याच्या तोंडात म्होरक्याने कसलासा द्रव ओतला आणि तो गुंगीत गेला.

म्होरक्या म्हणाला, थोड्या वेळाने शुद्ध येईल त्यांना. तेव्हा भानावर येतील. अजून जखमांच्या ठणक्याने काहीच सुचत नसेल त्यांना. पण उद्याच्या उद्या त्यांना शहरात हलवा. मोठ्या उपचारांची गरज आहे त्यांना. हाड वगैरे मोडलं असेल तर बघावं लागेल. तोपर्यंत मी देतो ते औषध त्यांचा त्रास कमी करेल".

रात्र झाली. कोणीच काही खाल्ले नव्हते. त्या हिरव्या रत्नाच्या प्रभावाने सगळ्या मंडळींना थोडं बरं वाटलं होतं. रिया अगदी किरकोळ जखमी होती, पण बाकीचे सगळेच खूप जखमी होते.

म्होरक्याची माणसे सगळ्यांसाठी खाणंपिणं घेऊन आली. एक मोठा धोका कायमचा नाहीसा झाल्याने सगळे खुश होते. अमित जिवंत सापडला होता. त्या संपूर्ण परिसराची त्या सिंहाची असलेली दहशत कायमची नष्ट झाली होती. त्यामुळे सगळे आदिवासी आता कायमचं भयमुक्त जीवन जगणार होते.

इतक्यात अमित शुद्धीवर आला. रिया त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन बसली होती. त्याने डोळे उघडले आणि सगळे त्याच्या भोवती जमले. काही क्षण गेल्यावर त्याने रियाला आणि इतरांना ओळखले. क्षणभर त्याचा विश्वासच बसला नाही.

त्याने उठायचा प्रयत्न केला, पण परत तो पडला. रिया म्हणाली, " राजा आराम कर रे! थोडं बरं वाटलं की उठ".

" मला तुझं तोंड देखील बघायची इच्छा नाही. तुझ्यासारखी विश्वासघातकी मुलगी माझ्या आयुष्यात होती ह्याचं मला कायम दुःख वाटत राहील", अमित म्हणाला.

त्यावर रियाच्या तोंडून एक हुंदका बाहेर पडला. त्यावर भावे सरांनी त्याला सगळं सांगितलं. त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. शेवटी त्याला सगळ्यांनी पुन्हा पुन्हा समजवल्यावर त्याचा गैरसमज दूर झाला. आणि तो रियाकडे बघून गोड हसला.

" चला रे सगळे बाहेर. नाही म्हणजे, इथे आपली काय गरज? आपल्याला लागलं असलं तरी कोण बघणार आपल्याकडे? जाऊ दे. दोस्त दोस्त ना रहा", असं नाटकीपणे म्हणून करण अमितकडे बघून डोळा मारून हसला.

रिया लाजली आणि सगळे खूप दिवसांनी हसले.

" सर, मला बरंच बोलायचं आहे", अमित गंभीर होत म्हणाला.

त्याचा चेहरा बघून भावे सरांना अंदाज आला की काहीतरी गडबड आहे. ते म्हणाले, " आज आता काही नको बोलूस. आराम कर. आपण सगळेच जखमी आहोत. शॉकमध्ये आहोत. उद्या बोलू शांतपणे. आधी खाऊन घेऊ सगळे".

काय बोलायचं असेल अमितला? वैभव, शर्मा आणि अभिलाषा बद्दल सांगेल का तो? राजाचं भूत तिथेच आहे, हे सांगेल का तो? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all