सावज : भाग २९

A Horror Story Of An Excavator
वैभवचा एकच पाय शिल्लक होता. तोही टांगलेला होता. त्याच्या कापल्या गेलेल्या पायातून गळणाऱ्या रक्ताने तोच माखला होता. त्यामुळे तो भयानक दिसत होता. शर्मा सर काचेवर आपटल्याने खूप जखमी होते. त्यांच्या सर्वांगातून रक्त खाली गळत होतं.

दोघांच्या खाली रक्ताचं थारोळं झालं होतं. ते बघून अमित चक्कर येऊन खाली कोसळला.

दुसऱ्या दिवशी पहाटे रियाला जाग आली. जंगलात असलेलं सकाळचं वातावरण तिला फार आवडायचं. पण अमित शिवाय सध्या तिला काहीच सुचत नव्हतं. ते वातावरण तिला आनंद देत नव्हतं. तिने सगळयांना उठवलं. मध्यरात्री कधीतरी भावे सर, म्होरक्या, करण, रोहित सगळेच झोपून गेले होते. बाजूच्या ओढ्याच्या काठी जाऊन सगळ्यांनी प्रातर्विधी उरकले. बरोबर आणलेलं थोडं खाणं झालं आणि सगळे रात्री दिसलेल्या टेकडीकडे जायला निघाले. उठल्यावर रोहितने त्या टेकडीबद्दल सांगितलं होतं, ज्यावर रात्री प्रकाश दिसला होता. त्याची नोंद परत एकदा बघून सगळे तिकडे निघाले. इथे जंगल बरंच विरळ होतं. त्यामुळे ऊन पण लागत होतं.

एकेक टेकडी सावकाश पार करत ते निघाले होते. सुरुवातीला त्यांना काहीच समजेना. सगळ्या टेकड्या एकसारख्या वाटत होत्या.

ज्या टेकडीची नोंद केली होती, ती अखेर त्यांना दिसली. ती फार उंच नव्हती. ती टेकडी चढण्यापूर्वी भावे सरांनी सगळ्यांना थांबवलं. ते म्हणाले, " आता आपण सावध रहायला हवं. कारण ज्या अर्थी इथे रात्री बारा वाजता दिवे होते, त्याअर्थी इथे जे काही आहे, ते चांगलं नाहीये. सांभाळा सगळे स्वतःला. आणि एकमेकांना सुद्धा. लक्षात ठेवा, आपल्याला काहीही इतर गोष्टी नको आहेत, कितीही मौल्यवान असल्या तरी. कशाचाही मोह धरू नका. तिथे काही मौल्यवान असेल असे नाही. पण आपण आपले ध्येय विसरू नये, म्हणून मी सांगतोय. आपलं एकच उद्दिष्ट आहे. ते म्हणजे मेघमाला राणीचा सांगाडा. आपल्या लाडक्या अमितचे श्वास त्या सांगाड्याशी जोडले गेले आहेत ते विसरू नका. चला, आपण नक्की यशस्वी होऊ".

असं म्हणून ते टेकडी चढायला लागले. त्या मागोमाग सगळेच चढू लागले.

इकडे महालात दुसऱ्या दिवशी सकाळीच अमितला शुद्ध आली. शुद्ध आली तेव्हा तो त्याच्या अत्यंत आरामदायक बिछान्यावर होता. थोडया वेळाने त्याला सगळं आठवलं आणि एकदम घाबरून तो उठला.

त्याला आवाज ऐकू आला, आणि तो उठून स्नानगृहात जाऊन आला. वर जायची हिम्मत त्याच्यात नव्हती.

" मला खूप भूक लागली आहे, काही मिळेल का खायला"? त्याने विचारले. कारण तिथे अडकून त्याला आता छत्तीस तास होऊन गेले होते. त्या अवधीत त्याने काहीच खाल्लं नव्हतं.

तो असं म्हणताक्षणी त्याच्या पुढे अनेक उत्तमोत्तम खाद्यपदार्थ आले, दिव्य सुगंधी पेये आली. त्याने त्यातल्या त्यात भूक पटकन भागेल असं खाल्लं. आणि साधं पाणी प्याला. आता त्याला बरीच हुशारी वाटत होती.

" त्या तिघांचं काय झालं"? त्याने अंदाजे इकडे तिकडे बघत प्रश्न विचारला.

" त्या तिघांना आता कधीच खजिन्याची गरज लागणार नाही" , असं म्हणून तो आवाज मंजुळ हसला. अमितच्या अंगावर भीतीने काटा आला. ज्यांना काल दुपारी जिवंत पाहिलं, ते आता नाहीत. ह्या कल्पनेने त्याला फार दुःख झालं.

थोडा वेळ गेला आणि त्याने परत विचारलं, " मला कपडे मिळतील का काही बदलायला? परवापासून हेच आहेत अंगावर".

त्याने असे म्हणताच, त्याच्या पुढे उत्तम कपडे आले. त्याने त्यातली त्यात साधा निवडला आणि तो स्नानगृहात जाऊन बदलून आला. दोन दिवस राहिले होते फक्त त्याच्या आयुष्याचे. त्यामुळे शांत झाला होता तो. त्याला त्याच्या घरच्या माणसांची, रियाची, मित्रांची फार आठवण येत होती. एकदा तरी सगळ्यांना डोळे भरून बघावसं वाटत होतं. पण आता तो काहीच करू शकत नव्हता. त्याने प्रयत्नाने तो विषय झटकला.

त्याला विचारातून बाहेर आल्यावर जाणवलं की, त्याच्या शेजारी त्याला तो सुगंध जाणवत होता. त्याच्या हातावर त्याला एक स्पर्श जाणवत होता. नकोसा वाटणारा स्पर्श. पण विरोध करून काहीही उपयोग नव्हता. तो स्पर्श त्याला हळूहळू त्याच्या गालावर, त्याच्या डोक्यात, त्याच्या दुसऱ्या हातावर जाणवू लागला. त्या स्पर्शाचा इरादा त्याला कळत नव्हता. समोरचं अस्तित्व जर अशारीरिक होतं, तर ह्या स्पर्शाने त्याला काय मिळणार होतं? अमितकडून प्रतिसाद तरी कसा मिळणार? पण हे विचार अमितला जास्त वेळ करावे लागले नाहीत. त्याच्या अंगावर सुगंधी फुलांचा वर्षाव झाला. त्याला काय रिऍक्शन द्यावी कळेना. खाली मान घालून तो शांत बसून राहिला. अमित कसलाही नकार देत नाहीये, विरोध करत नाहीये म्हटल्यावर तो स्पर्श अजून चेकाळला.

आता तो स्पर्श त्याला सगळ्या अंगावर जाणवत होता. अचानक त्याला जाणवलं की, त्याची वस्त्र दूर होतायत. तरीही तो शांत बसला. विरोध केला तर काहीही होऊ शकतं, ह्याची त्याला जाणीव झाली होती. त्याचं एकेक वस्त्र दूर होत होतं. एका क्षणी त्याच्या अंगातलं वरचं वस्त्र पूर्ण दूर झालं. आणि त्याचं अर्ध उघडं शरीर दिसू लागलं. काही क्षण त्याला कसलाच स्पर्श जाणवला नाही. ना तो सुगंध, ना कसली चाहूल.

पण एका क्षणात त्याला.....

त्याच वेळी तिकडे त्या टेकडीच्या माथ्यावर मंडळी पोहोचली. कसलेही मंदिर नव्हते. पण काही मोठी झाडं मात्र होती. त्याच्या सावलीत सगळे थांबले. पुन्हा थोडं खाणं पिणं झालं.

" आदिवासी लोकांनी शेकोटी केली असावी का"? ओशाळलेल्या रोहितने विचारले. त्याने चुकीचे बघितले, किंवा चुकीचा अर्थ लावला असं त्याला वाटत होतं.

" नाही रे, आम्हीही तेच बघितलं, जे तू बघितलंस. डोन्ट वरी". सर म्हणाले.

त्या टेकडीचं निरीक्षण करताना एक फार विचित्र गोष्ट ह्या मंडळींना जाणवली. त्या टेकडीच्या बरोबर मध्ये एक विचित्र दगड होता. त्यावर काही चित्र होती. त्या चित्रांचा काहीही अर्थबोध कोणालाही होईना. पुन्हा एकदा तो नकाशा बघून त्यांना कळलं की हीच ती टेकडी असावी. कोठेही शेकोटीच्या खुणा नव्हत्या. म्हणजे रात्री दिसलेला प्रकाश काहीतरी वेगळी कहाणी सांगत होता हे खरं.

" आपण तो दगड हलवायचा का" ? अमिषा म्हणाली. पूर्ण रस्ता ती गप्प गप्प होती. अचानक तो बोलली तशी, सगळे तिच्याकडे बघायला लागले. मध्येच तो दगडाचा विषय सोडून स्वतःशीच बोलल्याप्रमाणे ती परत म्हणाली, " वैभव नीट असेल ना"?

आता सगळ्यांच्या लक्षात आलं की, ती वैभवमध्ये गुंतली होती. पण वैभव मात्र अभिलाषा मध्ये गुंतला होता.

" हो, चला हलवू तो दगड" असे सरांनी म्हणताच, सगळी पुरुष मंडळी पुढे सरसावली. त्यांनी मोठया प्रयत्नाने तो दगड सरकवला.

आणि कमालीचं आश्चर्य ह्या मंडळींना वाटलं. खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या तिथे. वरच्या काहीच पायऱ्या प्रकाशमान होत्या. पुढे अंधार होता. काही वेळ सगळे अगदी शांतपणे उभे राहिले. न जाणो आतून काय येईल? पण काहीही हालचाल जाणवली नाही. शेवटी मशाली पेटवून सगळे हळूहळू आत उतरू लागले. ह्या वेळी म्होरक्या सगळ्यात पुढे होता. कोणी आदिवासी असतील आत, तर तो समजावून सांगू शकणार होता. बऱ्याच गोल गोल पायऱ्या उतरल्यावर त्यांना एक मोठी ऐसपैस गुहा लागली. त्या गुहेत हवा खेळती राहील अशी सोय होती. प्रकाश मात्र मशालीचाच होता. त्या गुहेतून अनेक मार्ग जात होते. सगळे मार्ग तपासायचे म्हणजे आव्हान होतं. कारण इथेच कुठेतरी तिचा सांगाडा असणार ह्याची आता खात्री होती सगळ्यांना.

चार दिशांनी गट करून शोधायचं ठरलं. त्या गुहेतल्या एका मोठ्या दगडाला त्यांनी दोऱ्या बांधल्या, आणि त्याच दोऱ्या स्वतःच्या कमरेभोवती बांधून मंडळी पुढे निघाली.

इकडे अर्ध वस्त्रात असलेल्या अमितला एकदम डाव्या बाजूला जळजळ जाणवली. त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला जिथे हृदय असतं तिथे त्वचेवर कसलातरी डाग उमटला होता. काहीतरी भाजल्यासारखं दिसत होतं. कमालीची आग आग होत होती.

कसला डाग होता तो? काय कारण होतं त्याचं? त्या टेकडीवर असलेल्या गुहेत त्यांना सांगाडा सापडणार का? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all