सावज : भाग २७

A Horror Story Of An Excavator


" ह्याचा अर्थ एकच की, त्या मूर्ती इथे आल्या होत्या. एकदा हे हिरवे रत्न मला दिले, दुसऱ्यांदा हा नकाशा. त्या चल आहेत, हे तर आता पक्केच झाले. मला वाटते लगेच ह्या नकाशा वाचून तो सांगाडा शोधायच्या कामी निघावे. आपल्या हातात वेळ कमी आहे. चालेल ना सर? याल ना तुम्ही?", रियाने विचारले.

" अर्थात मी येणार. अमितला सोडवण्यासाठी मी नक्कीच जे जमेल ते करणार". भावे म्हणाले.

तो नकाशा उघडून सगळे बघायला लागले. थोडा वेळ कोणाला काहीच कळेना. मग पुन्हा एकदा ती सगळी पानं वाचल्यावर पूर्वेच्या टेकड्यांवर जायचं ठरलं. सगळी नीट तयारी करून मंडळी निघाली. ह्या वेळेस मात्र वैभव, अभिलाषा आणि शर्मा सुद्धा बरोबर निघाले. तेवढाच मंदिराचा अभ्यास होईल, हा हेतू तिघांचा होता.

मजल दरमजल करीत बरीच पायपीट केल्यावर त्यांना एक मोठा ओढा लागला. त्या ओढ्याबद्दल त्या नकाशात काहीच नव्हतं. पुन्हा पुन्हा तो नकाशा तपासूनही त्यांना त्या ओढ्याबद्दल काहीही कळेना. भावे म्हणाले, " पाचशे वर्षांत इथल्या अनेक भागात बदल झाला असण्याची शक्यता आहे. निसर्ग बदलत असतो. त्यामुळे आपण हा ओढा ओलांडून जाऊ".

ओढा ओलांडायला काहीच मार्ग मिळेना.

शेवटी पाण्यातून जायचं ठरलं. ओढा फार खोल नव्हता.हळूहळू पाण्यातून सगळे पुढे निघाले. रोहितला मानेवर काहीतरी चावल्याचं जाणवलं. त्याने पटकन हात लावला, तर काहीतरी मऊ मऊ होतं. त्याने झटकायचा प्रयत्न केला. पण निघेना. त्याने करणला हाक मारली. करण बघतोय तर, ती जळू होती. रक्त पिणारी जळू. करणने ती चाकूने काढून टाकली. सगळे पुढे पुढे जायला लागले. अचानक एका दगडावरून रियाचा पाय सटकला आणि त जोरात खाली पडली. एक अणकुचीदार दगड तिच्या डोळ्यापाशी लागला. भळाभळा रक्त येऊ लागलं. कसेबसे एकमेकांचा हात धरून सगळे पलीकडे आले. थोडे बसले. रियाने लगेच बॅगमधून हिरवं रत्न काढलं आणि स्वतःच्या आणि रोहितच्या जखमेवर लावलं. काही क्षणात जखम बरीच बरी झाली. रक्त थांबलं.

थोडी विश्रांती घेऊन, चहा आणि थोडं खाणं झालं आणि मंडळी पुन्हा नकाशा फॉलो करायला लागली. पूर्वेकडे जाता जाता वाटेत त्यांना एक छोटी गढी लागली. त्या गढीचा उल्लेख देखील त्या नकाशात नव्हता.

ती गढी जास्त जुनी वाटत नव्हती. अभिलाषा पटकन म्हणाली, " इथे पण एखादं भूत असेल, कोणाची तरी वाट बघणारं. चला शोधू". असं म्हणून ती एकदम कुत्सित हसली. वैभवने तिला साथ दिली. आणि दोघं टाळी देऊन हसले. पण बाकी कोणीच त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत मंडळी तिथे त्या गढीचं बाहेरून निरिक्षण करीत थांबली. तेवढ्यात मागून एक आवाज आला. एक बाण सर्रकन आला आणि समोरच्या झाडात घुसला. घाबरून सगळे मागे वळले. आदिवासी होते. तितक्यात रियाला काय वाटलं काय ठाऊक? तिने चटकन गुडघ्यावर बसून डोकं झुकवलं. ते आदिवासी थांबले. रियाने हळूच सगळ्यांना तसेच करण्यास सुचविले. सगळ्यांनी चटकन रियाचं अनुकरण केलं. ते आदिवासी जवळ आले. सगळ्यांना धडधड होत होतं. ते काही बोलणार, तितक्यात म्होरक्या तिथे आला. त्याने थ आदिवासी लोकांची समजूत घातली आणि मंडळींची सुटका झाली.

" तू इथे कसा आलास अचानक? पण बरं झालं आलास, नाहीतर आमची काही खैर नव्हती". शर्मा म्हणाले.

तो म्हणाला, " मला ठाऊक होतं की, ह्या भागात हे आदिवासी असतात ते बाहेरच्या माणसांना बघायला फारसे उत्सुक नसतात. म्हणून मी आलो".

आता सगळे पुढे निघाले. " सर आपण जाऊ या का त्या गढीत"? अभिलाषा म्हणाली. "ती गढी सुरक्षित आहे, जा तुम्ही तुम्हांला जायचं असेल तर"! असे म्होरक्याने म्हणताच, शर्मा, वैभव आणि अभिलाषा तिघे जण तिकडे निघाले. आम्ही नंतर तुम्हांला त्या टेकड्यांवर जॉईन होतो, असे म्हणून वैभवने त्या नकाशाचा फोटो काढून घेतला.

तिघे त्या गढीच्या दिशेने गेल्यावर बाकीचे पुढे निघाले. आता म्होरक्या त्यांच्याबरोबर होता. त्यामुळे रस्ता सापडायला सोपं जाणार होतं. नकाशा वाचन अजून जास्त जमणार होतं.

दुपार झाली. एका मोठया झाडाखाली सगळे थांबले. सगळ्यांनी जेवून घेतलं. मग भावे सरांनी नकाशा काढला आणि तो ते पुन्हा अभ्यासू लागले. अजून बरंच दूर होतं ते ठिकाण. अंधार व्हायच्या आत ते गाठायला हवं म्हणून सगळे चटकन निघाले आणि कोणतेही विघ्न न येता त्या टेकड्यांच्या पायथ्याशी सगळे पोहोचले. छोट्या छोट्या बऱ्याच टेकड्या होत्या. जवळजवळ पन्नास साठ तरी असतील. आणि गंमत म्हणजे एकाही टेकडीवर मंदिर नव्हते.

सगळे गोंधळले. कहाणीत तर उल्लेख होता की, ती एका मंदिरात गेली होती. थोडा वेळ गेला आणि भावे म्हणाले, " टेकड्या बुटक्या आहेत. आपल्याला इथून वाटतंय की मंदिर नाहीये. आपण प्रत्यक्ष जाऊन बघायला हवं. तरच ते कळेल. पण आता संध्याकाळ झाली आहे. आपण इथेच मुक्काम करू कुठेतरी. आणि सकाळी शोधू".

सगळ्यांना ते पटलं. म्होरक्या देखील म्हणाला की, हा भाग तसा सुरक्षित आहे. आपण इथे राहू शकतो. मग सगळ्यांनी मिळून जवळची वाळलेली लाकडं गोळा केली. बाजूने गोलाकार रचून त्यावर बरीच लाख टाकून त्याला आग लावली आणि मध्ये सगळे तंबू ठोकून आडवे झाले. जेवणाचं काही फार नव्हतं कोणाला. रात्री अगदीच भूक लागली तर, मिल्क पावडर बरोबर होती. त्यात गरम पाणी घालून दूध करून प्यावं असं ठरलं.

तेवढ्यात तो म्होरक्या म्हणाला, " हा भाग सुरक्षित आहेच, पण तरीही आपल्या पैकी दोन दोन जण जागू आणि लक्ष ठेवू. दोन तासांनी पुढचे दोघे लक्ष ठेवतील".

त्याची ही सूचना सगळ्यांना पटली. भावे आणि तो स्वतः ह्यांनी जागायचं ठरवलं. इतर मंडळी तंबूत आडवी झाली. दोन तासांनी त्यांनी करण आणि रोहितला उठवलं. आता ते दोघे बसले. तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. गप्पा मारताना रोहितला दूर एका टेकडीवर कसलासा प्रकाश दिसला. त्याने तो करणला देखील दाखवला.

दोघांनी साधारण ती टेकडी कुठे आहे, ह्याची नोंद करून ठेवली. अंदाजानेच अर्थात, कारण रात्रीचा फार अंदाज त्यांना येत नव्हता.

एक वाजता त्यांनी ह्या दोघांना उठवलं. त्या दोघांनाही त्यांनी त्या टेकडीवर असलेला प्रकाश दाखवला. आणि कदाचित ते मंदिर तिथेच असावे, पण बाहेरून दिसत नसावे असे ह्या मंडळींना वाटले.

मुली शांत झोपल्या होत्या. रोहित आणि करण झोपायला जाणार इतक्यात त्यांना त्या तिघांची आठवण आली. ते तिघं सुरक्षित असतील ना? असा प्रश्न ह्यांना पडला होता. कारण ते आले नव्हते. त्यांच्याबरोबर कोणी वाटाड्या पण नव्हता. फोन लागण्याचा तर प्रश्नच नव्हता. पण ज्या अर्थी ते आले नाहीत त्या अर्थी एकतर ते त्या गढीत राहिले, नाहीतर परत गेले असावेत. अशी चर्चा होऊन तो विषय संपला.

इकडे महालात मात्र अमितला जाग आली तीच मुळी दुपारी. कदाचित तो फार थकला होता, त्याने असेल, पण तो उठला आणि क्षणभर आपण कुठे आहोत, तेच त्याला कळेना. मग त्याला सगळं आठवलं. तितक्यात ते नाजूक पैंजण पुन्हा वाजलं आणि अमितला स्नानगृहात जाण्यासाठी त्या आवाजाने सांगितलं. अमित नाईलाजाने उठला आणि स्नानगृहात गेला. अत्यंत स्वच्छ असं ते स्नानगृह बघून त्याला आश्चर्य वाटलं. त्याने सगळे प्रातर्विधी उरकले आणि तो परत त्या महालात आला. तिथे त्याला....

काय दिसलं तिथे त्याला? त्या गढीत गेलेल्या तिघांचं काय झालं? ह्या बाकीच्या मंडळींना मंदिर सापडलं का? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all