सावज : भाग २४

A Horror Story Of An Excavator


" नक्कीच सांगेन, पण माझे इतर प्रश्न तसेच आहेत. अजून एक विनंती करू? तुला आता तुझं प्रेम मिळालं आहे, पण त्या जीवाचं काय? जो तुझ्या इशाऱ्यावर लोकांना मारतोय. त्याची तरी सुटका कर. ते जनावर बिचारं! त्याला मुक्त कर". रिया म्हणाली.

त्यावर तो आवाज परत म्हणाला, " त्याला माझ्या रक्षणार्थ ठेवलं आहे. पौर्णिमेला तोही मुक्त होईल. ऐक तुला ऐकायचं आहे ना, की तुला दोन मूर्ती नष्ट करून मला काय मिळेल? जेव्हा त्या दोन मूर्ती नष्ट होतील, तेव्हा तुमच्या दोघांच्या आत्म्याचा संबंध संपेल. तुमचा जीव जो त्यात कणाकणाने साठत आला आहे इतकी जन्म, तो मुक्त होईल. तुम्हांला जेव्हा मी ती दोन अमूल्य रत्ने दिली, तेव्हा तुमच्या प्रेमाची कल्पना मला नव्हती. ती दोन रत्ने देखील नष्ट कर. ह्या महालाच्या पूर्वेस एक पाण्याचा डोह आहे, त्यात ती रत्ने फेकून दे. तो डोह दुष्ट शक्तींनी भरलेला आहे. राजाने अनेक स्त्रिया तिथे बुडवून मारल्या आहेत. त्या रत्नांच्या प्रभावाने त्या स्त्रिया मुक्त होतील. आणि आता पौर्णिमेला काय होणार तेही सांगते. सुकुमार माझा व्हावा, म्हणून अनेक जन्म मी वाट बघतेय. ह्या पौर्णिमेला मी त्याचा देह नष्ट करणार, आत्मा मुक्त करणार. आमच्या आत्म्याचं मिलन होणार. सुकुमारच्या देहाला मी ह्या महालातल्या तेलाच्या विहिरीत अर्पण करणार आहे. तिथलं शेकडो वर्षांचं विषारी, कुजलेलं तेल त्याच्या देहाला लागताक्षणी त्याचा देह कापरासारखा जळून जाईल".

" नाही, नाही" ,असं ओरडत अमित मागे सरकू लागला. " मला जगायचं आहे, मला मारू नकोस, मला मारू नकोस".... असं म्हणत तो अजून अजून मागे सरकू लागला.

अचानक एका अत्यंत मजबूत अदृष्य हाताने त्याला घट्ट धरलं. त्याला हलता येईना.

तो आवाज मंजुळ हसला. " तुझी आता सुटका नाही. आता माझ्या प्रेमाला तुला हो म्हणावंच लागेल. आणि तेही आत्ताच. नाहीतर ह्या सगळ्यांच्या अंताला तू जबाबदार असशील"..

ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत रिया म्हणाली, " मी बघू शकते का ती विहीर? आणि पौर्णिमा किती दिवसांनी आहे? आणि अजून एक! ह्याला इथे खायला कोण घालणार? नाहीतर आधीच त्याचं काही बरं वाईट व्हायचं आणि तू परत मलाच दोषी धरशील. म्हणून मला सगळं नीट सांग. कारण तू आत्मा असलीस, तरी तो नाही. त्याला खायला, प्यायला लागणार ना! आता मला कोणत्याही परिस्थितीत ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे. आणि त्या मूर्ती मी दिवसा की रात्री कधी नष्ट करायच्या आहेत? ,तुझं ते जनावर आमच्या मागावर असेल तर, मी कशी करणार हे सगळं? त्यामुळे तू मला वचन दे, की पौर्णिमेपर्यंत आम्हांला ते जनावर काही करणार नाही".

बाकीचे तिच्याकडे आता तिरस्काराने बघत होते. पण काही बोलायची हिम्मत एकाचीही नव्हती.

" ठीक आहे, ते जनावर हा महाल सोडून कुठेही जाणार नाही, तुम्हांला कोणालाही काहीही करणार नाही. ती विहीर ह्या महालाच्या पश्चिमेला जो मुदपाकखाना आहे, त्याच्या दक्षिणेकडे आहे. हवं तर तू जाऊन बघू शकतेस. मी तुला कसलीही इजा करणार नाही. तू तुझं वचन पाळत आहेस, पण तरीही राधा, लक्ष असेल माझं तुझ्यावर. मला फसवायचा कोणताही प्रयत्न करू नकोस" तो आवाज रियाच्या अगदी जवळून आला. एक मादक सुगंध रियाला जाणवला.

" मी तुला किती वेळा सांगू? मला हा महत्वाचा नाही, माझा जीव महत्वाचा आहे. कोणी येतंय का ती विहीर बघायला माझ्याबरोबर"? इतरांकडे बघत ती म्हणाली.

सगळ्यांनी तोंडं फिरवली. किंचित हसत, मान उडवत रिया तिकडे निघाली.

" तू आलीस की, ह्यांना घेऊन बाहेर पड लगेच. आणि सुकुमारच्या खाण्याची काळजी करू नकोस. त्याला आता कधीच भूक लागणार नाही, असं दिव्य पेय मी त्याला देईन. आणि पौर्णिमेला अजून चार दिवस आहेत. जा आता".

त्या आवाजाची आज्ञा घेऊन रिया आत गेली. हातातली मशाल तिला रस्ता दाखवत होती. त्याचबरोबर तिला जाणवत होती ती अजून कोणाची तरी चाहूल आणि तो मादक सुगंध. रिया त्या विहिरीपाशी पोहोचली. आत मशाल धरून तिने पाहिलं, पण तिला काहीच दिसलं नाही.

" जाऊ दे, मला काहीच दिसत नाहीये, जाते मी" असं म्हणून रिया परत सगळे होते, तिथे आली. आणि कुठंही न बघता सरळ दरवाजाकडे निघाली. जाता जाता तिने बाकीच्यांना चला म्हणून सांगितले. सगळे अमितकडे डोळे भरून बघत होते. तो आता त्यांना कधीच दिसणार नव्हता. रिया सोडून सगळे रडत होते. पण काही बोलायची हिंमत एकात नव्हती. रिया सोडून सगळ्यांनी त्याला मिठी मारली. इतक्यात रिया वळून इकडे तिकडे बघत म्हणाली, " तू कुठे आहेस? मला परत एक प्रश्न आहे. मी समजा पौर्णिमेच्या दिवशी त्या मूर्ती इथे आणून तुझ्यासमोर नष्ट केल्या तर चालतील का? ह्याने तुझं कायमचं समाधान होईल. आणि आम्ही चार दिवस न घाबरता काढू शकू. मला काल बरंच लागलं आहे. थोडं बरं झाल्याशिवाय मला हे काम करता येणार नाही. तुझा विश्वास बसणं माझ्यासाठी महत्वाचं आहे, कारण ह्यात माझाही जीव गुंतला आहे. मला महालातला खजिना पण हवाय. मी त्या साठी खरं तर ह्या संशोधनाला तयार झाले होते. तुला आणि तुझ्या सुकुमारला खजिन्याचा काय उपयोग? तुझी भीती नष्ट झाल्यावर इथला खजिना चोरी होणारच. माझं तरी कल्याण कर. मी तरी आरामात जगेन. प्रियकर नाही निदान संपत्ती तरी मिळेल".

" बघ, सुकुमार! आणि असल्या प्रेयसीसाठी तू मला इतके जन्म झुलवत ठेवलंस". अतिशय छद्मी हसत तो आवाज म्हणाला, " आलीस ना शेवटी औकातीवर"!

कोणाचाच स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. अमितच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. त्याची प्राणप्रिय सखी त्याच्याशी असं वागू शकते, हे त्याला पटत नव्हतं. तो हताश होऊन एका जागी शांत उभा होता. काहीही बोलायची ताकदच नव्हती त्याच्यात. अशा मुलीवर प्रेम केल्याची खंत त्याला आता वाटत होती. स्वतःलाच तो दूषणं देत होता. त्याला त्याचं मरण मान्य होतं. कारण फक्त शरीर मरायचं बाकी होतं. मन तर आत्ताच मेलं होतं.

" सांगतेस ना"? रिया म्हणाली.

" तो खजिना ह्या महालाच्या सर्वात वरच्या मजल्यावर एका घुमटीत आहे. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ये, आणि ने हवा तितका. आणि इथे आणून तुला त्या मूर्ती नष्ट करायच्या असतील तर कर. त्या नष्ट होणं महत्वाचं आहे. पौर्णिमेला रात्री शेवटच्या प्रहरात मी देह अर्पण यज्ञ करणार आहे. तू सकाळी त्या नष्ट कर".

तो आवाज थांबला. तसे सगळे रडत रडत अमितकडे बघत बघत बाहेर पडले. पण रियाच्या डोळ्यांत ना अश्रू होते, ना तिने त्याच्याकडे वळून पाहिलं. ते सगळे बाहेर पडले आणि धाडकन दरवाजा बंद झाला. बाहेर अंधार आणि पाऊस होता. पण आता कोणाला भीती वाटण्याचं कारण उरलं नव्हतं. सगळे अबोलपणे रस्ता कापत होते. शेवटी तांडा आला आणि सगळे येऊन तसेच ओले शेकोटीपाशी बसले.

शर्मा, अभिलाषा आणि वैभव तिघांनीही त्यांना हाय, हॅलो केलं. कुणीच बोललं नाही. वैभवने विचारलं देखील की, अमित कुठे आहे? त्यावर सगळे रियाकडे बघून परत त्या ज्वालांकडे बघत बसले.

" सर, सांगा ना. कुठे आहे अमित? काय झालंय त्याला? मागे राहिलाय का तो? पण एकटा का राहिला? आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला ठेवलं तरी कसं? रिया, अगं बोल की! अमित का नाहीये तुमच्याबरोबर? तुम्हांला इतका उशीर का झाला? आणि....आणि तुमच्या हातात मशाली नव्हत्या. म्हणजे धोका टळलाय का त्या जनावराचा"? वैभव धाडधाड प्रश्न विचारत होता. पण त्याला काहीच उत्तर मिळत नव्हतं. सगळ्यांच्या डोळ्यांतून अश्रू मात्र वहायला लागले होते.

म्होरक्या आला. त्याने पण तेच विचारलं. पण शांतता भंग होत नव्हती. थोडा वेळ गेल्यावर मग मात्र सरांनी संपूर्ण हकीकत सांगितली. रियाकडे एक तिरस्काराची नजर टाकून लीना म्हणाली, " विकलं तिनं तिचं प्रेम. खजिना आणि जीव ह्यांच्या बदल्यात. मला तिच्याशी मैत्री केल्याचा फार त्रास होतोय. नकोशी झालीय ही मला डोळ्यांपुढे. हिला काहीही वाटत नाहीये. एक थेंब सुद्धा आला नाही तिच्या डोळ्यांतून. अमित बिचारा, किती आर्ततेने तिला हाक मारत होता. पण हिला फक्त तो खजिना आणि स्वतःचा जीव दिसत होता बस! मला इथून पुढे हिचं तोंड देखील बघायचं नाही". असं म्हणून रडत रडत लीना आत पळाली.

सगळे उठून आत गेले. रिया एकटीच शेकोटीपाशी बसून होती. सगळ्यांचा जीव वाचावा आणि अमितचा जीव वाचवायला थोडा अवधी मिळावा म्हणून तिने काळजावर दगड ठेवून हा डाव खेळला होता. पण ह्यांना कोणालाच ते समजत नव्हतं. त्याचबरोबर तिने सगळ्यांच्या मागची त्या झपाटलेल्या जनावराची दहशत पूर्ण संपवली होती. हे ही त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. मनाशी काही विचार करून आणि निश्चय करून ती उठली आणि सरळ स्वतःच्या खोपटात गेली. ती जाताच मुली उठून बाहेर गेल्या. तिने कपडे बदलले. बाहेर आली आणि थेट सरांच्या खोपटात गेली. तिथे सगळे बसले होते. ती आल्यावर सगळे उठायला लागले. तशी ती म्हणाली, " प्लीज थांबा, मला बोलायचं आहे सगळ्यांशीच. आधी पूर्ण ऐकून घ्या. मग तुम्हांला माझा तिरस्कार करायचा आहे तर खुशाल करा. पण फक्त एक संधी द्या बोलायची. सर प्लीज"!

तिचं आर्जव बघून सर म्हणाले, " बोल".

" सर, लीना तुम्हांला खरंच असं वाटतंय का की, मी अशी वागू शकते. सगळी लाज लज्जा सोडून कबूल करते की, मी अमितवर अतिशय प्रेम करते, अगदी माझ्या जीवापेक्षा जास्त. पण मी जे केलं त्याने अनेक फायदे झाले. पहिलं म्हणजे ह्या सगळ्या एरियातल्या सगळ्या गावांची दहशत कायमची गेली. ते जनावर आता तिथून इकडे येऊन कोणालाही मारणार नाही. ते ही मुक्त होईल. आणि दुसरा असा फायदा की, सगळ्यांचा जीव वाचला निदान आत्ता तरी. लीना, मी स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुझ्यावरही करते गं. तुला लागलेलं बघून माझा जीव कसा झाला काय सांगू? सर, आपल्या हातात चार दिवस आहेत. तोपर्यंत कोणालाच धोका नाहीये. ह्या चार दिवसांत आपण ते भूत, तो आत्मा नष्ट करण्याचा काहीतरी उपाय शोधू शकतो. ते हिरवं रत्न खरंच दिव्य आहे. सगळ्यांच्या जखमा ते बऱ्या करतंच आहे, अजूनही त्याचा काहीतरी उपयोग करूच शकतो ना आपण? म्हणून तर मी युक्तीने त्या महालात परत जायचा मार्ग शोधला, तिलाच विचारून. मी माझं प्रेम विकलं नाही. उलट मी ते वाचवण्यासाठी खोटं नाटक केलं. आता पुढचे चार दिवस मी जीवाचं रान करेन पण त्याला वाचवायची युक्ती शोधेन. नाहीतर मी मला त्या विहिरीत अर्पण करेन". एवढं बोलून ती ओक्साबोक्शी रडत तिच्या खोपटात पळाली.

काय होणार पुढे? गैरसमज दूर होणार का? अमित वाचणार का? मेघमाला कोणता डाव खेळणार? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all