सावज : भाग ११

A Horror Story Of An Excavator
वाट संपली तिथे सरळ मोठी गुहा मशालीच्या प्रकाशात दिसत होती. अगदी आरामात पण जपून ते दुसऱ्या गुहेत आले आणि तिथे धाडकन एकदम वरून एक मोठा दगड पडला. अगदी रियाच्या डोक्यातच पडणार होता. पण अमितने एकदम तिला बाजूला ओढलं. नाहीतर आज तिचं काही खरं नव्हतं. एकदम मोठा आवाज झाला, खूप धूळ उडाली. आणि अर्थातच सगळे घाबरले. अगदी भावे सर सुद्धा.

जरा सगळं शांत झाल्यावर सर म्हणाले, " होतंच असं. फार प्राचीन गुहा आहेत. जपून आणि सावध रहा सगळे. रिया, बाळा घाबरू नकोस". त्यांनी असं म्हणत तिच्याकडे बघितलं. ती वेगळ्याच विश्वात आल्यासारखं इकडे तिकडे बघत होती. सगळे घाबरले, पण ती घाबरली नव्हती. ती वेगळ्याच आवाजात म्हणाली, " मला माहिती आहे, तो मला काही होऊ देणार नाही".

तिचा आवाज एकदम घोगरा झाला होता. डोळे भावशून्य होते. असं वाटत होतं की ती त्या भिंतीच्या आरपार कुठेतरी बघतेय. तिला काहीतरी वेगळंच दिसतंय.

आधी अमितला वाटलं की ती हे वाक्य त्याच्याबद्दल म्हणतेय. म्हणून तो अगदी हसऱ्या नजरेने तिच्याकडे बघत होता. तिचा हा अविर्भाव बघून त्याने एकदम तिचा हात धरला. आणि तेवढ्याच पटकन सोडला. तो ओरडला, " सर सर, ही अशी काय करतेय? अशी का बघतेय? आणि आणि.... तिचा तिचा तिचा.... स्पर्श असा का लागतोय? सर बघा ना, सर प्लीज".

" अमित शांत हो बाळा आधी! बघतो मी! थांब जरा. रोहित ह्याला सांभाळ. तो खूप घाबरलाय". असं म्हणत सर तिच्या जवळ आले. ती अजूनही त्याच ट्रान्स मध्ये होती. त्यांनी हलकेच तिचा हात धरला. एखादा दगड असावा असा तो स्पर्श होता. जिवंत व्यक्तीचा उष्ण स्पर्श तो नव्हताच.

तेही घाबरले. तिला त्यांनी गदागदा हलवलं. ती एकदम भानावर आली. "अं ! काय झालं"? तिने असं नेहमीच्या आवाजात विचारलं. सगळ्यांनी एकदम सुटकेचा निःश्वास सोडला.

" काही नाही बाळा! तुला एकदम चक्कर आली घाबरून. तो दगड पडला ना म्ह्णून. ठीक आहे आता सगळं". असं म्हणून सरांनी तिला पाणी प्यायला दिलं.

पाणी पिऊन झाल्यावर भावे म्हणाले, " चला रे मुलांनो. आता आपण ही गुहा तपासू".

" सर ", लीना म्हणाली, " इथेच अमित आणि रियासारख्या सेम दोन मूर्ती आहेत, असं शर्मा म्हणत होते. शोधू ना त्या आपण".

भावे म्हणाले, " अगं हो हो! किती उतावीळपणा! शोधू चल". त्यांनी असं म्हणताच मुलं सावकाशपणे ती गुहा चेक करायला लागली. पण त्या गुहेत काहीच नव्हतं. अगदी साधं चित्र पण नाही. नुसतीच रिकामी गुहा बघून मुलं नाराज झाली. त्यात अमित अजूनही घाबरलेलाच होता. त्याला केवळ डोळ्यांनी धीर देऊन भावे म्हणाले, " चलो मुलांनो! नेक्ट गुहा बघू".

पुढच्या गुहेची वाट काही सापडेना . बराच प्रयत्न करून झाला, पण हाती काहीच लागलं नाही. दमून सगळे खाली बसले. रिया एका मोठ्या दगडाला टेकून बसली होती.

तिची नजर अमितवर स्थिरावली होती. त्याला एकदम विचित्र वाटत होतं. ही अशी का बघतेय तेच त्याला कळत नव्हतं. ते इतरांना देखील जाणवलं होतं.

अमितकडे बोट करून रिया म्हणाली, " तो काय रस्ता तिथे आहे. मला दिसतोय. ह्याच्या मागचा एक दगड हलवा, तिथून आहे रस्ता". हे बोलताना तिचा आवाज परत घोगरा झाला होता. नजर बदलली होती.

अमितने एकदम मागे पाहिले. मागे खरेच दगड होता. तो चटकन उठला. भावे आणि रोहित पण उठले. तिघांनी तो दगड हलवायचा प्रयत्न केला. जरा जोर लावल्यावर तो दगड सरकला आणि आत एक वाट दिसू लागली. एक विचित्र थंड हवेचा झोत एकदम तिथून बाहेर आला.

कुबट वास एकदम सगळ्यांना जाणवला. अजूनही रिया भानावर आली नव्हती.

" सर, मला हे काहीतरी वेगळं वाटतंय. तिला हल्ली हे भास होणं, आताची हिची नजर, हा आवाज, आणि जे आपल्या सगळ्यांना दिसलं नाही, ते हिला दिसणं, तिची मूर्ती इथे आहे असं शर्मा सरांनी म्हणणं. हे खरंच काहीतरी वेगळं आहे. मला भीती वाटतेय आता इथे. आणि तिची देखील".

लीना असं म्हणताच सर म्हणाले, " हे बघ, हे काहीतरी वेगळं आहे, हे मलाही जाणवलं आहे. पण आपण हाडाचे संशोधक आहोत. असल्या गोष्टींचा परिणाम करून घ्यायचा नाही. घाबरू नकोस. मी आहे".

असं म्हणून सरांनी खिशातून एक लांब पात्तळ पण मजबूत दोरी काढली. तिथल्याच एका दगडाला करकचून बांधली. आणि ते दुसरं टोक स्वतःच्या कमरेला बांधून त्या वाटेने जायला निघाले. रिया तिथेच तशीच बसली होती. तिला तिथे ठेवून लीनाला तिच्याकडे लक्ष ठेवायला सांगून भावे, अमित आणि रोहित आत शिरले.

खरं तर लीना जाम घाबरली होती. पण ती तशी हटणार नव्हती. एक तर रिया तिचा जीव की प्राण अशी मैत्रीण होती. आणि दुसरं म्हणजे सरांच्या आज्ञेबाहेर ती नव्हती. पण रिया अगदी निश्चल बसली होती. तिचा श्वास अत्यंत संथ गतीने चालू होता.

तिघेही त्या वाटेने पुढे निघाले. ही वाट देखील कोणीतरी मुद्दाम बांधली असावी अशीच होती. आणि विशेष म्हणजे कुबट हवेखेरीज तिथे काहीही नव्हतं. ना धूळ, ना कोळी, ना घाण, ना इतर काही. टॉर्चच्या प्रकाशात तिघे पुढे जात राहिले. अखेर ती वाट संपली. त्याच्या पुढे होती एक अती प्रशस्त गुहा. त्या गुहेत कुठुनसा थोडा प्रकाश येत होता. तो कुठून येत होता, ते मात्र कळत नव्हतं. लालसर असा तो प्रकाश सर्वत्र भरून राहिला होता. अत्यंत मंद असा. तितक्यात मागे चाहूल लागली म्हणून तिघं वळले. लीना आणि रिया होत्या.

" सर, आम्ही आलो आत. आम्हांला का बाहेर ठेवलं"? रिया विचारत होती. जणू काय घडलं ते तिला ठाऊकच नव्हतं. अतिशय नॉर्मल आवाजात ती बोलत होती. लीना मात्र तिचा हात घट्ट धरून खाली मान घालून उभी होती. सरांनी काहीबाही बोलून तिचं समाधान केलं. सरांनी गुहा तपासायला सांगितली. टॉर्च आणि मशालीच्या प्रकाशात त्यांना दोन मूर्ती दिसल्या. नृत्य करताना असतात तशा पोझेस मध्ये. सगळे त्या मूर्तींभोवती गोळा झाले. दोन अप्सरा होत्या त्या. सगळ्यांची निराशा झाली, कारण त्या दोन मूर्ती म्हणजे अमित आणि रियासारख्या असाव्यात असं त्यांना वाटत होतं. पण ह्या त्या नव्हत्याच.

" पण सर, शर्मा सर तर म्हणाले होते की, इथे आमच्यासारख्या मूर्ती आहेत म्हणून. मग त्या अजून आत असतील का? पण सर तर इथपर्यंतच फक्त येऊ शकले होते. मग त्या मूर्ती कुठे पहिल्या त्यांनी"? एका दमात रियाने इतके प्रश्न विचारले. " किंवा त्यांना भास झाला बहुतेक". इतकं बोलून तिने परत त्या मूर्तींचे फोटो काढायला सुरूवात केली.

बाकी सगळ्या नोंदी झाल्यावर अमित म्हणाला, " पण त्या म्होरक्याची सुद्धा चूक होतेय का मग? कारण त्याने पण तेच सांगितलं".

भावे म्हणाले, " हे बघा मुलांनो! इथला अंधार, हा लालसर प्रकाश, इथलं वातावरण ह्याने त्यांचा गोंधळ उडाला असावा कदाचित". तितक्यात रोहित रियाकडे बोट दाखवत म्हणाला, " आपण तर प्रथमच येतोय. मग हिला हा रस्ता कसा कळला"?

हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. रिया म्हणाली, " काय बोलताय तुम्ही? कोणाला, कसला रस्ता कळला? आणि रोहित तू माझ्याकडे बोट का करतोयस"?

कसा कळला तिला रस्ता? ती कुठल्या ट्रान्समध्ये जात होती? त्या दोघांच्या मूर्ती कुठे होत्या? तो लाल प्रकाश कसला होता? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all