सावज : भाग १०

A Horror Story Of An Excavator
तितक्यात एका वाटेतून काहीतरी लखलखीत सरपटत बाहेर येताना दिसलं. त्या पाठोपाठ एक विलक्षण घुमल्यासारखा आवाज आला. दचकून सगळे बघतायत तर, एक पिवळा धम्मक मोठा नाग फुत्कार टाकत सळसळत बाहेर आला होता. त्याची शांतता भंग झाली होती. त्याच्या फुत्कारांवरून तो चिडल्यासारखा वाटत होता. शांततेत गारव्यात बसलेलं ते जनावर देखणं होतं. त्याच्या डोळ्यांतला विखार इथेही जाणवत होता. सरांनी काही बोलायच्या आत मुली किंचाळल्या. ते जनावर अजूनच चिडून पुढे आलं. सरांनी सगळ्यांना एकदम गप्प राहायला सांगितलं. बराच वेळ सगळे अजिबात हालचाल न करता उभे होते. जेव्हा त्याच्या लक्षात आलं की, ह्यांच्यापासून काही धोका नाही, तेव्हा ते जनावर दुसऱ्या वाटेने आत निघून गेलं. सगळ्यांनी एकदम सुटकेचा निःश्वास सोडला.

सर हळू आवाजात पुन्हा म्हणाले, " अजिबात काहीही झालं तरी ओरडायचं नाही. त्याने इथली शांतता भंग होते. जनावरं अजून चिडतात. तुम्ही काहीही हालचाल केली नाहीत, तर त्यांना समजतं की, तुम्ही त्यांचे शत्रू नाही. मग ते त्यांच्या वाटेने जातात. एक लक्षात ठेवा, आपण इथे काहीही नुकसान करायचं नाही. कोणत्याच प्रकारचं. आणि आधी सगळेजण गमबूट आणि हॅन्ड ग्लोव्हज घाला. चेहरा पूर्ण पॅक करा. नाईट व्हिजन चे गॉगल घाला".

सगळ्यांनी लगेच हा जामानिमा केला.

शर्मा सर पुन्हा म्हणाले, " आपण दोन टीम करणार आहोत. दोन मुलं आणि दोन मुली माझ्याबरोबर आणि असंच सेम भावे सरांबरोबर". त्याप्रमाणे भावे सरांबरोबर अमित, रोहित, लीना आणि रिया जाणार असं ठरलं. शर्मा सरांबरोबर वैभव, करण, अभिलाषा आणि अमिषा जाणार होते.

त्या गुहेतून ज्या चार वाटा गेल्या होत्या त्यातली एकदम उजव्या बाजूची वाट भावे सरांनी निवडली. आणि एकदम डावीकडची वाट शर्मा सरांनी. त्यातल्या त्यात ज्यातून तो नाग आला होता आणि जिथे गेला होता, त्या दोन वाटा आत्तातरी टाळल्या होत्या.

सगळं घेतल्याची खात्री करून मग भावे सर म्हणाले, " आज फक्त आपण बघणार आहोत. कुठेही काहीही दिसलं तरी आपण आज फक्त नोंद करणार. आज कशाचाही अभ्यास आपण करणार नाही. एक्स रे मात्र काढणार आहोत. तुमच्या बॅगेत आधीच छोटं पोर्टेबल एक्स रे मशीन आहेच. पण सरसकट एक्स रे काढू नका. त्याची बॅटरी जाईल. मुळात फक्त आधी गुहांच्या भिंती तपासा. खाली बघून नीट चाला. जेवढं जाता येईल तेवढंच आज आपण जाणार आहोत. बेस्ट लक".

उत्खनन क्षेत्रात आता प्रचंड क्रांती झाली आहे. ध्वनीच्या, एक्स रे च्या सहाय्याने आता पुरावे शोधणं फार सोपं झालं आहे. त्यामुळे ही टीम अधिक जोमाने हे अवघड काम करायला तयार झाली होती.

ठरल्याप्रमाणे दोन टीम दोन दिशांनी गेल्या. अगदी डावीकडची वाट धरून शर्मा आणि टीम आत गेले. तसा थोडा उजेड होता, त्यामुळे मशाल, टॉर्च ह्यांची गरज पडत नव्हती. पायाखाली बघत बघत बाजूच्या वाटेचा अंदाज घेत मंडळी पुढे चालू लागली. खूप कोळीष्टकं होती. वटवाघळं उलटी लटकली होती. ह्यांची चाहूल लागून फडफड उडत होती. त्यामुळे करणला जरा भीती वाटत होती. पण धाडस करणं मस्ट होतं. अजूनतरी वाटेवर, भिंतीवर काहीच नव्हतं. थोडं पुढे गेल्यावर मात्र अंधार वाटू लागला. तशी मशालीची उपयुक्तता वाढू लागली. टॉर्च असतानाही मशाल घेण्यामागे एक कारण होतं. आत असतीलच जर काही जनावरं तर, ती दूर जावीत. ती वाट जिथे संपत होती, तिथे एक अरुंद पोकळी असावी असं वाटत होतं. शर्मा सरांनी खिशातून दोरी काढली. अतिशय पात्तळ, पण अतिशय मजबूत अशा ह्या दोरीला त्यांनी त्या गुहेतलाच एक दगड बांधला आणि त्या पोकळीत जोराने टाकला. तो आपटल्याचा लगेचच आवाज आला.

" वळून ते म्हणाले, " जेव्हा आपल्याला खोलीचा अंदाज नसतो, तेव्हा ही ट्रिक वापरायची. ज्या अर्थी लगेच आवाज आला, त्या अर्थी पुढची पोकळी खोल नाही. अर्थात मी इथे येऊन गेलोय, पण तुम्हांला हे कळावं म्हणून मी हे केलं. आता हळूच टॉर्च आत मारू आणि मग सावकाश एकेक करून आत उतरू".

असं म्हणून त्यांनी टॉर्चचा उजेड आत फेकला, तर आत एक सामान्य गुहा होती. आधीच्या गुहेपेक्षा मोठी वाटत होती. सगळे एकेक करून हळूच आत उतरले. इथे अंधाराबरोबर एक विलक्षण थंडावा होता. खाली ओल वाटत होती. थोडा कुबट वास पण होता.

थोडं शांत उभं राहिल्यावर सर म्हणाले, " आता हळूहळू भिंती तपासा. कुठेही ठाकठोक करू नका. फक्त निरीक्षण आणि नोंदी ह्यावरच भर द्या. आणि इकडे उजव्या बाजूला अजून एक वाट दिसेल. ती तिसरी गुहा. मी तिथपर्यंत गेलो आहे. पुढे जाऊ शकलो नाही, कारण माझ्याकडे तेव्हा फार साधनं नव्हती. आज मात्र आपण पुढे नक्की जाऊ".

त्यांनी असं म्हणताच टॉर्चचा उपयोग करत मुलं भिंती तपासून बघू लागली. शर्मा इथे आले होते, पण फार काही बघू शकले नव्हते. त्यामुळे तेही आता भिंती तपासत होते. आवाज घुमत होते. बारीकसा आवाज सुद्धा मोठा वाटत होता. दोन ठिकाणी मंडळींना काही साधी चित्र आढळून आली. मुलांच्या आनंदाला सीमा उरली नाही. हळू आवाजात खुशी व्यक्त करून त्या चित्रांचा फोटो काढण्यासाठी अमिषाने कॅमेरा काढला.

सर म्हणाले, " अगं ब्रशने आधी धूळ, माती, कोळिष्टकं तरी साफ कर. मग काढ फोटो"

अभिलाषाने तिच्या बॅगेतून ब्रश काढला आणि हळुवारपणे तिने त्या चित्रावरची धूळ साफ करायला सुरुवात केली. मशालीचा उजेड पडून आणि फ्लॅश वरून नीट फोटो घेतले. साधी चित्र होती. अगम्य भाषेत काहीतरी लिहिलं होतं त्यावर. त्याचेही नीट फोटो घेऊन तिने त्या चित्रांचं नीट निरीक्षण करायला सुरुवात केली. शिंग असलेल्या काळविटांसारखे ते प्राणी दिसत होते. बाकी फार काहीच नव्हतं. तिथल्या मातीचे थोडे नमुने घेऊन तिसऱ्या गुहेकडे मंडळी सरकली.

तिसऱ्या गुहेत जायला जी वाट होती ती, थोडी कमी उंचीची होती. थोडं वाकून मंडळी भिंती तपासत चालू लागली. वाट जिथे संपली होती, तिथे थोडा उंचवटा होता. त्यावर चढून मग पुढची गुहा होती. हळूहळू मंडळी वर चढली आणि एका अत्यंत प्रशस्त, पण बुटक्या गुहेत मंडळी पोहोचली. अंधार तर होताच, त्याशिवाय घाणेरडा वास पण होता. कुजलेल्या जनावरांच्या मांसाचा, विष्ठेचा, हवेचा असा सगळा तो वास सगळ्या गुहेत भरून राहिला होता. अजूनतरी इक्सिजनची कमतरता कोणालाच जाणवत नव्हती. तिथे सगळीकडे तपासल्यावर परत थोडी चित्र आढळली. त्याचीही फोटोग्राफी करून मग त्यांनी पुढे जाण्याची वाट शोधायला सुरुवात केली.

शर्मा सर ह्याच्यापुढे गेले नव्हते.

त्यामुळे आता सावध राहणं आवश्यक होतं. जिथून ते आत आले होते, त्याच्या शेजारीच एक पोकळी होती. आता वैभवने तो दगडाचा प्रयोग केला. काही सेकंदात दगड आपटल्याचा आवाज आला. शक्य तेवढे टॉर्च आत मारून बघितल्यावर दिसलं की, थोडं खोल होतं. उडी मारून उतरण्याजोगं. पण खाली माती आहे का, ती भुसभुशीत आहे का, दगडी जमीन आहे का, ह्याचा काहीच अंदाज नव्हता. म्हणून मग कमरेला दोर बांधून वैभव जपून आत उतरला. साधी दगडी जमीन बघून त्याने समाधान व्यक्त केले. तसं त्याने सांगताच शर्मा खाली उतरले. पाठोपाठ सगळे हळूच खाली उतरले. उतरताना त्यांनी तिथल्या जमिनीत एक खुंटी भक्कमपणे गाडली. आणि त्याला बांधलेली लांबलचक दोरी करणच्या हाताला बांधली. दोरी अतिशय मजबूत, पात्तळ आणि कमालीची लांब होती. जर मार्ग सापडला नाही तर परत येताना त्रास होऊ नये, ही कल्पना त्या मागे होती.

ती गुहा फारच सामान्य होती. दोन दगडी मूर्ती तिथे कोरलेल्या दिसत होत्या. जणू काही त्या रखवालदार असाव्यात. तसाच वेष आणि शस्त्र त्यांच्या हातात वाटत होती. ब्रशने भराभर साफ करून त्यांचे फोटो, नोंदी सगळं झालं. सगळे खूप एक्साईट झाले होते.

वैभवला भूक लागली होती. त्याने सहज घड्याळात बघितलं तर त्यांना इथे येऊन चार तास उलटले होते. त्याने सरांना तसं सांगताच ते म्हणाले, " ठीक आहे, थोडा कोरडा खाऊ खा पटकन. सांडू नका मात्र".

मंडळींनी पॅकेट्स फोडले आणि खायला सुरुवात केली.

तिकडे उजव्या वाटेने भावे आणि बाकीचे पुढे सरकत होते. वाट अगदी रुंद होती. जणू काही कोणी बांधली होती. धूळ, आणि इतर घाण होतीच. पण निवांत चालता येत होतं.

वाट संपली तिथे सरळ मोठी गुहा मशालीच्या प्रकाशात दिसत होती. अगदी आरामात पण जपून ते दुसऱ्या गुहेत आले आणि ......

काय होतं त्या दुसऱ्या गुहेत? ह्यांना काय दिसणार? काही अघटित तर घडणार नाही ना? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all