सावज : भाग ९

A Horror Story Of An Excavator


दोघे सिनिअर्स बाहेर आले. आणि आदिवासी माणसांना सामान देऊन सगळे निघाले. त्या गुहा चालत जाऊनच बघाव्या लागणार होत्या. कारण तिथे गाडी जाणं शक्य नव्हतं. साधारण एक तास चालल्यावर सगळे तिथे पोहोचले. वाटलं होतं त्या पेक्षा कमी अंतर होतं. पण कष्ट जास्त होते.

त्या गुहा दुरून दिसू लागल्या. अचानक रियाला एक विचित्र वास येऊ लागला. जसं की काहीतरी खूप कुजलंय, सडलंय. जंगली वेली कुजाव्यात, त्याचबरोबर मानवी मांस कुजावं, असा तो भयानक वास होता. तिला आठवलं की हाच वास तिला पहिल्या मीटिंगच्या वेळी देखील आला होता. तिने इकडे तिकडे बघितलं. कोणालाच तो वास येत नव्हता. अमितचं मात्र तोंड वाकडं झालं होतं.

" काय झालं रे? तोंड का वाकडं केलंयस इतकं"? तिने विचारलं तसं वैभवने परस्पर उत्तर दिलं, " मुळातच तोंड वाकडं आहे, अजून काय वेगळं होणार"?

सगळे हसायला लागले. रिया म्हणालीच पण, " सर, फार भयानक वास येतोय. काहीतरी कुजल्यासारखा".

सर म्हणाले, " नाही गं. उलट जंगलाचा मोहक ओला वास येतोय". मस्त फ्रेश वाटतंय".

रिया म्हणाली, " मलाच का येतोय मग"? रोहित तिला चिडवत म्हणाला, " युनिक नाक आहे तुझं. मंगळ ग्रहावरून आयात केलंय".

सगळे हसायला लागले. हसता हसता गुहांच्या अगदी समोर आले सगळे. रियाने त्या गुहांकडे पाहिलं मात्र, तिच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. स्वतःचं घर वाटावं, इतकं तिला ते ओळखीचं वाटलं. ती काही बोलणार इतक्यात कोणीतरी तिच्याकडे बाजूच्या झाडीतून बघतंय असा भास तिला झाला. ती ते बघायला तिथे रेंगाळली. सगळे पुढे गेले.

त्या गुहांच्या बाहेर पुरातत्व खात्याचा बोर्ड लागला होता. सामान्य माणसांना तिथे प्रवेश बंद होता. बरोबर आलेली सरकारी माणसं कसल्याश्या नोंदी करण्यात गढली.

आवश्यक त्या नोंदी झाल्यावर शर्मा म्हणाले, " चला रे आत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. खूप वर्षे जुनी अंधारी गुहा हा त्रासाचा विषय होऊ शकतो. तिथे जरी मी जाऊन आलो असलो, तरी मी फार आत जाऊ शकलो नाही. मी टोटल बाहेरच्या केवळ पाच गुहा बघू शकलो आहे. तिथे असणारा अंधार, कोळी आणि इतर कीटक, सरपटणारे प्राणी, जंगली विषारी वनस्पती, पडीक दगड, खाचखळगे, ओल, त्यामुळे असणाऱ्या जळवा, कुबट वास, ऑक्सिजनची कमतरता ह्या सगळ्यांवर मात करून आपल्याला संशोधन करायचं आहे. आधी आपण ह्या गुहांचं पूर्ण इंस्पेक्शन करणार आहोत. मगच एक जागा निश्चित करून आपण तिथें काम सुरू करू. हळूहळू पुढे पुढे कसं काम करता येईल, त्याचा प्लॅन करू".

हे सगळं झालं आणि अमित म्हणाला, " रिया कुठे आहे? तीच फक्त दिसत नाहीये. सगळे वळून बघायला लागले. ती खरंच कुठेच दिसेना. क्षणभर लीना आणि अमितच्या काळजाचा ठोकाच चुकला. चटकन सगळे मागे आले आणि तिला हाका मारू लागले.

तितक्यात ती एका झाडीतून पळत बाहेर आली. " सॉरी सॉरी, मला इथे फार सुंदर फुलं दिसली. मी माझ्या नकळत तिकडे ओढली गेले, इतका सुंदर सुगंध होता त्या फुलांचा".

हे ऐकून शर्मा सर फार चिडले. परत असं कुठेही आणि कोणीही न जाण्याबाबत ते सगळ्यांना ओरडले. रियाचा चेहरा उतरला. परत एकदा तिने माफी मागितली.

सगळे परत त्या गुहांपाशी गेले. त्या गुहा थोड्या उंचावर होत्या. सगळं सामान आदिवासी घेऊन चढले आणि बाकीचे चढत असताना भावे मागे वळून म्हणाले , "सावकाश या सगळे. इथे चिंचोळी जागा आहे. एकेक करून आत या. गुहेचा बाहेरचा भाग चिंचोळा असला तरी, आत मात्र ऐसपैस आहे".

त्या गुहेच्या अरुंद प्रवेशद्वारातून आदिवासी आधी आत गेले. फडफड करत असंख्य वटवाघळं बाहेर उडाली. दचकून सर्वात मागे असलेल्या रोहितचा पाय सटकला आणि तो धपकन खाली पडला. वैभव आणि करण पटकन उतरले. अजून अमितला बरं नव्हतं, तितक्यात हा अपघात घडला. इथे काहीतरी अशुभ असल्याचा रियाचा समज पक्का झाला. पण ती कोणालाच काही बोलली नाही. तिने असं काही म्हटलं असतं तर सगळ्यांनी तिला वेड्यात काढलं असतं. खरं तर मगाशी तिला फुलं बिलं नव्हती दिसली. कोणीतरी पाळत ठेवत होतं. तिला ते जाणवत होतं. म्ह्णून ती त्याचा मागोवा घ्यायला गेली होती. तिला ते दिसलं होतं... पुसटसं... तेच दगडी वाटावं असं जनावर आणि त्याचा भयानक प्राण्याचा चेहरा.

पण तिने त्याच्या मागे न जाता एका छोट्या झाडावर चढून बघायचा प्रयत्न केला. तिला काहीच दिसलं नाही. पुन्हा तोच भास झाला असं तिला वाटलं. अमितच्या हाकेने ती भानावर आली. पटकन उतरून सगळे होते तिथे गेली.

करण आणि वैभवने रोहितला उचललं. थोडं खरचटलं होतं फक्त. आणि पाय मुरगळला होता. पण तोही फार नाही. थोडासा लंगडत ते पुन्हा वर चढले. हे तिघं आल्यावर एकेक करून सगळे आत शिरले. आत शिरतानाच थोडा कुबट वास आला. ही अगदी बाहेरची गुहा असल्याने इथे जरा उजेड आणि वारा होता. मोठी ऐसपैस गुहा होती. बाहेरून फार लहान वाटत होती. किमान पन्नास माणसे आरामात उभी राहू शकतील इतकी मोठी होती ही गुहा.

सगळं सामान आत ठेवून आदिवासी बाहेर निघून खाली निघाले. जाताना मशाली पेटवून ह्या मंडळींच्या हातात दिल्या. पाच मिनिटे आधी कोणीच काही बोलले नाही. सगळे निरीक्षण करण्यात गढले होते. त्या गुहेच्या आत चार बाजूला वाटा असाव्यात असं वाटत होतं. सगळं सामान एक बाजूला एकावर एक नीट रचून मंडळी शांत उभी राहिली.

तितक्यात एका वाटेतून काहीतरी लखलखीत सरपटत बाहेर येताना दिसलं. त्या पाठोपाठ एक विलक्षण घुमल्यासारखा आवाज आला.

कसला आवाज होता तो? काय दिसणार त्या गुहेत? त्या चार वाटांनी कोण कसं जाणार? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all