सावज : भाग ६

A Haunted Story Of An Excavator


अमित सोडून सगळ्यांनी आवरून घेतलं. अमितला गाढ झोप लागली होती. त्याला उठवलं. मुलींनी गरम पाणी घेऊन मॅगी केलं आणि सगळ्यांनी खाल्लं. आता त्याला बरं वाटत होतं.

तितक्यात परत म्होरक्या आला. रियाकडे बघत बघत म्हणाला....

" सरकारी माणसं आली आहेत तुम्हांला भेटायला. ते सांगायला आलो होतो. आणि हो शर्मा साहेब पण आले आहेत". एवढं बोलून तो रियाकडे बघत बघत निघून गेला. ह्याही वेळेस तो फार विचित्र नजरेने बघत गेला. आता रियाला फार अस्वस्थ वाटू लागलं होतं. तिने सरांना त्या रत्नाविषयी सांगायचं ठरवलं.

मुळात ती अस्वस्थ होती, कारण तिला पडणारी स्वप्न, भास, इकडे येताना तो विचित्र प्राणी, अमितची अवस्था, रात्रीचा तो प्रेमळ स्पर्श, ते मोहक स्वयंप्रकाशी हिरवंगार रत्न, त्याच्या हातात येण्याने थांबलेली वावटळ, अमितला आलेली शुद्ध, आणि सर्व गोष्टींच्या पलीकडे असणारी त्या म्होरक्याची ती अत्यंत विचित्र नजर.

तिने अमितकडे पाहिलं तर तो अजूनही थोडासा शॉकमध्येच होता. पण तिच्याकडेच बघत होता.

भावे सर म्हणाले, " मुलांनो, मी आलोच. शर्मा सरांना भेटून येतो. आणि तुम्ही आवरून बाहेर या. अमित, तू आराम कर. रिया, बस त्याच्या जवळ. त्याला काय हवं, नको ते बघ. आणि हो! तुम्ही दोघं इथून कुठेही जाऊ नका".

ते ऐकून अमित म्हणाला, " मी ठीक आहे आता. मी पण येणार. असं बसणं मला नाही जमणार, सर. प्लीज मला येऊ दे".

त्याला दुजोरा देत रिया म्हणाली, " मी सुद्धा येणार. पण सर, हे शर्मा कोण आहेत"?

" शर्मा म्हणजे ह्या रानाचे, जंगलाचे गूगल आहेत. इथलं साधं पान सुद्धा त्यांच्या ओळखीचं आहे. ह्या गुहांचा शोध सुद्धा त्यांचाच. तुम्ही विसरलात मुलांनो. मी पहिल्या मिटिंगमध्ये हे सांगितलं होतं. आणि हे ही सांगितलं होतं की, इथले आदिवासी हे केवळ इथे राहतात म्हणून आदिवासी म्हणायचे. त्यांनाही शहरी संस्कृतीची पूर्ण ओळख आहे. त्यांना आपली भाषा बऱ्यापैकी जमतेय, हे तुमच्या लक्षात आलं का? निदान मी आणि शर्मा सर नेहमी इथे येतो, म्हणून आम्हांला त्यांची ही मोडकीतोडकी शहरी भाषा निदान समजते. आज तुमची शर्मा सरांशी ओळख करून देतो. ह्या आदिवासी लोकांपैकी हा म्होरक्या त्यांच्या बरोबर अनेकदा त्या गुहांमध्ये गेला आहे. मी मात्र आता तुमच्या बरोबर प्रथमच जाणार". सरांनी सांगितलं.

सगळ्यांना कमालीचा उत्साह आला. अमित चटकन उठला, आणि तेवढ्याच स्पीडने पडला. सगळे क्षणभर हसले. आणि मग सिरीयस झाले. तो परत लगेच उठला आणि म्हणाला, " मी येणार सर".

सर म्हणाले, " हो हो! थांबा जरा. मी निरोप पाठवला की या". असे म्ह्णून स्वतःची सॅक घेऊन सर बाहेर पडले. इकडे मुलांची आपापसात चर्चा सुरू झाली. रियाला सरांशी बोलायला वेळ नाहीच मिळाला.

भावे आणि शर्मा त्या म्होरक्याच्या खोपटात भेटले. त्यांचं स्वागत त्याने मोहाच्या फुलांच्या अगदी माईल्ड केलेल्या दारूने केले. ते दोघं तिथे बोलत असताना, तो म्होरक्या मात्र तिथे थांबला नव्हता. तो हळूच कोणाच्या नकळत रिया जिथे होती तिथे आला. आणि एका छोट्या झरोक्यातून तिचं निरीक्षण करू लागला. त्याची हळूहळू खात्री पटत होती की, जे त्याने त्या गुहेत पाहिलंय ते त्याचा भास नव्हता. ते सत्य होतं. तो चांगलाच घाबरला. त्याने हे कोणाला सांगायचं नाही हे मात्र ठरवलं. कारण कोणीच त्यावर विश्वास ठेवला नसता. त्याने मनात हाच विचार केला की, जेव्हा हे दोन साहेब तिथे बघतील, तेव्हा त्यांची खात्री पटेल.

तो हळूच तिथून दूर झाला आणि परत स्वतःच्या खोपटात आला. तेव्हाही त्यांची चर्चाच चालू होती. थोडा वेळ गेला. भावे म्हणाले, " मी मुलांना बोलावतो. मग आपण पुढचं ठरवू".

असं म्हणून ते बाहेर आले आणि मुलं जिथे होती तिथे परत आले. मुलं आवरून तयारच होती. अमितला हाताला धरून रिया आणि वैभव हळूहळू चालत बाहेर आले. म्होरक्याच्या खोपटात पोहोचल्यावर सगळे खाली चटईवर बसले. शर्मा सर तिथे नव्हते. त्याच्या ऐवजी चार अपरिचित माणसे मात्र तिथे होती.

त्या माणसांची ओळख भावे सरांनी करून दिली. पुरातत्व खात्याच्या वतीने ती चार माणसे ह्यांच्या बरोबर सुपरव्हिजनला असणार होती. ओळख झालीच होती की, तितक्यात शर्मा सर आत आले. त्यांनी सगळ्यांकडे एक नजर टाकली. भावे सरांनी एकेकाची ओळख करून द्यायला सुरुवात केली. प्रत्येकाशी हस्तांदोलन करीत करीत ते अमितपाशी आले. आणि त्याच्याकडे बघून प्रचंड दचकले. ते दचकणं सगळ्यांच्या लक्षात आलं. ते त्याच्याकडे खूप निरखून बघत होते. त्याला फार ऑकवर्ड झालं.

" काय झालं शर्माजी"? , भावे सरांनी विचारलं?

"अं ! नाही, काही नाही". शर्मा म्हणाले. तेवढ्यात शेजारी असलेल्या रियाच्या कडे त्यांचं लक्ष गेलं आणि आता मात्र ते घाबरलेले दिसले.

" कसं शक्य आहे हे? कसं शक्य आहे? मी मी.... मला हे .....", अडखळत अडखळत शर्मा म्हणाले.

" भावे अहो ह्या दोघांची मूर्ती मी त्या गुहेत पाहिली आहे. हेच ते दोघं. पण ते ..... ते .... इथं कसे? आणि मूर्ती आणि हे दोघं इतके सेम कसे"? परत परत शर्मा तेच म्हणत होते.

सगळे अवाक झाले. " अहो काय म्हणताय हे? असं कसं असेल? तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल". भावे म्हणाले.

म्होरक्या म्हणाला, " खरं आहे साहेब म्हणतायत ते! मी फक्त ह्या मुलीची मूर्ती पाहिली आहे. ह्या साहेबांची नाही पाहिली मी. पण ह्या मुलीची आज नक्की. म्हणून मी काल रात्रीपासून त्यांच्याकडे असा बघत होतो. तुम्ही सकाळी मला विचारलं पण. मी तेव्हाच सांगणार होतो. पण माझ्यावर विश्वास कोण ठेवणार? म्हणून मी नाही सांगितलं".

आता मात्र कोणाला काय बोलावं हे सुचेना. रिया आणि अमित तर कावरेबावरे झाले होते. सगळं बळ एकवटून रिया म्हणाली, " सर, हे काय आहे, हे मला माहिती नाही. पण इथे येण्याआधीपासून मला काही भास, स्वप्न पडत होती". हे बोलून तिने सगळं सगळं सांगितलं. पण सांगताना तिने त्या हिरव्या रत्नाबद्दल काहीच नाही सांगितलं. का कोण जाणे, पण तिला ते सांगावंसं नाहीच वाटलं.

हे सगळं ऐकून शर्मा म्हणाले, " मुली, तू फार विचार करू नकोस. अमित बाळा, तू सुद्धा! कोणीही पॅनिक होऊ नका. आपण प्रत्यक्ष तिथे गेलो की खात्री करुन घेऊ. काही योगायोग असू शकतो. त्यामुळे फार विचार कोणीच करू नका".

हे ऐकून सगळे शांत झाले. बराच वेळ कोणीच काही बोललं नाही. सगळेच विचारात गढून गेले होते. शेवटी ही शांतता अभिलाषाने भंग केली. ती म्हणाली, " सर, मला वाटतं आपण आत्ताच जाऊन बघूया का? म्हणजे कोणालाच त्रास नको".

तिच्या ह्या उतावीळपणाचे सगळ्यांनाच हसू आले. भावे म्हणाले, " बाळे, अगं असं जाता येत नाही. आधी सगळं नीट प्लॅन करावं लागेल. तिथे जाणं अवघड आहे. तेच आता आपण ठरवू".

भावे सरांनी त्यांच्या बागमधून एक मॅप काढला. त्याची घडी उलगडली आणि ते त्या गुहांचे ठिकाण त्यात सगळ्यांना दाखवू लागले. त्या गुहांपासून दूर एक ठिपका होता. तिथे नाव होतं भुवनमहल. त्या ठिपक्याकडे बोट दाखवून लीनाने विचारलं , " ते काय आहे? कसला ठिपका आहे हा? आपण इथे जाणार आहोत का"?

त्यावर तो म्होरक्या एकदम म्हणाला, " नका जाऊ तिकडे, चांगला नाही तो महाल". बोलता बोलता शहारला तो एकदम.

काय प्लॅन्स करतील आता? काय रहस्य असेल त्या मूर्तीचं? कसला महाल आहे तो? उत्तरं उद्याच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all