Jan 26, 2022
नारीवादी

प्रेशर कुकर

Read Later
प्रेशर कुकर


प्रेशर कुकर

सकाळी अश्विनी उठल्यावर हातात मोबाइलला घेतला .विशालचा मेसेज आलेला दिसत होता इनबॉक्स मध्ये . अश्विनीने चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणून मेसेज बघावं म्हणून बटण दाबले आणि मेसेज बघताच अंगातील त्राण जाऊन खालीच बसली . "पुढे नाही जाऊ शकत " बस ,इतक्याच शब्दांचा मेसेज होता. सुन्न होऊन खूप वेळ बसलेली अश्विनी "उठ अग जायचं नाही का ऑफिसला ?"ह्या आईच्या हाकेने भानावर आली . काय करावं ?आईला सांगावं कि नको ?आणि बाबांना ?पण असे का झालं ?अनेक प्रश्न एका क्षणात वादळ उठवून गेले. तरी पण मनाचा हिय्या करून अश्विनी उठली.आपल्या रुमचा दरवाजा खोलून बाहेर आल्यावर,तोंडावर पाणी मारून फ्रेश झाली. दात घासेपर्यंत गॅसवर चहा ठेवला . यावरून झाल्यावर चहा घेणार तोच " अग किती वेळ? विशालच्या घरी पण अशीच राहिलीस सुस्त तर काय म्हणतील ?"आईचा आवाज कानी आला. काहीच म्हणणार नाहीत आता ,बराच वेळ चाललेले द्वंद्व संपवून अश्विनी बोलून गेली. "नाही कसे म्हणणार ?"आईने परत प्रश्न केला . "आता संपलय सगळं "अश्विनीने सांगून टाकायचं ह्या बेताने संवाद पुढे नेला . "काय बोलतेय तू?मला काहीच समजत नाही आहे , अग गेल्या आठवड्यात तर भेटलात ना ?मग?",आता हे काय नवीन ?आईने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली . "हे बघ" म्हणत अश्विनीने मोबाइल आईच्या समोर ठेवला ,त्यातील मेसेज बघून दोन मिनिट आईला काहीच सुचेना . भोवळ यावी तश्या खाली पडल्या . “आई आई , अग काय झालं ?” म्हणत तिने आईला सोफयावर बसवलं .बाबा बाबा ! अश्या जोरात हाक मारल्या तो आवाज ऐकून शामराव झोपेतून जागे झाले . ते येई पर्यंत अश्विनीने आईला पाणी मारून शुद्धीवर आणलं . शुद्धीवर आल्या आल्या त्या जोरात रडू लागल्या ,आग हे काय झालं ?आता तुझं कसे होणार म्हणून अश्विनीला बिलगू लागल्या .त्यांनी रडतच झाला प्रकार शामरावांना सांगितला . खूप वेळ धरून ठेवलेला बांध आता फुटला ,आईच्या मिठीत अश्विनीही रडू लागली . हे बघून पहाडासारखे शामराव दोघींना छातीशी धरून आतून मूक अश्रू गाळत होते . थोडासा पूर ओसरल्यावर जसे माणसे सावरतात तसे तिघेही विलग होऊन बाजूला बसले . मधून मधून शारदा बाईंचे हुंदके सुरूच होते . "अहो बघा ,तुम्ही बोलून "न राहून शारदा बाई बोलून गेल्या . "हो मी आज जाऊन येतो त्यांच्या कडे "शामरावांनी मान डोलावली. "नाही ,नको . या पुढे हा विषय इकडेच थांबवा .नाती जबरदस्तीने होत नसतात . "अश्विनी खंबीरपणे बोलून गेली. "तसेपण आधी हे आम्ही सांगितलेच कि आम्ही आधी बघतो एकमेकांशी बोलून आणि मग निर्णय सांगतो . फक्त चूक झाली कि आपण इतके पुढे सरकलो . "अजूनही अश्विनीचा स्वर तसाच खंबीर भासत होता . "अग पण आता जवळपास सगळ्यांना माहित आहे कि तुझं लग्न ठरतय आणि आता असे म्हणजे किती नाचक्की ?किती लोक बोलतील ?नातेवाईकांना काय सांगायचं?परत कोण भेटणार ?"शारदा बाई मन मोकळं करत बोलल्या .

ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अश्विनी कडे नव्हती . ह्या प्रश्नांचा दबाव आता तिच्यावर जास्त राहणार होता . कुकर मध्ये घुसमटणाऱ्या वाफे सारखी तिची अवस्था झालेली. स्वप्नांचे अन्न वास्तवाच्या अति धगीने करपटलेले ,आत उरलेली ती फक्त भावनांची वाफ 

सौ.प्राजक्ता हेदे(कृष्णवेडी)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now