Jan 27, 2021
स्पर्धा

प्रेरणादायी शेवंता

Read Later
प्रेरणादायी शेवंता

    प्रेरणादायी शेवंता 

सूर्य परतीला लागलेला होता.पक्षी आपल्या पिलाकडे धाव घेत होते.शेवंता लगबगीने शेतातील काम उरकून घराकडे चालली होती...ते खुरपे,शेतातील कपडे,घामाने भिजलेले शरीर , मनात चाललेली हुरहुर हे सारे आठवित घर गाठत होती.आपले लहान सोनुले मला केंव्हा बिलगेल याची ती वाट पहात होती.जीवापाड जपलेले पाडस तीचा जीव की प्राण होते.

असा जीव माझा तू 
हृदयाचा घेतोस ठाव तू 

   झपझप पावले टाकत तीने घर गाठले.घरात गेल्यावर रोहित आपल्या आईला बिलगला.तसा शेवंताचा सगळा शीण गायब झाला.अस्ताव्यस्त पडलेल चुलीजवळचे साहित्य ती साफ करु लागली.चुलीला सरपण घालता घालता तिला आपल्या आयुष्याचे दिवस आठवू लागले.गरीबी काय असते हे पदोपदी तिने अनुभवले होते.कष्टाच्या व घामाच्या थेंबानी सारे आयुष्य भिजवले होते हेच आयुष्य आपल्या लाडक्या रोहितला येवू नये म्हणून ती प्रत्येक बांधाला मोलमजुरीसाठी जात होती ...तिथल्या कामात फक्त तिला रोहितचा चेहरा दिसत होता..!! म्हणून ती रात्रीचा दिवस करुन रोहितला शाळा शिकवून शिक्षक बनविण्याचे ध्येय तिने उराशी बाळगले होते.

मनाची मनाशी होते जंग 
प्रयत्नात असावे नेहमी दंग 

   रोहित आता मोठा होऊ लागला होता.शाळेला जाण्यास तो फार त्रास देत असे.वैतागलेली शेवंता रडकुंडीला येत असे.पण तीने कधी धीर सोडला नाही.शाळेला ती रोहितला  स्वतः पाठवून देत असत ...त्याच्याजवळ बसत असत.त्याचे मन रमले की हळूच घराकडे येत असत पण रोहितही चलाख असल्यामुळे तो आईच्या आठवणीने घराकडे धुम ठोकत असे. हे रोहितचे नित्याचेच चालले होते.अखेर अनेक हालअपेष्ठा खात रोहितला शाळेचा लळा लागला.आता तो दररोजच शाळा व्यवस्थित जाऊ लागला.गरीबाचे पोरग शिकू लागले,अक्षरे गिरवू लागले ...सरस्वतीला वंदन करु लागले.हे पाहून शेवंताला आनंद गगनात मावेनासा झाला.

अक्षरांची ही उर्जा 
विचारांंचा वाढवी दर्जा 

    रोहितच्या शाळेच्या वाढता खर्च व संसाराचा गाडा  हाकताना शेवंताची दमछाक होत होती.यासाठी शेवंताने शेतात राबणे कधी बंद केले नाही.मिळेल तो भाकरीचा तुकडा खात दिवस काढत होती व रोहितला शाळेत लागेल तेंव्हा पैसा पुरवीत होती.आपल्या पोराला मास्तर करण्याचे स्वप्न पुरे करण्यासाठी ती क्षणांक्षणांला कष्टाला आपलेसे करत होती.

     रोहितला आपल्या आईची अवस्था पहावत नव्हती.गरीबी काय आहे व तीचे अंतस्थ रुप कसे आहे हे रोहितने जवळून बघीतले होते याची जाणीव  ठेवून रोहित शिक्षण घेत होता.  काटकसरीचे क्षण जगत होता.अभ्यास मन लावून करत होता.शाळेतील गुरुजनांना व मित्रांना आदराचे स्थान देत होता.आईने केलेल्या उच्च संस्कारांचे पडसाद त्याच्या शैक्षणिक वर्तणुकीत पदोपदी दिसत होते.शाळेतिल एक "संस्कारशील विद्यार्थी " म्हणून शिक्षकवर्ग त्याच्याकडे आदराने पहात होता.

थोर आसावेत संस्कार
छान घेईल व्यक्तिमत्व आकार 

      रोहितने प्राथमिक शिक्षण  विना  अडथळ्याने पुर्ण केले.दहाविच्या परिक्षेत रोहित शाळेत अव्वल आला.शाळेतिल शिक्षकांचे मार्गदर्शन , अभ्यासातील सातत्य व आईची कष्टरुपी भेट यामुळे रोहितला हे यश मिळवता आले. आपले मूल आता शाळेत नाव कमावतेल पाहून शेवंता मनोमन सुखावली होती.त्याला मास्तर करण्यासाठी ती शाळेत शिक्षकांच्याबरोबर वारंवार बोलत होती."काय बी होऊदे पण माझ्या रोहितला मास्तर करणारच ....!!" अशी ती सर्वांना सांगत होती.तिच्या या महत्वाकांक्षेची रोहितने मनापासून तयारी केली होती.

ध्येय असावे मनात
प्रयत्न करावे कणाकणांत

    रोहितने बारावीची परिक्षा देऊन उत्तम गुण मिळविले. आता त्याला वेध शिक्षक भरतिचे लागले होते. दोन वर्ष कसून  शिक्षक होण्याचा कोर्स पुर्ण केला.शिक्षक भरती परिक्षेचा अभ्यास रोहितने जोमाने केला होता.पहिल्या प्रयत्नात यश मिळावे यासाठी आई शेवंता मनात देवाचा धावा करत होती.लहानपणाची तीला आठवण येत होती.... याच बाळाने क्षणांक्षणांला  दमविले होते... शाळेतून पळ काढला होता ... तोच बाळ आता मास्तर व्हायला निघाला होता...!

पुढील पिढीसाठी मास्तर हवा 
शिक्षणासाठी घ्यावा ध्यास नवा

      शेवंताच्या प्रयत्नांना यश आले होते.कष्टाचे चिज झाले होते.यश कसे असते व ते प्रत्यक्ष कसे अनुभवायचे याचे त्या अविस्मरणीय क्षणाला पाहून तीला मनोमन वाटत होते.रोहित पहिल्या प्रयत्नामध्येच शिक्षक भरती परिक्षा उतिर्ण झाला.रोहितला प्रचंड आनंद झाला.क्षणभर विचार करताना सारे क्षण आठवू लागले व अपरिमित कष्टाने यश मिळते हे त्याने सिद्ध केले होते.आईला गाढ अलिंगन दिले.शेवंताच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. "पोरा संधीचे सोने केलास...!! माझ्या राबण्याचे सार्थक झाले...!!" दोघांनीही आनंदाने ही बातमी सर्वांना सांंगितली.रोहितने दिवंगत वडिलांना फुलांचा हार घालून आशिर्वाद घेतले.
असा हा रोहित आईच्या प्रेरणेने एक चांगला शिक्षक बनला.दुर्गम भागातील शाळेत रुजू होऊन अनेक हरहुन्नरी विद्यार्थी तयार केले.त्याच शाळेत सुविचार वाचण्यास मिळत होते " कष्टाशिवाय फळ नाही." आई थोर तुझे उपकार." शेवंतासारख्या दुर्दम्य ईच्छाशकी असणाऱ्या स्रीने विद्यार्थीप्रिय शिक्षक निर्माण केला.शेवंताच्या या कष्टाला ,तिच्यातील स्रीला व  प्रेरणेला शतशः वंदन ..!!

कष्टाने  फुलतो मळा 
अक्षरांचा लागतो लळा 

     अनेक बांध पालथी घालून कठोर मेहनतीने  परिस्थितीवर मात करुन शेवंतासारख्या अडाणी बाईने आपल्या मुलाला शिक्षक बनविले.ग्रामिण भागात अशा अनेक शेवंता दडलेल्या आहेत त्या परिस्थितीवर मात करुन डॉक्टर, इंजीनियर,शास्त्रज्ञ , वकील , थोर व्यावसायिक , अनेक रणरागिणी व खेळाडू तयार करत आहे.अशा दडलेल्या हिरकणींनी समृद्ध देश निर्माण केला आहे.आपल्याच सहवासातील या थोर महिलांचा यथोचित गौरव केला पाहिजे तरच अशा अनेक कतृत्वान महिलामुळे नवरत्नांची खाण निर्माण होईल.

  स्रीकडून घ्यावी प्रेरणा 
 क्षणांक्षणांला देते चालना 
 तुझ्या जन्मावर शतदा प्रेम करावे 
 अवघे जीवन हे कृतार्थ व्हावे

     ©®नामदेवपाटील ✍️