Jan 26, 2022
नारीवादी

प्रेरणा - भाग १

Read Later
प्रेरणा - भाग १
" आई, आबा, राजू, मिनू... अरे कुठे आहात सर्व..? लवकर बाहेर या... " प्रेरणा धावतच घरात शिरली आणि अंगणातूनच सर्वांना आवाज देऊ लागली.

" आले आले.. थांब .." आई म्हणजेच शकुंतला बाई आतून म्हणाल्या.

" अगं लवकर ये ना.." प्रेरणा पुन्हा अधीर होऊन म्हणाली.

" बोल ताई ... काय झालं..? " म्हणत मिनल बाहेर आली.

प्रेरणा तिला काही बोलणार एवढ्यात आई आबांची व्हीलचेअर ढकलत आबांना म्हणजेच शरद रावांना घेऊन बाहेर येत म्हणाली, " अगं तुझा रिझल्ट होता ना आज...? तू अजून इथेच आहेच.."

" आई थांब जरा.. राजू कुठे राहिला..? राजू अरे ये रे.." प्रेरणा आईला थांबवत म्हणाली.

" आलो अगं... दोन मिनिटं थांब... " राजू त्याच्या खोलीतून म्हणाला.

" प्रेरणा काय गं.. काय सांगायचं आहे..? आणि रिझल्ट आणायला गेली नाहीस तू अजून..? का रिझल्ट आणला तू..? सांग ना.. " आबा म्हणाले.

" सांगते सांगते.. थोडा धीर धरा.. सर्व समोर आल्यावरच सांगेन.." प्रेरणा म्हणाली.

" हे घे आलो.." हातात पाठी काहीतरी लपवत राजू म्हणजेच राजेश बाहेर आला.

" हातात काय आहे रे तुझ्या..? दादा काय लपवत आहेस तू..? " मिनलने राजेशला विचारले.

" अगं काही नाही... प्रेरणाच ऐकून घे आधी, मग सांगतो मी.." राजेश म्हणाला.

" ओके.. आता सर्व ऐका.. माझा रिझल्ट लागला आणि मी डिस्टिंक्शन मिळवलं आहे..." प्रेरणा रिझल्टची बातमी सांगता सांगता नाचू लागली. तिच्या सोबत मिनल आणि राजेश सुद्धा उड्या मारत तिला आलिंगन देण्यासाठी तिच्या जवळ पोहोचले.

" हे घे.. तुझं गिफ्ट.." असे म्हणत राजेशने प्रेरणाला खूप छान पेन आणि चॉकलेट गिफ्ट म्हणुन दिले.

" अरे राजू तुला आधीच माहीत होत का हे...? तू गिफ्ट आधीच कसं आणून ठेवलं ..? " प्रेरणाने राजेशला विचारले.

" अगं त्यात काय.. तू चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारच याची आम्हा सर्वांना खात्री होतीच. हो की नाही आई आबा.." आई आबांकडे बघत राजेश म्हणाला.

" हो ना.. माझं स्वप्न पूर्ण झालं. प्रेरणा तुला सांगू शकत नाही किती मोठा आनंद दिला आहेस तू मला.." असे म्हणत डोळ्यातून ओघळणारे अश्रू आबांनी पुसले.

" खरंच बाळा.. आम्ही सर्वच वाट बघत होतो याची.. आणि तू चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारच ही खात्री तर होतीच.." आई म्हणाली.

" आई आबा नमस्कार करते. " असे म्हणत प्रेरणाने आई आबांना नमस्कार केला.

" आबा सॉरी हा.. मला माहित आहे तुम्ही सकाळी वाट पाहत होतात माझी पण मी तुम्हाला न सांगताच लवकर गेले कॉलेजला. त्याआधी मंदिरात सुद्धा गेले होते. मला टेन्शन आलं होतं. त्यामुळे रात्रभर झोप सुद्धा आली नाही. असे झालं होतं , कधी एकदा सकाळ होते आहे.. भीती वाटत होती.. म्हणून मग तुम्हाला भेटायचं टाळलं आणि तशीच न सांगता गेले. " प्रेरणा आबांना म्हणाली, आबांना पाहून तिचे ही डोळे पाणावले होते. ती आबांच्या मांडीवर डोकं ठेवून विसावली.

" अगं ठीक आहे.. समजू शकतो मी. " प्रेरणाच्या केसात मायेने हात फिरवत आबा म्हणाले.

" शकू अगं बघत काय बसली आहेस , देवाजवळ साखर ठेव.." आबा आईला म्हणाले.

" हो हो.. ठेवते .. खरंच खूप छान झालं. लग्नासाठी आता स्थळांची रांगच लागेल. माझी लेक आता मोठ्या घरची सून होईल.. सर्व कसं खूप छान होईल.." स्वतःशीच पुटपुटत आई देवाजवळ साखर ठेवायला गेली.

" आई पुन्हा सुरू केलं तू हे.. मला एवढ्यात नाही लग्न करायचं. मला अजून शिकायचं आहे. आबा मला मानसशास्त्रात करिअर करायचं आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.. आई प्लिज अगं सारखं तुझं हे लग्नाचं तुणतुणं नको ग वाजवू.. कंटाळा आला आहे मला..." प्रेरणा वैतागून आई आबांना म्हणाली.

" शकू निदान आजच्या दिवशी तरी गप्प बस. तिच्या आनंदावर विरजण नको घालू. मुलींना लग्नासाठी उच्च शिक्षित आणि मोठं घराणं मिळावं फक्त या साठी त्यांना शिकवणं चुकीचं आहे. त्याचंही आयुष्य आहे. त्यांना हवं तस त्यांना जगता आलं पाहिजे. स्वतःच कर्तुत्व सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळालीच पाहिजे. असं ही या घरात तिनेच काय ते अटके पार झेंडे लावले आहेत. नाहीतर अजून कोणाकडून शिक्षणाची किंवा काही वेगळं करून दाखवायची अपेक्षाच नाही.." आधी शकुंतला बाईंना बोलता बोलता मग रागाने राजेश कडे पाहत आबांनी आपले बोलणे बंद केले..

" बोलले बोलले... एक संधी नाही सोडत माझ्या लेकाला बोलायची. नाही त्याला इच्छा शिकायची, नाही त्याला गती अभ्यासात. दिलं त्याने शिक्षण सोडून पण घरी तर नाही ना बसला.. व्यसनाधीन तर नाही ना झाला. वाईट मार्गाला तर नाही ना गेला. कमावतो आहे तो स्वतःच्या हिंमतीवर.. पुस्तकी शिक्षणच सार काही नसतं.. " आई आबांना बोलतच होती. इतक्यात राजेश मध्ये पडला.. 

" आता पुरे करा.. किती छान दिवस आहे आजचा.. आणि तुम्ही दोघे नेहमी प्रमाणे.... काय बोलू... शब्द नाहीत माझ्या कडे... मी जातो गॅरेजला. संध्याकाळी येताना पेढे घेऊन येईन. आणि आबा तुम्ही मला कितीही काहीही बोललात तरी मला आता त्याच वाईट नाही वाटत.. तुमचा राग समजू शकतो मी.. पण प्लिज नेहमी नेहमी मला सूनावल्याने आता गोष्टी बदलणार नाहीत. उलट घरातलं वातावरण दूषित होत जाईल.. बघा जमलं तर विचार करून..मी येतो." असे म्हणून राजेश निघाला.

तर असं हे गायकवाड कुटुंब.. शरद आणि शकुंतला गायकवाड. म्हणजेच आबा आणि आई. शरद राव मुंबईत नोकरीला होते. स्वतःच छान घर होत. एक गाडी होती. कोल्हापुरातल्या आंबे गावात वडिलोपार्जित प्रशस्त घर होत. शेतजमीन होती. शरद राव आणि त्यांना तीन बहिणी. तिन्हीही बहिणींची लग्न होऊन त्या आपापल्या घरात सुखाने नांदत होत्या. त्यांच्या आईला लवकरच देवज्ञा झाली त्यामुळे आता घरात उरले होते फक्त शरद राव आणि त्यांचे वडील. अशातच सधन कुटुंबातल्या राधा बाईंचं स्थळ त्यांना समोरून सांगून आलं. सालस, रेखीव, राधाबाई शरद रावांना आवडल्या. पत्रिका जुळली. थाटामाटात लग्न झालं आणि पूर्वाश्रमीची राधाबाई आता गायकवाडांची सून शकुंतला बाई झाली. गायकवाडांच घर म्हणजे आनंदवन.. या घरात तीन पिल्ले आली. त्यांची तीन मुलं घरात बागडू लागली. राजेश आणि प्रेरणा जुळी मुलं. राजेश मोठा तर प्रेरणा त्याच्या मागोमाग पाच मिनिटांच्या अंतराने या जगात आली. मिनल या घराचं शेंडे फळं. सार काही दृष्ट लागावं असच.. शेवटी दृष्ट लागलीच.. एकदा कामावरून येताना शरद रावांच्या गाडीचा अपघात झाला. अपघात इतका भयानक होता की शरद राव सहा महिने कोमामध्ये गेले. त्याच काळात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या वडिलांचे निधन झाले. छोट्या राजेशलाच अग्नी द्यावा लागला. सहा महिन्यानंतर कोमातून बाहेर आले तेव्हा या बातमीने ते हादरून गेले, हे एवढं दुःख काय कमी होत त्यातच भर म्हणुन त्यांचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी सांगितले की ते या पुढे कधीच उभे राहू शकणार नाहीत. अपघातात त्यांच्या मज्जातंतूला जबरदस्त मार लागला होता, त्यामुळे त्यांचा कमरे पासून खालचा भाग निकामी झाला होता. गायकवाड घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. शकुंतला बाई हार मानणाऱ्या नव्हत्या. त्यांनी सर्व प्रयत्न केले. डॉक्टरी उपचार केले, देवीला नवस केले, भोंदू बाबांच्या शरण गेल्या. त्यांना जे जे शक्य होत ते त्यांनी केलं. अशा परिस्थितीत शरद रावांची नोकरी गेली. उपचारासाठी मुंबईतलं राहत घर विकलं. भाड्याच्या छोट्या घरात राहू लागले. गावाची शेतजमीन विकली. सर्व वैभव गेलं. पण हाती काही यश आले नाही. सुरुवातीच्या काळात सर्व नातेवाईक होते पण हळूहळू त्यांनीही पाठ फिरवली. अगदी शरद रावांच्या सख्या बहिणी , शकुंतला बाईंची सारी रक्ताची नाती आता त्यांना परकी झाली होती. उरलं होत ते केवळ कोल्हापुरात आंबेगावत असलेले त्यांचं घर.

"आता उपचार पुरे झाले... गावच घर तरी असू देत आसरा म्हणून... तीन लेकरांच्या डोक्यावर छप्पर हवच ना.. आपण कसं ही राहू... पण त्यांना असं सोडू नाही शकत... मी सुद्धा थकलो आता... असं वाटतं जीव द्यावा... निदान माझ्या जाण्याने तुम्ही तरी मोकळे व्हाल..." शरद राव खिन्न होऊन शकुंतला बाईंना म्हणाले.

" अहो.. काहीतरीच काय... पुन्हा अस बोललात तर बघा.. तुमच्या आधी मीच स्वतःच काही तरी करून घेईन..." शकुंतला बाई शरद रावांना म्हणाल्या.

" नाही बोलणार असं काही.. पण आता आंबेगावला जाऊ आणि जमेल तसं नव्याने सुरू करू आयुष्य.." शरद रावांनी शकुंतला बाईंना समजावलं.
 
शकुंतला बाईंची आंबेगावला जाण्याची मुळीच इच्छा नव्हती.. पण आता तिथे जाण्यावाचून पर्याय नव्हता. वैभवात राहणाऱ्या शकुंतला बाईंच्या नशिबात आता गरिबीचा भोग आला होता. तिन्ही मुलांना घेऊन गायकवाड दांपत्य कोल्हापुरात स्थाईक झाले. मुले मोठी होऊ लागली. राजेशला शिक्षणात गतीही नव्हती आणि रसही नव्हता.. जेमतेम दहावी पर्यंत शिकून तो एका गॅरेजमध्ये कामाला लागला. मुलांनी खूप शिकावं, समाजात नाव , प्रतिष्ठा मिळवावी अशी शरद रावांची इच्छा. पण राजेशला ते काही जमल नाही, त्यामुळे ते त्याच्यावर नाराज असतं. जेव्हा संधी मिळे तेव्हा त्याला घालून पाडून बोलत असतं. या उलट शकुंतला बाईंचा तिन्ही मुलांमध्ये राजेशवर भारी जीव. एक तर तो वंशाचा दिवा होता म्हणून आणि तो अभ्यासात हुशार नसला तर तो मेहनती होता. आज्ञाधारक होता. त्याला जसं जमेल तसं तो घराला हातभार लावत होता. राजेशच्या विरुद्ध प्रेरणा आणि मिनल.. प्रेरणा आणि मिनल दोघीही अभ्यासात हुशार होत्या. प्रेरणा स्वतः शिक्षण घेत होतीच पण सोबत घरी शिकवण्या घेऊन घर चालवायला मदत सुद्धा करत होती. कोल्हापूरला आल्यानंतर शकुंतला बाईंनी सुद्धा खूप खस्ता खाल्या. आधी चार घरी जेवणाची कामं केली. कधी शिवणकाम केलं.. आणि आता अंगणवाडी सेविकेची नोकरी पत्करली होती. त्यांना त्यांच्या वाटेला आलेल्या या गरिबीचा तिटकारा आला होता. ज्याच्याकडे पैसा तोच या जगातला सुखी माणूस हेच त्यांचं समीकरण झालं होत. मुलींना शिकवायच आणि त्यांचं मोठ्या श्रीमंत घरात लग्न लाऊन द्यायचं म्हणजे त्या सुखी होतील. दोन्हीं ही मुली दिसायला देखण्या होत्याच. त्यांच्या लग्नात वर पक्षाला द्याला हुंडा नव्हता पण मुलींचं शिक्षण हेच त्याचं उत्तम स्थळं मिळवण्यात कामी येईल, असे त्यांचे विचार होते. या उलट शरद रावांना वाटे मुलींनी शिकून नोकरी करावी, स्वतःला सिद्ध करावं. स्वतः ला हवं तस जगावं. लग्न हेच त्यांच्या आयुष्याचं अंतिम ध्येय असू नये. घराच्या परिस्थितीमुळे आणि विचारातल्या भिन्नतेमुळे आता शरद राव आणि शकुंतला बाईंच्या नात्यात दरी निर्माण झाली होती, आणि याची पूर्ण जाणीव मुलांनाही होती. पण तिन्हीही मुलं खूप समजूतदार आणि समंजस होती. आपापल्या परीने घराला जपत होती. तिघांचही एकमेकांवर खूप प्रेम होत. प्रतिकूल परिस्थितीने शकुंतला बाई आणि शरद रावांच नात पोकळ केलं होतं.. पण त्याच परिस्थितीने तिन्ही मुलांचं नात भक्कम केलं होत.

 तर वाचकहो ही गोष्ट सुरू होते नव्वदच्या दशकात. जेव्हा भारत आणि भारतीय प्रगतीच्या, आधुनिकतेच्या मार्गावर चालू लागले होते. रूढी - परंपरा , जुन्या चाली रीती तसेच आधुनिक विचार , तंत्रज्ञ याची सांगड घातली जात होती. कथेच्या नावावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की ही कथा आहे प्रेरणाची.. तिच्या नात्यांची, तिच्या स्वप्नांची... तिच्या आयष्यातल्या घटनांची.. नक्की काय घडणार आहे तिच्या आयुष्यात हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग जरूर वाचा.


डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


वाचकहो.. कथा कशी वाटली ते नक्की सांगा. आपला अभिप्राय नोंदवा. लेख आवडला असेल तर LIKE जरूर करा. आणि हो मला FOLLOW करायला विसरू नका.
माझा लेख माझ्या नावासहित शेअर करायला माझी काहीच हरकत नाही??.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Ashwini Alpesh Naik

Physiotherapist

हॅलो.. मी पूर्वाश्रमीची डॉ. अश्विनी अनिल पांचाळ आणि आता डॉ. अश्विनी अल्पेश नाईक. मी फिजिओथेरपिस्ट आहे. गेले सहा वर्ष प्रॅक्टिस करते आहे. मला वाचनाची, लिखाणाची,प्रवासाची आवड आहे. मला आसपासच्या गोष्टी, निसर्ग, माणसं, यांचे निरीक्षण करायला फार आवडते.कदाचित ही आवड मला माझ्या प्रोफेशनमुळे निर्माण झाली असावी. निरीक्षणातून आपण बरेच काही शिकतो असे मला वाटते. माझी हीच आवड बरेचदा माझ्या लिखाणातून झळकते. माझी अजून एक ओळख म्हणजे मी एक आनंदी बायको आहे आणि अकरा महिन्याच्या बाळाची आई आहे.