प्रेमस्पर्श भाग २०

Umesh Shocked


गेल्याभागात पाहिले की उमेश आईसोबत गावी जातो ..तिथे आजी उमेशचं लग्न त्याची मामेबहीण आशु सोबत करण्याचे उमेशच्या आईला विचारते...उमेशची आई खुश होते ..आपल्या भावाची मुलगी सून म्हणून घरी येईल ह्या विचाराने सुखावते..त्यासंदर्भात ती उमेशशी बोलते..उमेश स्पष्ट सांगतो"आशूला त्या नजरेने कधी पाहिले नाही"...उमेशच्या बाबांना कुठेतरी वाटत असते की उमेशच्या मनात कोणीतरी मुलगी आहे....उमेश मात्र प्रियाच्या भेटीसाठी आतुर असतो ...रात्रभर त्याला झोप लागत नाही....पाहू पुढे..


सकाळ होते..उमेशसाठी ही सकाळ फार वेगळीच होती..किती वर्षाने प्रियाला भेटणार होता..तो पटकन तयारी करतो आणि बाहेर पडत असतो... तोच आई त्याला "इतक्या सकाळी कुठे जातो आहे"विचारते...


उमेश:"थोडं कॉलेजला काम आहे"


आई:"थोडं खाऊन जा "

उमेश:"आई मी लगेच येतो जावून"


आई:"उमेश अजून राग आहे का तुझ्या मनात?"

उमेश:"कसला राग आई?

आई:"तेच काल आशुशी लग्न करण्याबाबत विचारले म्हणून?"

उमेश:"आई ,ते तर मी कधीच विसरलो...आणि खरं तर आई सॉरी मी काल पहिल्यांदा इतक्या विचित्रपद्धतीने वागले तुझ्याशी..आई खर तर मिच माफी मागायला हवी. खरंच आई सॉरी"


उमेश आईच्या जवळ जातो..आईचे हात हातात घेतो आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवत आणि म्हणतो:"आई पुन्हा असे कधी होणार नाही"


आईला खूप गहिवरून येते..

आई:"बरं ,आता पुरे मला रडवतोस का??चल दोन घास खाऊन घे..तुला आवडते म्हणून तुपाची चपाती आणि चहा केला आहे"


उमेश:"बरं ,चल लवकर दे"


उमेशला आई ब्रेकफास्ट देते.

आई:"उमेश ,काल मी आजीला फोन करून लग्नासाठी नाही कळवले.."

उमेश:"काय ,म्हणाली आजी?

आई:"ती म्हणत होती समजव उमेशला"

उमेश गालात हसत होता..

आई:"काय झाले तुला हसायला"

उमेश:"आई,आजीच्या डोक्यात कसे काय आले हे लग्नाचे खूळ तेच कळत नाही??..."


आई:"तुला नाही कळणार कारण तू आमच्या ठिकाणी नाही..बरं ते जाऊ दे..तो विषय नको...तू माझ्या प्रश्नाचे खरं उत्तर दे..


उमेश:"कोणत्या प्रश्नाचे उत्तर??"


आई:"जो आता मी विचारणार आहे"

उमेश:"बरं बोल .."

आई:"उमेश,तू मला खरं सांग तुझं कोणावर प्रेम आहे का?"


उमेश:"आई ,तू हे का विचारते आहे??


आई:"ते मला नको सांगू,तू हो किंवा नाही मध्ये उत्तर दे..जर तुझं उत्तर हो मध्ये असेल तर मी काही मुलगी शोधत बसणार नाही"


उमेश:"आई,काय हे "


आई:"उमेश,हो किंवा नाही"


उमेश जरा गांगरून गेला...


उमेश:"बरं आई मी तुला वेळ आल्यावर खरं काय ते सांगेन"


आई:"वेळ आल्यावर म्हणजे??"

उमेश:"आई प्लिज ,आता तू पाठी नको लागूस ..मी खरंच काय ते सांगेन ..मी कोणतीही गोष्ट तुझ्यापासून आणि बाबांपासून लपवली आहे का??मग ही महत्त्वाची गोष्ट का लपवेल??.प्लिज मला वेळ दे खरंच आई मी तुला आणि बाबांना सांगेन.....


आई:"ह्याचा अर्थ तुला कोणीतरी आवडतंय??


उमेश :"आई ,आता मला खूप उशीर होत आहे.म्हणत त्याने खांद्यावर बेग घेतली .पळतच निघाला.."


उमेशच्या ह्या कोड्यात दिलेल्या उत्तराने आई स्वतःच कोड्यात पडली..पण तिला कळून चुकले की उमेश काही तरी लपवतो आहे...सहसा आजपर्यंत त्याने कोणतीही गोष्ट लपवली न्हवती... आई म्हणून तिला काळजी वाटू लागली...


दिवसभर ती विचाराच होती.....…


इथे उमेश कॉलेजच्या कँटीन मध्ये प्रियाची वाट पाहत बसला होता..


अर्धा तास झाला तरी प्रिया आली न्हवती..…

उमेशने प्रियाला फोन लावला....


प्रियाने फोन cut केला...


पुन्हा फोन लावला.तोच त्याच्या खांद्यावर कोणतरी हात ठेवला.. पाहतो तर प्रियाच होती..


प्रियाला पाहून त्याचे डोळे चमकले....
प्रियाही समाधानी चेहऱ्याने त्याला पाहत होती..…


प्रियाचा कंठ दाटून आला.....

उमेशही तिला एकटक पाहू लागला....


उमेश:"बस ना प्रिया"


प्रिया:"तू पण बस उमेश\"

प्रियाला आज समोर पाहून उमेशचा आनंद गगनात मावेनासा झाला...


प्रियाही त्याला पाहून खुश झाली हे तिच्या डोळयांत स्पष्ट जाणवत होते....


उमेश:"कशी आहेस प्रिया???


प्रिया:"मी बरी आहे ..तू कसा आहेस उमेश?

उमेश:"मी पण मस्त प्रिया"

प्रिया:"खूप छान वाटलं तुला भेटून उमेश..किती वर्षांनंतर भेटतो आहोत आपण"

उमेशच्याच मनातलं प्रिया बोलत होती....

उमेश:"हो प्रिया ,किती वर्षे लोटले... रोज भेटणारे आपण किती वर्षांनंतर भेटतो आहोत.....

प्रिया:"बाकी ,काय चालू आहे तुझं??


उमेश:"Mba करतोय.. झालं आता पुढच्या महिन्यात परीक्षा आहे ..मग चांगला जॉब शोधायचा...


प्रिया:"मस्तच उमेश...छान प्रगती केलीस ..खूप बरं वाटलं ऐकून..हो आणि तुझं नाव आपल्या कॉलेजच्या टॉप लिस्टमध्ये पाहिलं.तू पाहिला आलास ...अभिनंदन..

उमेश:"थँक्स प्रिया"..


उमेशला आता तिच्या आयुष्यात काय चालू आहे जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती..त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते..

उमेश काही बोलणार तोच प्रिया बोलू लागली..

प्रिया:"तुला हेच विचरायचे असेल ना "मी इतक्या लवकर लग्न का केले??मी अशी एकाएकी गायब का झाले..?सध्या माझे काय चालू आहे??..बरोबर ना उमेश??


उमेश:"हो प्रिया,खरंच जाणून घ्यायचे आहे..असे अर्धवट शिक्षण सोडून लग्न का केलेस...?त्यानंतर तू कॉन्टॅक्ट सुद्धा तोडला..प्रिया जेव्हा तुझ्या लग्नाची पत्रिका पाहिली खरंच कोसळून गेलो मी..इतकी हुशार तू अशी करूच कशी शकते??खरंच प्रिया लवकर सांग का केलेस लग्न?


प्रिया:"उमेश,तू माझा खास मित्र होतास..तुझ्यापासून कोणती कधी गोष्ट लपवलीच नाही...पण बघ ना माझ्या आयुष्यात इतका मोठा बदल झाला मी लग्न केले आणि तुला सांगू शकले नाही ह्याचे खरंच वाईट वाटते...

प्रिया पुढे बोलू लागली..

माझ्या आत्याचे आणि वडिलांचे कधी पटलेच नाही.माझे आजोबा गावी राहायचे.. त्यांची तब्येत बिघडली..आम्ही त्यांना पाहायला गेलो..आजोबा शेवटच्या घटका मोजत होते...आत्या आणि तिचे कुटुंबही आले होते..आजोबाला खंत होती की माझे बाबा आणि आत्या ह्यांचे संबंध काही केल्या सुधरलेच नाही..आत्याचा आणि माझ्या बाबांचा,आजोबावर खूप जीव होता.दोघे बहीण भाऊ बोलत नसले तरी आत्या आजोबाला भेटायला यायची..अशीच एक दिवस आत्या भेटायला आली..आजोबांना काय झालं काय माहीत..त्यांनी आत्या आणि माझ्या बाबांचा हात पकडला आणि वचन मागितले "प्रिया आणि संतोष म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा ह्यांच लग्न झालं पाहिजे .शेवटची इच्छा म्हणत ते रडु लागले...लगेच आत्या आणि बाबांनी वचन दिले...


उमेश,माझ्यासाठी मोठा धक्का होता तो..मी बाबांना खूप विनवणी केली की मला लग्न करायचे नाही पण आजोबांच्या वचनाखातर बाबांनी अजिबात ऐकले नाही...बाबांना अगदी भीती वाटत होती की मी पळून जाईल वैगेरे म्हणून त्यांनी माझ्यावर कडक पहारा ठेवला..माझा फोनही काढून टाकला... कधी वाटलं नव्हतं की बाबा असे वागतील..मी बाबांना माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करते म्हणाले पण ते तयार झाले नाही.. म्हणाले:"वडिलांची शेवटची इच्छा म्हणजे तुझं लग्न..तुझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत ते जिवंत राहतील की नाही ह्याची शाश्वती नाही.तुला हे लग्न करावेच लागणार"


मी आईलाही सांगितले.. आईने बाबांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला..पण बाबा स्वतःच्या निर्णयावर ठाम होते.. मी विरोध करणार तरी कसा .आपल्याच माणसाच्या विरोधात जाणं इतकं सोप्प नसतं.. माझ्यावर प्रेम करणारे बाबा मला माझे शत्रू वाटू लागले..मला फार चीड येऊ लागली..उमेश ,तुला विश्वास बसणार नाही एकदा मी स्वतःचा जीव सुद्धा देण्याचा प्रयत्न केला पण नशीब खराब की मी वाचले..त्याक्षणी खूप लाचार झाले मी.मी काहीच करू शकत न्हवते..बंदिस्त झाले...


थोड्या दिवसाने आजोबाची तब्येत अजून खालावली ..तेव्हा बाबांनी लवकरात लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला..मोजक्या पत्रिका छापून मोजकी माणसं लग्नाला बोलावून माझं लग्न लावण्यात आलं.

हे सर्व इतक्या घाई गडबडीत झालं की मला विश्वासच बसत न्हवता.माझं लग्न झालं आणि महिन्याने आजोबा गेले....नंतर आई बाबा सर्वच गावच्या घरी शिफ्ट झाले..

शिक्षणाची स्वप्न पाहिलेली मी आता दिवसभर शेतात राबू लागले.सकाळी उठून घरातली सर्व कामं उरकून शेतात जायचे.आत्याचे एकत्र कुटुंब.तिच्या चार जावा,दीर,त्यांची मूलं.. आत्याच्या दोन नंदा ह्यासुद्धा त्यांच्या परिवरासोबत यायच्या.. सर्वांचं करण्यात पाठ मोडून जायची.प्रायव्हसी हा प्रकारच न्हवता.फक्त राबावं लागत असे. संतोष माझा नवरा जास्त बोलायचा नाही..सुरवातीला खरं तर राग यायचा त्याचा पण नंतर त्याचा स्वभाव कळला..त्याच्या सहवासाची सवय झाली..त्याला ओळखू लागले..त्यानेही घरच्या गरीब परिस्थितमुळे स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडले होते.जेमतेम मेट्रिक केली होती...

संतोष आणि माझं नातं खुलत गेले..आपलं हक्काचं तोच तर होता घरात..लग्नाला दोन वर्षे झाले आणि मी आई बनत नाही म्हणून सगळेच सूनवु लागले..त्याकाळात संतोष माझ्या पाठीशी उभा राहिला.माझी आत्या स्वतःच बोलू लागली सोडचिठी दे पण संतोष त्याच्या मतावर ठाम होता..त्याचा आधार ,त्याची सोबत असणं सुखावून जात होतं.. रोज पुन्हा नव्याने प्रेमात पडत होते..एक दिवस आई होण्याची चाहूल लागली..

तो दिवस आजही आठवतो..संतोष आणि मी खूप खुश झालो...आई बाबा होणार म्हणून सुखावलो...


बघता बघता तो दिवस आलाही...मी आई झाले..वंशाला दिवा भेटला म्हणून आत्या अजूनच खुश झाली...साऱ्या गावात पेढे वाटले..

मी आणि संतोष दोघेही आनंदीत होतो..परिवार पूर्ण झाला होता...आईपण अनुभवत होते..पण नियतीच्या मनात वेगळंच होतं काहीतरी.. एक दिवस संतोष आलाच नाही..शोधाशोध सुरू केली..सर्व गाव पालथं घातलं..नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह मिळाला..त्याला विषारी सापाने चावले होते..एका क्षणात माझं कुटुंब उद्धवस्त झाले उमेश..ज्याच्या सोबत सात जन्म निभवायचे वचन घेतले तो असा सोडून जाईल कधी वाटले न्हवते...

प्रिया रडु लागली...उमेशही तिला पाहून रडु लागला.उमेश निशब्द झाला..प्रियाला कसं सावरावं हे त्याला सुचेना...

उमेश:"प्लिज प्रिया रडु नको"

प्रिया:"उमेश,बघ ना काय होऊन बसले...नवरा गेला आणि त्यानंतर मी सासरच्याना ओझं वाटू लागले..मला विचित्र वागणूक देऊ लागले..तरी मी माझ्या दोन महिन्याच्या पोराला पाठीशी बांधून शेतात जाऊ लागले..मला कोणावरही ओझं बनायचे न्हवते.. आई बाबा खूप वेळा म्हणाले "चल आमच्या सोबतीला" पण मला त्यांच्यावरही ओझं व्हायचे न्हवते..नवरा गेल्यावर एक मुलाचाच आधार होता..त्याच्यासाठी जगत होते पण उमेश माझं नशीब इतकं वाईट निघेल वाटलं न्हवतं तापाचे निमित्त झाले आणि तोही मला सोडून गेला...सर्वच संपलं उमेश सर्वच संपलं.. जगण्याची आशाही मेली..कोणासाठी जगायचे होते मी??


उमेश मी डिप्रेशन मध्ये गेली...आई बाबांनी मला माहेरी आणले..त्यांचाही चाही जीव तुटत होता..बाबा माफी मागत राहायचे सतत "माझ्या हट्टामुळे भोग भोगते आहे..मीच माती केली तुझ्या आयुष्याची".पण आता बोलून रडून माझं आयुष्य बदलणार तर नक्कीच न्हवते..अवघ्या वयाच्या 21 व्या वर्षी सर्व भोगत होते...फक्त नावाला जिवंत होते मी उमेश .नावासाठी श्वास चालु होते..
आधीच इतकं सर्व झाले आणि एक दिवस असं म्हणत प्रिया जोरजोरात रडु लागली.....

उमेश कानात तेल ओतून ऐकत होता..

क्रमशः

तुमच्या प्रतिक्रिया नेहमी लिखाणासाठी प्रेरणा देतात. आजचा भाग आवडला असेल तर नक्की कंमेंट करा.मला फॉलो करायला विसरू नका...धन्यवाद..
©®अश्विनी ओगले...



🎭 Series Post

View all