प्रेमरोग भाग 9

कथा एका अव्यक्त प्रेमाची.

।। प्रेमरोग (भाग 9 समीर खान ) ।।

" ते काहीही असो. मी सोबत आहे सबा. I love you saba. I love you." पुढे त्यालाही काही बोलवलं गेलं नाहीच. कितीतरीवेळ दोघंही तसेच बसून राहीले. भावनावेग ओसरताच, काहीतरी ठरवत दोघंही तिथून बाहेर पडले.

सबाच्या भावविश्वात खूप मोठी उलथापालथ झाली होती. अब्बुंनंतर हा दुसरा असा पुरूष होता जो हक्काने सर्व कर्तव्य पार पाडत होता. तिला जपत होता.

" आज मै, तुम्हारी अम्मी, चाचाजान सब तुम्हारे साथ है बेटा. कल हम नही रहेंगे. कुरआन कहता है, हर जानदार चीज को मौत का मजा चखना है. जानती हो ना तुम. हमारे जाने के बाद तुम्हारा कोई अपना, तुम्हारा हमसफर भी तो होना चाहिए ना?अगर......" क्षणभरासाठी अब्बुंचे हे बोल सबाला आठवले आणि तिच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या.

समीर हे सर्व तिच्यासाठी करत होता ते ही तेंव्हा, जेव्हा त्याला माहित होतं की सबाच्या मनमंदिरात कुणी दुसराच विराजमान आहे. तरीही त्याला तिच्याकडून कुठलीच अपेक्षा नव्हतीच. अगदी तिच्या प्रेमाचीही नाही. यालाच तर प्रेम म्हणतात ना? निरपेक्ष प्रेम? कुठलीही अपेक्षा न करता एखाद्यावर जिवापाड प्रेम करणं.

प्यार करने का मतलब सिर्फ पाना ही तो नही होता ना?
सबकुछ खो कर भी बदले मे प्यार मिले ना मिले, प्यार करते रहना ये भी तो प्यार ही है ना? ये प्यार ईश्क मे बदल जाता है और ईश्क अगर मोहब्बत मे तब्दील हो जाए तो वो इबादत बन जाती है. ईश्क इबादत बनने के बाद जिंदगी का सिर्फ एक ही मक्सद रह जाता है. किसी पे कुर्बान हो जाना.

शमा की लौ पे मर मिटता है परवाना,
क्या करें बेचारा, वो तो है ही दिवाना.


बालपणापासून सोबत असलेला सागर कुमारवयापर्यंत सोबत होता. दहावीच्या वर्षी तो सोडून गेला. कुठलाही बंध न बांधता. आपणच एकतर्फी बंध इतका घट्ट जोडून ठेवलाय की ती फरफट अजून सुरूच आहे. इकडे समीरने तर त्याच्या प्रेमाची कबुली दिली. काय करावं काय नाही?या विवंचनेत सबा असतानाच समीरचाच पलीकडून काॅल आला. हो म्हणून सांगावं का याला? माझ्याबाबतीत अब्बु गेले म्हणून फक्त एक सहानुभूतीपूर्वक तो हे करत असेल किंवा माझ्या सौंदर्यावर हा मोहित झालेला आहे. जर यदाकदाचित याचा माझ्याशी लग्न झाल्यावर माझ्यातला ईंटरेस्ट संपला तर? नानाविध शंकांनी तिला घेरलं होतं.

" हॅलो सबा..सबा. सुन रही हो ना?" तो पलीकडून बोलत होता पण ही जागेवरच थिजली होती. तिचा काहीच प्रतिसाद न आल्याने काळजीने तो तिला भेटण्यासाठी लगबगीने निघाला.

तिथून पुढे त्या क्षणापासून तो फक्त आणि फक्त तिच्यासाठी काय काय करत गेला याची गणतीच नव्हती. तिचा पहिला जाॅब, मिळत जाणारी बढती, अहमदनगर वरून तिचं मुंबई ला शिफ्ट होणं, तिथेच 2 bhk चा फ्लॅट घेणं, सबाच्या चाचाजान ला समजावून इथल्या तिच्या प्राॅपर्टीमधला हिस्सा तिला मिळवून देणं. इतकच काय तर अगदी सबाची अम्मी करोनामध्ये गेल्यानंतर सैरभैर झालेल्या सबाला समीरनेच समेटले होते. तिच्या आयुष्याच्या कणं न कणात आता तो सामावला होता. सर्वात आधी ओठांवर आता त्याचेच नाव यायचे.

इतकं सगळं असूनही सबा बाबतीत त्याने एका शब्दानेही स्वतःच्या घरी काहीच सांगितलं नव्हतं. तो तिच्या करीयरसाठी थांबलाय आणि लवकरच ते लग्न करतील हेच सांगितलेलं होतं. सुशिक्षित परिवार असल्याने सुरूवातीचा विरोध मावळताच पुढे यांना काही अडचण आलीच नाही. समीरच्या घरी सबाला सुनेचाच मान होता. कुठलीही रसम झाली नसली तरीही. सबा त्याच्या घरून जाऊन आल्यावर मनाला खूप खायची. अपराधी वाटायचं तिला. या साध्या सरळ लोकांच्या प्रेमाचा आपण गैरफायदा घेतोय असं तिला वाटत रहायचं. तो ही कुठे ना कुठे आतून मनाला खायचा पण तिच्यासमोर तो काहीच भासवायचा नाही. म्हणतात ना प्रेम आंधळं असतं. समीरचं सबावरचं प्रेम आंधळ्यासोबतच बहिरं आणि मुकंही होतं. इतर अनेक उत्तमोत्तम स्थळ त्याने आजपर्यंत नाकारले होते. सबाला याची पुर्ण कल्पना होती. आरतीही आता समीरसोबत चांगलीच रूळली होती. वीक एंड वर सबा, आरती, समीर भेटायचे. समीरची मुंबई वारी तर कधी सबाची अहमदनगर वारी ठरलेली. आरतीही सबासोबत एकदोनदा अहमदनगरला समीरच्या घरी येऊन गेली होती. आरतीने बर्‍याच वेळा सबाला समजावलं होतं. पुरूषांना खूप पर्याय असतात सबा. इतका उशीर योग्य नव्हे. सबाच्या मनःपटलावर आता समीर हावी असला तरी कुठेतरी सागर मनात डोकावून जायचाच.

अशातच अचानक जे व्हायचं नाही ते झालं. अवचितपणे सागर आरतीला एका समारंभात भेटला. आरती बावरली. गोंधळली. तो सबाचंच विचारत होता. त्याचे वडील वारले होते. त्यांच्याच पसंतीने त्यांनी सागरचं लग्न लावून दिलं होतं. जे फार काळ टिकलं नाही. कोर्टात केस चालू होती त्याची घटस्फोटाची . निकाल लांबलेला होता तर बरेच पैसे द्यावे लागणार होते. आरती खूप विचारात पडली. सबाबाबतीत तिला खूप चिंता दाटून आली. सागर मुळे सबाने खूप काही भोगलं होतं. एकोणीस वर्ष.. तब्बल एकोणीस वर्ष ती एक एक क्षणाला मरत होती हे आरतीने स्वतः पाहिलं होतं.
दहावीत असताना ती सोळा वर्षांची होती. आज ती पस्तिशीत होती. मागच्या गेल्या सहा वर्षांपासून समीर सावलीप्रमाणे सबाच्या सोबत होता. अजूनही तिच्या होकाराची वाट पाहण्यासाठी डोळयात प्राण आणून बसला होता. तिच्या आयुष्यातली कित्येक वादळं त्याने स्वतःवर झेलली होती. असं असताना आज हा सागर अवचित उगवतोय आणि तिचं विचारतोय याचा आरतीला खूप राग आला. ते ही तेव्हा जेव्हा त्याच्या आयुष्याचं मातेरं झालंय.

"का हिंमत दाखवली नाही तुझे बाबा असताना? लग्न करताना लाज वाटली नाही? ती स्री असून लढत राहीली शेवटपर्यंत. एकटीच. तुझ्यात तर इतकीही हिंमत नव्हती सागर की तु तुझ्या प्रेमाची कबुली तिला द्यावी. पळपुटा आहे तु.
आज कोणत्या हक्काने तु तिच्या आयुष्यात परतायला पाहतोय?कुठं होता तु जेंव्हा तिचा बाप वारला होता? तेंव्हा कुठं होता तिची अम्मी वारली होती? तिचे नातेवाईक तिला टोचायला टपले होते? नाही नाही ते लांछनास्पद आरोप तिच्यावर होत असताना का तिचा बचाव करायला तु आला नाहीस?"

आरतीने रडतच आपलं मन मोकळं केलं. तो ही निमूटपणे सर्व ऐकून घेत होता. आरतीने पुढच्याच क्षणी समीरला काॅल केला. तिघं भेटले. तासभर तरी त्यांचा संवाद झाला.सबाला या प्रकाराची काहीच कल्पना नव्हतीच. निघतांना त्यांनी काहीतरी ठरवलं. तिघांच्याही डोळ्यात अश्रू होते. त्यांच्यात जे ठरलं त्याचाच एक भाग म्हणून सबाला आरती त्या काॅमन फ्रेंडच्या लग्नात घेऊन आली होती. सागर कदाचित तिथे येऊ शकतो याची पुसटशी कल्पना तिने सबाला दिली होती. केवळ याचमुळे ती आरतीसोबत या लग्नाला आली होती. तिचं पुर्ण आयुष्य ज्या एका प्रश्नावर येऊन थांबलं होतं तो प्रश्न आज निकाली निघणार होता. सबा कुणाची सागर की डाॅ. समीर हे येणारा काळच ठरवणार होता.

क्रमशः
©® समीर खान. (आपला बहुमूल्य अभिप्राय नक्की द्या कारण पुढच्या फेरीत प्रवेश मिळण्यासाठी हा अभिप्राय खूप महत्वाचा आहे ?)

🎭 Series Post

View all