Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

प्रेमरोग भाग 8

Read Later
प्रेमरोग भाग 8

।। प्रेमरोग (भाग 8 समीर खान ) ।।


हाॅस्पिटलच्या या दोन दिवसांमध्येच सबाला दुनियेचे खरे रंग कळून चुकले. आतापर्यंत कधीच न घडलेल्या घटना तिच्यासोबत घडल्या होत्या. तिच्याबाबतीत प्रत्येकाचंच वागणं खूप बदललं होतं. या सर्व घटनांना सर्वजण तिला दोषी ठरवून मोकळे झाले होते. सर्वत्र गडद अंधार दाटलेला असताना एक आशेची किरण सबाला दिसली. डाॅ. समीर. होय तोच डाॅ. समीर जो चारच दिवसांपूर्वीच तिला पाहून लग्नाची मागणी घालून गेला होता. तरीही सबाने आपला निर्णय असा अधांतरी ठेवला होता. त्याला काॅल करावा की नाही या दुविधेत असतानाच तो स्वतःच तिच्यासमोर दत्त म्हणून हजर झाला. बावरलेल्या सबाच्या खांद्यावर हात ठेवत Don\"t worry saba..everything will be Allright. म्हणत तो आत मुख्य डाॅक्टरांना भेटण्यासाठी निघूनही गेला. तिथून पुढची सर्व सुत्र आपल्या हातात घेत तो परिस्थिती उत्तमरित्या हाताळू लागला. सबाशी त्याचं त्रोटकच बोलणं व्हायचं. कामापुरतं बोलून पुढच्याच क्षणी तो तिथून निसटूनही जायचा. सबाला त्याच्यासोबत बोलण्याची संधीच मिळत नव्हती. अढळपदावर असणाऱ्या सबाच्या मनातल्या सागरच्या प्रतिमेला समीर सुरूंग लावण्यात यशस्वी ठरला होता. पुढच्या काही दिवसांमध्ये अब्बुंची तब्येत सुधारली. सर्व नातेवाईक उपस्थित होतेच. सर्वांसमक्ष माझ्या तब्येतीसाठी कुणीही तिला जबाबदार ठरवू नका आणि तिच्या आयुष्यात तिचा निर्णय हाच माझा निर्णय असेल यापुढे एक शब्दही कुणी बोलणार नाही हा खुलासा अब्बुंनी केला. समीर तिथे उपस्थित होताच. बाकीचे लोकंही अब्बुंपुढे काही बोलू शकले नाही. सबावर आलेल्या या आळचा मळभ आता तिच्या मनावरून दूर झालं होतं. यामध्ये सर्वात मोठा वाटा समीरचा होता. मनोमन सबा समीरचे आभार मानत होती. अल्लाहने समीरच्या रूपात फरीश्ताच पाठवला होता. सर्व सुरळीत होतंय याची शाश्वती होत असतानाच अब्बुंची तब्येत ढासळत गेली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.
त्यांना खाक ए सुपूर्द करण्यापासून ते प्रत्येक कामात समीर सहभागी होता. अब्बुंचे पुढचे विधीही निर्विघ्न पणे त्याने पार पाडले. स्वतः त्याचे कुटुंबीय ही यात सहभागी होते.थोडक्यात तो सबाची ढाल झाला होता. अब्बुंना जाऊन दिड महिना तरी उलटला असावा. सबाशी काही बोलणं मात्र त्याने अजूनही टाळलं होतं. अखेर सबाच्या धीराचा बांध तुटलाच आणि तिने त्याला काॅल लावला. एका कॅफेमध्ये दोघांची भेट ठरली.

प्रशस्त अशा कॅफेत सबा आधीच हजर होती. समीर सबा बसली त्या टेबलावर येऊन बसला. त्याला पाहताच मेणबत्तीने आगीत वितळावं तशी सबा वितळून गेली. तिचे डोळे वाहतानाच तिने त्याला हात जोडले. अजून एका शब्दाचाही संवाद न होता दोघं एकमेकांशी खूप काही बोलून गेले होते. तिचे जोडलेले हात याने हातात घेतले. पहिल्यांदाच त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने ती शहारली. किती आश्वासक स्पर्श होता तो. काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत असेल या आशयाचा तो स्पर्श. काश...काश सागरने ही हिंमत दाखवली असती. कोणत्याही परिस्थितीत साथ देण्याची. सागरच्या प्रतिमेला आणखी एक हादरा बसला होता. ती काही बोलणार या आधीच त्याने तिला थांबवले.

" लग्नाचा विषय सध्यातरी नकोच. Take your time. वर्ष, दोन वर्ष, पाच वर्ष तु म्हणशील तितकी वर्ष. तुला जेव्हाही काही अडचण असेल मी सोबत असेनच पण हा विषय पुन्हा कधीच माझ्यासमोर काढायचा नाही की मी लगेच होकार का दिला नाही. "

" समीर ऐकून तरी घेणार आहेस का? "

" हेच ना की तुझं कुण्या दुसर्‍यावर प्रेम आहे ? तु भेटली तेव्हाच पहिल्याच नजरेत माझं तुझ्यावर प्रेम जडलं मात्र तुझे डोळे तेव्हाच खूप काही बोलून गेले सबा. मात्र या गोष्टीने माझं तुझ्यावर जडलेलं प्रेम तसूभरही कमी होणार नाही." समीरचे बोल ऐकून सबा क्षणभर स्तब्ध झाली.

" मी एकतर्फीच प्रेम केलंय समीर. माझ्या प्रेमाची कबुली कधीच त्याला दिली नाही. त्याच अग्नित मी होरपळून निघलेय. अब्बुंना गमावलं मी. तुला फसवायचं नव्हतं रे मला. लग्नानंतर मी तुला तुझा अधिकार देऊ शकले नसते समीर आणि मी हा अन्याय तुझ्यावर का करावा?" आता मात्र सबाला शब्दच फुटत नव्हते.

" ते काहीही असो. मी सोबत आहे सबा. I love you saba. I love you." पुढे त्यालाही काही बोलवलं गेलं नाहीच. कितीतरीवेळ दोघंही तसेच बसून राहीले. भावनावेग ओसरताच. काहीतरी ठरवत दोघंही तिथून बाहेर पडले.


क्रमशः


©® समीर खान. (आपला बहुमूल्य अभिप्राय नक्की द्या कारण पुढच्या फेरीत प्रवेश मिळण्यासाठी हा अभिप्राय खूप महत्वाचा आहे ?)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sameer Khan

Writer

मी समीर खान या टोपणनावाने लिहितो, लिहितो म्हणण्यापेक्षा व्यक्त होतो हे म्हणणे अधिक सोयिस्कर होईल.लिहिणे हा माझा छंद आहे आणि माझं लेखन वाचकांना आवडतं ही माझ्या साठी खूप मोठी गोष्ट आहे.

//