प्रेमरोग भाग 7

कथा एका अव्यक्त प्रेमाची.
।। प्रेमरोग (भाग 7. समीर खान)


अम्मीचे हे शेवटचे दोन निर्वाणीचे वाक्य सबाच्या मनात खोलवर जखम करून गेले. आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याशिवाय आता पर्याय उरला नव्हताच. उद्या तिला मुलगा पहायला येणार होता. समीर. डाॅ. समीर. सागर चं नाव पुसून हे नाव मनमंदिरात वसवणं इतकं सोप्प होतं का? याची उत्तर येणारा काळच देणार होता.

पहाटेच्या अजानच्या स्वराने सबाची झोप चाळवली. अशीही ती नमाजची पाबंद होतीच. आताही शुचिर्भूत होत वजू करून तिने जानमाज अंथरली. दोन्ही हात उचलत डोळे बंद करत दुवासाठी ती बसली. अल्लाहची करूणा ती भाकू लागली. "मेरे वालीदैन की, उनके इज्जत ओ आबरू की हिफाजत फरमा मेरे मौला." टपटप करत दोन टपोरे अश्रू तिच्या पुढ्यात येउन पडले. आताही तिने स्वतःसाठी काहीच मागितलं नव्हतं. मागणारही नव्हतीच.

खानदान की इज्जत...या भारंभार शब्दाच्या ओझ्याखाली ती दबली गेली होती. असंही अम्मी आणखी काय करू शकणार होती तिच्यासाठी? फार फार तर गायत्री वहिनींकडे त्यांच्या लाडक्या सागरसाठी सबा तुमची सुन म्हणून स्विकारा हे ही केलं असतं तिने . प्रसंगी अब्बुंचा रोषही सहन केला असता अम्मीने. तितकी खंबीर नक्कीच होती ती पण तिकडे वहीनी?त्यांची सागरच्या बाबांसमोर ब्र शब्द उच्चारण्याचीही बिशाद नव्हती. फार फार तर एकांतात अम्मीजवळ वहिनींने हे स्थळ आनंदाने स्विकारलं असतं पण सागरचे बाबा? ते जिवंत असेपर्यंत तरी ही गोष्ट स्वप्नातही विचार करणं शक्य नव्हतं. या गोष्टींची तिला पुरेपूर कल्पना होतीच. कोवळी सकाळ सरून ऊन्हं डोक्यावर आली तशी यांच्या घरातली लगबग वाढली. चाचाजान त्यांच्या पुर्ण कुटुंबासह सकाळपासून हजर होते. सबाची मोठी बहीण आणि तिचा नवराही मुलांसहीत उपस्थित होते. हे स्थळ याच बैठकीत जमेल याची सर्वांनाच पुरेपूर खात्री होती आणि त्याच अनुषंगाने ही तयारी सुरू होती. बावर्चीखान्यात दावत साठी सकाळपासूनच घरातल्या बायका राबत होत्या. अम्मी, आपा, चाचीजान, तिच्या चुलत बहिणी.

वेळेवर डाॅ. समीर आणि त्याचे कुटुंबीय हजर झाले. सलाम-आदाब करत त्यांचं जंगी स्वागत सत्कार करण्यात आला. हाॅलमध्ये सर्व पुरूषमंडळी तर मोत्यांच्या पडद्याआड सर्व बायका स्थानापन्न झाल्या. दावत झाली. सर्वांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. मुलाकडच्या बायकांनी आधीच सबाला आत जाऊन पाहिलं. नक्षत्रासारखी सबा पाहताच सर्वांच्या मनात भरली. नंतरचा कार्यक्रम ही व्यवस्थित पार पडला. समीर तर तिला पाहताच पाहतच राहिला. एकमेकांशी बोलायला दोघांना वेगळं बोलण्याची परवानगी दिली गेली. पुढच्या पाचच मिनिटात दोघं बाहेर आले. समीरचा चेहरा पडलेला होता. त्याने सर्वांसमोर जास्त काही विषय केला नाही मात्र पुर्ण घरात कुजबूज वाढलीच. नोकरीच्या काॅल लेटर चं सांगत मोठ्या खुबीने सबाने खानदान ची इज्जत ला बट्टा न लावता स्वतःच खरं केलं होतं. समीरमध्ये काहीतरी वेगळी गोष्ट तिला नक्कीच जाणवली. या पाच मिनीटाच्या भेटीतही तो तिच्यावर आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी झाला होता.

" इस रिश्ते के लिए हमारा कुछ भी ऐतराज नही पर सबा अगर नया जाॅब अभी जाॅइन करती है तो उसे दुसरे शहर मे जाना होगा. शादी के बाद दोनो अलग रहे ये ठिक बात नही. चाहे तो कुछ साल बाद वो नोकरी कर सकती है. "

या गोष्टीवर येउन ही बाब अडकली. जमणारं स्थळ सबाच्या अशा आगाउपणामुळे जमलं नाही, हेच करायचं होतं तर आम्हाला बोलावलंच कशाला असा कांगावा करत चाचाजान आणि भाईजान निघून गेले. सबाने काहीही गैरप्रकार केला नसला तरी ही बाब जरा खटकणारीच होती. भाऊ आणि मोठ्या जावयाचे बोल अब्बुंच्या जिव्हारी लागले. पुढच्याच चारच दिवसात त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि सायरन वाजवत येणारी रूग्णवाहिका अब्बुंना घेऊन गेली. इकडे या दोघींवर आभाळ कोसळले. सबा तर जागेवर थिजून गेली. या सर्वाला तिलाच दोषी ठरवण्यात आले. दोन दिवस विना अन्नपाण्याची ती अब्बुंजवळून हललीच नाही. सतत अल्लाहला प्रार्थना करत, कुरआनच्या आयत वाचत ती तिथेच बसून राहीली. अम्मीने तिच्या डोक्यावर हात फिरवला. त्या ही परिस्थितीत तिला अम्मीच्या या एका कृतीचा खूप आधार वाटला. हाॅस्पिटलमध्ये झाडून सगळेच नातेवाईक हजर होते. चाचाजान तर सबाचं तोंडही पाहण्यास तयार नव्हते. आपल्या मोठ्या भावाला मृत्यूच्या खाईत लोटणारी ही करंटी कारटी जन्माला आली तेव्हाच मेली असती तर बरं झालं असतं. त्वेषात ते बोलले तर खरं पण आजपर्यंत आपल्या लाडक्या चाचूंशी असणारं सबाचं सख्ख्या मुलीप्रमाणे असणारं नातं आठवून ते ही गहिवरून गेले होते.

क्रमशः

©® समीर खान. (आपला बहुमूल्य अभिप्राय नक्की द्या कारण पुढच्या फेरीत प्रवेश मिळण्यासाठी हा अभिप्राय खूप महत्वाचा आहे ?)

🎭 Series Post

View all