प्रेमरोग भाग 5

कथा एका अव्यक्त प्रेमाची.


।। प्रेमरोग (भाग 5 समीर खान ) ।।


देशमुख कुटुंबियांचं बिऱ्हाड ज्या ट्रकमध्ये गेलं होतं त्या रस्त्यावर जाताना मातीचा कितीतरी मोठा धुरळा उडाला होता. त्यापेक्षाही मोठा धुरळा अम्मीच्या मनात उठला होता. पाणावलेल्या डोळ्यांनी त्या गेलेल्या ट्रकच्या रोखाने पहात ती कितीतरीवेळ तिथेच उभी राहीली. परतीच्या वाटेवर सागरच्या घराला असणारं भलंमोठं कुलूप पाहून तिला स्वतःच्या पोरीची काळजी आणखीनच दाटून आली.

सबा घरी परतली. सागरला कधी भेटावे असे तिला झाले होते. मागील घटनांमुळे आलेला कडवटपणा या सुट्टीने भरून काढला होता. अम्मी काही बोलण्यापूर्वीच ती सागरच्या घराकडे पळाली .

"अम्मी, सागर के घर को तो कुलुप है? कहाँ गये है वो? कब आने वाले है? बताओ ना अम्मी... बोलो ना? "

"मुंबई गये है बेटी वो सब.. "

"कब आनेवाले है? दिवाली मे आई ने मेरे लिए मिठाई तो जरूर बचाकर रखी होगी. सागरने पटाखे बजाये क्या? तुमने ऊसे शिरखुरमा तो खिलाया ना अम्मी? बहोत पसंद है उसे. " सबाची प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती.

"मामूजान के यहाँ क्या क्या मजे किये हमारी बेटी ने? "

अम्मी विषय बदलण्याचा प्रयत्न करत होती. मात्र सबा ऐकण्याच्या मनःस्थितीतच नव्हती.
अम्मीने तीला प्रेमाने जवळ घेत हळूवारपणे सांगितले,

"अब वो फिर कभी नही आयेंगे सबा, ये शहर छोडकर चले गये है वो लोग. "

" क्या ऽऽऽ ?" सबाने जोरात टाहो फोडला.

"मुझसे मिले बगैर?? कैसे जा सकता है अम्मी वो? "भरून आलेला पाऊस मनसोक्त बरसावा तशी कितीतरी वेळ ती रडत होती. रडत रडतच ती झोपी गेली. अब्बू आल्यावर त्यांनाही तिची हालत बघवेना.

"कुछ पता लगा बेगम ?कहाँ गए है वो? भाऊ की जिद की वजह से सागर और वहिनीने बहुत कुछ भुगता. बेचारी
वहीनी. गाय थी गाय"

"नही जी, बंबई गए है ईतना ही पता चला. सबा बहोत रो रही थी "

"भई बच्चे है, साथ खेलकुद लेते थे.. अब कोई एक चला जाए तो गम तो होगा ही ना.. वक्त बहोत बडा मरहम होता है बेगम, गहरे से गहरे जख्म अपने आप भर देता है. " खरचं या समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन खरच योग्य होता अब्बुंचा.

त्या दिवसानंतर सबा चुप चुप राहू लागली. खेळणे तर कधीच बंद झाले. अभ्यास मात्र आणखी जास्त करू लागली होती ती.पुस्तकं तिचे मित्र झाले होते. कुणी खास अशी तीची मैत्री कुणासोबत झालीच नाही.आठवणींशी कितीही पिच्छा सोडवायचा प्रयत्न केला तरी त्या अजून अजून घट्ट चिपकून बसतात. त्यातही त्या अश्या अडनिड वयातल्या आठवणी असल्या तर आणखीनच जास्त. सबाची दहावी त्याचवर्षी झाली जेव्हा सागर शहर सोडून गेला. पेपर देण्यासाठी सागर शहरात आला होता मात्र दुर्दैव असे की दोघांची परिक्षाकेंद्र वेगवेगळी होती. दोघांची भेट झालीच नाही. ह्या गोष्टीची खबरही सबाला खूप उशीरा समजली. ते ही तेंव्हा जेंव्हा सागरने लिहिलेलं पत्र आरतीकडून सबाला मिळालं.

सबा,

काय लिहू? काय बोलू? काय बोलू शकतो मी तुला? जाताना तु तशीच निघून गेलीस न भेटताच आणि मी जाताना तु इथे नव्हतीच. आताही ही चिठ्ठी मी गेल्यावरच तुला मिळेल. मीच सांगितलंय आरतीला तसं. तु समोर असली तर कदाचित माझा पाय इथून निघणार नाही. रागावू नकोस. तु माझी खूप चांगली मैत्रीण होती आणि आजन्म राहशील.

सागर.

सागरच्या डोळ्यातून ओघळलेल्या अश्रूने शेवटची काही अक्षरं धुसर केली होती. मोठ्या मुश्कीलने त्याने हे मोजून पाच ओळींचं पत्र लिहिलं असावं आणि या पाच ओळी लिहिताना त्याला किती वेळ लागला असेल हे ती मनोमन जाणून होती.
पत्र वाचून सबा मटकन खालीच बसली. कितीतरीवेळ आरती सबाचं सांत्वन करत होती. दिवसामागून दिवस जात होते. काळ कुणासाठी थांबून रहात नाही. इतक्यात अब्बु आजारी रहात होते. सबाचं शिक्षण पुर्ण झालं होतं. MBA मध्ये चांगल्या मार्कांनी ती पास झाली होती. ज्या संस्थेतून तिने हा अभ्यासक्रम पूर्ण केला होता त्याच संस्थेच्या कंपनी सेमिनार मधून तिला जाॅब ऑफर झाला होता. आनंदातच ती घरी आली मात्र घरची परिस्थिती वेगळीच होती. तिच्या काकांनी तिच्या लग्नासाठी स्थळ आणलं होतं. हे पाहून इतक्या वर्षांनंतर भरलेली तिची जखम पुन्हा भळभळती झाली होती. सागर. सागर देशमुख. या एकाच नावाभोवती तिचं पुर्ण भावविश्व घट्ट गुंफलं गेलं होतं. जे सहजी सुटणं तिच्यासाठी केवळ अशक्य होतं. तिच्या अम्मीला याबाबतीत थोडी कुणकुण कानावर आली होतीच मात्र जोपर्यंत स्वतः सबा बोलत नाही तोपर्यंत ती हा विषय छेडणार नव्हती. अब्बुंचं वागणं अगदी कर्मठ नसलं तरी ह्या गोष्टीचा खूप मोठा आघात त्यांच्यावर होइल हे सबा जाणून होती. असंही सागर आणि तिच्यात होतं तरी काय? कुठे दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती एकमेकांना? दिली असती तरी या प्रेमाचं काय भविष्य होतं? चित्पावन ब्राम्हणांच्या घरी मांसमच्छी खाणार्‍या घरातली मुस्लिम मुलगी सुन म्हणून त्यांनी स्विकारली असती? या नात्याला काहीच भविष्य नव्हतंच मात्र मनाचं काय? प्रेम तर कुणावरही होउ शकतं ना?ठरवून प्रेम केलं जात नाहीच. ठरवून केलेलं प्रेम प्रेम असतं का? प्रेमाला कुठल्याच बंधनात बांधता येत नाहीच पण सामाजिक बंधनं? तहेजीब...संस्कृती? तिच्याकडे या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नव्हतीच.

क्रमशः

©® समीर खान. (आपला बहुमूल्य अभिप्राय नक्की द्या कारण पुढच्या फेरीत प्रवेश मिळण्यासाठी हा अभिप्राय खूप महत्वाचा आहे ?)

🎭 Series Post

View all