Login

प्रेमरोग भाग 1

कथा एका अव्यक्त प्रेमाची.
।। प्रेमरोग (भाग 1 . समीर खान)।।

आलिशान 2bhk च्या फ्लॅटमध्ये ती एकटीच बसलेली होती. सबा. अब्बु नेहमीच सांगायचे तिच्या नावाचा अर्थ. खुशनुमा हवा. म्हणजेच आनंदित करणारा वारा. का ठेवलं असेल हे नाव त्यांनी? ती नेहमीच विचार करायची. आनंदित करणारी झुळूक इतरांना आनंदित करते पण ती स्वतः ? आजपर्यंत हेच तर करत आलोय आपण. अदब, तहेजीब, तमीज एकेका भारीभक्कम शब्दांचं ओझं वागवत आलोय आणि आज? आज तर तिला टोकणारं कुणीच नाही मग इतकं उदास होण्याचं काय कारण? कितीही केलं तरी अम्मी, अब्बु, आपा सगळेच तिचे अपने तर होते आणि तो? त्याचा विचार येताच ती झटकन उठली. फ्लॅटला लागूनच असलेल्या प्रशस्त बाल्कनीत आरामखुर्चीवर स्थिरावली. हातात पुस्तक होतंच. इतक्यात जास्त वाचलं की डोळ्यात पाणी यायचं. दिवसभर लॅपटॉप वर ऑफिसचं काम करताना आधीच डोळे थकायचे त्यात या वाचण्याच्या आवडत्या कामात डोळे झरायचे तरीही ती नेटाने वाचत रहायची.

अगं काय हे?बाईसाहेबांना लक्षात नसेलच. " आरती आत येत जवळपास ओरडलीच.

आरतीच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली. पुस्तक वाचण्यात ती इतकी गुंग होती की मोलकरणीने दार उघडून आरतीला आत घेतलं तरीही सबाच्या लक्षात आलं नाही.

" अगं काय म्हणतेय मी?"

" हो गं, जरा बस की,काॅफी घे आधी मग निघू. निम्मो.. दोन काॅफी आण ." सबा अजूनही निवांतच होती.

" तुझं ना नेहमीचच असतं हा सबा, तुला माहितीये ना माझा मुलगा किती मुश्किलने मला सोडतो. आताही त्याच्या आजीकडे सोडून आलेय. " आरतीच्या तक्रारी सुरूच होत्या.

हलक्या गुलाबी रंगाचा चुडीदार, बारीक वेलबुट्टीची जरदोजी कलाकुसरीची तलम ओढणी, मोकळे सोडलेले केस, मोत्यांचे नाजूक दागिने आणि साजेशी लिपस्टिक लावून सबा तयारही झाली होती.आरती तिला आश्चर्याने बघतच राहीली.

" क्या बात है सबा, आजभी तुम्हारे जलवे बरकरार है, कयामत लग रही हो " आरती सबाला चिडवत बोलली.

सबाने आरशात स्वतःला पाहिलं आणि पुन्हा एकदा त्याच्या आठवणीने डोळ्यात ढग दाटून आले. पुढच्याच क्षणी तिने स्वतःला सावरलं. पुन्हा एकदा ओल्या डोळ्यांच्या कडा पुसत तीने आयलायनर लावला आणि दोघी घराबाहेर पडल्या.

आरती, सबा दोघी बालमैत्रीणी.एकाच शहरातल्या, एकाच मोहल्ल्यात वाढलेल्या, मोठ्या झालेल्या. कितीतरी अजून मित्रमैत्रिणीं अजून होते त्यांच्या ग्रुप मध्ये. रिज्जो, मुन्नी, बबल्या, अशक्या, शांती आणि....आणि? होय तोच..सागर. सागर देशमुख. रम्य बालपण एकत्र घालवलेले हे सवंगडी आज जिवनाच्या धबडग्यात विखुरले गेले होते.एक एक करत मोहल्ल्यातली कुटुंब स्थलांतरीत झाली आणि या सर्वांचा एकमेकांशी संपर्क तुटला. तरीही वेळात वेळ काढून सबा व आरती एकमेकांना भेटत असे व काही निवांत क्षण जगून घेत असे. आरतीचं सासर मुंबई.योगायोगाने सबाची ड्युटी याच शहरात असल्याने दोघींचा संपर्क झाला आणि त्यांच्या भेटीगाठी होउ लागल्या. असंही मामा मामी वगळता सबाचं इथे होतं तरी कोण? आईवडील निवर्तलेले, बहिण सासरी तर ही एकटीच. वर्किंग वुमन. अविवाहित. सबाने अजून लग्नच केलं नव्हतं. अस काय कारण होतं की ती अजूनही अविवाहित होती? दिसण्याचा तर प्रश्नच नव्हता. पस्तीशी ओलांडली तरीही आजही ती तितकीच देखणी होती. देखणी, सुसंस्कृत, उच्चशिक्षित, नोकरीपेशा तरीही ती अजूनही एकटीच का होती? याची उत्तरं तिच्या भूतकाळात दडली होती आणि लवकरच तिचा भूतकाळ वर्तमानाला दस्तक देणार होता.

क्रमशः


©® समीर खान. (आपला बहुमूल्य अभिप्राय नक्की द्या कारण पुढच्या फेरीत प्रवेश मिळण्यासाठी हा अभिप्राय खूप महत्वाचा आहे ?)

🎭 Series Post

View all