प्रेमऋतू: द स्प्रिंग ऑफ लव्ह (भाग-०२)

एक प्रेमकथा निराळी, गैरसमजुतीत गुंफलेली... सामर्थ्याने नटलेली, अस्तित्वाची जडणघडण निर्माण कर??

                         भावी वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा देताना नायिकेला अतिशय जिव्हारी येत होते परंतु याची केवळ तिलाच जाणीव होती. तरीदेखील तिने अढळ संयम बाळगून ठेवला होता.

तेवढ्यात क्षिप्रा कसनुसं हसत म्हणाली, " खरंतर, समीर बहिर्मुख वाटतो पण प्रत्यक्षात त्याला त्याचं व्यक्तिगत आयुष्य जगापासून कायमच अलिप्त ठेवायचं असतं आणि मुख्यत्वे अनोळखी लोकांपासून! " 

अनपेक्षितपणे क्षिप्राने नायिकेला टोमणा मारला होता पण तिने दुर्लक्ष केले व कसनुसं हसून प्रतिसाद दिला. तेवढ्यात ती अंगावर चढवलेल्या शर्टचे प्रदर्शन करत नायिकेला म्हणाली, " सॉरी, मी याच अवतारात दार उघडलं. मी लगेच हे समीरचे शर्ट बदलून घेते. "

                          क्षिप्रा कपडे बदलण्यासाठी आतल्या खोलीत जाताच नायिकेचा बांध सुटला अन् ओघाओघात तिचा एक अश्रू बंड पुकारून गालावर कोसळला. तेवढ्यात क्षिप्राची चाहूल लागताच तिने परत हसरा चेहरा केला. 

क्षिप्रा तिच्याजवळ हजर होताच नायिका स्वतःचा परिचय देण्याचा प्रयत्न करू लागली; पण क्षिप्राने मध्येच तिला थांबविले व ती म्हणाली, " परिचयाची काहीच गरज नाही. समीरने माझ्याजवळ तुझा उल्लेख केलाय बरेचदा! तू 'मिस शिन्चॅन' या नावाने प्रसिद्ध आहेस ना! ठाऊक आहे मला. शिवाय सोशल मीडियावर दररोज तुझ्या संदर्भात निदान एक तरी बातमी ट्रेंडिंगला असतेच. त्यामुळे मला ओळख आहे तुझी. " 

" बरं. " नायिका कसनुसं हसून उत्तरली. 

" ह्म्म. कसं काय येणं झालं? काही महत्त्वाचं काम आहे का समीरकडे? " क्षिप्रा साशंक नजरेने दखल घेत म्हणाली. 

" हो, जरा गोपनीय आहे. आमच्या व्यवसायासंदर्भात आहे; त्यामुळे मी तुम्हाला अगदी सविस्तर माहिती देऊ शकत नाही. " ती थोडक्यात उत्तरली. 

" बरं. जर अति महत्त्वाचं काही असेल तर मी उठवते त्याला. " क्षिप्रा गूढ हसत म्हणाली. 

" नका उठवू त्यांना. अर्थात ते निवांत झोपलेले असतील तर त्यांना उठवून त्यांची झोपमोड करू नका. ते उद्या ऑफिसला येतीलच तेव्हा अगदी सविस्तर बोलून घेईल मी त्यांच्याशी. सध्या त्यांची झोपमोड करू नका. एरवीही कामकाजाचा व्याप जास्त असला की, जागरण करतात ते! त्यामुळे त्यांच्या शांत झोपेत मला अडथळा व्हायचं नाहीये. " नायिका सोफ्यावरून उठत म्हणाली. 

" अडथळा वगैरे काही नाही. कामकाजाबाबतीत हयगय नको. " क्षिप्रा कुत्सितपणे हसून म्हणाली. 

" नाही होणार हयगय वगैरे. येते मी! " नायिकेने हलकासा उसासा घेत प्रत्युत्तर दिले. 

" नक्की? " क्षिप्राने खात्रीपूर्वक विचारले. 

" हो. चला आता निघते मी! " तिने तडकाफडकी निरोप घेतला. 

" हो, भेटू नंतर कधीतरी. " क्षिप्रा गूढ हसत म्हणाली. 

" ह्म्म. " तिने निर्विकारपणे हुंकार भरला व तेथून काढता पाय घेतला. 

                          नायिका तिच्या मार्गाने जात होती तेवढ्यात क्षिप्राने तिचा हात पकडला व तिला थांबवून घेतले. नायिका थबकली व गोंधळून क्षिप्राकडे पाहू लागली. 

तथापि, क्षिप्रा ओशाळून नायिकेस म्हणाली, " माझी एक मदत कर प्लीज. " 

" कोणती मदत? " नायिकेने आश्चर्याने विचारले. 

" काही वेळापूर्वी आत तू मला ज्या अवस्थेत पाहिले त्याची इतरत्र चर्चा करू नकोस. ॲक्च्युली, आमचं लग्न व्हायचं असलं तरी आम्ही दोघांनीही पाश्चात्य देशात शिक्षण घेतलंय. जडणघडण ही तिथलीच त्यामुळे फिजिकल रिलेशनशिप आम्हाला नकोशी वाटत नाही. त्यामुळे हे आमच्यासाठी नवीन नाही परंतु समीर ज्या क्षेत्रात कार्यरत आहे, तिथे ह्या अशा बातम्या व्हायरल व्हायला क्षणाचाही विलंब लागत नाही. 

                         थोडक्यात, जर अख्ख्या जगाला आमच्यातील 'बोल्ड' नात्याची खबर लागली तर उगाच समीरच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले जातील अन् त्याच्या कार्यक्षमतेवर विशेष टीका-टिप्पणी केली जाईल व मला हेच नकोय. मी अपेक्षा करते की, तुला माझं मत पटलं असेल आणि तू कुठेही याबाबत चर्चा करणार नाहीस. इव्हन समीरपुढेही! " क्षिप्रा नायिकेला विश्वासात घेत म्हणाली. 

" काळजी करू नका. तुम्ही समजा की, ना मी आज इथे आली होती, ना मी आत काही पाहिलं. मीही कुणाशीही याबाबत चर्चा करणार नाही. " डोळ्यात अश्रू साठवून नायिका मंद हसत उत्तरली. 

" थॅंक्स. " क्षिप्रा तिच्या डोळ्यांवर येणारी बट कानामागे सारताना म्हणाली. 

                          नायिकेने केवळ मंद हसून नाईलाजास्तव प्रतिसाद दिला. त्यानंतर तिने लगबगीनेच तेथून काढता पाय घेतला. चार पावले पुढे गेल्यावर साधारण सहा वर्षीय एक चिमुकली नायिकेला धडकली व लगेच ती दिलगिरी व्यक्त करू लागली. 

क्षिप्रा त्या दोघींजवळ गेली अन् त्या चिमुकलीला उद्देशून म्हणाली, " समीज्ञा, काय करतेस तू? एवढी धडपड कशाला करतेस? " 

" इट्स ओके. एवढं काही नाही. " नायिका लहानग्या मुलीची बाजू घेत म्हणाली पण त्या दरम्यान तिच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळलाच. 

" सॉरी मम्मा, मी पुढच्या वेळी लक्ष ठेवणार. " समीज्ञा क्षिप्राकडे पाहून उत्तरली परंतु त्या मुलीने उद्गारलेला 'मम्मा' शब्द नायिकेच्या कानात गुंजारव करत राहिला.

                          नायिका थक्क झाली होती. काय प्रतिक्रिया द्यावी, ह्यापासून ती अनभिज्ञ होती. तिने थरथरतच एक आवंढा गिळला. तिच्या अंगावर काटा उभा राहिला अन् अविश्वासाने ती क्षिप्राकडे पाहू लागली. 

तेवढ्यात क्षिप्रा समीज्ञाला उद्देशून म्हणाली, " बरं. पुढच्या वेळी नीट लक्ष ठेवायचं. आता जा नि तू आतमध्ये खेळत बस. " 

समीज्ञाने होकार दिला व ती पळतच खोलीत निघून गेली. दरम्यान नायिकेचा आश्चर्यचकित झालेला चेहरा पाहून क्षिप्रा मंद हसत उत्तरली, " समीज्ञा, माझी आणि समीरची एकुलती एक लेक आहे. " 

" अच्छा. अगदी गोड आहे. तुम्हा दोघांसारखीच. " नायिका भावनांचा पूर सांभाळत उत्तरली अन् माघारी वळली व परत मागे वळून पाहिले नाही. 

                          तिच्या डोक्यात असंख्य विचारांचे वादळ थैमान घालत होते म्हणून एलिव्हेटरचा उपयोग न करता आठ माळ्याच्या त्या इमारतीची एकेक पायरी उतरत नायिका मार्गक्रमण करत होती. दरम्यान समीरला एकाएकी जाग आली. त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं.

                          तो बेचैन मनाने मुख्य खोलीत (हॉलमध्ये) गेला. हॉलमध्ये शिरताच त्याला नायिकेच्या परफ्युमचा सुगंध आला आणि त्याची शंका सार्थ ठरली. हलकेसे स्मितहास्य त्याच्या ओठांवर पसरले अन् त्याने सभोवती नजर फिरवली तिची शोधाशोध करण्यासाठी पण ती दिसली नाही. 

                          दरम्यान समीरचे क्षिप्राकडे लक्ष गेले. त्याने गोंधळून तिच्याकडे पाहिले. तिला त्याच्या फ्लॅटमध्ये पाहून तो भांबावला होता; परंतु तात्पुरते स्वतःच्या इतर प्रश्नांकडे दूर्लक्ष करत त्याने क्षणाचाही विलंब न करता तो नायिकेबद्दल विचारपूस करू लागला. 

समीरने क्षिप्राला विचारले, " क्षिप्रा, 'मिस शिन्चॅन' आली होती का इथे? " 

" हो! पण तुला कसं कळलं? " क्षिप्राने नाराजी व्यक्त करत उत्तर दिले व प्रतिप्रश्न केला. 

" खरं सांगायचं तर, मलाही ठाऊक नाही पण ती सभोवती असल्याची जाणीव झाली मला. कदाचित तिची चाहूल लागली असावी माझ्या हृदयाला. " समीर गालातल्या गालात हसून उत्तरला. 

" ह्म्म. बरं. " क्षिप्राने नाराजीयुक्त स्वरात उद्गार काढले. 

" पण ती कशासाठी आली होती आणि मला न भेटताच का गेली ती? " समीरने गोंधळून विचारले. 

" तुला भेटायलाच आली होती पण तू झोपला असल्याचे कळल्यावर तुझी झोपमोड करावीशी वाटली नाही तिला. त्यामुळे आल्या पावली गेली निघून ती. " क्षिप्राने थोडक्यात माहिती दिली. 

" तिला जाऊन किती वेळ झाला? " समीरने क्षणार्धात विचारले. 

" बराच वेळ झालाय. " क्षिप्रा मुद्दाम खोटे बोलली. 

" नाही, मला असं वाटत नाही. " समीर साशंकपणे उत्तरला. 

" अर्थात मी खोटं बोलतेय का? " क्षिप्राने नजर रोखून विचारले. 

" मला असं नव्हतं म्हणायचं. " समीर चाचरत म्हणाला. 

" मग कसं म्हणायचं होतं? " क्षिप्राने कुत्सितपणे रागीट कटाक्षाने विचारले. 

" तिच्या असण्याची मला जाणीव होतेय. शिवाय या खोलीत अजूनही तिचा दरवळ आहे. त्यामुळे मला खात्रीशीर वाटतंय की, ती असेल इथेच. " समीरने स्पष्टीकरण दिले. 

" गैरसमज आहे हा तुझा. ती पोहोचली असेल अद्याप तिच्या घरी! " क्षिप्रा रागाने धुसफूस करत म्हणाली. 

" बरं. निदान खात्री करण्यासाठी तरी मी एकदा बघून घेतो. " समीर उत्तरला व त्याने तडकाफडकी एलिव्हेटरच्या दिशेने धूम ठोकली. 

                          समीरला नायिकेची भेट घ्यायची होती. त्याच्या हृदयाला लागणारी चाहूल सिद्ध करायची होती. शिवाय त्याच्यासाठी ती अमूल्य अन् खास होती; त्यामुळे तिची भेटगाठ घेण्याची संधी तो ही सोडत नसायचा. त्यामुळे नखे कुरतडच तो नायिकेची भेट घेण्यास एलिव्हेटरमध्ये उभा प्रवास करण्यास सज्ज झाला. 

क्रमशः

......... 

©®

सेजल पुंजे. 

१०/०४/२०२३.

🎭 Series Post

View all