प्रेमाला समाजसेवेचे कोंदण ( टीम मारवा )

ईरा : शब्द मनातले ...!!

    प्रेमाला समाजसेवेचे कोंदण..!!

सूर्य मावळतीला लागला होता.राधा घाईघाईने आपल्या खोपटाकडे प्रयाण करीत होती.डोकीवरची  लाकडाची मोळी जड झाली होती. पायात त्राण उरला नव्हता .दररोजच्या या राबण्याला कोणतीही मर्यादा नव्हती..राधाला या त्रासाने गाढ  झोप लागायची मात्र पहाटे राधा लवकर उठून खोपटाची स्वच्छता करायची  पुन्हा चुलीकडे वळायचे ..सरपण घालायची बाजरीच्या भाकरी भाजायची व परत कामावर जायाची असे हे चित्र कायमचेच होते.

       राधा...बीडमधील संतोष गजरे  यांची मुलगी.. नाकीडोळी छान , गोल हसमूख चेहरा व चेह-यावरती नेहमी निरागस हास्य , बोलका स्वभाव यामुळे  राधेच हे रुप सगळ्यांना आवडायचे वडील नेहमी तिला लाडाने जवळ घ्यायचे , तीची प्रत्येक हौस पुरवायचे मग राधा हळूच वडिलांच्या कुशीत शिरत असे.राधाची आईही राधावर फार माया करायची ..पण संस्काराचा बडगा कायम तिच्यावर ठेवला ..घरातील झाडलोट , स्वच्छता यासाठी तीने राधाला सारे कसब सुरवातीपासूनच शिकवले राधानेही ते मनापासून केले म्हणूनच राधा हळूहळू तरबेज होत होती.

     राधा आता मोठी झाली होती.बीड भाग दुर्गम असल्यामुळे  शाळा शिकण्याची तिची  ईच्छाच नव्हती. त्यामुळे राधाला शाळा शिकणे मनातच नव्हते .घरी शेतीवाडी बेताचीच होती.राधाचे आईवडिल घरची गुजराण करण्यासाठी मोलमजुरीसाठी जात असत.राधा एकलुती एक मुलगी असल्यामुळे तीचा जीवापाड सांभाळ केला होता.राधाला कधीच काय कमी पडू दिले नाही ..त्यामुळे राधा नेहमी आईवडिलांची प्रेमाची शिदोरी होती...!

    घरप्रंपच चालवायचा म्हणजे अनंत अडचणी ... हे राधाचा बाप जाणून होता ...!! उन्हाळ्यात कांहीच काम नसल्याने राधाच्या आईवडिलांनी ठरवले की ऊसतोड मजूर म्हणून टोळीत जायचे.मिळालेल्या पैशातून कसतरी संसार चालवायचा .ऊसटोळीत जोडपीच असल्यामुळे राधाचे आईवडिल जाणे भाग होते.लागणारे पैसे अगोदरच घेतल्यामुळे ऊसतोड मजूरांना वहान मालक आपल्या सोयीच्या ठिकाणी ऊसतोडीसाठी घेऊन जात असे.

      असे हे दरवर्षीच होत असे.या सगळ्या जीवनाच्या दळणवळणात राधाही आईवडिलांच्या संगतीने होती तीही त्यांचे काम बघून आता शिकू लागली होती.फडात जेवण आणणे  यासारखी कामे करु लागली त्यामुळे ती पुढील ऊसतोड कामगार तयार होण्याचे संकेत देत होती ..!!

  बीड भागातील असे तांडे ऊसतोडीसाठी महाराष्ट्रात जात असत.साधारण नोंव्हेंबर महिन्यापासून ही हालचाल होत असते.मालकाचे वाहन टोळी नेण्यासाठी बीड भागात येत असत.प्रत्येक गावातील जोडपी गोळा करत ,  आपले सगळे साहित्य भरत टोळी आणण्याचे काम पुढे सरकत असते.प्रत्येकांच्या साहित्याने वाहन खचाखच भरत असे.बाजरीची पोती , कपडे , लाकडे , खोपटाचे साहित्य हे सगळे भरुन वाहन आपल्या नेमूण दिलेल्या गावाकडे प्रयाण करत असे.

     असेच दिवस सरले.राधा आता मोठी झाली होती.सडपातळ शरीरयष्टी , लाबसडक हात , कुरळे केस अंगात शोभेल अशी कपडे अशा हलक्या  वेशात राधाचे वावरणे चालू होते .शिक्षणाचा थोडाफार गंध होता पण तो कुचकामी होता....!!चौकस व बेरका स्वभाव यामुळे तिचा हजरजबाबीपणा जाणवत होता.असेच ऊसतोडीसाठी तांडे  चालले होते.राधा व राधाचे आईवडिल या तांड्यात सामिल होते.या लवाजम्यात शिवा वंजारे हा तरुण ऊसतोडीसाठी सामिल झाला होता.एकत्र टोळीत असल्यामुळे शिवा टोळीत म्होरक्या असल्यासारखा होता.सळसळते रक्त , कामाची हौस , मदतीची भावना , धाडस , चिकाटी या गुणामुळे शिवाने टोळीत आपली चांगलीच छाप पाडली होती.

" ये शिवा आज ऊसाचा माल लवकर पाहिजे हं ...!

वाहनाचा मालक असे दररोजच  म्हणत असे ..."

अहो मालक कवा बी या  माल तयार ..!!

अशी शिवाची आश्वासने पक्की असायची त्यामुळे वाहन फडात भरायला आले की तास , दोन तासात भरुन व्हायचे. सगळे शिवार फिरायचे , कुठे चांगले मळे लागायचे कुठे खराब पण सगळ्यांना उन्हात घाम गाळावा लागत असे.

    राधाचे टोळीतिल वागणे आता सराईत झाले होते.बिनधास्त बोलणे , हसणे खिदळणे , मौजमजा त्याबरोबर कामाचाही तगादा असायचा.राधा व शिवा यांचा कामाचा उरक चांगला होता.शिवा ऊस सपासप तोडत असे ..तलवार फिरवावी तसे आपला कोयता ऊसावर फिरवित असे , भिरभिरनारी ऊसाची पाने वा-यासारखी उडून  जात व बघता - बघता  पाठीमागे ऊसांचा मोळींचा ढीग लागत असे.राधाला हा शिवाचा कामातील चपळपणा आवडला , त्याचे बोलणे , वागणे , हसणे  यावर राधा फिदा होऊ लागली याचा हळूवार  शुभारंभ हृदयाकडे झीरपू लागला होता.राधा ऊसाची मोळी बांधता बांधताच थांबत होती , मनात हसत होती ..कुजबजत होती , हळूच शिवाकडे नजर फिरवत होती ..आणि मग आपल्या कामात गर्क होत होती.राधाचा मनाचा पाठशिवणीचा खेळ शिवाला केंव्हाच ओळखला होता पण शिवाने आपल्या मनाच्या चपळाईने तो राधाला दिसू दिला नव्हता. जरा धिरानेच या नाटकाला हाताळायचे असे शिवाने ठरविले होते.

     राधाच्या मनाचे कंगोरे बदलले होते.राधा लगबगीने फडाकडे चालली होती.फडात ऊसाची मोळी बांधताना  शिवा तेथे आला.

राधा , तुझ्या मनाची चलबिचल मी वळखली आहे ."

तुला कसे कळले ? राधा म्हणाली.

तुला कस कळलं ...?

तुझ्या बदलेल्या वागण्यातून ..!!

तुझे माझ्याकडे एकसारखे बघणे , माझी स्तुती करणे हे मला समजले ,  शीवा म्हणाला .

असे किती दिवस हे लपवून ठेवणार ...!

" त्याला वाच्या फोडलीस तर मनातील तरी समदं समजल."

असे म्हणताच राधाने " तुझ्यात माझा जीव गुंतला आहे "  याची कबूली दिली.

हे ऐकून शिवालाही आनंद झाला व राधाच्या प्रेमाला शिवानेही दुजोरा दिला.दोघांचेही मनोमिलन झाले होते.राधाच्या आयुष्यात नवा वसंत फुलला होता. मन उधान वा-यासारखे धावू लागले होते.शिवाबरोबर हे रेशीमबंध जपताना तिच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळणार होती.प्रत्येक कामात तिला शिवाचे प्रतीबींब दिसत होते.आपल्या खोपटालगत शिवा असल्यामुळे राधाला महालात रहायला असल्यासारखे वाटत होते.

       राधाचे विचार आता धीरगंभीर होत होते प्रत्येक गोष्टीचा ती चौकसपणे विचार करत होती.अनेक चांगल्या सवयी राधाने शिवाला लावल्या होत्या. माणसात कसे बोलायचे व व्यावहारिक सांगड कशी राखायची हे सारे राधाने ह्या फिरत्या जगात अनुभवले होते.कष्टाची तयारी तिच्या मनाने केव्हाच केली होती.हे सारे घडत असता शिवाबरोबर पुढील आयुष्य कसे घालवायचे याचा विचार राधा मनोमन केला होता . " मी आता सक्षम आहे "  हे तीने मनाला बजावून सांगितले होते.

       असेच दिवस जात होते. ऊसाचे मळे फस्त होत होते.वाहन भराभर भरुन जात होते.बाजारहाट , खाणेपिणे  बिनधास्त सुरु होते .येणारा दिवस चांगलाच जात होता.शिवाच्या सानिध्यात राधा चांगलीच रमली होती.ही गोष्ट आपल्या आईवडिलांनाही माहित होती .दोघेही कर्तबगार आहेत पुढे त्यांंना सुगीचे दिवस येतील हीच मनात आस बाळगून त्यांनी कसलाच त्यांना विरोध केला नाही.

राधा ..आपण आता जीवनभराचे जोडीदार  झाले पाहिजे.

व्हय शिवा ..!!

तुझ्या मनात तर आहे ना राधा ?

माझ्या मनात तर तू हाईस पण काळजात बी हाईस ...!

समद्यासनी कळून चुकलय आता ...!

म्हणूनच आता थांबायच नाही ..!

  राधाने व शिवाने ठाम ठरविल्यामुळे दोघांचे लग्न साध्या पद्धतीने झाले.दोघेही सांसारीक जीवनात गुंतले
व नेटाने संसार करु लागले .

    एकदिवस राधा व शिवा जवळच शहराच्या ठिकाणी बाजाराला गेली.अनेक दुकानात पाहिजे तो बाजार केला.शिवाने बाजाराची गाठोडी बांधली.

" चल राधा चहा घेऊ ..!!" 

असे म्हणत दोघेही चहा घेण्यासाठी गेले.शिवा चहा पिण्यात मग्न होता पण राधाचे लक्ष दुसरीकडेच होते .तिला लहान मुलगी दिसली होती ..केस विस्कटलेले , अंगात फाटका फ्राॕक होता , घाम अंगावर गळत होता , भूकेने ती व्याकूळ झाली होती , सर्वांच्याकडे ती हात पसरत होती... ! कनवाळू राधाला हे पाहून तिची दया आली ..तिला हातात खाऊ दिला  , तिची सारी विचारपूस केली  माहिती घेतली मग तिला समाधान वाटले.सारे बाजाराचे सामान घेऊन राधा व शिवा खोपटावर आले व आपल्या कामात गुंतले.

    राधाला त्या लहान मुलीची मुर्ती डोळ्यासमोरुन जाईना.कसे जगत असतील ही मुले "  त्यांंना आईवडिल असतील का ? त्यांना खायाला कोण देत असेल का ? ती कुठे रहात असतील ? असे नाना प्रश्न राधाला सतावत होते. मळ्यात राधा काम करायची पण तिचे कामात लक्ष नव्हते. शिवालाही तिच्या या वागण्याचे गम्य समजत नव्हते.राधा कुठल्या व्यापात असती काय माहित ..?असे म्हणून तो आपल्या ऊसतोडीच्या कामात मग्न असे.राधा मात्र सतत चिंतीत होती.तिला ती बाजारातील मुलगी अनाथ भासली ...आणि खरोखरच ती अनाथ होती.तिचा चेहरा सारखा तिच्या डोळ्यासमोर तरळू लागला.तिची अवस्था  आठवून नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू घरंगळू लागले .मनात ती म्हणू लागली ,
तीला जवळ घ्यावे !

तिचे पापे घ्यावे ...!

तिला भरवावे ...!

तिला अंघूळ घालावी ...!

तिची स्वच्छता करावी...!
आणि तिला आपल्या खोपटावर ठेवून घ्यावे..!

     राधाच्या मनाने एकाकी वेगळीच कलाटणी घेतली होती.एका ऊसतोड मजूर स्रीच्या मनाने वेगळीच उचल खाली होती.हळवे मन वाळवंटातील ओअॕसीस शोधत होतं.राधाच्या मनात अशा गरीब मुलांच्याबद्दल ओढ निर्माण झाली होती.आशा निराधार मुलांना आधार देण्याची कल्पना तिला सुचली होती .

   असेच राधा व शिवा ऊसतोड झाल्यानंतर बांधावर बसले होते.राधाने आपल्या मनातील विचार शिवाला सांगितला.शिवा तुला सांगायचो महणतोयं,

" गरीब ,  निराधार मुलांना सांभाळ करायचा ईचार माझ्या मनात येतोय..!

" काय डोकंबिकं फिरलय का तुझं..!

एकतर आम्हाला जगायच मुश्किल ?आणि हे कोणी  खुळ घातल तुझ्या डोक्यातं..!

शिवा  ते कुणीबी  घालू दे ..पण माझ्या मनात हाय ते मी करणारच ...!

राधा नेटाने म्हणाली ." या कामात शिवा तुझी साथ पाहिजे बग .!

अग पण कस शक्य आहे हे ...!  शिवा पुटपुटला.

शिवा आपण तर चांगल जगतोय पण ही निराधार मुल कशी जगत असतील याचा जरा ईचार कर ...!

राधाच्या विचारावर शिवासुद्धा विचारमग्न झाला.समाजात अशी कितीतरी मुले पोरकी आहेत त्यांचे जीवन हा दररोजचा यक्षप्रश्न आहे हे शिवालाही पटले होते पण हे राधाला कसे शक्य आहे ...? याचे त्याला उत्तर सापडत नव्हते.

   ऊसतोडीचा हंगाम संपवून राधा व शिवा  आपल्या राहत्या गावी आले.बीड हे मुळ गाव असल्यामुळे या गावची ख्याती ऊसतोड मजूर म्हणून सगळी होती.आपल्या छोट्याशा घरात राधा व शिवा  रहात होते . घरी आल्यावर राधा निराधार मुलांचा विषय राधाच्या डोक्यात घोंघावत होताच पण ईथे परत सगळी कशी जमवाजमव करायची याच विचारचक्रात राधा होती.यासाठी तिने शिवाबरोबर विचारमसलत केली .शिवाही राधाला मदत करु लागला.दोघांचा सकारात्मक प्रभाव पुढील योजनावर होत होता.त्यामुळे राधालाही स्फुरण चढले होते.राधाच्या मनात अनाथ मुलांना आसरा देण्यासाठी जागा पाहिजे होती.प्रचंड विरोध असतानाही राधाला आपल्या घरा शेजारी जागा मिळाली.राधा व शिवाला आता जरा धीर आला होता.गावातील अनेक नेते मंडळी , धनाढ्य लोकांना राधा व शिवा भेटून आपण अनाथ मुलांना आश्रम काढणार असल्याचे सांगितले.राधाच्या या निर्णयाचे गावकरी मंडळीनी स्वागत केले व लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .गावक-यांच्या या पाठिंब्यामुळे राधा व शिवाला जोर चढला होता.

     राधा व शिवाने जागा स्वच्छ केली.पत्रे , बांबू  व कापड यांच्या वेष्टनाने ताबडतोब  शेड उभारला गेला.तिथेच स्वच्छतागृह , पाणी , शौचालय आदि सर्व सुविधा करुन घेतल्या .गावक-यांच्या मदतीने राधा व शिवा यांचा अनाथांचा बालकाश्रम उदयास आला.

  "  महत्वाचे काम आपले झाले आहे शिवा ...! " राधा बोलली.

" आश्रमांत मुलासाठी आपल्याला दारोदारी हिंडावे लागणार आहे ." राधा म्हणाली.

" प्रसंगी खायला पियाला नसले तरी चालल  पण आनाथ मुलांना हुडकून आपल्या आश्रमांत आणून त्यांंची सेवा करण हे आपले कर्तव्य आहे."  राधा शिवाला म्हणत होती.

दोघानीही या कामाला वाहून घेतले होते.

    राधा व शिवा आज लवकर उठले .बीड भागातिल सारी गावे शोधायला सुरवात केली.अनेक गावात त्यांना मानहानी पत्करावी लागली.हा अपमान सहन करतच त्यांनी आपली मोहीम सुरु ठेवली.आनेकांच्याकडे मदतीची याचना करत मुलांना  गोळा करत मोहीम पुढे चालू ठेवली. जागी जागी चांगला प्रतिसाद मिळाला .दररोजचे हे काम राधा व शिवा करु लागली ...!! असे करत जवळजवळ पंचवीस अनाथ मुले त्यांनी गोळा केली व आश्रमात त्यांना आधार दिला.मुले आश्रमांत राधा व शिवा त्यांंच्या  सेवेत गुंतून राहिले .त्यांंच्या आवडीनिवडी , स्वच्छता दोघेही करु लागली.हे सगळे करत असतांना राधा व शिवाला झोप  लागत नसे या सा-या मुलांचा सांभाळ व्यवस्थित करायचा हा एकच ध्यास त्यांना  होता. या मुलांना खाण्याच्या सोयीसाठी अनेक सावकरांचे उंबरे राधा व शिवाने झिजवले होते.प्रत्येकाला गयावया  करायचे कधी पैसे मागायचे तर कधी धान्य ..! कशाच्याही स्वरुपातील मदत गोळा करुन राधा व शिवाने अनाथ मुलांच्या डोळ्यात कधी आश्रू येवू दिला नाही आईवडिलांची माया ,  प्रेम त्यांना दिले.

    राधा व शिवाच्या अनाथश्रमाची महती सगळीकडे पसरली होती.गावागावातून त्यांंना प्रेरणा मिळत होती.अनाथ आश्रमांत मुलांची संख्या शंभरीपार गेली होती.मुले लहानाची मोठी होत होती वात्सल्याची कमतरता त्यांना कधीच जाणवली नाही.आनंदाने सारी मुले खेळत होती , बागडत होती.एक अथांग प्रेमाचा सागर अनाथ आश्रमांत वाहत होता .राधा व शिवाचे हे महनिय काम चालूच होते.प्रसिद्धीच्या शिखरावर अनाथ मुलांचे कार्य पोहचले होते आणि म्हणूनच या अनाथ आश्रमाचा कायापालट  करण्याचे राधा व शिवाने ठरविले.

   अनाथ आश्रमांत मुलांची संख्या वाढली होती .सुख सुविधा थोड्या फार प्रमाणात कमी पडत होत्या.राधा व शिवाला अनेक दानशूर लोकांनी मदतीचा ओघ सुरु ठेवला.धनाढ्य लोक  पैशाच्या स्वरुपात मदत देऊ लागली.भरपूर निधी जमू लागला.मदतीचे हात सरसावू लागले त्यामुळे राधा व शिवाला हत्तीचे बळ मिळाले .आपला छोटा आश्रम त्यांनी अंबेजोगाई येथे प्रशस्त जागेत साकारला .सगळ्या सुविधा केल्या.खेळण्यासाठी पटांगण , व्यायामशाळा , छोट्या खोल्या , जेवणासाठी बैठकव्यवस्था असे सारे नियोजनबद्ध केले.रंगरंगोटीने सारा आश्रम झळकू लागला." अनाथांची सेवा करा "  दिनदुबळ्यांना आधार द्या "  मुलांना प्रेम द्या "  अशा अनेक सुविचारांनी आश्रम फूलून गेला होता.

   नविन स्तलांतरीत आश्रमाची तयारी पूर्ण झाली होती.अनाथ मुले आनंदाने बेभान झाली होती.राधा व शिवा कष्टाचा हा ताजमहाल बघून हरखून गेले होते.राधाचे आईवडिलांच ही या राधाच्या करुणेवर फिदा झाले होते.राधाने सारी तयारी पूर्ण केली होती .ज्या लोकांनी राधाला मदत केली होती त्या सर्वांना राधाने या नविन आश्रमाच्या शुभारंभाला आमंत्रित केले होते.सारे गावकरी , ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख उपस्थिती होती " अनाथांची माय सिंधुताईं सपकाळ " यांची...!! अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात " राधेय बालकाश्रम "  या नव्या आश्रमाचा शुभारंभ केला गेला.सा-यांचा आनंद ओसंडून  वहात होता.राधा व शिवाच्या  कार्याचे तोंडभरून आनाथांच्या मायीने कौतूक केले हा वारसा असाच चालू ठेवा हा मोलाचा संदेश त्यांनी दिला

   राधा व शिवा यांनी हे महान काम असेच आनंदाने  पुढे चालू ठेवले.त्यांच्या या कार्याने समाजात निराधाराना आशेचा नवा किरण मिळाला होता.

  ईरा चॕम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेत मी " टीम मारवा "चे प्रतिनिधित्व करत असून आपल्याकडून  लाईक , कमेंटची जरुर  साथ द्या ...!!

               नामदेव पाटील