Feb 27, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

प्रेमाचे सासर भाग १३ अंतिम

Read Later
प्रेमाचे सासर भाग १३ अंतिम


सुनेच्या यशाचे कौतुक म्हणून आज प्रमिलाताई आणि सुमन ताईंनी मिळून जेवणात गोडाचा बेत केला होता. मोनालीचे आई वडील देखील लेकीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी पेढे घेवून तिच्या घरी हजर झाले.

विलासरावांना आज सुनेचे कौतुक करताना पाहून प्रदीपरावांना मात्र भरून आले.

"इतक्या कमी वेळात माझी मोना विलासच्या मनात घर करेल असे स्वप्नातही वाटले नव्हते मला. कारण कितीही नाही म्हटले तरी विलास खूपच मानी स्वभावाचा आहे हे चांगलेच जाणून आहे मी." प्रदीपराव मनातच बोलले.

"प्रदीप आता जेवण करूनच जायचे बरं का." विलासराव त्यांना जेवणाचा आग्रह करत होते.

"नाही अरे नको! तुम्ही जेव्हा आम्ही निघतो आता. घरी स्वयंपाक तयार आहे." म्हणत प्रदीपरावांनी जेवणाचा विषय टाळला.

"अरे! व्याह्याच्या नात्याने नको जेवू पण आपल्या मैत्रीच्या नात्याने जेवायला काहीच हरकत नाही." विलासरावांनी हसतच मित्राची खेचायला सुरुवात केली.

"पण पुढच्यावेळी नक्की आता नको..,"म्हणत सर्वांचा निरोप घेवून प्रदीपराव जायला निघाले.

तेवढ्यात.."मला तुम्हाला सर्वांना काहीतरी सांगायचे आहे," म्हणत मोनाली थोडी घाबरतच सर्वांसमोर आली.

"काय ग बाळा?" शांतपणे प्रदीपरावांनी विचारले.

"बाबा! रागावू नका. पण मी एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. तुम्हाला कोणालाच तो पटणार नाही याची मला खात्री आहे. पण माझाही नाईलाज आहे."

"मोनाली काय झाले? जे मनात आहे ते बोलून टाक बरं." विलास काका शांतपणे म्हणाले.

"काका मी हा जॉब नाही स्वीकारणार." मान खाली घालून मोनाली उत्तरली.

"काय..? असा वेडेपणा का पण?"

मोनालीच्या या उत्तराने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता.

"पण अगं! हाती आलेली एवढी मोठी संधी तू नाकारणार? इतका अविचारी निर्णय नको घेवूस बाळा. लोक नोकरी मिळावी  म्हणून काय काय करत आहेत आज. नोकरीसाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची त्यांची तयारी असते. मग तू तर इतक्या चांगल्या गुणांनी असे घवघवीत यश मिळवले असताना अशी दुर्बुद्धी तुला का सुचावी? कोणी काही बोलले का तुला?" विलास काकांनी शांतपणे मोनालीला प्रश्न केला.

"नाही काका, पण या जातीच्या आरक्षण कुबड्या नको वाटतात हो मला. मला विनाआरक्षण नोकरी मिळाली तर मी हसत हसत स्वीकारेल. पण आता ह्या जन्मात तरी ते शक्य नाही. कारण हा जातीयवादाचा संघर्ष मृत्यूपश्चातच सुटेल." बोलता बोलता मोनालीच्या डोळ्यात आसवांची दाटी झाली.

"मोना... वेड लागलंय का तुला? असा मुर्खपणा कोणी करतं का? मला तुझा हा निर्णय अजिबात मान्य नाही." प्रदीप काका रागातच बोलले.

"तसेही तुला इतके चांगले गुण आहेत की तुला नावाला फक्त आरक्षण मिळाले आहे. आरक्षित गुणांपेक्षा जास्त गुण आहेत तुला. त्यामुळे मनात अशी कोणतीच सल ठेवू नकोस बाळा. त्यामुळे मलाही मान्य नाही तुझा हा निर्णय. तू पुढच्या ट्रेनिंगसाठी जाणार आहेस. बाकी मला काहीच माहीत नाही." विलास काका समजुतीच्या स्वरात बोलले.

"अगं पण मोना! इतका मोठा निर्णय असा अविचाराने कसा काय घेत आहेस तू? ह्या क्षणाची किती आतुरतेने वाट पाहत होतीस तू, मग अचानक हे जात आरक्षणाचे खूळ कुठून आले तुझ्या डोक्यात?" न राहवून विमल ताईंनीदेखील कडक शब्दात विचारले तिला.

"मी सांगते काय झाले आहे नेमके ते?" माणसांच्या बैठकीत कधीही न बोलणाऱ्या प्रमिला ताईंनी आज मात्र पहिल्यांदा  त्यांचे तोंड उघडून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला नि शालिनी काकीचा त्यामुळे चेहराच पडला. काय होणार पुढे आता? या भीतीने तिचे पाय लटपटायला लागले.

"शालिनी! सांगतेस तू की मी बोलू?"

"आता माझ्यावर काय घसरताय? मला अजिबात ओढायचे नाही या सगळ्यांत, आताच सांगून ठेवते हा!" एवढे सगळे होवून देखील शालिनी काकीचा तोरा काही कमी झाला नव्हता.

"शालिनी! काय म्हणते आहे वहिनी? तुझा काही संबंध तर नाही ना या गोष्टीशी?" विलास काकांनी कडक शब्दातच शालिनी काकीला प्रश्न केला. 

"नाही ओ! माझा काय संबंध असेल आता या साऱ्यांशी?" शालिनी देखील घाबरतच उत्तरली. तिच्या चेहऱ्यावरील भीती सर्वांना स्पष्ट दिसत होती.

"मग वहिनी काय खोटं बोलत आहेत काय? वहिनी तूच सांग बरं नेमकं झालंय तरी काय?" विलास काका प्रमिला ताईंना म्हणाले.

आता प्रमिला ताई काय बोलणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून होते.

"अहो! शालिनीनेच मोनालीच्या डोक्यात हे सारे खुळ भरवले आहे. आरक्षण घेवून तर काय कोणीही पास होईल. बँकेची परीक्षा पास होणे कोण्या ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. आम्हाला आरक्षण मिळाले असते तर आम्हीही असतो आज कोणत्या तरी पदावर. हे असे काहीबाही बोलून मोनालीच्या स्वाभिमानालाच जर दुखावले जात असेल..तिने घेतलेल्या मेहनतीची थट्टा केली जात असेल..तिच्या प्रयत्नांवरच संशय घेतला जात असेल तर मलाच सांगा ती कशी तयार होईल ही नोकरी स्वीकारायला?"

"शालिनी... तू असे बोललीस का मोनालीला?" विलास काकांच्या तळपायाची आग आता मस्तकात जात होती. रागातच त्यांनी बायकोला प्रश्न केला. रागाची लाली त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती.

"नाही काका! काकी काहीच नाही बोलल्या मला. आई तुम्ही काहीतरी चुकीचे ऐकले असेल ओ! काका माझेच मन मला खात आहे ही नोकरी कशी स्वीकारू? म्हणून मी बोलले बाकी काही नाही."

"नको ग आता खोटं बोलूस! चार पावसाळे जास्त पाहिले आहेत आम्ही तुझ्यापेक्षा. प्रमिला वहिनी सून म्हणून या घरात आली ना तेव्हापासून मी तिला ओळखत आहे आणि शालिनी माझी बायको आहे तिलाही मी चांगलेच ओळखून आहे. वहिनी सारखी व्यक्ती भर माणसांत वर मान करून कधी बोलली नाही ती आज फक्त तुझ्यासाठी बोलली आणि ते पण खोटं बोलेल यावर मी तरी विश्वास नाही ठेवू शकत."

आता सगळे सत्य सर्वांसमोर होते. शालिनी काकीनेही सर्वांची माफी मागितली. कारण तिच्याकडे दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता.

म्हणतात ना सत्य कितीही लपवले तरी एक ना दिवस ते समोर आल्याशिवाय राहत नाही. अगदी तसेच शालिनी काकीचे पितळ अखेर सर्वांसमोर उघडे पडले होते. एवढे सगळे होवूनही ती मोनालीला जातीपातीवरून अजूनही हिणवतच होती. अजूनही तिने मोनालीचा सून म्हणून खऱ्या अर्थाने स्वीकार केलाच नव्हता. पण आता तिलाही तिची चूक लक्षात आली होती. "पुन्हा असे कधीही होणार नाही,"असे वचन शालिनी काकीने सर्वांसमक्ष मोनालीला दिले.

काकांनी आणि प्रदीपरावांनी मोनालीची समजूत काढली आणि तिला ट्रेनिंगला जाण्यासाठी अखेर तयार केलेच.

"हाती आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्याची जबाबदारी ही आपली स्वतःची असते. कोणी काही बोलले, एखाद्या गोष्टीवरून हिणवले म्हणून आपण आपल्या नशिबाला अशी लाथ नसते मारायची. मिळालेल्या गोष्टींचा आनंदाने स्वीकार करत स्वतःला सिद्ध करण्यासाठी उंच भरारी घेण्याचे स्वप्न मनापासून जगायचे असते."

असे अनेक लाखमोलाचे सल्ले आज घरातील प्रत्येकाकडून मोनालीला मिळाले होते.

तिचेही मन मग त्यामुळे अवकाश कवेत घेण्यासाठी दुप्पट वेगाने आता सज्ज झाले होते.

पुढे दोन दिवसांतच निखिललादेखील बोलावून घेण्यात आले. तोही अर्जंट सुट्टी घेवून लगेचच हजर झाला. बायकोच्या यशाचा सोहळा गावात सजणार होता आणि या सर्वांचा तो साक्षीदार असणार होता.

विलास काकांनी गावात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. निखिल आणि मोनाली दोघांचाही सत्कार करून त्यांचा  अविस्मरणीय असा गौरव सोहळा साजरा करण्यात आला.

"खरंच जातीपातीच्या बंधनात न अडकता मीही एक पाऊल पुढे टाकले आणि आज माझ्या सुनेने स्वतःला सिद्ध करूनच दाखवले. त्यामुळे आमच्या पाटील घराण्याचे नाव पुन्हा एकदा मोठे झाले. आज आमच्या निखिल पाठोपाठ आमच्या सूनबाईंनी देखील त्यासाठी खूप मेहनत घेतली त्यामुळे आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे."

विलासकाकांचे हे कौतुकपर भाषण ऐकताच निखिलच्या डोळ्यांत आसवांची दाटी झाली. याच क्षणाची तर तो आतुरतेने वाट पाहत होता. आज मोनालीने विलास काकांच्या नजरेत  त्याला त्याचा मान पुन्हा एकदा मिळवून दिला होता. समाधानाचे तेज आज त्या दोघांच्याही चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते.

खरंच जातीपातीच्या बंधनात न अडकता विलास रावांनी मुलांवर जो विश्वास दाखवला होता त्याचे त्यांनी आज चीज करून दाखवले होते. हे सर्व अप्रत्यक्षरीत्या विश्वनाथ काकांमुळे साध्य झाले होते. हे विसरून चालणार नाही.

पुढे मोनालीचे ट्रेनिंग पूर्ण झाले नि खऱ्या अर्थाने ती बँक मॅनेजर म्हणून तिच्या पदावर रुजू झाली.

आज खरंच मोनालीला तिच्या प्रेमाचे सासर खऱ्या अर्थाने मिळाले होते आणि यातच ती खूप समाधानी होती.

समाप्त

खरंच आजही समाजात या जाती पातीवरून अनेक विवाहांना घरातील कर्ते मान्यता देत नाहीत. बदनामीला घाबरून आणि लोक काय म्हणतील? या एकाच विचाराने मुलांना त्यांच्या भविष्याचा जोडीदार निवडायची देखील परवानगी नाकारली जाते. मुलगा किंवा मुलगी कोणत्याही जातीचे का असेनात पण समजात स्वतःच्या हिमतीवर जगण्याची जेव्हा त्यांची पात्रता असते, बुद्धीच्या जोरावर अवकाश भरारी घेण्यासाठी जेव्हा ते सज्ज होतात तेव्हा मात्र त्यांच्या निर्णयाचादेखील मोठ्या मनाने स्वीकार करायला हरकत नसावी.

धन्यवाद..

वरील कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा चुकीची माहिती प्रसारित करण्याचा मुळीच हेतू नाही. फक्त या एकविसाव्या शतकात एकीकडे देश प्रगतीची उड्डाणे घेत असताना समाज मात्र जातीपातीच्या शुल्लक गोष्टीत अडकून पडला तर त्या प्रगतीला मग काहीच अर्थ उरणार नाही.

चुकून जर कोणाच्या भावना दुखावल्याच तर मोठ्या मनाने माफी असावी.

©® कविता वायकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//