प्रेमाचे सासर भाग १२

नशिबानेच मिळते प्रेमाचे सासर.

विलास काकांकडून मोनालीला अभ्यासासाठी आज खूप मोठे प्रोत्साहन मिळाले होते. त्यांनतर शालिनी काकीने तिला जरी खूप काही सुनावले असले तरी आज मात्र काकांच्या त्या एका वाक्याने तिला बळ मिळाले होते.


उराशी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरविण्याची जिद्द तिच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर मात्र मोनाली आणखी ताकदीनिशी कामाला लागली.

"कितीही आले अडथळे तरी ते जिद्दीने पार करायचे..
एवढ्या तेवढ्या गोष्टीने खचून नाही जायचे..
वाट अडवणारे अडवतच राहतील..
म्हणून काय थोडीच ना ते आपले नशीब बदलवतील?
प्रयत्न आणि जिद्द हे तर आपल्याच हाती असते..
म्हणूनच तर जिद्दीला प्रयत्नांच्या  साथीने
उंच भरारी घेण्या नेहमी सज्ज ठेवायचे.."

त्याचक्षणी मोनालीने मनाशी निर्धार पक्का केला, "शालिनी काकीने आपल्या मार्गात कितीही काटे पेरले तरी त्यातून युक्तीने मार्ग काढायचा. तिला न दुखावता आपण आपल्या धेय्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतच राहायचे. भलेही मग रात्रीचा दिवस करण्याची वेळ आली तरीही चालेल."

आज विलास काकांमुळे मोनालीच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले होते. यशाचे नवे क्षितीज तिला जणू खुणावत होते. मनातील आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

एक वेळ अशी होती की काका जिला सून मानण्यास तयार नव्हते, तिलाच आज लेक मानून त्यांनी त्यांच्या बायकोलाच खूप काही सुनावले. काकांच्या याच विश्वासाला तिला आता खरे उतरायचे होते. निखिल आणि काकांमधील नातेही तिला पुन्हा एकदा पूर्ववत करायचे होते आणि हीच ती योग्य वेळ होती. म्हणूनच देवबाप्पाचा आशीर्वाद घेवून ती कंबर कसून कामाला लागली. मिळेल तसा वेळ ती सत्कारणी लावत होती.

खूप दिवसांपासून उराशी बाळगलेले स्वप्न आता सत्यात उतरण्याची वेळ आली होती.

बघता बघता अखेर तो दिवस उजाडला.
"काका मला आशीर्वाद द्या." म्हणत मोनाली विलास काकांच्या पायाशी झुकली. क्षणभर त्यांनाही भरून आले.

"ज्या मुलीला आपण झिडकारत होतो ती मात्र मनात कोणताही राग न ठेवता आपल्याला आपल्याच मोठेपणाची तसेच कर्तेपणाची जाणीव करून देत आहे. खरंच लहानांकडून देखील बऱ्याचदा खूप काही शिकण्यासारखे असते." विचार करता करता विलास काकांचे डोळे पाणावले.

"यशस्वी भव:" म्हणत विलास काकांनी देखील तिच्या डोक्यावर हात ठेवत तिला आशीर्वाद दिला.

लग्नाच्या वेळी काकांनी दिलेल्या आशीर्वादात आजच्याइतका आपलेपणा आणि प्रेम नव्हते. जे की आज मोनालीला प्रकर्षाने जाणवले. आज खऱ्या अर्थाने ती भरून पावली.

काकांबरोबरच तिने घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेतला नि पूर्ण तयारीनिशी मोनालीने बँकेची परीक्षा दिली. घरातील सर्वांचे आशीर्वाद तसे होतेच तिच्या पाठीशी पण,त्याबरोबरच तिचा आत्मविश्वास देखील तिला तिच्या धेय्यापर्यंत पोचवण्यासाठी खूपच कामी येणार होता.

कोणी काही का म्हणेना शेवटी आपले यश हे आपल्याच हाती असते. कारण जिद्द आणि मेहनतीने त्याला विजयाची सोनेरी झालर जी चढवता येते.

निखिलला तर पूर्ण विश्वास होता बायकोच्या प्रामाणिक प्रयत्नांवर. पण तरीही आता सर्वांनाच प्रतीक्षा होती त्या विजयी क्षणाची आणि तितकाच विश्वासदेखील.

बघता बघता तो दिवसही उजाडला. सगळ्यांनाच मोनालीच्या रिझल्टची प्रतीक्षा होती. ती स्वतः देखील खूपच आतूर झाली होती तिचा रिझल्ट ऐकण्यासाठी.

"पाहुयात आता मॅडम काय दिवे लावतात ते? बँकेची परीक्षा पास होणं कोण्या ऐऱ्यागैऱ्याचे काम नव्हे आणि झालीच जरी पास तरी जातीचे कन्सेशन येईलच की कामी. तसे तर काय कोणीही पास होईल मग. नाहीतर आम्ही नसतो का आज एखाद्या पदावर."

मोनालीला काय वाटेल? याचा क्षणभरही विचार न करता सवयीप्रमाणे शालिनी काकी खोचकपणे बोलून गेली. प्रमिला ताईंच्या मनाला खूपच लागली ही गोष्ट. कारण आजही या घरातील शिकलेले लोक जातीभेदाच्या बुरसटलेल्या विचारसरणीतून बाहेर येण्याचे साधे कष्ट घेतानाही दिसत नव्हते.


शालिनी काकीचे बोलणे अंगावर वीज कोसळावी आणि शरीरात एकदम आगीचा डोंब उसळावा अगदी तसे मोनालीच्या मनावर आघात करून गेले.

"देवा! काय चूक आहे रे माझी यात? जन्माला येतानाच हा जातीचा लेबल वारसा हक्काने मला मिळाला. प्रेम मिळवताना देखील त्याची आडकाठी निर्माण झालीच आणि आता नोकरी मिळवताना देखील तीच अवस्था?"

मोनालीच्या मनातील विचारांचे वादळ सैरावैरा धावत सुटले. निखिलच्या साथीने तिच्या आयुष्याला दिशा तर मिळाली होती खरी पण अजूनही वादळात सापडलेल्या दिशाहीन नौकेसारखी तिची अवस्था झाली होती.

देश कितीही बदलला, देशाने कितीही प्रगतीची गरुडझेप घेतली तरी लोकांच्या मनात खोलवर रुतलेल्या या बुरसटलेल्या विचारांचे काय? ते कसे बदलणार होते ते देवच जाणे?

"सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता, उच्च-नीच भेदभाव न मानणे, सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मता हे सर्व फक्त अभ्यासापुरते आणि पुस्तकापुरतेच मर्यादित आहे,"याचेच मोनालीला वाईट वाटत होते.

जातीयवादाने आजही कित्येक घरे पोखरली गेली आहेत. लोकांची आर्थिक, सामाजिक प्रगती तर झाली पण वैचारिक प्रगतीचे काय? ती मात्र आजही शून्यच होती.

"नशिबाने असे हे प्रेमाचे सासर मिळाले पण अजूनही या घरातील काही लोक मला आपलं मानायला तयारच नाहीत. आता तर माझ्या मेहनतीवरच शंका घेतली जात आहे. आता रिझल्ट जरी माझ्या मनासारखा आला तरी त्याचा इतका आनंद नसेल."

मोनाली हतबल होवून विचार करतच राहिली. डोळ्यांत आसवांची दाटी झाली होती. आता निखिलची उणीव तिला खऱ्या अर्थाने भासत होती. त्याच्या कुशीत शिरून मनसोक्त रडावे असे क्षणभर तिच्या मनात आले. पण सध्या तिच्या नशिबी तेही सुख नव्हते. वाटतो तितका मुळीच सोप्पा नाही हा सारा प्रवास.


एकीकडे विजयाची आस तर दुसरीकडे तो विजय हाती येण्याआधीच त्याला आपल्याच माणसांकडून लागलेले जातीयवादाचे गालबोट. असा विजय तो काय कामाचा मग?

पावलापावलावर पाय खेचण्यासाठी लोक जणू सज्जच होते.  पण मोनाली ही इतक्यात हार मानणाऱ्यातील मुळीच नव्हती. रिझल्ट काहीही येवू दे पण पुढे काय करायचे हे तिने मनाशी पक्के केले होते.

अखेर तो क्षण आला. मोनालीच्या विजयाचा सोहळा घरी सजला. मोनालीने उत्तम गुणांनी यश संपादन केले होते. स्टेट बँकेच्या मॅनेजर पदी तिची निवड झाली होती. पण तिच्यासाठी त्या यशाचे बिलकुल कौतुक नव्हते. तिच्या नजरेत फक्त जातीच्या आरक्षण कुबड्या हाती घेवून अगदी सहज मिळालेला तो एक साधा कागदच होता. तिला स्वतःचीच त्यामागची मेहनत बिलकुल दिसत नव्हती. डोळ्यांसमोर नाचत होत्या त्या फक्त आरक्षणाच्या कुबड्या आणि कानी घुमत होते ते शालिनी काकीचे काळजाला घरे पाडणारे कठोर शब्द.

एकीकडे सगळेजण तिचे कौतुक करण्यात गुंतले होते. "विलास काकांची सून आज बँक मॅनेजर झाली," म्हणून त्यांनाही शुभेच्छांचे फोन सुरू होते. काकांची कॉलर आज खऱ्या अर्थाने ताठ झाली होती. त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

निखिलचाही आनंद आज गगनात मावत नव्हता. बायकोचे कौतुक करण्यासाठी तो आज घरी नव्हता, याचीच सल त्याच्या मनाला बोचत होती. अगदी असाच आनंद झाला होता जेव्हा निखिल फॉरेस्ट ऑफीसर झाला तेव्हा. संपूर्ण पाटील घराणे तेव्हादेखील आनंदात न्हाऊन निघाले होते आणि आज पुन्हा एकदा मोनालीमुळे तो क्षण सर्वांच्या वाट्याला आला होता. दुरुनच मग त्याने आपल्या लाडक्या बायकोवर प्रेमरुपी शुभेच्छांचा वर्षाव केला. तिनेही वरवर आनंद दाखवत नवऱ्याच्या शुभेच्छांचा स्वीकार केला खरा पण मनात मात्र विचारांचा हलकल्लोळ सुरू होता.

आठच दिवसांत मोनालीला ट्रेनिंगसाठी हजर राहावे लागणार होते. प्रमिलाताई आणि माधवरावांचा जणू काळच उजाडला होता. आज पाटील घराण्यातील मोनाली ही पहिली स्त्री आणि त्यातही पहिलीच सून जी की घराबाहेर पडून नोकरी करणार होती. त्यामुळे शालिनी काकी आणि प्रतिभा काकी सोडता सर्वांनाच तिचा खूपच अभिमान वाटत होता.

शालिनी काकीची खोचक नजर मोनालीला राहून राहून खायला उठत होती. काकीचे शब्द तिच्या मनाला इतके लागले होते की आता मिळालेल्या यशाचे तिला अजिबात अप्रूप वाटत नव्हते. त्यामुळेच मोनालीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला.

क्रमशः

काय असेल आता मोनालीचा निर्णय? जाणून घेऊयात पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all