माहेरी असताना रात्री कितीही जागून अभ्यास केला तरी दुसऱ्या दिवशी लवकर उठायचे कोणतेही बंधन नसायचे. अभ्यासदेखील त्यामुळे मन लावून होत होता. पण सासरी तसे नाही वागता येत.
सासरचे लोक कितीही समजून घेणारे असले तरी सून म्हणून तिचे मन तिला नेहमी सुनेच्या मर्यादांची जाणीव करून देत असते.
विचार करता करता क्षणभर मोनाली भूतकाळात रमली. आई वडिलांकडे असतानाचे दिवस तिच्या नजरेसमोर फेर धरून नाचू लागले. नकळतपणे गालावर हास्यकळी उमलली. तितक्यात तिचा फोन वाजला नि तिच्या विचारांची तंद्री भंग पावली
निखिलचा फोन पाहून तिचा चेहरा खुलला. घाईतच मग तिने फोन उचलला.
"काय गं अभ्यास करत आहेस?" मोनाली काही बोलायच्या आतच पलीकडून आवाज आला.
"हो अरे! अभ्यासच करत होते."
"बरं कर मग मी करतो नंतर कॉल."
"नाही अरे बोल ना!"
"काय केले मग आज दिवसभर मॅडमने?"
"अरे आज उडीद पापड बनवले. त्यामुळे दुपारी वेळच नाही मिळाला अभ्यासाला. म्हणून मग आता बसले होते." कोणताही विचार न करता मोनाली पटकन् बोलून गेली.
परंतु, आता याचे काय परिणाम होतील? याची तिला कल्पना होतीच.
परंतु, आता याचे काय परिणाम होतील? याची तिला कल्पना होतीच.
"यासाठी तुला घरी ठेवले मोना! याआधी तुझ्याशिवाय पण पापड लाटले जात होतेच ना घरी? असा दिवसभर टाईम वेस्ट करतेस आणि रात्री मग जागरण करत बसतेस. काही गरज आहे का त्याची? आणि घरात इतर बायकाही आहेत ना की तुझ्याशिवाय झालेच नसते पापड?"
"सॉरी ना अरे! पण आज सुमनताई आणि आईपण घरी नव्हत्या. म्हणजे अजूनही नाही आल्या त्या. कदाचित उद्याच येतील आणि मीना काकी शेतात गेल्या होत्या. मुलीही कॉलेजला गेल्या होत्या,मग त्यामुळे मला शालिनी काकीला मदत करणे भागच होते."
"अगं पण आज कुणीच घरी नाही म्हटल्यावर पापडांचा घाट घालायची गरजच काय होती?"
"आता मी काय बोलणार यात?"
"ह्मममम! तू काही बोलूच नकोस! तू बोलत नाहीस याचाच फायदा घेतला जातोय. हे कसं कळत नाही गं तुला? गरज असेल तिथे नाही म्हणायला शिक जरा."
"मोनाली झाला का ग अभ्यास तुझा? थोडी मदत करतेस का स्वयंपाकात?" तितक्यात शालिनी काकीने तिला आवाज दिला. आता मोनाली थोडीच ना नाही म्हणणार होती.
"हो आलेच." म्हणत मोनालीने लगेचच होकार दर्शवला. निखिल कितीही म्हणत असला की "नाही" म्हणायला शिक पण बाईच्या जातीला सासरी मर्यादांची बंधने पाळणे बंधनकारक असतेच. चुकून जर त्यांचे पालन नाहीच झाले तिच्याकडून तर तिच्या संस्कारांची चार चौघात पायमल्ली झालीच म्हणून समजा.
"जावू दे मोना ठेव फोन. तुला कितीही पोटतिडकीने सांगितले तरी तुझेच खरे करणार तू. आताही काही गरज नव्हती काकीला हो म्हणायची."
"अरे पण! नाही तरी कसं म्हणायचं तूच सांग ना? आणि तसंही आज त्या एकट्याच आहेत म्हणून मग त्यांना मदतीची अपेक्षा असणारच ना रे!"
"हा असा टाइमपास करत बसशील ना तर बँक एक्झाम क्लिअर होण्याचे स्वप्न विसरून जा. कामेच करत बस तू. नाही साध्य होणार मग काही."
रागानेच निखिलने मग फोन कट केला.
रागानेच निखिलने मग फोन कट केला.
मोनाली मात्र आता पुरती पेचात सापडली होती. काय करावे आणि कसे वागावे? तेच तिला समजेना. सासूचे ऐकले तर नवऱ्याला राग येईल आणि नवऱ्याचे ऐकले तर सासूला. आता नेमके वागायचे तरी कसे? या विचाराने ती सुन्न झाली.
नाईलाजास्तव मग हातातील पुस्तक बाजूला सारत ती स्वयंपाकघरात आली.
"काकी! काय करू मी?" मोनालीने शालिनी काकीला प्रश्न केला.
"तेवढी कणीक भिजवून ठेव. तोपर्यंत मी कुकर लावते. त्यानंतर मग मी चपात्या केल्या की तू भाज पण त्याआधी इथे झाडू मारून घे." एक म्हणता शालिनी काकी चार कामे एकाच दमात सांगून मोकळी झाली.
सुमनताईंची आई आजारी असल्यामुळे त्या त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. तर प्रमिला ताई बहिणीच्या नातीच्या बारशाला. मुलींची देखील परीक्षा सुरू होती. त्यामुळे त्याही किचनकडे फिरकल्या नाहीत. विश्वनाथ काकांच्या पत्नीचे शालिनी काकीसोबत बोलणे व्हायचे नाही त्यामुळे शालिनी काकी किचनमध्ये असली की ती किचनकडे फिरकायची नाही. ती आधीपासूनच ह्या सगळ्यांपासून चार हात लांबच राहायची. त्यामुळे आज किचनची आणि रात्रीच्या स्वयंपाकाची सर्व जबाबदारी शालिनी काकीवर होती.
तिच्याकडेही मग कारणच होते आता मोनालीला कामाला जुंपायचे.
दोघी सासू सुनेने मिळून मग स्वयंपाक केला. घरातील पुरुष मंडळींची जेवणेदेखील आटोपली. त्यानंतर भांड्यांचा खच जणू आ वासून मिश्कीलपणे हसत होता मोनलीवर.
मोनालीच्या डोळ्यात पाणीच आले. क्षणभर तिला माहेरच्या आठवणीने वेडेपिसे केले.
"हेच काम जर आईने सांगितले असते तर?" स्वतःच्याच मनाला तिने प्रश्न केला.
"मी नाही करणार आ आई! मला अभ्यास करायचा आहे म्हणत तासनतास पुस्तक उघडून बसले असते. पण आता तेही नाही करू शकत. त्यात आई आणि सुमनताई असत्या तर ही अशी वेळ त्या दोघींनीही माझ्यावर येवूच दिली नसती.
दोन्ही सासवांच्या आठवणीत मोनालीचे डोळे पाण्याने डबडबले.
इतक्या दिवसांचा सारा बदला जणू शालिनी काकी एकाच दिवसात घेवून मोकळी झाली होती.
इतक्यात विलास काका आले, "काय ग बाकीचे सगळे कुठे गेले? तू एकटीच का करत आहेस काम?" विलास काकांनी मोनालीला प्रश्न केला.
काय बोलावे ते तिलाही समजेना त्यामुळे क्षणभर तीही गोंधळलीच. "आहेत काका आत. मुली अभ्यास करत आहेत आणि काकी काहीतरी काम करत असतील."
विलास काकांनी शालिनी काकीला आवाज दिला. रागातच त्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला.
"हे काय सुरू आहे? निदान परीक्षा होईपर्यंत तरी तिला अभ्यासाला मोकळीक द्या. किती वेळ झाला ती किचनमध्येच आहे आणि अजूनही ही कामे संपेनात. आपली लेक असती तर तू अशीच वागली असतीस का तिच्यासोबत? थोडे दिवस सहकार्य करा तिला." म्हणत विलास काका आत निघून गेले.
विलास काकांचे वागणे, शालिनी काकीसाठी अनपेक्षित होते.
"ये बाई राहू दे ते काम. करते मी माझे. तसेही नशीब घेऊनच जन्माला आली आहेस तू. काय जादू केली आहेस सर्वांवर देवच जाणे?"
रागानेच शालिनी काकी बोलली आणि मोनालीच्या हातातील भांड्यांची घासणी जवळपास तिने ओढूनच घेतली.
" काकी राहू द्या ना! घासते मी..थोडेच राहिलेत भांडी."
"काही नको बाई, आण इकडे. आज माझाच नवरा मला बोलला. हळुहळू सगळेच जण माझ्याच विरोधात जात आहेत. तुझ्या तर मनासारखेच झाले असेल ना?"
"नाही ओ काकी. काहीही काय?"
" मला नकोय कोणते स्पष्टीकरण जा तू. तुझा अभ्यास महत्त्वाचा आहे बाई. काम काय होतच राहील आणि तसेही तुझ्या सासवा आहेतच की तुझ्या हाताखाली राब राब राबायला."
जिव्हारी लागेल असे शालिनी काकीने खूप सुनावले मोनालीला.
पण आज पहिल्यांदा विलास काकांनी तिच्या अभ्यासाला प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे मात्र तिच्या मनाला वेगळेच समाधान मिळाले होते.
पण आज पहिल्यांदा विलास काकांनी तिच्या अभ्यासाला प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे मात्र तिच्या मनाला वेगळेच समाधान मिळाले होते.
काहीही न बोलता मोनाली तिच्या रूममधे निघून गेली. कारण आता काकी बोलू देईल असे वाटत नव्हते.
क्रमशः
आता पुढे काय होणार? जाणून घेवूयात पुढील भागात.
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा