Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

प्रेमाचे सासर भाग १०

Read Later
प्रेमाचे सासर भाग १०


निखिल असताना सासरी नवीन घरात वावरताना मोनाली एकदम बिंदास होती. पण आज तो त्याच्या कामावर रुजू झाला नि मोनाली अचानक बुजली. आधीच लग्न हे अशा परिस्थितीत झालेले, त्यामुळे आता खूपच दडपण वाटत होते तिला सर्वच गोष्टींचे.

दिवसभर कशातच तिचे मन लागेना. निखिलच्या आठवणीत तिला सारखे रडू येत होते. त्यात राहून राहून तिला आई वडिलांची आठवण सतावत होती.

"आज आईकडे असते तर मनमोकळेपणाने रडू तरी शकले असते. इथे मन मोकळं करतानाही बंधने येतात. भरल्या घरात रडायची देखील सोय नाही." मगाचे प्रतिभा काकीचे बोलणे तिच्या मनाला खूपच लागले होते.

परंतु, ठरवून देखील मनाला ती आवरू शकत नव्हती.  आसवांचा पूर देखील थांबवू शकत नव्हती. भावनांना आवरणे कठीण होत होते तिला. राहून राहून निखिलचे बोलणे तिच्या कानात गुंजारव करत होते.

"निखिल चल म्हणत असतानाही मी का गेले नाही?" याचीच तिला आता खंत वाटत होती.

कोणतीही नवीन नवरी नवऱ्याच्या सहवासात सासरी हळुहळू रुळत जाते. एक एक करत घरातील लोकांची मने ती जिंकते. पण ज्याच्यामुळे ती सासरी थोडीफार रुळली होती, त्याचे आजूबाजूला असणे तिला आधार वाटायचे; तोच आज तिच्यासोबत नव्हता.

निखिल कुठे जातो नाही तेच प्रतिभा काकीने लगेचच मोनालीला चार शब्द सुनावले. अर्थातच तो तिचा स्वभावच होता म्हणा, पण निखिल घरात असता तर तिची एवढी हिम्मत नक्कीच झाली नसती.

आता अजून मोनालीच्या पुढ्यात काय वाढून ठेवले होते देवच जाणे!

प्रमिला ताईंनी मात्र तिचे मन जाणले. त्या जेव्हा लग्न करून सासरी आल्या होत्या तो दिवस त्यांना आठवला. त्यांच्या सासूबाईंचा तो करारी बाणा पाहून त्या तर पुरत्या हादरल्या होत्या. आधीच त्यात त्याकाळी नवऱ्याशी शब्दाने बोलायची पण सोय नव्हती. पावलापावलावर सुनेची परीक्षा घेतली जायची. पण नशीब आता तसे काही राहिले नाही. नाहीतर प्रतिभा काकी आणि शालिनी काकीने तिला सुखाने जगू दिले नसते.

"मोनाली चल जेवून घे बाळा." प्रमिला ताईंच्या हाकेने मोनालीच्या विचारांनी तंद्री भंग पावली.

प्रमिला ताईंनी मोनालीला बाळा म्हणून हाक मारली नि तिला लागलीच तिच्या आईची आठवण झाली. तिच्या डोळ्यात पुन्हा आसवांची दाटी झाली.

"आई! का कोण जाणे पण जेवायची इच्छाच होईना ओ."

"असं नको करू गं.. चल ऊठ बरं... जेवून घे आणि थोडावेळ आराम कर. मी दादांना सांगते तुझ्या बाबांना फोन करून बोलावून घ्यायला. चार दोन दिवस आईकडे जावून ये म्हणजे मग बरे वाटेल तुला."

"आई! खरंच जाऊ का ओ? नाहीतर नकोच! पुन्हा प्रमिला काकी काहीतरी टोमणा मारतील. नवरा कुठे पोहोचत नाही तोच बायको माहेरी निघून गेली, असं नको त्यांनी बोलायला."

"अगं! असतो एखाद्याचा स्वभाव. त्याला कोण काय करणार ना? जास्त मनावर नाही घ्यायचे तिचे बोलणे आणि तशीही दोन दिवसांत तीही जाणारच आहे. तू नको काळजी करुस आणि तिच्या बोलण्याकडे तर अजिबात लक्ष नको देवूस. चुकून बोललीच ती काही तर एका कानाने ऐकायचे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे. असे वागले तरच अशा एकत्र कुटुंबात तुझा निभाव लागेल बरं...नाहीतर अशा छोट छोट्या गोष्टींचा मनावर परिणाम करून घेत बसलीस तर टोचून बोलणाऱ्या लोकांना मात्र आणखीच आनंद मिळवून देशील त्यामुळे."

"बरं चल..उठ आता, मलाही खूप भूक लागली आहे." हसूनच प्रमिला ताई बोलल्या.

सासूने सांगितलेल्या चार समजुतीच्या गोष्टींमुळे मोनालीला आता खूपच छान वाटत होते. मनावरचे खूप मोठे ओझे हलके झाल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते. निखिलच्या माघारी आपल्याला जीव लावणारे अनेकजण आहेत या घरात, याची तिला आता खात्री पटली होती.

तोंड धुवून ती मग जेवायला आली. प्रतिभा काकी आणि शालिनी काकीची रागीट नजर तिच्या मनाला क्षणभर वेदना देवून गेली खरी, पण लगेचच तिला प्रमिला ताईंचे बोलणे आठवले.

"ह्या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले तरच तुझा या एकत्र कुटुंबात निभाव लागेल."

मोनालीनेही मग अगदी तसेच केले. त्यामुळे तिलाही मनातून खूपच छान वाटले.

थोड्या वेळाने माधवरावांनी प्रदीपरावांना फोन करून बोलावून घेतले. लेकीला दोन दिवस माहेरी घेवून जायला सांगितले.

ठरल्याप्रमाणे मोनालीचे बाबा आले. जरी नेहमीचेच त्यांचे येणेजाणे असले पाटलांच्या घरी तरी आज मोठ्या अदबीने त्यांचे स्वागत झाले होते. कारण आता व्याही जे झाले होते ते पाटील घराण्याचे.

चहापाणी आटोपून मोनाली वडीलांसोबत तिच्या माहेरी गेली. आईला भेटून तिलाही आनंद झाला. लेकीला कुठे ठेवू नि कुठे नाही? असेच झाले होते विमल ताईंना.

तिकडे सुनेला माहेरी पाठवले म्हणून प्रमिला ताईंना मात्र खूप सुनावले प्रतिभा काकी आणि शालिनी काकीने.

"आहे माहेर जवळ म्हणून असे उठ सुठ माहेरी पळायचे का? आताच तर आली होती जाऊन, चार दिवस तरी झाले का?" प्रतिभा काकी रागातच बोलली.

"अगं! मीच जा म्हणून सांगितले तिला. निखिल गेल्यावर तिच्या मनाला वेदना झाल्याच असतील ना? आपण नाही समजून घ्यायचं मग कुणी घ्यायचं?" प्रमिला ताईंनी मनातील गोष्ट बोलून दाखवली.

"तुम्हीच घ्या तिला डोक्यावर आम्हाला नाही तेव्हढा वेळ आणि आमच्याकडून तशी अपेक्षाही ठेवू नका." शालिनी काकी चरफडतच बोलली आणि आत निघून गेली.

दोन तीन दिवस माहेरी थांबून मोनाली पुन्हा तिच्या सासरी आली. येताना अभ्यासाची सर्व पुस्तके ती सोबत घेवून आली. ती येईपर्यंत प्रतिभा काकीची फॅमिली निघून गेली होती. पण आता ती नाही तर शालिनी काकी होतीच की तिची कमी भरून काढायला.

आता खरी कसरत होती मोनालीची. पण अभ्यासाचे तिने योग्य नियोजन केले. निखिलदेखील वेळ मिळेल तसा तिला हवा तसा गायडन्स करतच होता. त्याचे मार्गदर्शन तिच्यासाठी लाखमोलाचे होते. अभ्यास सांभाळून ती घरकामाला देखील हातभार लावायची अधूनमधून. प्रमिला ताई आणि सुमन ताई होत्याच तिच्या अभ्यासाची काळजी घ्यायला.

मोनाली रिकामी दिसली रे दिसली की शालिनी काकीच्या कामांची मात्र लिस्ट तयारच असायची.

कुठे झाडूनच घे, फरशी पुसून घे, भांडीच घास, दळण करू लाग, मी भाकरी करते तू भाज ही आणि अशी अनेक कामे त्या मोनालीला सांगत. मोनालीदेखील आनंदाने सर्व काम करून मोकळी व्हायची आणि रात्री जागरण करून मग अभ्यास करत बसायची. तसा तिला कामाचा कंटाळा नव्हताच कधी. हा! फक्त सध्यातरी कामाबरोबरच अभ्यासही तितकाच महत्वाचा होता तिच्यासाठी. शालिनी काकीलाही जणू अंदाजच आला होता, गोड बोलून मोनालीकडून कसे काम करून घ्यायचे याचा.

अप्रत्यक्षरीत्या मोनालीला अभ्यासापासून डायवर्ट करण्याचा शालिनी काकीचा प्रयत्न सुरू होता. कारण घरात सध्या तिचीच सत्ता होती.

राहून राहून एकच भिती शालिनी काकीच्या मनाला सतावत होती. "मोनाली जर पुढे गेली तर घरात तीच वरचढ ठरेल. पुढे जावून तिचीच सत्ता निर्माण होईल घरात. त्यामुळे आपली किंमत मात्र शून्य होईल."

ह्या अशा नकारात्मक विचारांनी शालिनी काकीचे मन पोखरले होते. म्हणूनच तर मोनालीबद्दल तिच्या मनात इतके विष भरले होते.

क्रमशः

होईल का शालिनी काकीचा मनसुबा सफल? जाणून घेवूयात पुढील भागात.

©®कविता वायकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//