Feb 22, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

प्रेमाचे सासर भाग ९

Read Later
प्रेमाचे सासर भाग ९


प्रेमाचे सासर आणि सासरच्यांचे प्रेम या साऱ्यांत मोनाली माहेरलाही विसरली होती जणू. घरातील एक दोन मंडळी सोडली तर सगळेच जण तिला खूपच जीव लावत होते. मोनालीचे भाग्यच म्हणावे तिला असे सासर मिळाले होते.

बघता बघता निखिलची एक महिन्याची सुट्टी संपत आली. आता पुन्हा त्याला कामावर रुजू व्हावे लागणार होते. पुढच्या एक दोन दिवसांतच त्याला निघावे लागणार होते.

निखिल जाणार या जाणीवेनेच मोनाली उदास झाली आणि तसे होणे स्वाभाविकच होते. सासर कितीही प्रेमाचे असले तरी निखिलशिवाय ते अपूर्ण होते.

आदल्या दिवशी निखिलने बॅग भरायला घेतली. मोनालीच्या डोळ्यांत मात्र अश्रू तरळले. निखिलचेही पाय आता जड होत होते. ह्यावेळी पहिल्यांदा त्याला जाण्याची इच्छाच होईना.

ओठांवर आलेले शब्द जागेवरच विरत होते. डोळ्यांतील आसवांना देखील दोघांनीही कितीतरी वेळ थोपवून धरले होते. गेल्या एक महिन्याचा प्रवास झरझर दोघांच्याही डोळ्यासमोर तरळला. सुखाचा प्रत्येक क्षण दोघांच्याही नजरेसमोर फेर धरून नाचू लागला.

बघता बघता मोनालीच्या डोळ्यांतील अश्रूंनी त्यांची सीमा पार केली आणि न राहवून ते गालावर ओघळलेच. झटकन तोंड फिरवून निखिलच्या दृष्टीस पडण्याआधीच मोनालीने  त्यांना अलगद टिपले.

खूप लपविण्याचा प्रयत्न करूनही डोळ्यांतील आसवांनी अखेर धोका दिलाच. हातातील काम सोडून निखिल बायकोजवळ गेला. प्रेमाने तिला मिठीत घेतले. आता मात्र मोनालीच्या अश्रूंचा बांध फुटला.

"ये वेडाबाई! अगं, रडतेस काय अशी लहान मुलासारखी?" हलकेच तिची हनुवटी तर्जनीने टेकू देत त्याने उचलून धरली. दुसऱ्या हाताने तिच्या डोळ्यातील पाणी त्याने अलगद टिपले.

"माझ्याकडे बघ एकदा. तू रडलीस तर मलाही रडू येईल आ आता." निखिल लाडीक स्वरात बोलला.
तशी त्याच्या कमरेभोवतीची मिठी तिने आणखीच घट्ट केली. त्यालाही मग क्षणभर भरून आले.

"तू येतेस का मग माझ्यासोबत?"

"काही नको. तुला माहितीये माझी बँकेची एक्झाम आहे पुढच्या महिन्यात, मला तुझ्यासोबत येता येणार नाही म्हणून मुद्दाम म्हणत आहेस ना तू?"

"एवढे तर कळते ना, मग कशाला रडतेस बरं. पण तुझी खरंच इच्छा असेल तर खरंच चल. तुला याआधीही म्हणालोय ना मी."

"खूप इच्छा आहे रे पण सध्या नाही येवू शकत ना मी तुलाही माहित आहे ते. पण तुझ्याशिवाय इथे एकटी कशी राहू मी? तेच समजेना झालंय."

"अगं! एकटी कुठे? आई आहे, ताई आहे, काकी, अपर्णा, अपेक्षा तुझी लाडाची सगळीच माणसे आहेत की इथे. अगदी माझ्यापेक्षाही जास्त तुला जीव लावणारी."

"पण फक्त तू नाहीस त्याचं काय?"

"त्याचं काय आहे ना..सध्या आपल्यासाठी तुझा अभ्यास महत्त्वाचा आहे की नाही? शिकून फक्त चपात्याच लाटायच्या आहेत का? बघ बरं...ती प्रतिभा काकी रोज कामाला लावेल नाहीतर तुला."

निखिलच्या या वाक्यावर मोनालीही खुद्कन हसली.

"त्यामुळे म्हणतोय फक्त अभ्यासावर फोकस कर. चांगला मन लावून अभ्यास कर. ज्या ज्या लोकांनी जातीपातीवरून तुला हिणवले ना त्या सर्वांना दाखवून द्यायची आता हीच खरी वेळ आहे. नावे ठेवणारेच कौतुक करायला पुढे सरसावतात की नाही बघ तेव्हा. विलास काकांनाही त्यावेळी खूप अभिमान वाटेल बघ तुझा आणि माझी निवड कशी योग्य आहे याचीही जाणीव होईल मग तेव्हा त्यांना."

निखिलच्या या बोलण्याने मोनालीच्या अंगात वेगळीच ऊर्जा संचारली. नकारात्मकतेच्या गर्तेतून ती अचानक बाहेर आली. त्याच वेळी तिने मनाशी निर्धार पक्का केला, "काहीही झाले तरी मला जगासाठी नाही तर फक्त विलास काकांसाठी जिंकायचे आहे. त्यांना अभिमान वाटेल असे काहीतरी करून दाखवायचे आहे."

दुसऱ्या दिवशी निखिलने घरातील सर्वांचा आशीर्वाद घेतला.  अजूनही विलास काका मनातून कुठेतरी नाराज होते त्याच्यावर, हे त्याला स्पष्ट जाणवले. पूर्वीसारखा मोकळेपणा आता त्यांच्या बोलण्यात उरला नव्हता. निखिलदेखील त्यामुळे अपराधी पणाची भावना मनात ठेवूनच वावरत होता त्यांच्यासमोर. काकांचा आशीर्वाद घेवून तो घराबाहेर पडला.

भिंतीला टेकून उभ्या असलेल्या मोनालीवर त्याने चोरटा कटाक्ष टाकला. मोनालीचा पडलेला चेहरा आणि पाण्याने डबडबले डोळे यांचा तो सामनाच करू शकत नव्हता.

"माझ्या माघारी वहिनीकडे लक्ष दे. तिला काय हवं नको ते बघ. काही लागलं तर आणून दे." जाता जाता निखिलने बहिण अपेक्षाच्या कानात सांगितले.

तिनेही हसून मान डोलावली.

"मोनालीला अभ्यासासाठी वेळ द्या. तिला काम सांगितले तर ती नाही म्हणणार नाही. ती नुसतेच काम करत राहील." असे प्रमिला ताई आणि सुमन ताईलाही निखिलने आधीच सांगून ठेवले होते.

"आम्ही देवू लक्ष तू काळजी करू नकोस." दोघींनीही त्याला विश्वासपूर्ण शब्दांची हमी दिली.

सर्वांचा निरोप घेवून जड पावलांनी निखिल अखेर गाडीत बसला. त्याच्या मनाला वेगळीच हुरहुर लागली होती.

निखिलच्या पाठमोऱ्या गाडीकडे क्षणभर मोनाली पाहतच राहिली. शरीरातून प्राण दूर जात आहेत असेच तिला काही क्षण वाटले. पण परिस्थितीचे भान ठेवून मनाला आवर घालत तिने स्वतःला सावरले. तो दिवस दोघांसाठीही खूप क्लेशदायक होता. कशातच मन लागेना दोघांचेही. पूर्ण प्रवासात निखिल एकमेकांसोबतचे फोटो पाहून मनाचे समाधान करून घेत होता. बायकोचा विरह त्याला सहन होत नव्हता.

"मोनालीला सोबत आणायला पाहिजे होते." असे राहून राहून त्याचे मन त्याला सांगत होते."

तिकडे मोनालीची देखील अगदी अशीच अवस्था झाली होती.
"उगीच मी थांबले, मी पण जायला हवे होते निखिलसोबत." असे तिलाही मनातून वाटत होते. निखिलच्या आठवणीत तिला रडूच आवरेना.

तिच्या मनाची अवस्था समजून घेत अपेक्षाने तिची समजूत काढली.

"रडू नकोस ना ग वहिनी. आम्ही आहोत ना सगळे. आजच्या दिवस तुला असाच त्रास होईल. अगं दादा असा सुट्टीवर येवून पुन्हा गेला की घर पूर्ण रिकामे झाल्यासारखे वाटते. आम्हालाही दोन दिवस करमत नाही मग. मोठी आईदेखील दादाच्या आठवणीत रडत असते सारखी. आता तू तरी नको ना ग रडूस." अपेक्षा मोनालीची समजूत काढत म्हणाली.

चेहऱ्यावर उसने अवसान आणून मोनाली बळेच हसली.

प्रतिभा काकीने मोनालीला रडताना पाहून टोमणा मारलाच शेवटी.
"ह्या आजकालच्या मुलींना नवऱ्याशिवाय क्षणभर करमत नाही. तरी नशीब सासवा सासुरवास करणाऱ्या नाहीत. आमच्यासारखा त्रास असायला हवा होता ह्यांना म्हणजे मग बरोबर कळले असते. सगळे कसे अगदी मनासारखे आहे तरी भरल्या घरात रडत बसतील."

"नाहीतर काय!" शालिनी काकीनेही लगेचच प्रतिभा काकीच्या बोलण्याला दुजोरा दिला.

"वहिनी तू अजिबात ह्या दोघींच्या बोलण्याकडे लक्ष देवू नकोस. आता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आणि दाखवून दे ह्यांना. त्यांचे तोंड बंद करण्याचा हा एकमेव पर्याय आहे आणि अशी रडत नको ग बसू. तू इतकी विक थोडीच ना आहेस. कशाला उगीच ह्यांना बोलायला संधी देतेस. उठ बरं जा तोंड धुवून ये."
अपेक्षाच्या बोलण्याचा मोनालीला खूपच आधार वाटला. तिला हिंमत मिळाली होती तिच्या शब्दांनी.

त्या दिवसापासून दोघी नणंद भावजय जिवलग मैत्रिणी झाल्या. खरंच ह्या अशा आधाराची मोनालीला खूपच गरज होती त्यावेळी, जो की अपेक्षाने तिला दिला होता.

क्रमशः

करेल का मोनाली स्वतःला सिद्ध? करु शकेल का ती मनासारखा अभ्यास? की शालिनी काकी आणि प्रतिभा काकी आणतील त्यात काही अडथळे? जाणून घेवूयात पुढील भागात.

©® कविता वायकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//