प्रेमाचे सासर भाग ८

नशिबानेच मिळते प्रेमाचे सासर


निखिल आणि मोनालीचे थाटामाटात लग्न झाले. लक्ष्मीच्या पावलांनी सून घरी आली. सत्यनारायण पूजा देखील मोठ्या उत्साहात पार पडली. नवीन जोडपे जोडीने कुलदेवतेच्या दर्शनालाही जाऊन आले.

त्यांनतर पुढचे आठ दिवस शिमल्याच्या निसर्ग सौंदर्याचा आविष्कार एकमेकांसवे जोडीने अनुभवताना प्रेमाचे अनेक सोनेरी क्षण दोघांनीही हृदयाच्या कप्प्यात अगदी अलगदपणे साठवले.

सारे काही स्वप्नवत वाटत होते दोघांनाही. एक वेळ अशी होती की प्रेमाचा त्याग करण्याची देखील तयारी दर्शवली होती निखिल आणि मोनालीने. कारण घरच्यांच्या विरोधात जाऊन कोणतेही टोकाचे पाऊल त्यांना उचलायचे नव्हते. दोन्ही कुटुंबाचा पाठिंबा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्याबरोबरच दोन्ही कुटुंबांचा मान सन्मानदेखील.

विलास काकांनी जेव्हा नकारात्मकता दर्शवली, त्यांच्या प्रेमाला विरोध केला तेव्हा मात्र दोघेही दोन पाऊल मागेदेखील आले. पण, म्हणतात ना जोड्या या आधीच जुळलेल्या असतात, लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात, अगदी तसेच काहीसे झाले होते निखिल आणि मोनालीच्या बाबतीत.

विलास काकांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि अखेर निखिल आणि मोनालीच्या आंतरजातीय प्रेमविवाहाला त्यांनी  हिरवा कंदील दर्शवला. प्रेम करणारे दोन जीव अखेर एक झाले.

"आपण किती भाग्यवान आहोत ना निखिल! वाटलेही नव्हते आजचा हा दिवस आपल्या आयुष्यात कधी येईल, तुझ्यासोबत माझे भविष्य खरंच जोडले जाईल याचा विचार तर मी मनातून काढूनच टाकला होता. स्वप्नातील ही अशी प्रेमाची मिठीही मी अलगद सैल केली होती, सगळी आशाच सोडली होती रे मी. पण देवाचीच कृपा म्हणायची." निखिलच्या प्रेमाच्या मिठीची ऊब मोनालीला बोलायला भाग पाडत होती. कारण, ती स्वतःला खूपच भाग्यवान समजत होती आज.

"प्रेम जर खरे असेल ना तर तर भेटतेच हे मी फक्त फिल्ममधेच पाहिले होते. पण,आज स्वतः प्रत्यक्षात ते अनुभवतोय." मोनाली भोवतीची मिठी अधिक घट्ट करत समाधानकारकपणे सुस्कारा टाकत निखिल बोलला.

"खरं सांगू, खूप इच्छा होती रे तुझ्या एकत्र कुटुंबाचा एक भाग होण्याची आणि देवाने आज माझी ती इच्छा पूर्ण केली, यातच मी भरून पावले बघ. असं प्रेमाचं सासर मिळायलाही भाग्य लागतं रे. एकत्र कुटुंबातील मजा कधी अनुभवलीच नव्हती मी. त्यामुळेच तुझ्या बरोबरच तुझ्या कुटुंबाच्या देखील प्रेमात पडले मी आणि आज परमेश्वर कृपेने त्याच कुटुंबाचा एक भाग देखील झाले.

"आता फक्त माझे नाही तर आपले कुटुंब म्हण." मोनालीला जवळ घेत निखिल बोलला. दोघेही एकमेकांकडे पाहून हसले.

"अगं पण तरीही राहून राहून एक गोष्ट मनाला सलते आहे की, मी विलास काकांना खूप दुखावलंय."

"आता मी आलेय ना..मग मी करेल सगळं व्यवस्थित. तू काळजी करू नकोस आणि काकांनी मोठ्या मनाने आपल्या लग्नाला परवानगी दिली ना यातच सर्व आले."

विश्वासभऱ्या नजरेने निखिलने मोनालीकडे पाहिले आणि समाधानाचे तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकले.

आठ दिवस एकमेकांसोबत प्रेमाचे ते गुलाबी क्षण अनुभवल्यानंतर दोघेही पुन्हा घरी परतले. नव्या प्रेमाची नवी नवलाई दोघांच्याही चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होती. प्रेमाच्या गुलाबी रंगात दोघेही अगदी न्हाऊन निघाले होते जणू.

अनेक सुखद आठवणींची साठवण मनात ठेवून मोनाली आज पहिल्यांदा किचनमध्ये आली. आता खऱ्या अर्थाने निखिल आणि मोनालीच्या संसाराला सुरुवात झाली.

"आई मी काय काम करू?" मोनालीने तिच्या सासूला म्हणजेच प्रमिला ताईंना विचारले.

"आधी चहा पिऊन घे तू मग लाग कामाला आणि निखिल उठला का ग?"

"नाही अजून."

"उठवायचे ना ग मग त्याला. पुन्हा त्याचे कपडे तसेच पडून राहतात बाथरूममध्ये."

"अगं तू कशाला काळजी करतेस आता प्रमिला. त्याची बायको आहे ना. ती धुवून टाकेल तिच्या नवऱ्याचे कपडे." सुमनताई मोनालीला चिडवत म्हणाल्या. तशी मोनालीच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली.

" खरंच मी खूप नशीबवान आहे, हे असं प्रेमाचं सासर मला मिळालं." मनातच मोनाली बोलली.

तेवढ्यात प्रतिभा काकीने तिला आवाज दिला.

"चला सूनबाई, या आता स्वप्नातून बाहेर. घ्या हा कणकेचा गोळा आणि दाखवा जरा तुमच्यातील किचन कौशल्य."

"ही जशी सगळे कौशल्य आत्मसात करूनच इथे आली होती." अपेक्षा अपर्णाच्या कानात हळूच कुजबुजली.

"बघ की! पण हीच्यापेक्षा नक्कीच वहिनी चांगल्या चपात्या करत असणार याची मला खात्री आहे."

शेवटी अपर्णा म्हणाली तसेच झाले. मोनालीने सर्वांच्या अपेक्षांना खरे उतरत गोलाकार चपाती लाटून प्रतिभा काकीचा मनसुभा हाणून पाडला.

दाराच्या आडून निखिलने हलकेच आत डोकावून पाहिले. अंगठा आणि तर्जनी जुळवत तसेच भुवया उंचावत दुरुनच त्याने छान म्हटले. तशी मोनाली लाजली. लाजतच तिने नजर खाली झुकवली.

अपेक्षाने हळूच जाऊन निखिल दादाला टाळी दिली.

"घे म्हणावं आता.. माझी वहिनी आहेच एक नंबर." नजरेच्या खाणाखुणेतूनच दोन्ही भावंडांच्या गप्पा सुरू होत्या.

आज मोनालीचा पहिलाच दिवस होता किचनमधे. त्यामुळे तिला नेमकं काय येतं? याचा अंदाज घेण्यासाठी प्रतिभा काकीने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले होते आणि त्या परीक्षेत तिने पास देखील होवून दाखवले.

आता मोनाली उत्तम चपाती लाटू शकते म्हणजे प्रतिभा सवयीप्रमाणे तिच्यावरच हे काम ढकलून मोकळी होणार याचा प्रमिलाताईंना अंदाज होताच. त्यामुळे प्रतिभा काही बोलायच्या आतच प्रमिला ताईंनी मोनालीला तिथून उठवले.

"मोनाली जा बरं निखिलला आंघोळीसाठी पाणी काढून दे. त्याला काय हवं नको ते बघ जा."

सासूबाईंचे हे वाक्य कानी पडताच मोनालीची कळी खुलली. ती लगेचच तिथून उठली नि लाजतच बाहेर गेली.

"आज तुझ्यामुळे माझी कॉलर ताठ झाली. लय भारी वाटले बघ." निखिल हसूनच मोनालीला म्हणाला.

नवऱ्याची मिळालेली कौतुकाची थाप तिला स्वर्गसुखाचा आनंद देवून गेली. खरंच पुनःपुन्हा ती स्वतःला खूपच भाग्यवान समजत होती.

निखिलच्या एकत्र कुटुंबात मोनाली अगदी काहीच दिवसांत रुळली. सासारच्यांच्या आणि नवऱ्याच्या प्रेमात ती अगदी न्हाऊन निघाली होती.

क्रमशः

मोनालीचा हा आनंद असाच कायम राहणार की त्याला लागेल कोणाची दृष्ट? जाणून घेवूयात पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all