लेकीचे सुख उघड्या डोळ्यांनी जवळून पाहण्याचे भाग्य प्रदीप रावांच्या नशिबातच होते जणू.
निखिल आणि मोनालीच्या खऱ्या प्रेमाची ही खरी ताकद होती. प्रेम म्हटले की त्याग आणि समर्पणाची भावनादेखील असायला हवी. जी की सुरुवातीपासूनच मोनालीच्या मनात खोलवर रुजली होती. पण तिच्या प्रेमाची ताकद इतकी मोठी होती की नशिबानेच तिला तिचे प्रेम आणि तिचे प्रेमाचे सासरदेखील मिळाले होते.
बुरसटलेला जातीयवादाचा पडदा भेदून मोनालीने लक्ष्मीच्या पावलांनी पाटील घराण्यात गृहप्रवेश केला. निखिलला हे सारे स्वप्नवतच वाटत होते. इतके सारे घडून गेल्यानंतर आपल्याला आपले प्रेम मिळेल ही आशा निखिलने तर सोडूनच दिली होती.
एकत्र कुटुंब म्हटले की विविधांगी स्वभावगुणांच्या माणसांना एकाच छताखाली राहणे भागच असते. अशावेळी मतभेद, भांडणतंटा यांमुळे त्या घराचा पाया डळमळण्याची दाट शक्यता असते. निखिलच्या घराचेही तसेच काहीसे होते की काय असे क्षणभर वाटले होते. परंतु, आता नव्या नवरीच्या आगमनाने पुन्हा एकदा घरात उत्साहाचे वातावरण पसरले.
असे असले तरीही या आनंदाला शालिनी काकी आणि प्रतिभा काकीच्या तिरसट, हेकेखोर स्वभावामुळे गालबोट लागण्याची दाट शक्यता होती. दोघींचाही या लग्नाला कडाडून विरोध होता. दोघींच्याही चेहऱ्यावरील नाराजी मोनालीने अचूक हेरली.
लग्नानंतर पहिल्या दोनच दिवसांत अप्रत्यक्षरीत्या मोनालीच्या सासुरवासाला जणू सुरुवात झाली.
दुसऱ्या दिवशी घरात सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते. पाहुणेरावळे येणार म्हणून लग्नगडबडीत अस्ताव्यस्त झालेले घर स्वच्छ करण्यासाठी प्रतिभा काकीने मोनालीला सांगितले.
"चला सूनबाई थोडी मदत करता का आम्हाला?" प्रतिभा काकीने मोठया तोऱ्यातच विचारले मोनालीला.
"अगं आल्या आल्या तिला कामाला लावतेस का आता?"सुमन ताईने सुनेची बाजू उचलून धरली.
सुमन ताईने मोनालीची बाजू घेतली, हे पाहून प्रमिला ताईंच्या चेहऱ्यावर मात्र हास्यलकेर उमटली.
"मी जे भोगले ते माझ्या सुनेला तरी भोगायला लागू नये," एवढीच त्यांची अपेक्षा होती.
"मी जे भोगले ते माझ्या सुनेला तरी भोगायला लागू नये," एवढीच त्यांची अपेक्षा होती.
"झालंय ना आता सगळं मनासारखं मग एवढे तर ती करुच शकते. हो ना सूनबाई." सुमन ताईने मोनालीची बाजू उचलून धरताच प्रतिभा काकीने लगेचच तिला टोमणा मारला.
"काही हरकत नाही, करते की मी. तशीही मला सवयच आहे या साऱ्याची." हसूनच मोनाली उत्तरली. पदर खोचून मग ती लगेच कामाला लागली.
"स्वतः कधी हातात झाडू घ्यायचा माहित नाही हिला आणि वहिनीवर कसा रुबाब झाडत आहे बघ." विश्वनाथ काकांची मुलगी अपेक्षा तिच्या लहान बहिणीच्या अपर्णाच्या कानात पुटपुटली. दुरुनच दोघीही प्रतिभा काकीची गंमत पाहत होत्या. अपर्णा कॉम्प्युटर क्लासला जायचे म्हणून आवराआवर करत होती.
"हे उचलून तिकडे वर ठेवून दे, खुर्च्या एकात एक घालून त्या कोपऱ्यात ठेव म्हणजे पसारा कमी दिसेल. तेवढे झाले की मग पलीकडच्या रुममधील पसारा आवरून तिथेही झाडू मारून घे." प्रतिभा काकी फक्त हुकूम सोडत होती. स्वतः एका कामाला हात लावत नव्हती.
मोनालीने देखील न लाजता झाडू हातात घेतला. हातावरील मेहंदी हळदीच्या पिवळसर रंगात आणखीच उठून दिसत होती. हातातील हिरवा चुडा, पायातील पैंजण आणि जोडवी या साऱ्यामुळे मोनालीच्या सौंदर्यात भरच पडली होती. तिच्या गोऱ्यापान रंगाला जांभळ्या रंगाच्या साडीने अजूनच खुलवले होते. आता खरी गृहलक्ष्मी ती शोभत होती.
मोनालीलाही आज स्वतःच्या सौंदर्याचा खूपच हेवा वाटत होता. आनंदाच्या भरात तिने भरभर सारे काम आटोपले. पाच ते सहा खोल्या पसारा आवरून झाडून तिने स्वच्छ केल्या. हक्काच्या घरात आज हक्काने प्रतिभा काकीने तिला काम सांगितले याचाच तिला आनंद वाटत होता.
"मनापासून काम केले तर काकीच्या मनातील माझ्याबद्दलचा राग तरी कमी होईल," ही वेडी आशा मनाशी बाळगून आनंदाच्या भरात ती झटपट काम करत होती.
"कामाची आहे हो आमची सूनबाई. बरं चल आता मी पाणी देते तुला, पुसून घे सगळ्या खोल्या." एक काम पूर्ण होते ना होते तोच प्रतिभा ककीने पुढचे फर्मान सोडले.
"ह्या काकीचं काय डोकं फिरलंय का? जीव घे म्हणावं आता तिचा." निखिलचा मात्र आता संताप संताप होत होता. मोनालीसाठी त्याचा जीव खालीवर होत होता. आता जाऊन तिला कामात मदत करावी असे वाटत होते त्याला पण मर्यादेची बंधने आडवी येत होती.
"अरे दादा, तिचे केव्हापासून सुरू आहे हे. वहिनी बिचारी ऐकते म्हणून तिचे वाढतच चालले आहे. माझी क्लासची तयारी झाली तरी हिच्या ऑर्डर काही संपायचे नाव घेईनात.
"अप्पू! जा ना मोनाला मदत कर थोडी. मी सोडतो तुला नंतर क्लासला. मी जर तिथे गेलो तर काकी चार वाक्य सुनावील मला." केविलवाण्या सुरात निखिल बहिणीला म्हणाला.
"वहिनी दे मी पुसते राहिलेले." निखिलच्या सांगण्यावरून लगेचच अपेक्षा मोनालीला मदत करण्यासाठी सरसावली.
"तुझे काय ग मधेच? जा ना तुला क्लासला उशीर होतोय ना आणि एवढा चांगला ड्रेस घालून फरशी पुसणार का आता?" प्रतिभा काकीने अपेक्षाला सुनावले.
"हो! मला नाही फरक पडत त्याने. वहिनी इकडे दे ते कापड."
"ताई राहू द्या ना मी करते. तुमचा ड्रेस खराब होईल ओ. तुम्हाला क्लासला उशीर होईल पुन्हा आणि तशीही मला सवय आहे या साऱ्याची."
"अगं किती दगदग झालीये तुझी. गेल्या पाच सहा दिवसात शांत झोपलीही नसशील आणि आजही पुन्हा जागरण गोंधळ. आम्ही तरी थोडा वेळ पडलो होतो. ऐक माझे दे इकडे ते. राहिलेल्या दोन रुम पुसते मी."
आग्रह करून अपेक्षाने मोनालीच्या हातातील कापड घेतले आणि राहिलेल्या दोन रुम पुसून काढल्या."
"मोनाली.. जा तू आतमध्ये जावून पड थोडा वेळ. रात्री पुन्हा जागरण करावे लागेल. उगीच आजारी पडशील." सुमन ताईच्या बोलण्याने मोनालीच्या जणू जीवात जीव आला. कारण तिलाही आरामाची खूपच गरज होती.
"घ्या घ्या आतापासूनच डोक्यावर घ्या तिला." प्रतिभा काकीला मात्र सुमन ताईचा रागच आला.
मोनालीलाही आता खूपच थकल्यासारखे वाटत होते. कधी एकदा अंग टाकते असे झाले होते तिला. थोडा वेळ आराम केला तेव्हा कुठे तिला बरे वाटले.
सायंकाळी आनंदी वातावरणात सत्यनारायण पूजा पार पडली. दिव्यांच्या झगमगाटात लग्न घर अगदी उठून दिसत होते. नवरा नवरीच्या चेहऱ्यावरील तेजही ओसंडून वाहत होते.
पाहुण्यांमधे एकच चर्चा सुरू होती, जोडा अगदी लाखात एक शोभून दिसतोय.
मधेच एका कोपऱ्यातून कुजबूज कानावर येत होती.
"निखिलपेक्षा नवरी नक्कीच उजवी आहे पण हीच मुलगी जर आपल्या जातीची असती तर कार्यक्रमाला आणखीच रंग चढला असता." दूरच्या नात्यातील निखिलची आजी शालिनी काकी आणि प्रतिभा काकीशी दबक्या आवाजात बोलत होती. हे नेमकी शेजारी उभ्या असलेल्या निखिलच्या दोन्ही बहिणींनी ऐकले.
"आता आपलेच नाणे खोटे असेल तर बोलणार तरी काय ना?" लागलीच प्रतिभा काकीने आगीत तेल ओतले.
"आता लग्न झाले तरी ह्यांचे अजूनही तेच सुरू आहे." अपर्णा अपेक्षाच्या कानात पुटपुटली.
"हो ना अगं! कंटाळा पण कसा येत नाही मी म्हणते. त्यात ह्या दोघी अजून आगीत तेल ओतायला आहेतच. तेव्हढेच चांगले जमते म्हणा त्यांना." अपेक्षा रागातच बोलली.
इतके सगळे चांगले होऊनही फक्त जातीपातीचे राजकारण सुरू होते घरात. शिकलेलेच लोक असे अडाण्यासारखे वागत होते.
क्रमशः
मोनालीचा कसा लागेल आता पाटलांच्या घरात निभाव? थांबेल का हे जातीभेदाचे राजकारण? जाणून घेऊयात पुढील भागात.
©®कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा