"अरे! मुलगा तुझा.. निर्णय तुझा. मी कोण मध्ये बोलणारा? जेवढे माझे कर्तव्य होते तेव्हढे मी आनंदाने पार पाडले. आता तुमचा निर्णय घेण्यास तुम्ही मोकळे आहात नाही का?" विलास काकांनी नाराजीच्या सुरातच उत्तर दिले.
"हे बघ माझ्यापेक्षाही तुझा जास्त अधिकार आहे निखिलवर. तुझ्यामुळेच त्याचे भविष्य मार्गी लागले. हे मीही मान्य करतो ना. पण प्रदीपसुद्धा तुझाच मित्र आहे. त्यालाही तू जवळून ओळखतोस. त्याच्या मुलींना तर माझ्यापेक्षाही जास्त तू ओळखतोस. मग फक्त जातीवरून अडून राहण्यात काही अर्थ आहे का?"
"अरे! ती एक गोष्ट जर जुळत असती तर मी स्वतः निखिलचे स्थळ घेवून प्रदीपच्या घरी गेलो असतो. वाजतगाजत त्याची मुलगी सून करून घरी आणली असती. पण, आता जर आपण असे केले ना तर हा समाज शेण घालील आपल्या तोंडात, हे कसे समजत नाही तुला?"
"कोणत्या समाजाबद्दल बोलत आहेस तू विलास?" विश्वनाथ काकांनीही अखेर चर्चेत सहभाग नोंदवला.
"अरे! मागे जेव्हा तुझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा कुठे गेला होता हा समाज? तेव्हा वेळेला धावून येणारा देखील हा प्रदीपच होता, हे विसरू नको. त्यावेळी हा समाज फक्त बघ्याची भूमिका घेऊन मजा पाहत होता. जेव्हा तुला रक्ताची गरज होती तेव्हा आमच्या आधी तो हजर होता दवाखान्यात तुला रक्त देण्यासाठी. तेव्हा का म्हणाला नाहीस, नको रे बाबा तुझे रक्त नाही चालणार मला! कारण आपली जात वेगळी आहे."
झरझर दहा वर्षांपूर्वीचा तो प्रसंग विलासरावांच्या डोळ्यांसमोर तरळला. सर्रकन त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला.
"खरंच, त्यावेळी प्रदीप होता म्हणून मी आज इथे आहे. नाहीतर..." नुसत्या विचारानेच विलासरावांच्या मनात धस्स झाले. शरमेने त्यांची मान खाली गेली. हे दोघेही चुकीचे बोलत नाहीत. हे विलासरावांच्या लक्षात आले आणि ते खोल विचारांत गुंतले.
"जात, धर्म, पत्रिका पाहून लग्न जुळवली म्हणजे संसार सुखाचा होतोच असे नाही. नुसते विचार जरी जुळले तरी आयुष्य आनंदाने जगता येते विलास. फक्त मान, प्रतिष्ठा यासाठी आंतरजातीय विवाहाला विरोध करणाऱ्या पालकांची काही कमी नाही या समाजात. मग नाईलाजास्तव मुलांनाही आपल्यासारखे पालकच चुकीचे पाऊल उचलायला भाग पाडतात. आधी नाही नाही म्हणणारे पालकच मग कालांतराने दुरावलेल्या आपल्या पिल्लांना कवेत घेण्यासाठी सज्ज होतात. अशी उदाहरणे काही कमी नाहीत या समाजात. पुढे जाऊन जर हे असेच होणार असेल तर मग आताच मुलांच्या आनंदात आनंद मानायला काय हरकत आहे? त्यांचे आयुष्य जगू देवूयात ना त्यांना त्यांच्या पद्धतीने. तसेही या समाजाचे काय घेवून बसलास? नावे ठेवणारे ठेवतच राहणार. हाच समाज पायीही चालू देणार नाही आणि घोड्यावरदेखील बसू देणार नाही."विश्वनाथ काका पोटतिडकीने बोलत होते.
तेवढ्यात दरवाजात आनंदराव उभे. आनंदराव म्हणजे निखिलचे सर्वात लहान काका. सोबत प्रतिभा काकीदेखील होती.
"पण मी काय म्हणतो, त्याच मुलीला काय सोनं लागलंय का? जातीबाहेरची मुलगी घरात आणायची नाही हे विलास भाऊचे म्हणणे योग्यच आहे. कशाला उगीच त्याला भरीस पाडताय?"आनंदराव येताचक्षणी कडाडले.
"हे बघ आता तू यात पडू नकोस आनंद." विश्वनाथ काका थोडे रागातच बोलले.
"आम्हालाही हे लग्न मान्य नाही." शालिनी काकी आणि प्रतिभा काकी दोघींनीही आपापली मते नोंदवली.
"मोठया मुलाला ही अशी सुट दिली म्हणजे घरातील इतर मुलांनाही रान मोकळेच झाले नाही का?" प्रतिभा काकी चरफडतच बोलली.
"आता एवढा तमाशा डोळ्यांदेखत घडत असताना पुढे जाऊन कोणी ही अशी हिम्मत करेल असे मला तरी वाटत नाही." कधीही चर्चेत स्वतःचे मत न नोंदवणाऱ्या सुमन काकीनेही न राहवून आज तिचे मत मांडलेच.
घरातील काहींचा निखिल आणि मोनालीच्या आंतरजातीय विवाहाला पाठिंबा होता तर काहींचा विरोध.
विलासराव सुन्न होवून खिडकीतून एकटक बाहेर पाहत होते. इतर कोणी कितीही मत मांडले तरी त्यांच्या निर्णयाशिवाय हे लग्न होणे शक्यच नाही हे सर्वानाच माहीत होते.
अखेर खूप विचाराअंती त्यांनी फर्मान सोडले, "प्रदीपला घ्या बोलावून. करूयात लग्नाची बोलणी."
आनंदराव, शालिनी काकी आणि प्रतिभा काकी सोडली तर घरातील प्रत्येकाचा उर आनंदाने भरून आला. विलास काकांनी निखिल आणि मोनालीच्या लग्नाला अखेर मान्यता दिली. मनातून जरी ते नाराज असले तरी विश्वनाथ काकांचे बोलणे त्यांना पटलेले दिसत होते.
जातीपातीची सर्व बंधने झुगारून अखेर निखिल आणि मोनालीच्या लग्नाला हिरवा कंदील मिळाला होता.
माधवरावांनी लगेचच फोन करून प्रदिपरावांना म्हणजेच मोनालीच्या वडिलांना बोलावून घेतले. त्यांच्यापुढे हा लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्यांना या गोष्टीची आधीच कल्पना असल्यामुळे त्यांनी जास्त आढेवेढे न घेता लगेचच प्रस्ताव मंजूर केला.
दोनच दिवसांत निखिल आणि मोनालीच्या लग्नाची सुपारी अखेर फुटली. दोन्ही घरी आनंदाचे वातावरण होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिभा काकी तणतण करत घरात आली.
"म्हणत होतो आम्ही दुसऱ्या जातीची पोर घरात आणताना जरा भान ठेवा म्हणून. आता लोकांच्या तोंडाला कोण हात लावणार? वाटेल ते ऐकून घ्यावे लागणार आता. जरा चार भिंतीच्या बाहेर पडा म्हणजे कळेल बाहेर काय चाललंय ते. समाजात आम्हाला वागायचे आहे. ह्यांना काय घरात बसून नुसत्या भाकरीच तर थापायच्यात. जग काय म्हणतंय? याच्याशी थोडीच ना काही घेणंदेणं असणार आहे." प्रतिभा काकी प्रमिला ताईंना टोमणा मारायची एक संधी सोडत नव्हती.
"हो का...तू गेली होतीस ना चार भिंतीच्या बाहेर? मग तू ऐकले तेवढे पुरेसे नाही का? घरात येवून तमाशा करायची काही गरज आहे का? आता जगाचा विचार सुचतोय ह्यांना." विश्वनाथ काका रागातच बोलले.
"अरे बस करा! हा विषय कालच संपलाय ना? मग आता तेच तेच बोलायची काही गरज आहे का? जग काय म्हणतंय? हे विसरा आता. यापुढे या विषयावर घरात अजिबात चर्चा नकोय मला." न राहवून विलास काका बोलले.
पुढे काही दिवसांतच लग्नाचा उत्तम मुहूर्त पाहून निखिल आणि मोनालीचा सर्वांच्या संमतीने थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला.
जातीपातीची सारी बंधने झुगारून ह्या विवाहाला घरच्यांनी संमती दिली, त्याबद्दल समाजातून त्यांचे कौतुक होऊ लागले. नावे ठेवणारे तसेही नावे ठेवतच होते आणि पुढेही ठेवतच राहणार. परंतु,आज दोन सुशिक्षित कुटुंब एकत्र आले होते. दोन उच्वशिक्षित वधू वर उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सज्ज झाले होते आणि त्यात काही वावगेही नव्हते. जातीपातीच्या बंधनात अडकून परंपरांचे जोखड मानेवर घेवून, जग काय म्हणेल? ह्या एका विचारात अडकून बसण्यापेक्षा पुढच्या पिढीच्या दृष्टीने काय योग्य नि काय अयोग्य? हा विचार करून योग्य तो निर्णय घेणे केव्हाही चांगले. जे की विलास काकांनी करून दाखवले होते. आंतरजातीय विवाहाला मान्यता देवून समाजाला एक नवी शिकवण दिली होती.
क्रमशः
अखेर मोनालीला तिचे प्रेमाचे सासर मिळाले जरी असले तरी शालिनी काकी आणि प्रतिभा काकी तिला मनापासून स्वीकारतील का? जाणून घेवूयात पुढील भागात.
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा