प्रेमाचे सासर भाग ५

नशिबानेच मिळते प्रेमाचे सासर.


दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळे उठायच्या आतच निखिल जायला निघाला. आई वडिलांचा आशीर्वाद घेवून भरल्या डोळ्यांनी त्याने घराचा उंबरा ओलांडला.

प्रमिलाताई आणि माधवराव केविलवाण्या नजरेने अपराधी पणाच्या भावनेतूनच लेकाला निरोप द्यायला दारापर्यंत आले. सगळेजण आपापल्या खोलीत झोपले होते.

"आता पुन्हा कधी येशील रे बाळा?" भरल्या डोळ्यांनी प्रमिला ताईंनी लेकाला प्रश्न केला.

"नाही माहित आई. पण तू काळजी करू नकोस. मी पैसे पाठवत जाईल. स्वतःची काळजी घे. वेळेवर जेवण करत जा आणि औषधेही वेळेवर घेत जा. नुसते काम काम नको करत राहू. जरा स्वतःकडेही लक्ष दे. फक्त विश्वास ठेव माझ्यावर तुझा लेक चुकीचे काहीही करणार नाही. घरच्यांच्या शब्दाबाहेर सुद्धा जाणार नाही. पाटील घरण्याचे संस्कार धुळीला मिळणार नाही, याची मी नक्कीच काळजी घेईल. फक्त माझ्या भावना समजून घ्यायला हव्या होत्या गं काकांनी. हे असे काही होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते गं. आतापर्यंत माझे कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि यापुढेही राहील अशी मनाला खात्री होती. त्यामुळेच भावनेच्या भरात मनातील गुपित विलास काकांना सांगून मोकळा झालो."

प्रमिला ताईंच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. आतापर्यंत आपण लाचारासारखे जीवन जगत आलो आणि अजूनही तेच आपल्या नशिबी आहे, याचेच त्यांना वाईट वाटत होते. जन्मदात्या लेकावर अन्याय होत असताना आपण काहीच करू शकत नाही याचीच टोचणी त्यांच्या मनाला लागली होती.

सोपे नव्हते एकत्र कुटुंबात उभे आयुष्य काढणे, सतत एखाद्याच्या दबावाखाली वावरणे. प्रमिला ताईंनी आणि माधवरावांनी आपल्या दोन्ही लेकरांसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतोनात कष्ट उपसले. गरीबी तर जणू त्यांच्या पाचवीलाच पुजली होती. माहेरची दुबळवाडी म्हणून तर सासरी हीन वागणूक मिळत गेली प्रमिला ताईंना. आता माझ्या सुनेच्या वाट्याला तरी असे दिवस येऊ नयेत, त्यामुळेच सून मोठया घरची असावी अशी त्यांची मनोमन इच्छा होती.

माधवराव देखील शांतपणे हाताची घडी बांधून लेकाच्या बाजूला उभे होते. डोळ्यांत लेकाच्या झालेल्या अपमानाची आग आणि स्वतःवर लागलेल्या नाकर्तेपणाची लाजिरवाणी लकेर त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

"तू काळजी करू नकोस निखिल, मी बघतो काय करायचे ते. शेवटी माझेही हात उपकाराच्या ओझ्याखाली दडपले गेले आहेत रे. तू नक्कीच समजून घेशील तुझ्या या नाकर्त्या बापाला अशी आशा आहे."

"दादा..काहीही काय बोलताय! आतापर्यंत तुम्ही जो त्रास सहन केलाय ना त्याची कल्पना आहे मला. मान्य आहे विलास काकांनी माझे भविष्य घडवले. पण एकीकडे तुम्ही शेतात राबत होताच ना. त्याबदल्यात त्यांनी हे केले. आता मी माझ्या आयुष्याचा जोडीदार देखील त्यांच्या मर्जीनेच निवडायचा का? आयुष्य माझे आहे दादा. आईला आणि तुम्हाला प्रेमाने सांभाळणारी, माझ्या भावाला जीव लावणारी मुलगीच मी पसंत करणार ना? जात पात धरून बसलोत तर सोन्यासारखी मुलगी हातची निघून जाईल. प्रदीप काकांना तर तुम्ही ओळखताच आणि त्यांच्या मुलींनाही. मुलगी एम.कॉम झालेली आहे. आज ना उद्या बँकेत नोकरीला लागेल, त्यात सुसंस्कारी. मग या सर्व गोष्टी मनासारख्या असताना जातीपातीचे राजकारण कशासाठी हवे?" निखिल पोटतिडकिने बोलत होता.

"सगळं पटतंय रे बाळा मला. पण हे खेडेगाव आहे. इथे इतक्या सहजासहजी ह्या गोष्टी नाही मान्य होत कोणाला. लोक नावे ठेवतात. त्यात आपले पाटील घराणे. मग काय लोकांना तर बोलायलाच होईल हे सगळे."

"पण दादा मला एक सांगा, काल जे झाले ते योग्य होते का? नसेल पटत माझं बोलणं तर विलास काकांनी सरळ नाही म्हणून सांगायचे होते. शेजारी पाजारी फुकटचे आमंत्रण धाडून मोनालीची आणि माझी इज्जत वेशीला टांगली गेली. माझे ठीक आहे ओ, कारण मी मुलगा आहे ना..पण तिचे काय? उद्या गावच्या वेशीवर ही चर्चा रंगेल. मग तिचे लग्न जमण्यात ही आडकाठी नाही ठरणार का? अहो, एकवेळ मी चुकीचा वागेल पण ती माझ्या चुकीत कधीच माझी साथ देणार नाही. जात पात सोडा काकांना म्हणावं कारण ह्या अशा विचारांची मुलगी मिळायलाही भाग्यच लागतं."

"तू टेन्शन नको घेऊ, सध्या थोडे दिवस जाऊ दे. वातावरण थोडे निवळले की मी प्रदीपसोबत पण बोलतो आणि घरातील  प्रत्येकाचे काय मत आहे तेही पाहतो. तू जा आता सावकाश. नितेश जा रे बाबा त्याला सोडून ये." माधवराव धाकट्या लेकाला म्हणाले.

निखिल गेल्यावर प्रमिला ताईंच्या डोळ्यांतील पाणी थांबायचे काही नावच घेईना.

"रात्री लेकरु नीट जेवलेही नाही आणि आताही तसेच बाहेर पडले. देवा! कृपादृष्टी ठेव रे माझ्या लेकरावर." म्हणत प्रमिला ताई आत निघून गेल्या.

दुसऱ्या दिवशी निखिलने घडलेला सर्व वृत्तांत मोनालीला कथन केला. तिला वाईट वाटणे स्वाभाविक होते. पण सर्वात जास्त वाईट तिला या गोष्टीचे वाटले की, "आजही एकविसाव्या शतकात देखील या जाती पातीच्या बंधनांचा पगडा इतका खोलवर रुजला आहे की माणसाने कितीही प्रगतीची उड्डाणे जरी घेतली तरी माणूस या जातीपातीच्या बेड्यांतून स्वतःची मुक्तता काही करून घेणार नाही आणि त्यात त्याला स्वारस्य देखील नाही." मोनालीला लोकांच्या या अशा विचारांची प्रचंड चीड येत होती.

मोनालीने शेवटी निखिलची समजूत काढली. त्याला धीर दिला.
"काळजी करू नकोस...इतका मोठा ऑफिसर तू आणि असा लहान मुलासारखा वागतोस होय. हे बघ! जे नशिबात आहे ते कोणालाही कधीही चुकले नाही. त्यामुळे रिलॅक्स! आहे ती परिस्थिती स्वीकारायची असे आपण आधीच ठरवले होते ना? मग नको जास्त वाईट वाटून घेवूस. आपली मैत्री तर कायम राहणार आहे. तिथे नाही आपल्याला कोणी अडवू शकत."

"नको गं इतकी समजुतदारपणे वागून मला आणखी तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडूस."

डोळ्यांतील अश्रू लपवत मोनाली खंबीर असल्याचा जरी आव आणत असली तरी आतून मात्र ती पूर्णपणे तुटली होती. राग येत होता तिला या जातीयवादाचा. ज्यामुळे तिला तिच्या प्रेमाचा त्याग करावा लागणार होता.

त्यानंतर शालिनी काकी आणि विलास काकांनी निखिलचे नाव सुद्धा काढले नाही घरात. दिवसाआड फोन करून निखिलची खुशाली विचारणारी शालिनी काकी इतकी कशी पाषाण हृदयी झाली देवच जाणे.

विश्वनाथ काकांची मुलगी अपेक्षा ही वरचेवर निखिलला फोन करून घरची खुशाली कळवत होती. अधूनमधून नितेशचा देखील फोन व्हायचा त्याला. घरचे वातावरण आता निवळले होते. पूर्ववत सगळे सुरू झाले होते.

योग्य वेळ पाहून माधवरावांनी विलासरावांजवळ पुन्हा एकदा तोच विषय घेतला. त्याआधी मोनालीच्या वडिलांशी देखील त्यांचे बोलणे झाले होते.

"जातीपाती पेक्षाही माझ्या लेकीचे सुख माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. पण विलास जर या लग्नाला तयार असेल तरच मी देखील विचार करेल नाहीतर हे सगळे इथेच थांबवलेले बरे." मोनालीच्या वडीलांनी स्पष्टच सांगितले.

माधवराव खूप विचार करून मगच  विलासरावांशी बोलायला आले होते.

"हे बघ विलास! फक्त जात आडवी येते म्हणून जर तू लग्नाला नकार देत असशील तर खरंच ते मला पटत नाही बघ. अरे! अशी मुलगी शोधूनही सापडणार नाही रे. फक्त एका गोष्टीवरून अडून राहण्यात काही अर्थ आहे का तूच सांग बरं?"

विलासराव शांतपणे फक्त ऐकून घेत होते.

क्रमशः

आता काय असेल विलास काकांचे उत्तर? जाणून घेऊयात पुढील भागात.